Sunday, September 06, 2026

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन






 


४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…!

========================

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या डोळ्यांत दाटला आठवणींचा पाऊस…

५ सप्टेंबर २०२६… रात्रीचे सात वाजले होते.स्थळ होते — रघुनाथ यादव यांचे नवीन घर.नेहमीसारखी ती एक साधी संध्याकाळ नव्हती…ना तो केवळ मित्रांचा गेट-टुगेदर होता…ना तो फक्त जुन्या वर्गमित्रांच्या भेटीचा कार्यक्रम होता…ती होती तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा गुरु-शिष्यांच्या नात्याला उजाळा देणारी, आठवणींना जागवणारी आणि मनाला आतून हलवून टाकणारी एक अविस्मरणीय संध्याकाळ!

ज्यांच्या हातून अक्षरओळख झाली, ज्यांनी जगण्याचे धडे दिले, ज्यांनी गरीब परिस्थितीतही शिक्षणाची वाट दाखवली, अशा आपल्या तत्कालीन गुरुजनांना भेटण्यासाठी ४२ वर्षांपूर्वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले होते.

कोणी पुण्याहून आले होते…कोणी मुंबईहून…कोणी दूरवरून कुटुंबासह  आले होते…वर्षे बदलली होती… चेहरे बदलले होते… प्रत्येकाच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या बदलल्या होत्या… पण गुरुंबद्दलची श्रद्धा आणि वर्गमित्रांबद्दलची मैत्री मात्र तशीच होती!

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेचा अभिषेक….....कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.त्यानंतर आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या तत्कालीन शिक्षकांना आणि वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्या क्षणी वातावरण काहीसे गंभीर झाले…जवळ असलेले अनेक चेहरे आठवले…कधी वर्गात आपल्या शेजारी बसलेले मित्र आठवले…शिक्षकांचा प्रेमळ आवाज आठवला…आणि क्षणभर ४२ वर्षांचे अंतर जणू विरघळून गेले.

यानंतर तत्कालीन अध्यापन करणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक आदरणीय आप्पासाहेब पाटील, शंकर पाटील आणि संपत पाटील या गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण सत्कार केला.यावेळी शिक्षक दिनानिमित्त सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे धनाजी माने यांचा व सरळ सेवेतून शिक्षिका म्हणून निवड झालेली साक्षी गावडे या दोघांचाही यावेळी सत्कार  करण्यात आला

गुरुंचे पाय धुऊन त्यांचे पूजन करण्यात आले.कपडे, शाल, श्रीफळ आणि मूर्ती भेट देऊन गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.हा केवळ सत्कार नव्हता…

तो होता —“गुरुजी, तुम्ही आम्हाला जे दिलंत, त्याची परतफेड या जन्मात कधीच होऊ शकणार नाही; पण तुमच्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही मनापासून जपली आहे…”

या भावनेचा एक छोटासा प्रयत्न! गुरुंच्या चरणी नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.कार्यक्रमातील अनेक क्षणांपैकी एक क्षण म्हणजे माजी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना.आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले —“आयुष्यात अनेक विद्यार्थी घडवले. त्यातील  काही विद्यार्थी आजही आमच्या वार्धक्यात स्मरणात आहेत. आपल्या हलाखीच्या गरीब परिस्थितीतही येलूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून त्यावेळी आमचाही त्यांनी मान वाढवलेला होता असे  विद्यार्थीही आज येथे आहेत.त्यांनी विविध क्षेत्रात आपला नावलौकिक केला आहे.याचा गुरु म्हणून मलाही अभिमान वाटतो.”

गुरुंच्या मुखातून आपल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या संघर्षाची आठवण ऐकताना अनेकांच्या मनात जुन्या आठवणींचा पट उलगडत गेला.गुरु आपल्या विद्यार्थ्यांना विसरत नाहीत…कारण विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांच्या आयुष्याचे खरे प्रमाणपत्र असते !

४२ वर्षांनंतरही मैत्रीचा धागा तुटला नव्हता…..काळ कितीही पुढे गेला तरी काही नाती काळाच्या ओघात विरत नाहीत.शाळा सुटली…गाव बदलले…नोकऱ्या लागल्या…कोणी शेतीत रमले.....मुले मोठी झाली…कोणी मुंबईला गेले…कोणी बाहेर देशात गेले....पुन्हा मायभूमीत परतले...कोणी पुण्याला स्थायिक झाले…पण मनाच्या एका कोपऱ्यात “आपला वर्ग… आपले मित्र… आपले गुरुजी…”  हे जग कायम तसेच राहिले.

या कार्यक्रमात  व्यासपीठावर येऊन गुरुजनांबद्दलच्या संस्कारित, गोड आणि मनाला भिडणाऱ्या आठवणी सांगितल्या.

कधी हशा पिकला…कधी जुन्या खोड्या आठवल्या…कधी एखाद्या मित्राची आठवण झाली…गुरुजनांचा मार आठवला...हयात नसणारे धिप्पाड शरीराचे, शिस्तप्रिय व गणितामध्ये हातखंडा असणारे कै.राजाराम पाटील गुरुजी यांच्या आठवणींनी व काळाच्या पडद्याआड झालेल्या मित्रांच्या आठवणींनी  डोळे पाणावले.बालपणीचे ते निरागस दिवस जणू पुन्हा एकदा सर्वांना जगता आले.

गोड जेवणापेक्षा गोड होत्या आठवणी…कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे गोड जेवणाचा आस्वाद घेतला.पण खरी मेजवानी होती ती आठवणींची! जेवण झाल्यानंतरही कोणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या.आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या आठवणी शेअर झाल्या.“काय दिवस होते ते…”

“आठवतंय का गुरुजी असं म्हणाले होते…असा मार खाल्ला, असे इंग्रजी त्यांनी शिकवले...अशी गाणी शिकवली .... अशी गणिते शिकवली...आपण त्या वेळी असं केलं होतं…”

अशा असंख्य आठवणींनी रात्र सरत गेली.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते…पण निरोपाची वेळ आली तेव्हा मात्र मन जड झाले. “पुन्हा लवकर भेटू…” असे म्हणत प्रत्येकाने एकमेकांचा निरोप घेतला.गाड्या निघून गेल्या…रस्ते शांत झाले…रात्र गडद झाली…पण त्या घरात घडलेल्या आठवणींचा उजेड मात्र प्रत्येकाच्या मनात कायमचा राहिला.दोन महिन्यांची मेहनत… आणि एका अविस्मरणीय दिवसाचे स्वप्न साकार झाले ! हा कार्यक्रम  यशस्वी होण्यामागे अनेकांची मेहनत होती.गेली दोन महिने या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच रामचंद्र पवार (नाना), रघुनाथ यादव,पंचायत समिती सदस्य प्रदिप कांबळे, केमिकल इंजिनिअर -दीपक पवार आणि त्यांचे सर्व वर्गमित्र मैत्रीणी झटत होते.

कोणाला फोन करायचा…कोणाला प्रत्यक्ष भेटायचे कोणाचा संपर्क शोधायचा…मुंबई-पुण्यातील मित्रांशी संपर्क साधायचा…गुरुजनांना कार्यक्रमासाठी आणायचे…या सर्वांसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अखेर फळाला आले.एकेक मित्र जोडत गेले…एकेक आठवण जागी होत गेली…आणि अखेर ४२ वर्षांनी संपूर्ण वर्ग एकाच छताखाली जमला!

गुरु-शिष्य नाते… काळाच्या पलीकडचे!

आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात नाती जपणे कठीण झाले आहे.मोबाईलमध्ये शेकडो संपर्क असतात; पण मनापासून बोलण्यासाठी वेळ नसतो.सोशल मीडियावर हजारो मित्र असतात; पण मनातील आठवणी शेअर करण्यासाठी माणसे कमी पडतात.अशा काळात ४२ वर्षांनी एकत्र येऊन आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होणारे हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने समृद्ध आहेत.कारण त्यांनी केवळ आपल्या गुरुंचा सत्कार केला नाही…तर त्यांनी आपल्या बालपणाचा, आपल्या संस्कारांचा, आपल्या शाळेचा आणि आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या त्या दिवसांचा सत्कार केला!

गुरुजी, तुम्ही दिलेल्या संस्कारांची शिदोरी आजही आमच्याजवळ आहे…

गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारी व्यक्ती नव्हे.

गुरु म्हणजे परिस्थितीशी लढण्याची जिद्द.

गुरु म्हणजे आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ.

