🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला प्रेमाचा धागा......🇮🇳
=======================================
देशाच्या सीमेवर कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, प्रखर ऊन आणि अनेक संकटांना सामोरे जात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोरेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला.
शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत ‘राखी तयार करणे’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने, आकर्षक व रंगीबेरंगी राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या. या राख्यांमध्ये केवळ रंग, सजावट आणि कलाकुसर नव्हती, तर त्यामध्ये देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना गुंफलेली होती.
‘सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला आम्ही आमच्या भावासारखे मानतो. त्याच्या हातावर ही राखी बांधता आली नाही, तरी आमच्या प्रेमाचा हा धागा त्याच्यापर्यंत नक्की पोहोचावा,’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.
आपल्या लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधून घेण्याऐवजी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर या राख्या पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील भावनिक उद्देश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या सीमेवरील भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कलाकुसरीचा आनंद मिळाला नाही, तर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कारही मिळाले. छोट्याशा हातांनी तयार केलेली ही राखी सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर पोहोचताना त्यांना आपल्या देशातील बालमनांचे प्रेम आणि शुभेच्छा नक्कीच जाणवतील.
या उपक्रमातून ‘राखीचा धागा छोटा असला, तरी त्यामागची भावना संपूर्ण राष्ट्राला जोडणारी आहे,’ असा हृदयस्पर्शी संदेश कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला.
शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शाळा नं.१ चे मुख्याध्यापक सदाशिव वारे,शाळा नं.२ चे मुख्याध्यापक धनाजी माने,सहाय्यक शिक्षिका शुभांगी भोसले,रुपेश्री पोळ, तेजस्विनी फाळके,दिपाली वारे,तेजस्विनी माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरगांवच्या पोस्ट ऑफिस कर्मचारी पूजा पाटील उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
- धनाजी माने.....✍️



1 comment:
खूप छान शब्दांकन गुरुवर्य…
Post a Comment