Monday, June 14, 2021

शैक्षणिक


 👌ऑनलाइन शिक्षण ही चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करता येतील.यासाठी.....✍️

जस-जशी जून महिन्याची १५ तारीख जवळ येते, त्यावेळी आपणाला आपल्या शाळेचे वेध लागतात. कधी एकदा आपण शाळेत जातो आणि आपल्या जुन्या मित्रांना भेटतो. हे सगळे वेध आपल्या मनाला लागलेले असतात. तर इयत्ता पहिली चे विद्यार्थी नव्याने दाखल होऊन या नवीन वातावरणात येत असतात.
इयत्ता पहिलीचे विद्यार्थी एका अनौपचारिक वातावरणातून एका औपचारिक  वातावरणात येतात.आणि त्यांनाही वेध लागलेले असतात आपल्या शाळेचे .काही रडतातही त्यांना आपल्या घरची आई -वडिलांची आठवण येत असते. त्यांची मनधरणी करावी लागते. या सर्वांची मनधरणी आमच्या शिक्षक भगिनी- बंधू करत असतात. आणि ती पोकळीहि आई-वडिलांची भरून काढत असतात.
प्रत्येक वर्षी या नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ, चॉकलेट, कॅडबरी असे विविध खाऊचे पदार्थ देऊन केले जाते परंतु गत वर्षापासून कोरोणाच्या महामारी मुळे हे सर्व थांबले आहे. सर्वांच्याच मनावर मान्सूनच्या ढगा प्रमाणेच या कोरोनामुळे निराशेचे ढग ☁️ दाटले आहेत. प्रत्येकालाच आपल्या पाल्याच्या भविष्याची काळजी वाटत आहे. जे शिक्षण आपल्या जीवनाला आकार देते ते सर्व शिक्षणच प्रत्यक्ष थांबले आहे.
परंतु यावरती शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या क्षेत्रातले शिक्षणतज्ञ ,शासन स्तरावर राबणारे अधिकारी ,तंत्रस्नेही शिक्षक,
सर्व शिक्षक बंधू -भगिनी  यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.
याठिकाणी  शासनाने टीव्ही वरती विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.गतवर्षीही शासनाने विविध उपक्रम राबवले. आणि या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये खंड पडू नये यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले.
यामध्ये काही पालकांना आपल्या परिस्थितीमुळे भाग घेता आला नाही .अनेकांना मोबाईल वरती किमती मोबाईल डाटा घेता आला नाही. तर अनेकांना किमती मोबाईल खरेदी करता आले नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबातील पाल्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये अडथळा आला.
उद्यापासून सुरू होणारे शैक्षणिक वर्षही अशाच काही आव्हानांना सामोरे जात आहे.
अद्यापही कोरणाचे संकट दूर झालेले नाही याच्यावरती निश्चित असा अजून उपाय नाही.
सारे जगच यावरील उपायात अद्याप तरी चाचपडत आहे.
आणि शहरीभागा बरोबरच ग्रामीण भागात तर हा कोराना जास्तच फोफावू लागला आहे.
आणि यामुळेच  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये हा मोठा अडथळा ठरत आहे. पण यावरती ही उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. आणि त्याचे नियोजन शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व अधिकारी आणि शिक्षक ,पालक, शाळाव्यवस्थापन समित्या आपापल्या पातळीवरती सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने
ऑनलाइन शिक्षणाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात काही टिप्स आवर्जून सांगाव्या वाटतात त्या सर्वाचा अंमल केला तर आपल्याला ऑनलाइन शिक्षण ही चांगल्या पद्धतीने घेता येईल .आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करता येतील.
यासाठी.....