आज ४२ वर्षांनंतरही आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली—शाळा सुटते…पण गुरुंचे संस्कार कधीच सुटत नाहीत! वर्ग सुटतो…पण वर्गमित्रांची मैत्री मनातून कधीच सुटत नाही.काळ पुढे जातो…पण बालपणाच्या आठवणी मनाच्या वहीत कायमच्या कोरल्या जातात.हा केवळ स्नेहमेळावा नव्हता…

हा कार्यक्रम होता—गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देणारा,मैत्रीच्या नात्याला पुन्हा उजाळा देणारा,हरवलेल्या आठवणी शोधून काढणारा,

आणि गेलेल्या काळाला पुन्हा एकदा स्पर्श करून देणारा…एक अत्यंत भावूक, संस्कारित आणि अविस्मरणीय सोहळा!

४२ वर्षांपूर्वी वेगवेगळ्या दिशांनी निघालेले ते विद्यार्थी…आज पुन्हा एकदा त्याच आठवणींच्या वळणावर भेटले.आणि मनात एकच भावना घेऊन परतले—

“काही भेटी या केवळ भेटी नसतात…

त्या आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणी असतात!”

५ सप्टेंबर २०२६ ची ती रात्रही अशीच एक अविस्मरणीय आठवण बनून राहिली…!

गुरुजनांना मनःपूर्वक नमन ! सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मैत्रीला मनापासून सलाम! आणि हा सुंदर सोहळा साकारण्यासाठी झटलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

एकूणच....“गुरुंच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतेची ही फुले…आणि ४२ वर्षांनी पुन्हा फुललेली मैत्री…  हेच  

या अविस्मरणीय भेटीचे खरे फलित आहे ! ”

— धनाजी माने ......✍️


Saturday, August 22, 2026

🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला प्रेमाचा धागा...





🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला  प्रेमाचा धागा......🇮🇳

=======================================

देशाच्या सीमेवर कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, प्रखर ऊन आणि अनेक संकटांना सामोरे जात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोरेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा  उपक्रम राबविला.

शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत ‘राखी तयार करणे’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने, आकर्षक व रंगीबेरंगी राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या. या राख्यांमध्ये केवळ रंग, सजावट आणि कलाकुसर नव्हती, तर त्यामध्ये देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना गुंफलेली होती.

‘सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला आम्ही आमच्या भावासारखे मानतो. त्याच्या हातावर ही राखी बांधता आली नाही, तरी आमच्या प्रेमाचा हा धागा त्याच्यापर्यंत नक्की पोहोचावा,’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.

आपल्या लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधून घेण्याऐवजी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर या राख्या पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील भावनिक उद्देश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या सीमेवरील भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कलाकुसरीचा आनंद मिळाला नाही, तर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कारही मिळाले. छोट्याशा हातांनी तयार केलेली ही राखी सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर पोहोचताना त्यांना आपल्या देशातील बालमनांचे प्रेम आणि शुभेच्छा नक्कीच जाणवतील.

या उपक्रमातून ‘राखीचा धागा छोटा असला, तरी त्यामागची भावना संपूर्ण राष्ट्राला जोडणारी आहे,’ असा हृदयस्पर्शी संदेश कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला.

शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. 

यावेळी शाळा नं.१ चे मुख्याध्यापक सदाशिव वारे,शाळा नं.२ चे मुख्याध्यापक धनाजी माने,सहाय्यक शिक्षिका शुभांगी भोसले,रुपेश्री पोळ, तेजस्विनी फाळके,दिपाली वारे,तेजस्विनी माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरगांवच्या पोस्ट ऑफिस कर्मचारी पूजा पाटील उपस्थित होत्या. 

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

- धनाजी माने.....✍️

 

Tuesday, August 04, 2026

राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !










 "राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )"

===============================

🙏भावपूर्ण श्रद्धांजली... 

माजी राज्यपाल, पद्मश्री  यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक संवेदनशील, दूरदृष्टीचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

राजकारणात त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. मात्र, त्यांची खरी ओळख ही एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, समाजहितैषी आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्त्व अशीच कायम राहील.

त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच मन नकळत   २०१० मधील ,तब्बल सोळा वर्षांपूर्वीच्या एका  अविस्मरणीय आठवणीत हरवून गेले...

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा  राजभवनातील ती संस्मरणीय भेट..फेब्रुवारी २०१० मध्ये  CCRT नवी दिल्ली यांच्या वतीने "भारताची सांस्कृतिक विविधता" या विषयावरील दहा दिवसांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली होती. हे प्रशिक्षण त्रिपुराची राजधानी आगरतळा  येथे २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात देशातील तब्बल २२ राज्यांतील १२६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सांगली  जिल्ह्यातून त्यावेळी  दहा शिक्षकांची निवड झाली होती. 

या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला त्रिपुरा राज्याच्या राजभवनात जाऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (दादा ) यांची भेट घेण्याचा बहुमान लाभला. आजही तो दिवस डोळ्यांसमोर अगदी जिवंत उभा राहतो.

राजभवनातील वातावरणात कोणताही  दुरावा नव्हता. उलट राज्यपालांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे मनापासून आपलेपणाने स्वागत केले, अभिनंदन  केले आणि अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. भारताची सांस्कृतिक विविधता, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाची भूमिका आणि शिक्षकांची जबाबदारी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी अत्यंत साधेपणाने विचार मांडले.

विशेष म्हणजे, त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांसमवेत भोजन केले. सर्वासाठी बसची सोय केली ,त्रिपुरा मधील महत्वाच्या ठिकाणांची सफर घडवली.त्या काही क्षणांत आम्हाला एखाद्या राज्यपालांपेक्षा   एका प्रेमळ, स्नेहशील आणि प्रेरणादायी शिक्षणतज्ज्ञाचा सहवास लाभल्याची भावना मनात निर्माण झाली. निरोप घेताना त्यांनी आमच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा दिली.

आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्या भेटीतील प्रत्येक क्षण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहिला. आयुष्यात काही व्यक्तींची भेट अल्पकाळाची असते, पण त्यांचा प्रभाव मात्र आयुष्यभरासाठी मनावर कोरला जातो.                आदरणीय  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा) हे माझ्यासाठी अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.

त्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेला ज्ञानाचा दीप पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहील. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी दिलेले विचार सदैव स्मरणात राहतील.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏼

— धनाजी माने.....✍️


Friday, July 31, 2026

पहिला क्रमांक... आणि विश्वासाचा शेवट?


 

पहिला क्रमांक... आणि विश्वासाचा शेवट?

कधी कधी एखादी बातमी वाचताना डोळे  शब्दांवरून पुढे सरकत नाहीत. मनात एकच प्रश्न घुमत राहतो—हे खरंच घडू शकतं?

===================================

२०१६ च्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारा एक अधिकारी... गुणवत्तेचा आदर्श मानला गेलेला चेहरा... आणि त्याच अधिकाऱ्याविरोधात लाचखोरीचे गंभीर आरोप. एसीबीने तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा रचला आणि पुढे घडलेल्या घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. 

२०१६ च्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्यावर ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप झाल्याचे वृत्त वाचणात आले आणि धक्काच बसला.

लाच घेतल्याची रक्कम ऐकून विश्वासच बसेना .

अबब ! ४५ लाखाची लाच !

खरच , या प्रकरणाचा अंतिम  निकाल भविष्यात काय यायचा तो येईल.....पण... घटनेने समाजाच्या मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण केले आहेत.

खरं तर, भ्रष्टाचाराची प्रत्येक घटना सरकारी तिजोरीवरचा डाका नसते; ती गरिबाच्या घासावरचा घाला असते.

ज्या शेतकऱ्याने उन्हातान्हात घाम गाळला, त्याच्या अनुदानाचा मार्ग भ्रष्टाचारामुळे अडतो. ज्या विधवेला पेन्शनची गरज आहे, तिच्या फाईलला गती मिळत नाही. ज्या विद्यार्थ्याच्या डोळ्यांत शिक्षणाची स्वप्ने आहेत, त्याच्या शिष्यवृत्तीचा प्रवास विलंबतो. एका अधिकाऱ्याच्या कथित लालसेची किंमत लाखो सामान्य नागरिक रोज मोजत असतात.

आजही गावातील गरीब माणूस सरकारी कार्यालयात जाताना आपल्या खिशात कागदपत्रांपेक्षा जास्त आशा घेऊन जातो. त्याला वाटते—"सरकार माझे आहे. अधिकारी माझे आहेत. न्याय मिळेल.

" पण जेव्हा अधिकाराचा वापर सेवेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी होत असल्याची चर्चा समाजात पसरते, तेव्हा त्या आशांचा चुराडा होतो.

