Saturday, May 23, 2026

🇵🇾 भारताची जणगणना – २०२७



 🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾============================🇪🇬 शिक्षक आणि जणगणना  🇪🇬

“उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक”
“गुरु म्हणजे फक्त वर्गात धडा शिकवणारा माणूस नसतो…
तो समाजाच्या प्रत्येक जबाबदारीत खंबीरपणे उभा राहणारा सैनिक असतो.”
मे महिन्याचे अंग भाजून काढणारे ऊन…
रस्त्यावर असलेली शांतता…
डोक्यावर तळपता सूर्य आणि हातात मोबाईल घेऊन घराघरांत फिरणारा एक शिक्षक…
कुणासाठी तो “सर” आहे,
कुणासाठी “मास्तर”,
तर कुणासाठी फक्त —
“अहो… उद्या या ना!”

देशाची जणगणना सुरू आहे…
आणि हजारो शिक्षक या राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकून देत आहेत.
एका बाजूला अनेक जण आपल्या कुटुंबासोबत कुलू-मनाली, महाबळेश्वर, थंड हवेच्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत…
तर दुसऱ्या बाजूला शिक्षक उन्हाच्या चटक्यांत घामाने भिजत घराघरांत माहिती गोळा करत आहेत.

“ज्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकतात,
त्याच्याच हातून देशाची सेवा घडत असते.”

शिक्षकांना सुट्ट्या असतात… पगार असतो…
म्हणून समाजात अनेकदा टीकाही होते.
पण त्या सुट्ट्यांमध्येही हा शिक्षक स्वतःच्या संसाराला बाजूला ठेवून देशाच्या कामासाठी रस्त्यावर उतरतो, हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही.
अनेक शिक्षिका आपल्या लहान मुलांना घरी ठेवून सकाळपासून रात्रीपर्यंत फिरत आहेत.
घर, संसार, शाळा आणि जणगणना…
सगळ्यांचा ताळमेळ घालत त्या शांतपणे काम करत आहेत.

“आईपण आणि कर्तव्य
दोन्ही सांभाळताना,
तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरही
देशसेवेचे तेज दिसत असते.”

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर, शेतामधून, डोंगर उतारांवर पायपीट सुरू आहे.
रस्ते नाहीत… सावली नाही…
फक्त तळपते ऊन आणि चालत राहण्याची जबाबदारी.
काही ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले…
काहींना पाण्याचीही सोय नव्हती…
तरीही शिक्षक थांबला नाही.
कारण त्याला माहिती आहे —
“हे फक्त काम नाही… हे राष्ट्रकार्य आहे.”
शहरी भागात वेगळीच लढाई…
गुडघेदुखी असणारे शिक्षक उंच इमारती चढत आहेत.
लिफ्ट बंद…
एकेक मजला पार करत माहिती गोळा करावी लागत आहे.
पण याहून जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे —
लोकांची वागणूक…
“आमच्या विश्रांतीच्या वेळी का आलात?”
“काय फालतू प्रश्न विचारता?”
“आमच्या सेवा तर काढून घेणार नाही ना?”

हे प्रश्न ऐकताना शिक्षकाच्या मनात वेदना उसळतात.
कारण वर्गात गेल्यावर ज्या शिक्षकाला विद्यार्थी आदराने उभे राहून नमस्कार करतात,
त्याच शिक्षकाला अनेक घरांसमोर उभ्याउभ्याच माहिती मागावी लागते.

“मान देणाऱ्यांची संख्या कमी झाली,
तरी कर्तव्य निभावणारे हात कमी होत नाहीत.”

जणगणनेच्या कामात फक्त उन्हाची झळ नाही…
तर तांत्रिक अडचणींचाही डोंगर आहे.
Application login होत नाही…
अर्धा-अर्धा तास App लॉक…
Delete option चा गोंधळ…
नेटवर्क नाही…
भर उन्हात उभे राहून शिक्षक मोबाईलकडे पाहत राहतो…लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतो…आणि पुन्हा प्रयत्न करत राहतो.दरम्यान, अनेक ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा…तासनतास पेट्रोल पंपावर थांबावे लागले.
दुपारी लोकांच्या घरी गेल्यावर बोलही खावे लागले.

“कष्ट करणाऱ्याच्या वाट्याला
उन्हे जास्त येतात,
पण इतिहासात नावही
त्यांचेच कोरले जाते.” 
याहून अधिक वेदना तेव्हा होतात,जेव्हा AC मध्ये बसून नियंत्रण करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची भाषा शिक्षकांना समजून घेणारी नसते ,योग्य मार्गदर्शन केले जात नाही याने तो व्यथित होत आहे . 
काही ठिकाणी मात्र अनेक अधिकारी  शिक्षकांना समजून घेताना दिसतात - शंकांचे निरसन कोणत्याही वेळी फोन केला तरी  प्रेमाने आपुलकीने करतातच त्याचबरोबर ..”भर उन्हात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन काम करा!” 
टेन्शन घेऊ नका ! " 
  असे आपुलकीने ,आपलेपणाने , आस्तेवाईकपणे सांगतात. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभे असल्याचा आधार मिळतो .
अनेक ठिकाणी अपमानीत होऊनही  शिक्षक शांत असतो…
कारण त्याने आयुष्यभर सहनशीलता शिकवली आहे.विद्यार्थ्यांना संस्कार शिकवले आहेत.
तो स्वतः जळतो…
पण दुसऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावतो.
खरंच…
जणगणनेच्या या मोहिमेत शिक्षक फक्त घरांची संख्या मोजत नाही…
तर तो देशाच्या प्रत्येक माणसाला शासनाशी जोडत असतो.
हा घाम फक्त शरीरातून वाहत नाही…
तर तो राष्ट्रसेवेच्या मातीमध्ये मिसळत असतो.
“देश घडवणारा शिक्षक
स्वतः मात्र शांत राहतो…
कारण त्याच्या कर्तव्याचा आवाज
कधी गोंधळ करत नाही.”
आज गरज आहे ती शिक्षकांकडे फक्त “कर्मचारी” म्हणून न पाहण्याची…
तर त्याच्या त्यागाचा, संयमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर करण्याची.
कारण…
जेव्हा देश स्वतःची गणना करत असतो,
तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक दारावर
घामाने भिजलेला एक शिक्षक उभा असतो…!
जयहिंद -जय महाराष्ट्र- जय भारत - जय जणगणना. 🙏Take care All my Dear !

- धनाजी माने…..✍️
dhanajimane.blogspot.com
https://www.facebook.com/share/p/1CHuv56fmA/
(  तुमच्या प्रतिक्रिया Blog वर, वेळ काढून जरुर लिहा ...✍️)

जणगणना मोहिमेत........







🇵🇾 भारताची जणगणना – २०२७

  🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾 ============================🇪🇬  शिक्षक आणि जणगणना  🇪🇬 “उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक” “गुर...