📌आपल्या कार्यक्षेत्रात इंटरनेट सुरळितरित्या सुरु आहे की नाही याची खात्री करुन घ्यायला हवी.
यासाठी कोणत्या कंपनीची पुर्ण क्षमतेने रेंज असते हे माहिती करुन घ्यायला हवे.
📌कधी -कधी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सदर क्षेत्रातील नेटवर्क बंद पडते यासाठी घरात वेगवेगळ्या कंपनीचे कार्ड वापरणे सोयीचे होते.
📌ज्या वेळी ऑनलाईन तास सुरू असतात अशा वेळी आपल्या घरात ज्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने रेंज येते अशा ठिकाणी ऑनलाइन तासासाठी बसण्याचे नियोजन करावे.
📌ऑनलाईन तास सुरू होण्यापूर्वी आपला लॅपटॉप ,मोबाईल पूर्णक्षमतेने चार्जिंग आहे का याची खात्री करून घेणे गरजेचे असते. काही वेळेला बाजारात उपलब्ध असणाऱ्या योग्य पॉवर बँकेचाही आपण वापर करू शकतो.
📌ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊन काही मुद्दे न समजण्याची शक्यता असते. अशा वेळेला न समजलेला मुद्दा आपल्या शिक्षकांना तास संपल्यानंतर वैयक्तिक फोन करून विचारणे व आपली शंकानिरसन करून घेणे गरजेचे असते.
📌तांत्रिक शिक्षणाला काही मर्यादा असतात यामुळे तुम्हाला शिक्षकांनी पाठवलेल्या  लिंक वरती वेळेवर  जॉईन होऊन अध्यापन केलेल्या भागाचा पुरेपूर लाभ घेणे महत्त्वाचे असते.
📌काही वेळेला घरामध्ये एकच मोबाईल आणि दोन -दोन पाल्य शिक्षण घेणारे असतात .अशा वेळेला तुमच्या वर्ग शिक्षकांशी संपर्क साधून वेळेचे योग्य नियोजन करून घेणेही गरजेचे असते.
📌काही पालकांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ही साधने उपलब्ध नसतात अशा वेळेला कोरोणाची त्रिसूत्री वापरून ( सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि योग्य लेअरचा  मास्क वापर) आपल्या शेजारी संबंधित वर्गातील विद्यार्थी कोण आहे  का हे पाहून त्या ठिकाणी आपल्या पाल्याची बैठक व्यवस्था करणे गरजेचे असते.
📌शाळेकडून ,शिक्षकांच्या कडून ऑनलाइन तासाच्या  पूर्व नियोजनासाठी दिलेल्या सूचनेनुसार त्या -त्या विषयाचे क्रमिक पुस्तक आपल्याजवळ असणे गरजेचे  असते. तसेच शिक्षकांच्या कडून शिकवले जाणारी मुद्दे व त्यातील काही ठळक मुद्दे लिहून घेण्यासाठी आपल्याजवळ कागद, पेन, पेन्सिल जवळ ठेवणे गरजेचे असते.
वर दिलेल्या सगळ्या गोष्टींचे पालन आपण व्यवस्थित केले तर ऑफलाइन शिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण सुरु असणाऱ्या या प्रक्रियेमध्ये आपणाला पूर्ण क्षमतेने सहभागी होता येईल. व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करता येताल. व आपली ही शैक्षणिक प्रक्रिया सुरळीत सुरू राहून आपणाला या प्रवाहात राहता येईल.
एकूणच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जशी खंत आहे तशी तमाम शिक्षकांनाही आपण प्रत्यक्ष भेटत नसल्याची, प्रत्यक्ष अध्ययन - अध्यापन प्रक्रिया होत नसल्याची खंत आहे.
आपल्या सर्वांच्याच गैरहजेरीमुळे किंवा आपल्याला प्रत्यक्ष शाळेत जाता येत नसल्यामुळे  सगळ्या शाळा कशा सुन्यासुन्या झालेल्या आहेत. पण कोरोणाच्या जागतिक महामारी मुळे आपल्यासमोर पर्याय नाही .जे जे पर्याय उपलब्ध आहेत ते पर्याय शोधून आपण आपली शैक्षणिक प्रक्रिया कशी सुरळीत पार पडेल याची सगळ्यांनीच काळजी घेऊया एवढेच !
आपल्या या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी ,पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, या क्षेत्रात कार्य करणारे सर्व कर्मचारी ,अधिकारी या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

काळजी करू नका , मात्र काळजी जरुर घ्या !सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि योग्य लेअरचा  मास्क वापर या त्रिसूत्रीचा अंमल करा.ही सर्वांना विनंती,कारण दिवस खूपच वाईट आहेत.सर्वांना आधार देत राहूया !