स्पर्धा परीक्षेचा पहिला क्रमांक मिळवणे हे बुद्धिमत्तेचे प्रतीक असू शकते; पण चारित्र्याचा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आयुष्यभर परीक्षा द्यावी लागते. पद मोठे असणे ही प्रतिष्ठा नाही; त्या पदाचा प्रामाणिक वापर करणे हीच खरी प्रतिष्ठा आहे.

आज समाजाला इमारती, कार्यालये आणि मोठमोठे प्रकल्प यापेक्षा जास्त गरज आहे ती विश्वासार्ह अधिकाऱ्यांची. कारण विकासाची पायाभरणी सिमेंटने होत नाही; ती प्रामाणिकपणाने होते.

भ्रष्टाचाराची बीजे रुजली की लोकशाहीची मुळे कमकुवत होतात. मग गरीब न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही, शेतकरी शासनावर विश्वास ठेवत नाही, तरुण प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करतो आणि समाजात निराशेचे सावट दाटू लागतात.

म्हणूनच अशा प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान चौकशी होणे अत्यावश्यक आहे. दोषी असेल तर कठोर शिक्षा झाली पाहिजे; निर्दोष असेल तर त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. कारण कायद्याचे राज्य हे भावनांवर नव्हे, तर पुराव्यांवर उभे असते.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी...

प्रिय भावी अधिकारी,

तुम्ही अभ्यास करता ते केवळ नोकरीसाठी नाही; तर लाखो नागरिकांच्या विश्वासाचे ओझे आपल्या खांद्यावर घेण्यासाठी करता. तुमच्या स्वाक्षरीत  एखाद्या गरीबाचे भविष्य दडलेले असेल. तुमच्या निर्णयावर एखाद्या शेतकऱ्याचे पीक, विद्यार्थ्याचे शिक्षण, विधवेचा आधार आणि समाजाचा विश्वास अवलंबून असेल.पद हे संपत्ती कमावण्याचे साधन नाही; ते समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे.

एकूणच....."बुद्धिमत्ता तुम्हाला अधिकारी बनवेल;पण प्रामाणिकपणा तुम्हाला इतिहासात सन्मानाचे स्थान देईल." स्पर्धा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणे ही  मोठी गोष्ट आहे; परंतु आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वच्छ चारित्र्याने जगणे हीच खरी सर्वोच्च रँक आहे.

कारण शेवटी...

लोक तुमच्या पदाचा नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणाचा इतिहास लिहितात.

-धनाजी माने.....✍️


Sunday, July 05, 2026

हरवलेले शिक्षण आणि हताश शिक्षक

 

शिक्षक की बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी? – एका प्राथमिक शिक्षकाची व्यथा.....।

"शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे."

हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, भाषणांमध्ये बोलतो आणि

शिक्षक दिनी गौरवाने उच्चारतो. परंतु वास्तवात आजचा शिक्षक राष्ट्राचा शिल्पकार कमी आणि बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी अधिक बनला आहे.आज प्राथमिक शिक्षकाच्या हातात खडू, पुस्तक आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने यांच्याबरोबरच जणगणनेचे फॉर्म, BLO चे रजिस्टर, ऑनलाइन पोर्टल, बैठकींचे आदेश, विविध सर्वेक्षणे, शासकीय अहवाल आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल प्रणालींचा प्रचंड भार आहे.प्रश्न असा आहे की एकच शिक्षक एकाच वेळी उत्कृष्ट अध्यापन, दोन-दोन वर्गांचे व्यवस्थापन,मुख्याध्यापकांचा कार्यभार, जणगणना, BLO, ऑनलाइन कामे, बैठका, प्रशिक्षण आणि स्वतःच्या TET/CTET चा अभ्यास कसा करणार?हा प्रश्न केवळ शिक्षकाचा नाही; तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिक्षणव्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न आहे.

शिक्षकाचे मूळ कार्य काय?🔹समाज शिक्षकाकडून मोठ्या अपेक्षा ठेवतो. त्या योग्यही आहेत.शिक्षकाने—विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे,प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे,वाचन, लेखन आणि गणित मजबूत करावे,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा,मूल्यशिक्षण, संविधानिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करावीत,पालकांशी सतत संवाद ठेवावा,सतत मूल्यमापन करून प्रत्येक मुलाला पुढे न्यावे.हे सर्व शिक्षकाचे खरे काम आहे.परंतु आज शिक्षकाचा बहुतांश वेळ अध्यापना ऐवजी

प्रशासकीय कामांमध्ये जात आहे.शिक्षकावर वाढत चाललेले अशैक्षणिक कामांचे ओझे ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शिक्षकाचा विचार करा.

🔹त्याच्यावर या साऱ्या अध्यापना व्यतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत— ( यातील थोड्याच कामाची यादी दिली आहे ,कारण ही यादी खूप मोठी आहे )

जणगणना,BLO (मतदार यादी),निवडणूक काम,विविध शासकीय सर्वेक्षणे,विद्यार्थ्यांचे आधार

व अपार आयडी,UDISE+, विविध पोर्टलवरील माहिती,शिष्यवृत्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके,पोषण आहार नोंदी,ऑनलाइन अहवाल,वरिष्ठांनी मागितलेली तातडीची माहिती,शाळेच्या सर्व प्रशासकीय नोंदी,मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज,तालुका, केंद्र, जिल्हास्तरीय बैठका,प्रशिक्षण,विविध स्पर्धा,पालक भेटी,आणि यासोबत दोन-दोन वर्गांचे अध्यापन,या सर्वांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ कधी देणार?

दोन वर्गांचा एकच शिक्षक अनेक ग्रामीण शाळांमध्ये एकाच शिक्षकाला पहिली-दुसरी किंवा तिसरी-चौथी असे दोन वर्ग एकत्र शिकवावे लागतात.एका वर्गाला शिकवत असताना दुसरा वर्ग स्वअध्ययन करत असतो.एका मुलाच्या शंकेचे निरसन करताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे वास्तववादी आहे का?

ऑनलाइन कामांचा वाढता डोंगर,डिजिटल युगात तंत्रज्ञान आवश्यक आहे. पण ते शिक्षकाला मदत करणारे असावे, अडथळा निर्माण करणारे नव्हे.

🔹आज शिक्षकाचा मोठा वेळ पुढील गोष्टींमध्ये जातो

नवीन लिंक,नवीन पोर्टल,नवीन पासवर्ड,नवीन माहिती,नवीन अहवालवारंवार तीच माहिती.जर एखादी माहिती वेळेत भरली नाही तर लगेच स्पष्टीकरण.म्हणजे शिक्षकाच्या गुणवत्तेचे मोजमाप विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नव्हे, तर पोर्टलवरील "Submitted" बटणावर होऊ लागले आहे.बैठकींचे वाढते प्रमाण,महिन्यात अनेक बैठका.ऑनलाइन बैठक.,ऑफलाइन बैठक.क्लस्टर बैठक.तालुका बैठक.प्रशिक्षण.या बैठकींमुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन किती तास बुडते याचा कधी विचार केला जातो का?

स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ कुठे?

न्यायालयाच्या एका निर्णयानेआज प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षा आहे की तो—TET, CTET उत्तीर्ण व्हावा.नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे.डिजिटल कौशल्य वाढवावे.नवीन अध्यापन पद्धती शिकाव्यात.हे सर्व आवश्यक आहे.

🔹पण प्रश्न आहे—वेळ कुठे आहे?

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम ,सततची डेडलाईन.वरिष्ठांचा दबाव.ऑनलाइन चुका होण्याची भीती.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता.पालकांच्या अपेक्षा.कुटुंबाला वेळ देता न येण्याची खंत.या सर्वांचा परिणाम शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.अनेक शिक्षक निद्रानाश, उच्च रक्तदाब, मधुमेह, चिंता, नैराश्य आणि मानसिक थकवा अनुभवत आहेत.शिक्षक शाळेत उपस्थित असतो; पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेला असतो.कुटुंबाकडे दुर्लक्ष,सकाळी शाळा.सायंकाळी ऑनलाइन काम.

रात्री अहवाल.सुट्टीच्या दिवशी बैठक.स्वतःच्या मुलांबरोबर वेळ नाही.आई-वडिलांसोबत वेळ नाही.जीवनसाथीसोबत संवाद नाही.ही केवळ एका शिक्षकाची नव्हे, हजारो शिक्षकांची वास्तविकता

आहे.

🔹विद्यार्थ्यांचे नुकसान

या परिस्थितीचे सर्वात मोठे नुकसान विद्यार्थ्यांचे होते.त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळत नाही.

वाचन-लेखनाचा सराव कमी होतो.मूल्यशिक्षणासाठी वेळ राहत नाही.कमकुवत विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष

देता येत नाही.आणि शिक्षणाचा दर्जा घसरला की

दोष शिक्षकालाच दिला जातो.

🔹कायदा आणि राष्ट्रीय धोरण काय सांगते?

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की

शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय कामांचा भार कमी केला पाहिजे, जेणेकरून ते अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकतील.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act) नुसार शिक्षकांना नियमित अशैक्षणिक कामांसाठी वापरू नये. अपवाद म्हणून केवळ जनगणना, निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन

यांसारखी मर्यादित कामे दिली जाऊ शकतात.शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थाही सातत्याने याच भूमिकेचा पुरस्कार करतात की शिक्षकाचा जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांसाठी राखीव असला पाहिजे.

🔹शासनाला काही थेट प्रश्न

एका शिक्षकावर दोन-दोन वर्ग का?रिक्त शिक्षक पदे तातडीने का भरली जात नाहीत?एकाच माहितीची वारंवार मागणी का केली जाते?प्रत्येक बैठकीसाठी शिक्षकांनाच का बोलावले जाते?प्रत्येक नवीन योजनेचा भार शिक्षकांवरच का?हे सर्व समजत असूनही यावर उपाययोजना का होत नाही ?

🔹उपाय काय?

समस्या मांडणे पुरेसे नाही; उपाय आवश्यक आहेत-

प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची तातडीने नियुक्ती."एक शिक्षक – एक वर्ग" हे धोरण

प्रभावीपणे राबविणे.शिक्षकांना अनावश्यक अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे.जणगणना, BLO आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करणे.एकात्मिक डिजिटल प्रणाली तयार करून एकच माहिती एकदाच घेणे.अनावश्यक बैठका कमी करणे.शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन उपलब्ध करणे.मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज शक्यतो टाळणे.

🔹शिक्षकांच्या वेळेचा आदर करणे.

समाजासाठी संदेश जेव्हा पालक म्हणतात—"माझ्या मुलाला चांगले शिकवा."

तेव्हा शिक्षक मनोमन म्हणतो—"मलाही तेच करायचे आहे. पण माझ्या हातात पुस्तकापेक्षा कागदपत्रे इतर कामेच जास्त दिली गेली आहेत."

🔹शेवटी एक अपेक्षा विचार

शिक्षक हा यंत्र नाही.तो एक संवेदनशील माणूस आहे.त्यालाही कुटुंब आहे.त्यालाही आरोग्य आहे.त्यालाही स्वप्ने आहेत.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचा आहे.जर शिक्षक कागदपत्रांत, पोर्टलमध्ये आणि बैठकींमध्ये,उपक्रमामद्धे अडकून राहिला, तर विद्यार्थ्यांचे

भविष्यही त्या कागदपत्रांतच अडकून राहील.शिक्षकाला सन्मान केवळ शिक्षक दिनी पुष्पगुच्छ देऊन मिळत नाही. त्याला सन्मान मिळतो तो त्याच्या हातातील अनावश्यक कामांचा भार कमी केल्याने, त्याला अध्यापनासाठी पुरेसा वेळ दिल्याने आणि शिक्षणव्यवस्थेवर विश्वास दाखवल्याने.

कारण शिक्षक मजबूत असेल तरच विद्यार्थी सक्षम होतील;

विद्यार्थी सक्षम झाले तरच राष्ट्र सक्षम होईल.

आज ही वेळ शिक्षकांविषयी सहानुभूती व्यक्त करण्याची नाही,

तर शिक्षणव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची आहे. शिक्षकाला पुन्हा एकदा "शिक्षक" म्हणून काम करू देणे हीच खरी शिक्षणसुधारणा ठरेल.मायबाप सरकारने यावर वेळीच साकल्याने विचार करावा व त्वरित यावर उपाय करावेत अशी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींची मागणी आहे. तर आणि तरच विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य घडेल अन्यथा येणारा काळ कुणालाच माफ करणर नाही.ना शासन व्यवस्थेला,ना शिक्षकाला ,ना समाजाला हे नक्की !  -         - धनाजी माने….✍️

Thursday, May 28, 2026

जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत


 ===================🇮🇳===================

🇮🇳 जनगणनाआकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳

==========================

पहाट अजून पूर्ण उजाडायची असते…पूर्वेकडून हलकासा सोनेरी प्रकाश डोकावू लागलेला असतो…गावात कुठेतरी कोंबड्याची बांग ऐकू येत असते…कोणाच्या अंगणात चुल पेटलेली असते…तर कुठे दुधाच्या कॅनची खडखड सुरू झालेली असते…कोण खांद्यावर रुमाल व खोरे ,टिकाव घेऊन शेताची वाट चालत असतो.

आणि अशा सकाळी…एका शिक्षकाच्या हातात मोबाईल, खांद्यावर बॅग,गळ्यात शासनाने दिलेले icard चेहऱ्यावर जबाबदारी आणि मनात देशसेवेची भावना घेऊन सुरू होतो — जनगणनेचा प्रवास….

वरकरणी हे काम खूप साधं,सोप वाटतं ,दिसत…

घराघरात जायचं…माहिती विचारायची…HLO अँपमध्ये माहिती भरायची…आणि पुढच्या घराकडे निघायचं हा शिक्षकाचा प्रवास सुर राहतो.या प्रवासात काही घटना शिक्षकांना त्रास देऊन गेल्या कुठे वाडी वस्तीवर , शेतात कुत्री मागे लागली, तर काहीं शिक्षकांना चावाही घेतल्याच्या घटना घडल्या.काही लोकांनी प्रगणकाशी वादही घातले ...वेळेत काम करण्याचे टार्गेट असल्याने काहींचे या कामगीरीवर असताना अपघात झाले आणि प्राणाशी मुकावे लागले ,तळपत्या उन्हात रानोमाळी भटकावे लागल्याने उष्माघात होऊन काहींना प्राण गमवावे लागले अशा घटना महाराष्ट्रात ,देशात अनेक ठिकाणी घडल्या.या घटना कानावर येऊनही शिक्षक आपले काम करत राहिले.

 खरं सांगायचं तर —जनगणना ही फक्त मोबाईल वर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नसते.ती असते…भारत नावाच्या खंडप्राय देशाला ,विशाल कुटुंबाला जवळून अनुभवण्याची संधी.ती असते…प्रत्येक घरामागचं आयुष्य समजून घेण्याची वेळ.ती असते…समाजाच्या धडधडत्या हृदयाला कान लावून ऐकण्याची एक संवेदनशील प्रक्रिया.

कारण प्रत्येक घरामागे एक जिवंत कथा असते…प्रत्येक चेहऱ्यामागे एक लपलेला संघर्ष असतो…आणि प्रत्येक नावामागे एक अपूर्ण स्वप्न दडलंलेलं असतं.

“माणसं मोजताना माणुसकी भेटत जाते…घराघरातून चालताना आयुष्य उलगडत जाते…”

जनगणनेच्या कामासाठी एखाद्या गल्लीत प्रवेश केला की भारताचं खरं चित्र दिसू लागतं…

एका बाजूला उंच इमारती…मोठमोठ्या गाड्या…आधुनिक दरवाजे…डोअरबेल…पंखा तर कुठे थंड एसी…महागडे मोबाईल…ऑनलाइन मीटिंगमध्ये व्यस्त असलेली माणसं…

तर त्याच रस्त्याच्या पुढच्या वळणावर…पत्र्याचं घर…अर्धवट भिंती…उन्हाने तापलेलं छप्पर…ना पंखा ना एसी..दारात उभी चप्पलविना मुलं…तर काही भागात पाण्याच्या हंड्यासाठी रांगेत उभ्या स्त्रियाही दिसतात…

भारत एकाच वेळी दोन टोकांवर जगताना दिसतो.एखाद्या घरात माहिती विचारताना समोर थंड पाण्याची बाटली येते…“सर, बसा ना थोडा वेळ,पाणी घ्या.सरबत करु दे का ? चहा घ्या थोडा…”

तर काही घरात इतकी गरिबी असते की,स्वतःच्या अडचणी सांगतानाही त्यांना संकोच वाटतो.जगण्यासाठी किती त्यांना किती संघर्ष करावा लागत असेल याची जाणीव समोरच त्याच वास्तव पाहून दिसतं.