- धनाजी माने.....✍️






Thursday, June 10, 2021

कुतुहल


 कुतुहल🤭😀

कोविशिल्ड लसीचे दोन डोस  घेतल्यावर नाशिकच्या सिडको भागातील  अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याच्या बातम्या विविध चॅनेलवर प्रसिद्ध झाल्यानंतर व त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर,
सदरची बातमी पाहणाऱ्या अनेकांनी आपल्याही शरीराला नाणी चिकटत नाहीत ना?याची खात्री करुन घेतली.😀
याबाबत माहिती अशी की ,
नाशिक येथील सिडको परिसरात शिवाजी चौकात  अरविंद जगन्नाथ सोनार वय वर्षे ७१   यांच्या शरीरावर ,नानी,चमचे, झारी,प्लेट अशा स्टीलच्या ,लोखंडाच्या वस्तू चिकटत असल्याच्या बातम्या  विविध चॅनेलवर प्रसिद्ध होत आहेत.
वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या शरीराच्या कमरेच्या वरच्या भागावर वस्तू चिकटत आहेत.
कमरेच्या खाली कोणत्याही भागात नाणी किंवा इतर वस्तू चिकटत नाहीत.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी , वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी येवून खात्री केल्याचेही त्यांनी या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.त्यांची बायपास ची शस्त्रक्रिया ही झाली असून त्यांना शुगरही आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस  हॉस्पिटलमध्ये घेतला होता.  लस घेतल्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न करून अशा वस्तू शरीरावर लावून  बघितल्या. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणी,झारे, चमचे अशा लोखंडी ,स्टीलच्या विविध वस्तू शरीरावर तशाच चिकटून राहात असल्याचे लक्षात आले.
एकूणच हे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या समोर संशोधनाचा विषय ठरला असून,
कोव्हिड लस घेतलेले लोक घराघरात , आपल्याही शरीराला वस्तू चिकटत नाही ना हे कुतुहलाने पहात आहेत.😀😀😀🤭

-धनाजी माने



Wednesday, June 09, 2021

अनुत्तरित.........



#शिक्षण म्हणजे #उन्नतीचे #साधन आहे, असे  म्हणतात. "पण कोरोना ह्या #जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी #अस्वस्थता निर्माण झाली . विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आज आपला #भारत देश प्रगतीच्या अती उच्च शिखराकडे वाटचाल करत असताना #कोरोना #विषाणू म्हणजे #Covid-19 सारख्या संकटाने जगभर महाथैमान घातले. या विषाणूने सर्वच क्षेत्रात मोठ्या अडचणी निर्माण केल्या. कोरोनाच्या संकटासमोर जागतिक #बलशाली #महासत्ता असलेली #राष्ट्र देखील हतबल झाली. यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासून काही कालावधी साठी संपूर्ण देशात #लॉकडाऊन करण्यात आला.
 शाळा, महाविद्यालये यांना #सुट्टी देण्यात आली. दरम्यानच्या काळात कोरोणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय किंवा #अडथळा येऊ नये विद्यार्थी हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून #वंचित राहू नये, म्हणून #ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडण्यात आला.
ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी सर्व साधने शहरातील किंवा #श्रीमंत #शिक्षीत पालकांच्या मुलांकडे होती किंवा आहेत. परंतु ग्रामीण भागातील #गरीब,#शेतकरी,#कष्टकरी .अशिक्षित पालकांच्या मुलांचे काय?
हाच प्रश्न , ही #व्यथा या कथेत #व्यथीत केली आहे......
कथा वेळ काढून जरुर वाचा, '#उपेक्षितांचे #अंतरंग जाणून घ्या ! ' .......✍️


 अनुत्तरित.........

उन्हाळ्याचे दिवस होते..मार्च पासून पुढे उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत #जिल्हा परिषदेच्या #शाळा या नेहमीच सकाळच्या सत्रात भरतात.

 कोरोनामुळे #लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊन नंतर काही काळ हा लॉकडाऊन उठवण्यात आला व #पाचवी पासूनचे  पुढचे वर्ग हे सकाळच्या #सत्रात भरु लागले होते. तर इयत्ता पहिली ते चौथी वर्गांचे  ऑनलाईनच #अध्यापन सुरु होते .ऑनलाईन #तासिका घेऊन व कार्यालयातील कामकाज पाहून मी शाळेतून बाहेर पडलो. 

#कामेरी गावाच्या पूर्वेकडून इस्लामपूरला एक मधला मार्ग जातो.त्या मार्गाने मी निघालो होतो.