“टीव्ही आहे का घरी ? डीश आहे की केबल? ” या साध्या प्रश्नावर जेव्हा उत्तर मिळतं —

“साहेब… आमच्याकडे कुठला हो टीव्ही, रोज पोट भरतानाच नाकी नऊ येतं.कुठला टीव्ही नि कुठली केबल …”

तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर भरलेला डेटा अचानक जड वाटू लागतो,अंतकरण गलबलून येत.यांच्यासाठी आपण काहीतरी कराव अस वाटतं पण…वास्तवतेचे आकडे मोबाईल वर भरण्याशिवाय आपण काहीही करु शकत नाही याची जाणीव होते.कारण त्या एका वाक्यामध्ये त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष दडलेला असतो.

“काही घरात सुख ओसंडून वाहतं…काही घरात दुःखही शांत बसलेलं असतं…पण दोन्ही ठिकाणी,जगणं मात्र सुरूच असतं…”

गावागावातून फिरताना अनेक वार्धक्यात असलेले वयोवृद्ध भेटतात…घराच्या ओट्यावर शांत बसलेले आजोबा,आजी…डोळ्यांवर जाड चष्मा…हातात काठी…आणि नजरेत कोणीतरी येण्याची वाट…

“मुलगा पुण्याला / मुंबईला असतो हो…”

“मुलगी लग्न होऊन नांदायला गेली…”

“आम्ही दोघंच असतो घरी…”

इतकंच ते सहज सांगतात.पण त्यांच्या आवाजामध्ये एकटेपणाची खोल दरी दडलेली असते.कुठे एखादी आजी जुन्या काळाच्या गोष्टी सांगते…

“पूर्वी गावात किती माणुसकी होती हो.आज कस सगळं वेगळचं दिसतय , माणसाला आपुलकीच राहिलेली दिसत नाही…”

कुठे एखादा वृद्ध आपल्या मुलाचा फोटो दाखवत अभिमानाने सांगतो —“माझा मुलगा मोठ्या कंपनीत आहे…”पण त्या अभिमानाच्या मागे मुलाच्या सहवासाची ओढ स्पष्ट जाणवत असते.

“मोठी शहरं वाढत गेली…पण गावाकडची अंगणं रिकामी होत गेली…पैशासाठी धावताना,माणसं ,

आणि माणसातील माणुसकी मात्र दूर निघून गेली…”

जनगणनेच्या प्रवासात सर्वात जास्त मन हेलावून टाकतात ती लहान मुलं…कुठे फाटलेल्या कपड्यातलं मूल दारात उभं राहून मोबाईलकडे आश्चर्यानं पाहत असतं…कुठे शाळेच्या जुन्या वहीत चित्र काढणारी मुलगी दिसते…

“मोठं होऊन काय बनायचं ?” 

या प्रश्नावर डोळे चमकतात… “डॉक्टर,पोलीस,शिक्षक,कलेक्टर…”

स्वप्नं खूप मोठी असतात…पण परिस्थिती मात्र खूप छोटी…कधी कधी वाटतं —या मुलांच्या डोळ्यातील आशा जपण्यासाठीच कदाचित देश जगत असावा.

“फाटकी वही असली तरी स्वप्नं मात्र रंगीत असतात…गरीबांच्या मुलांनाही.आकाशाला गवसणी घालायची असते.”

अनेक घरांमध्ये स्त्रियांचा संघर्ष जवळून दिसतो…सकाळी उठल्यापासून  रात्रीपर्यंत घाण्याला जुंपलेल्या बैलासारख काम,काम आणि कामच….घर…मुलं…शेती…जनावरं…स्वयंपाक…हे राहटगाडग सुरुच.आणि तरीही चेहऱ्यावर शांत हास्य..सार दु:ख ऊरात दाबून जगासमोर हसत राहायचं .

कुठे पती गमावलेली आई मुलांना शिकवण्यासाठी धडपडताना दिसते…कुठे मजुरी करून मुलाचं कॉलेज सुरू ठेवणारी आई भेटते.भारतातील अनेक घरांचा खरा कणा अजूनही स्त्रीच आहे, हे प्रकर्षाने जाणवतं.

“स्वतःचं दुःख लपवूनजी संसार हसवत असते…ती आई नावाची स्त्री, खऱ्या अर्थाने देव असते…”

जनगणना करताना अनेक व्यवसायही भेटतात…

सकाळ पासून चहाची टपरी लावणारा तरुण…दिवसभर उन्हात भाजी विकणारी आजी…छोट्याशा दुकानातून संसार चालवणारा दुकानदार…सायकलवरून दूध नेणारा  शेतकरी…त्यांच्या हातावर कष्टाच्या रेषा असतात…पण चेहऱ्यावर हार नसते.कारण भारत अजूनही मेहनतीच्या जोरावर उभा आहे.

“घामाच्या थेंबातून देश उभा राहत असतो…साधा माणूसच भारताचा खरा चेहरा असतो…”

या प्रवासात धर्म, जात, भाषा, परंपरा यांचं वैविध्यही दिसतं…एका गल्लीत अजान ऐकू येते…दुसऱ्या गल्लीत आरतीचा आवाज…भाषा वेगळ्या…वेष वेगळे…खाणंपिणं वेगळं…

पण प्रत्येकाच्या घरात एकच गोष्ट समान असते —उद्याचा दिवस चांगला असावा ही आशा.तेव्हा जाणवतं —भारत फक्त नकाशावरचा देश नाही…तर विविधतेतून धडधडणारं एक विशाल जिवंत कुटुंब आहे.आणि या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम मनाला स्पर्श करते —लोकांचा शिक्षकावर असलेला विश्वास.“मास्तर,सर,गुरुजी तुम्ही आलात म्हणजे काम नीट होईल…”आणि “मॅडम,बाई  तुम्हीही आलात बर वाटलं आम्हाला आधार वाटला.विचारा काय विचारचे ते तुमच्यावर आमचा विश्वास आहे.तुम्ही विचाराल त्याच उत्तर देवू, ”                   

ही वाक्यं ऐकताना जाणवतं —शिक्षक हा फक्त वर्गात शिकवणारा कर्मचारी नसतो.तो गावाचा विश्वास असतो…तो प्रशासनाचा चेहरा असतो…तो समाजाच्या आशेचा आधार असतो.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतानाही…प्रखर अशा तळपत्या उन्हात…वाडी-वस्तीवर,डोंगर-दऱ्यांतून…गल्लीबोळांतून फिरून…देशासाठी हे राष्ट्रीय कार्य करणारे शिक्षक खरंच समाजाचे शांत सैनिक असतात.

ना प्रसिद्धी…ना पुरस्कार…ना मोठं कौतुक…फक्त एक जबाबदारी —देशाला स्वतःच्या लोकांची खरी ओळख करून देण्याची.

“शिक्षक फक्त धडा शिकवत नाही…तो समाज वाचत असतो…जनगणनेच्या प्रवासात तो भारत अनुभवत असतो…”

आणि दिवस संपतो…संध्याकाळी थकलेलं शरीर घरी परततं…पण मन मात्र अनेक घरांत अडकून राहतं…त्या वृद्ध आजोबांच्या नजरेत…त्या गरीब आईच्या संघर्षात…त्या मुलाच्या स्वप्नांत…त्या चहावाल्याच्या मेहनतीत…शेतकऱ्यांच्या घामात.

मोबाईल मध्ये डेटा सेव्ह होतो…पण मनात मात्र अनेक चेहरे कायमचे साठून राहतात.तेव्हा प्रकर्षाने जाणवतं —जनगणना ही फक्त आकड्यांची मोजणी नसते…ती असते —माणसांच्या आयुष्याची नोंद…

त्यांच्या दुःखांची…त्यांच्या आशांची…त्यांच्या संघर्षांची…त्यांच्या स्वप्नांची…आणि त्यांच्या जगण्याच्या जिद्दीची…

कारण शेवटी…

“घरं मोजताना भारत भेटत जातो…माणसं समजून घेताना स्वतःचं मनही बदलत जातं…जनगणना म्हणजे केवळ सरकारी काम नसतं…ती असते —समाजाच्या धडधडत्या हृदयाला जवळून ऐकण्याची एक संवेदनशील संधी…”

शेवटी यानिमित्ताने परमेश्वर चरणी एकच प्रार्थना , या प्रवासात ज्या- ज्या घरात दारिद्र्य पाहिले त्या-त्या ठिकाणी बरकत होऊदे ! अशा कुटूंबात सुख-समृद्धी येऊदे ! अशा कुटुंबातील चिमुकल्यांनी उराशी बाळगलेली गोड स्वप्ने साकार होऊदेत .

।। जयहिंद जय भारत ,जय जनगणना ।।

Take care all my Dear !

             - धनाजी माने….✍️

https://dhanajimane.blogspot.com/2026/05/blog-post_28.html

#population #worldpopulationday #populationcontrol #people #world #overpopulation #india #worldpopulation #populationday #covid #populationhealth #depopulation #familyplanning #facts #depopulationagenda 

Tuesday, May 26, 2026

जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश .

 


जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश -वाळवा पंचायत समिती गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर

============◆===========

सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शोध परीक्षा घेतली. वाळवा तालुक्यातील २१५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. जिल्ह्यात वाळवा तालुका गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चौथीच्या डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत २७ विद्यार्थ्यांनी, सातवीच्या २५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पहिलीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत ५३, दुसरी ३९, तिसरी ४९ आणि सहावीच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे.फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेतलेल्या पाचवीच्या पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी उज्ज्वल यश संपादन केले. ६३ शाळांमधील २७९ विद्यार्थी पात्र ठरले. ७६३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तालुक्यातील जि. प. शाळा काळमवाडी, नेलें नं. १, महादेववाडी, जाक्राईवाडी, इटकरे,पेठची उर्दू शाळा, इस्लामपूरची उर्दू शाळा या शाळांचे ६० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरले.

वाळवा तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन वर्षभर सुरू होते. पंचायत समितीच्या माध्यमातून सरावासाठी प्रत्येक वर्गाच्या पाच सराव चाचण्या घेतल्या होत्या. यामुळेच सर्वच इयत्तांचा गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, अधिकाऱ्यांचे अभिनंदन सांगली जि. प. अध्यक्षा संगीता पाटील, सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील यांनी केले. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून वाढत असलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उल्लेखनीय आहे. यामुळे ग्रामीण भागातील ओढा जि. प. शाळांकडे पालकांचा ओढा जि. वाढत आहे.

=======================================

बीडीओंचे शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान वाळवा

=====≠==============================

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार गेली दोन वर्षे वाळवा तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान राबवत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गाचा गुणवत्ता आढावा घेतला जात आहे. शाळास्तरावर हे अभियान राबवले जात आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी आणि केंद्रप्रमुखांचे पथक तयार केले आहे. वर्षभरात गुणवत्तेचा आढावा घेऊन संबंधित शिक्षकांना सूचना तर गुणवत्तापूर्ण वर्ग असणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले जाते. यामुळे शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी अधिक सतर्क राहत असून सर्व वर्गांच्या गुणवत्तेचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.

=======================≠===============

जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा वाढता ओढा

" वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षक सातत्याने व्यापक प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिलीपासून आठवीपर्यंत सुरू असलेल्या गुणवत्ता परीक्षांमुळे वर्गांची तयारी चांगली होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होत आहे. स्पर्धा परीक्षांचा पाया या माध्यमातून भक्कम होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. " -प्रफुल्ल काळे (केंद्रप्रमुख ,कोरेगांव)

- धनाजी माने.......✍️

( सर्व पालकांना शेअर करा )

Saturday, May 23, 2026

🇵🇾 भारताची जणगणना – २०२७



 🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾==========================

🇪🇬 शिक्षक आणि जणगणना  🇪🇬

“उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक”
“गुरु म्हणजे फक्त वर्गात धडा शिकवणारा माणूस नसतो…तो समाजाच्या प्रत्येक जबाबदारीत खंबीरपणे उभा राहणारा सैनिक असतो.”
मे महिन्याचे अंग भाजून काढणारे ऊन…रस्त्यावर असलेली शांतता…डोक्यावर तळपता सूर्य आणि हातात मोबाईल घेऊन घराघरांत फिरणारा एक शिक्षक…
कुणासाठी तो “सर” आहे,
कुणासाठी “मास्तर”,
तर कुणासाठी फक्त —
“अहो… उद्या या ना!”
देशाची जणगणना सुरू आहे…आणि हजारो शिक्षक या राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकून देत आहेत.एका बाजूला अनेक जण आपल्या कुटुंबासोबत कुलू-मनाली, महाबळेश्वर, थंड हवेच्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत…तर दुसऱ्या बाजूला शिक्षक उन्हाच्या चटक्यांत घामाने भिजत घराघरांत माहिती गोळा करत आहेत.

“ज्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकतात,
त्याच्याच हातून देशाची सेवा घडत असते.”

शिक्षकांना सुट्ट्या असतात… पगार असतो…म्हणून समाजात अनेकदा टीकाही होते.पण त्या सुट्ट्यांमध्येही हा शिक्षक स्वतःच्या संसाराला बाजूला ठेवून देशाच्या कामासाठी रस्त्यावर उतरतो, हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही.
अनेक शिक्षिका आपल्या लहान बाळांना,मुलांना घरी ठेवून सकाळपासून रात्रीपर्यंत फिरत आहेत.घर,संसार, शाळा आणि जणगणना…सगळ्यांचा ताळमेळ घालत त्या शांतपणे काम करत आहेत.

“आईपण आणि कर्तव्य
दोन्ही सांभाळताना,
तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरही
देशसेवेचे तेज दिसत असते.”

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर, शेतामधून, डोंगर उतारांवर पायपीट सुरू आहे.रस्ते नाहीत… सावली नाही…फक्त तळपते ऊन आणि चालत राहण्याची जबाबदारी.काही ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले…
काहींना पाण्याचीही सोय नव्हती…तरीही शिक्षक थांबला नाही.कारण त्याला माहिती आहे —
“हे फक्त काम नाही… हे राष्ट्रकार्य आहे.”

शहरी भागात वेगळीच लढाई…गुडघेदुखी असणारे शिक्षक उंच इमारती चढत आहेत.लिफ्ट बंद…
एकेक मजला पार करत माहिती गोळा करावी लागत आहे.पण याहून जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे —
लोकांची वागणूक…
“आमच्या विश्रांतीच्या वेळी का आलात?”
“काय फालतू प्रश्न विचारता?”
“आमच्या सेवा तर काढून घेणार नाही ना ?”
हे प्रश्न ऐकताना शिक्षकाच्या मनात वेदना उसळतात.
कारण वर्गात गेल्यावर ज्या शिक्षकाला विद्यार्थी आदराने उभे राहून नमस्कार करतात,त्याच शिक्षकाला अनेक घरांसमोर उभ्याउभ्याच माहिती मागावी लागते.

“मान देणाऱ्यांची संख्या कमी झाली,
तरी कर्तव्य निभावणारे हात कमी होत नाहीत.”

जणगणनेच्या कामात फक्त उन्हाची झळ नाही…
तर तांत्रिक अडचणींचाही डोंगर आहे.Application login होत नाही…अर्धा-अर्धा तास App लॉक…
Delete option चा गोंधळ…नेटवर्क नाही…भर उन्हात उभे राहून शिक्षक मोबाईलकडे पाहत राहतोलोकांच्या प्रश्नांना उत्तर देतो…आणि पुन्हा प्रयत्न करत राहतो.
दरम्यान, अनेक ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा तासनतास पेट्रोल पंपावर थांबावे लागले.दुपारी लोकांच्या घरी गेल्यावर बोलही खावे लागले.
“कष्ट करणाऱ्याच्या वाट्याला
उन्हे जास्त येतात,
पण इतिहासात नावही
त्यांचेच कोरले जाते.”
 याहून अधिक वेदना तेव्हा होतात,जेव्हा AC मध्ये बसून नियंत्रण करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची भाषा शिक्षकांना समजून घेणारी नसते ,योग्य मार्गदर्शन केले जात नाही याने तो व्यथित होत आहे. 
काही ठिकाणी मात्र अनेक अधिकारी  शिक्षकांना समजून घेताना दिसतात - शंकांचे निरसन कोणत्याही वेळी फोन केला तरी  प्रेमाने आपुलकीने करतातच त्याचबरोबर ..
'भर उन्हात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन काम करा! टेन्शन घेऊ नका ! "  असे आपुलकीने,आपलेपणाने , आस्तेवाईकपणे सांगतात. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभे असल्याचा आधार मिळतो .अनेक ठिकाणी अपमानीत होऊनही  शिक्षक शांत असतो…कारण त्याने आयुष्यभर सहनशीलता शिकवली आहे.विद्यार्थ्यांना संस्कार शिकवले आहेत.तो स्वतः जळतो…
पण दुसऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावतो.
खरंच…
जणगणनेच्या या मोहिमेत शिक्षक फक्त घरांची संख्या मोजत नाही…तर तो देशाच्या प्रत्येक माणसाला शासनाशी जोडत असतो.हा घाम फक्त शरीरातून वाहत नाही…तर तो राष्ट्रसेवेच्या मातीमध्ये मिसळत असतो.

“देश घडवणारा शिक्षक
स्वतः मात्र शांत राहतो…
कारण त्याच्या कर्तव्याचा आवाज
कधी गोंधळ करत नाही.”
आज गरज आहे ती शिक्षकांकडे फक्त “कर्मचारी” म्हणून न पाहण्याची…तर त्याच्या त्यागाचा, संयमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर करण्याची.कारण…जेव्हा देश स्वतःची गणना करत असतो,तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक दारावर घामाने भिजलेला एक शिक्षक उभा असतो…!
जयहिंद -जय महाराष्ट्र- जय भारत - जय जणगणना. 🙏Take care All my Dear !

- धनाजी माने…..✍️
dhanajimane.blogspot.com
https://www.facebook.com/share/p/1CHuv56fmA/
(  तुमच्या प्रतिक्रिया Blog वर, वेळ काढून जरुर लिहा ...✍️)

जणगणना मोहिमेत........







Thursday, April 02, 2026

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर












भैरवनाथाच्या नावानं चांगभल.......



#मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन यानिमीत्ताने विविध #धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.


येथील ग्रामदैवत भैरवनाथाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की; भारत खंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ आहे. जेथे #देवऋषी, महषीॅ,तपस्वी, #मुनिजन नित्य #तपस्या करीत असताना अशा समस्या काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अतिश्रद्धेने पुजा, अर्चा, #ध्यानधारणा करणारी एक #गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात रहात असे. तो गवळीवाड्याचा भाग आजही गोपी या नावानेच ओळखला जातो. तेथील जमीन ही पिकाऊ आहे व त्या शेतास गोपी हेच नाव सध्या चालु आहे.


एकदा नित्य ध्यान मग्न असणाऱ्या गोपीस गाईची धार काढण्यास सांगीतली असता ती गोपी हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईची धार काढण्यासाठी गेली व धार काढू लागली. त्यावेळी भांडे दुधाने भरलेले आहे व खाली फेसाचा मोठा ढीग पडलेला आहे. असा चमत्कार घरातील सर्व माणसांनी पाहीला. धार काढताना भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीस #समाधी अवस्थेतुन दुर केले. त्याचवेळी गाईचा एक खुर त्या फेसावर पडला व त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथाचे अलौकीक दर्शन झाले व ती समाधान पावली. ती फेसरूपी #स्वयंभू पिंड, त्यावर गाईच्या खुराचा व्रण अशा स्वरूपात येथे अस्तित्वात आहे. अशा पिंडीची रोज पुजा केली जाते.


संपुर्ण #सोलापुर जिल्हा व परिसरातील #सांगली, #सातारा, #कोल्हापूर, #लातुर, #उस्मानाबाद तसेच #कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी दि. ९ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता देवाच्या सभा मंडपात वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ, शुक्रवारी दि. १० एप्रिल २६ रोजी पहाटे पाच वाजता देवाचा अक्षता सोहळा व याच दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी म्हटली जाते. या दिवशी गावकरी आपल्या आरत्या घेऊन नाल बसवणे, पुरणपोळीचा नैवद्य देवास दाखवितात. शनिवारी दि. ११एप्रिल २६  रोजी यात्रेकरुंची अष्टमी असते. या दिवशी दाखल झालेले सर्व भाविक आपला नैवद्य #पुजारी, #गडशी-गोसाव्या मार्फत देवास दाखवितात. रविवारी दि. १२ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता शोभेच्या दारू कामाने या यात्रेची सांगता होणार आहे. याशिवाय यात्रा काळात दररोज रात्री नऊ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना निघणार आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय केली आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोहोळ पोलिसांनी चोख #बंदोबस्त ठेवला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान #ट्रस्टी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 - धनाजी माने ,इटकरे ( सांगली ) .....✍️






Saturday, March 21, 2026

“ रमजान ईदची खीर ( शिरखुरमा ) थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे”






=====================================

“ रमजान ईदची ( शिरखुरमा ) खीर थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे”

=====================================

आज २१ मार्च ‘रमजान ईद’… सणाचा दिवस. आनंद, गोडवा, आपुलकी, भेटीगाठी यांचा दिवस. पण आज मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय… एक अनामिक हुरहूर, डोळ्यांत नकळत येणारे अश्रू, आणि मनाच्या कोपऱ्यात निर्माण झालेली एक खोल पोकळी.

गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच असा दिवस उगवला आहे, जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील किणी गावातून बालम मुजावर सरांची गोड खीर( शिरखुरमा ) माझ्या घरी पोहोचला नाही…

आणि याचं कारण एकच—सर आता या जगात नाहीत.

मागच्या महिन्यात, अगदी अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या ७४- ७५ रीत निधन झाले . आयुष्य किती अनिश्चित आहे, हे कळतं… पण काही माणसं अशी असतात, की त्यांचं जाणं स्वीकारणं फार कठीण होतं. बालम मुजावर सर त्यापैकीच एक. हसतमुख ,प्रेमळ स्वभाव ,वयाने माझ्यापेक्षा २५ एक वर्षानी मोठे, वडिलधारे .

सन २००१… माझी बदली  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हून घुणकी येथे झाली. नवीन ठिकाण, अनोळखी वातावरण, नवीन सहकारी… त्या सगळ्यात एक साधं, शांत, प्रेमळ व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं—बालम मुजावर सर.

पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातली आपुलकी, वागण्यातला साधेपणा, आणि मनातली माणुसकी जाणवली. हळूहळू ओळख वाढली, संवाद वाढले… आणि ती ओळख एका सुंदर नात्यात रूपांतरित झाली—जिवाभावाच्या मैत्रीत.

धर्म वेगळे होते—मी हिंदू, ते मुस्लिम. पण आमच्यात कधी धर्माचा अडसर आला नाही. उलट त्या भिन्नतेतच एक सुंदर एकात्मता निर्माण झाली.

प्रत्येक ‘रमजान ईद’ला सर किणीहून खास माझ्याघरी खीर(शिरखुरमा ) घेऊन  इटकरे येथे यायचे. पुढे मी इस्लामपूर (ईश्वरपूरला ) राहिला आलो पुढे ते एवढा प्रवास करत वयाच्या सत्तर - पंच्याहत्तरीतही येत होते. कधी समीर तर कधी इम्रान ही सरांची मुल सरांच्या सोबत असायची.

माझ्याकडे येण्यापूर्वी ते त्यांचे तांदूळवाडी येथील समवयस्क सहकारी शिक्षक बाजीराव पाटील सर यांच्याकडे खीर देऊन पुढे माझ्या घरी यायचे.

हा नियम अखंडपणे  या तवर्षीच्या ' रमजान ईद ' पर्यंत सुरुच होता.

सरांचा माझ्या घरी चहापाणी,गप्पा-गोष्टी व्हायच्या ,सुख-दु:ख शेअर व्हायची.माझ्या मुलांना आशीर्वाद द्यायचे आणि हसतमुख चेहऱ्याने ही स्वारी निरोप घ्यायची. मागच्या रमजान ईदचा निरोप हा त्यांचा आम्हाला दिलेला  शेवटचा निरोप ठरला.....।

खरचं , सरांनी आनलेला  शिरखुरमा फक्त एक गोड पदार्थ नव्हता… ती होती त्यांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची, आणि माणुसकीची भेट. त्या खिरीचा प्रत्येक घास म्हणजे त्यांच्या मनातली आपुलकी अनुभवणं होतं.

दिवाळीच्या सणात किणीला त्यांच्या घरी मी ,  तर कधी माझा मुलगा, तर कधी माझे कुटुंब - लाडू, करंज्या, चकली, चिवडा, असा दिवाळीचा फराळ  घेऊन जायचो. 

त्यांच्या घरात दिवाळीचा उजेड पसरायचा आणि आमच्या मनात ईदचा गोडवा जागा व्हायचा.गळाभेट व्हायची ते आम्हाला दुवा -शुभाशीर्वाद द्यायचे.

खरचं,ही केवळ सणांची देवाणघेवाण नव्हती… ही होती संस्कृतींची, भावनांची,माणुसकीची आणि आपलेपणाची देवाणघेवाण....

 एक-दोन नव्हे, तब्बल चोवीस वर्षे , दोन तपांची ही परंपरा अखंड चालू होती. वेळ बदलली, परिस्थिती बदलली, आयुष्य पुढे सरकत गेल… पण आमचं नातं आणि ही परंपरा कधीच बदलली नाही......

प्रत्येक वर्षी ' ईद ' जवळ आली की मनात एक आनंद असायचा—“मुजावर सर येणार…शिरखुरमा  घेऊन येणार…” पण यावर्षी…दरवाज्याकडे पाहणं झालं, पण सर  आलेचं नाहीत.सरांचा फोन येईल असं वाटलं, पण तोही  आलाच नाही .आणि जाणवलं—आता सर कधीच येणार नाहीत…

आज त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव मनाला वेदना देत होती. घरात सगळं होत, पण काहीतरी  आजच्या ईदच्या दिवशी हरवलंय असं वाटलं.जणू त्या खिरीसोबतच आपल्या आयुष्यातला एक गोडवा ,या गोड माणसाच्या जाण्याने कायमचा हरवला आहे याची जाणीव आज प्रकर्षाने झाली.

आदरणीय बालम मुजावर सर ! हे फक्त एक शिक्षक नव्हते… ते होते एक जिवंत मूल्य. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, की खरा धर्म कोणता तर, माणुसकीचा.

त्यांनी कधी  भाषणांतून ऐक्य सांगितलं नाही… पण त्यांनी ते जगून दाखवलं. त्यांच्या एका छोट्याशा कृतीतूंन - दरवर्षी खीर घेऊन येण्यात—इतकं मोठं तत्त्वज्ञान दडलं होतं, की ते शब्दांत मांडणं कठीण आहे.

आजच्या काळात आणि भूतकाळात डोकावून पाहिल की लक्षात येत की, जेव्हा धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जातात,, तेव्हा बालम मुजावर सरांसारखी माणसातली अशी देव माणसं त्या भिंती तोडून प्रेमाचे पूल बांधतात,माणुसकीचे,प्रेमाचे,आत्मियतेचे  आणि आपुलकीचे नाते जपतात.

त्यांचं जाणं म्हणजे केवळ एक व्यक्ती गमावणं नाही… तर एक विचार, एक परंपरा गमावणं आहे. याचे सर एक जिवंत उदाहरण आहे.

पण तरीही…त्यांची आठवण आहे, त्यांच्या आठवणींचा सहवास आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे. आज खीर ( शिरखुरमा ) नाही… पण त्यांनी दिलेली माया,प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा याचा गोडवा अजूनही मनात  घर करुन तसाच आहे.

आज ते  नाहीत… पण त्यांनी जपलेलं माणुसकीच नातं अजूनही जिवंत आहे.आणि म्हणूनच मनातून एकच आवाज येत - “सर, तुम्ही या जगात आज नाही आहात… पण तुमचं प्रेम, तुमची माणुसकी, आणि आपलं नातं—हे कधीच संपणार नाही सर !”

🙏Dear Mujavar Sir ! Miss you lot !😢😢

 - धनाजी माने....✍️

Friday, March 06, 2026

आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!


 

कागदावर उतरलेला निरागस जिव्हाळा: जेव्हा दुसरीतील मुलींनी सरांना साद घातली...आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!

======================

​शिक्षक म्हणून काम करताना आपण अनेक गावं फिरतो, अनेक चेहरे पाहतो. पण काही गावं आणि तिथली मुलं काळजाच्या अशा कोपऱ्यात घर करतात की, तिथून बाहेर पडणं कधीच शक्य होत नाही.माझी कामेरी गावांतून शासकीय नियमानुसार बदली दुसऱ्या गावी झाली पण….कामेरी गावच्या त्या शाळेचा कॅम्पस आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. मी ज्या मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतो, त्याच कॅम्पसमध्ये शेजारच्या मुलींच्या शाळेत माझी पत्नी आजही ज्ञानदानाचं काम करत आहे. याच धाग्याने जोडल्या गेलेल्या इयत्ता दुसरीतील त्या चिमुकल्या मुली... ज्यांच्याशी कधी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने, तर कधी मधल्या सुट्टीत गप्पांच्या ओघात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले.

​बदली झाल्याने २० किलोमीटर वरच्या मी दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेलोय.आज मी त्या शाळेत प्रत्यक्ष शिकवायला नाही, पण , मी ज्या शाळेत शिकवायला होतो त्या शाळेतल्या मुलांच्या मनातील जागेइतकीच त्या चिमुकल्यां लेकींच्या मनातली माझी जागा आजही तशीच अढळ आहे, याची प्रचिती मला  नुकत्याच मिळालेल्या त्या निष्पाप , निरागस लेकींच्या पत्रांतून आली. 

मोडक्या-तोडक्या अक्षरात, पण अथांग मायेने एकत्र लिहिलेले पत्र वाचताना काळजाचा ठाव सुटला आणि डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या, हे समजलंच नाही.

​अक्षरांतून पाझरणारे निखळ प्रेम

​दुसरीतील त्या लहानग्या हातांनी धरलेल्या पेन्सिलमधून जे शब्द उमटले आहेत, ते कोणत्याही पदवीपेक्षा मोठे आहेत.

​रुचीची 'बासुंदी' आणि हक्काचं आमंत्रण: रुचीने पत्रात विचारलंय, "सर, तुम्ही मला बासुंदी म्हणायचा, आता घरी बासुंदी खायला कधी येणार?" तिला दिलेले ते टोपणनाव तिच्यासाठी आजही किती जिवंत आहे, हे पाहून थक्क व्हायला होतं. ती केवळ बासुंदी खायला बोलवत नाहीये, तर त्या गोडव्याने जपलेली आठवण पुन्हा जागवायला सांगतेय.

​श्रावणीची 'भेळ' आणि आर्त साद: श्रावणीने शाळेत होणाऱ्या 'भेळ' पार्टीचं आमंत्रण दिलंय. "तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता" हे तिचं वाक्य वाचताना वाटलं की, एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी दुसरी कोणतीच पावती असू शकत नाही.

​समिधाचा तो पहिला रंग: रंगपंचमीचा सण जवळ येतोय आणि या पोरींना वेध लागलेत ते आपल्या सरांना रंग लावण्याचे. समिधा अत्यंत हक्काने सांगते, "मी सगळ्यात आधी तुम्हाला रंग लावणार!" तर सईने चक्क 'पिंकी प्रॉमिस' घेत मला यायचा आग्रह केलाय. सणम, प्रचिती आणि तनुजा यांच्या शब्दांतली ती आर्तता— "सर, तुम्ही कधी येणार? एकदा तरी या ना!"— हे केवळ प्रश्न नसून ते माझ्याबद्दलचं नितांत प्रेम आणि ओढ आहे.

​काचेसारखं स्वच्छ नातं

​आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे मोठी माणसं एकमेकांना विसरून जातात, तिथे या सात-आठ वर्षांच्या मुलींनी जपलेला हा जिव्हाळा थक्क करणारा आहे. त्यांच्या पत्रातील प्रत्येक ओळीत एक निष्पाप भाव आहे. त्यांना राजकारण माहीत नाही, त्यांना व्यवहार माहीत नाही; त्यांना माहीत आहे ते फक्त आपल्या 'सरांना' पुन्हा एकदा पाहणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं.

​"शिक्षक केवळ फळ्यावर अक्षरे गिरवून घेत नाही, तर तो मुलांच्या कोऱ्या मनावर मायेचे रंग भरत असतो. आज या मुलींनी पत्राद्वारे माझ्या आयुष्यात प्रेमाचे तेच रंग पुन्हा उधळले आहेत."

माणुसकीची श्रीमंती आणि कृतज्ञता

​माझ्या पत्नीच्या माध्यमातून पोहचलेली ही पत्रे केवळ कागदाचे तुकडे नाहीत, तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे 'सन्मान' आहेत. एखाद्या मोठ्या व्यासपीठावर मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही या चिमुकल्यांच्या पत्रातील 'पिंकी प्रॉमिस' मला अधिक मोलाचं वाटतं.

​माझ्या लाडक्या चिमुकल्यांनो (रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा),

तुमची बासुंदी, तुमची भेळ आणि तो रंगपंचमीचा रंग... हे सगळं माझ्यासाठी काळजाच्या पेटीत जपून ठेवण्यासारखं धन आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या या शिदोरीवरच माझं शिक्षकी आयुष्य आणि पुढील प्रवास समृद्ध होत राहील. तुमचं हे 'पिंकी प्रॉमिस' मी नक्कीच जपण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या त्या हक्काच्या रंगासाठी अन् बासुंदीसाठी लवकरच तुम्हाला भेटायला शाळेत येईन!

रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा....लेकींनो तुमचं हे निष्पाप ,निरागस प्रेमच आम्हा शिक्षक बंधु-भगिनींची खरी श्रीमंती आहे. 🙏"

धनाजी माने….✍️


​( टीप: हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या शालेय जीवनातील आठवणी आठवल्या का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. )




४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...