 मी  कामेरी ते #इस्लामपूर मधल्या मार्गाने जात असताना, या रस्त्यालगतच एका ठिकाणी ऊसाला

पाणी पाजण्यासाठी #मोटर सुरू होती. उन्हाचा तडाखा कडक असल्यामुळे या ठिकाणी थांबून , हात-पाय धुऊन घ्यावेत व अंगावरती पाणी मारून घ्यावे. असा  मनात विचार आला आणि मी माझी गाडी थांबवली.रस्त्याच्या कडेला एका बाजूला आंब्याच्या सावलीत गाडी उभी केली.

हात - पाय धुतले . आंब्याच्या झाडाखाली बसलो. थोडा विसावलो. एवढ्यात भर उन्हातून  याच मार्गावरून एक #मुलगी आणि दोन लहान #मुले जात असताना दिसली.साधारणत:  ५ते ७ वर्षे वयाने असावीत.

 त्यांना मी हाक मारली.  माझ्या जवळ बोलावलं.

त्यांना  मी माहिती विचारली. कुठून आलात? कुठे निघालात?  त्यावेळी त्या भावंडापैकी त्या मुलीने मला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, दोघे तिच्यापेक्षा लहानच होते.

"आमचं,आई-बाबा #ऊस तोडायसाठी इकडं आलेती."

"त्यांच्याबर आलुया !"

मुलीने उत्तर दिलं

कधी आलायं गं? - मी विचारलं

"लय दिवस झालं"

मुलीने पुन्हा माझ्या प्रश्नाचे उतर दिलं.

आता कुठ चाललाय?

"खोपटावर निघालुया ! "

मी त्यांना माझ्याजवळ बसवून घेतलं

तिन्ही भावंडांची नाव विचारली पुढे #गाव, #तालुका, #जिल्हा विचारला पण त्यांना नावाशिवाय काहीच सांगता आलं नाही.

तिन्ही भावंडांची नाव खूपचं सुंदर होती.....

सर्वात मोठी #सुंदरी ,मधला #देव आणि सर्वात छोटा #रवी .

  सावळ्या रंगाच्या सुंदरीला #दृष्ट लागू नये म्हणून कपाळाच्या मध्यभागी आणि दोन्ही गालावरती काळ्या काजळाच्या टिकल्या लावलेल्या दिसत होत्या. जेणेकरून आपल्या #लेकीला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या आईनेच या टिकल्या लावल्या असाव्यात .विसकटलेले तिच्या डोक्यावरचे केस.गळ्यामध्ये काळ्या-पांढऱ्या मण्यांची #माळ ,अंगामध्ये #गुलाबी ड्रेस, हातामध्ये हरभऱ्याचा डहाळा,कोणाच्यातरी शेतातून खाण्यासाठी तिने घेतलेला असावा. दोन्ही हातातील मनगटावर  बांधलेला  काळा दोरा. दोन्ही पायात असणारी #चप्पल. पण.... त्यातील एका चप्पलाचा #अंगठा तुटलेला. आणि त्याच ठिकाणी पांढऱ्या दोऱ्याने #टाके घातलेले.

यावेळी , 'गरिबीने गांजलेल्या आयुष्यालाही टाके घालण्यासाठी त्यांच्या आई-बाबांचेही कोयते कुणाच्यातरी फडात ऊस तोडण्यासाठी चालत असल्याचा मला भास झाला. '

सुंदरी आपल्या रवी आणि देव या भावंडांना खोपटावर घेऊन जात होती.

सुंदरीने  आपल्या हाताला लहान भावंडांना धरलेलं. आपला भाऊ देव आणि रवी.


देवाचाही ,असाच काही अवतार, देवाचे पूर्ण #टक्कल केलेले . अशा भर उन्हात  तो बोडकाच होता. डोक्यावर काहीच नव्हतं . डोक्यावर #चपचपीत लावलेल्या तेलामुळे त्याच डोक आणखीनचं तळपत होतं.

दोन्ही बाजून वगळलेल #तेल दिसत होतं.

त्याला मी म्हटल - अरे, देवा एवढ कशालारे तेल लावलेस?

तो हसून म्हणाला, " आईनच , लावलयं , सकाळी आंघुळ केल्यावं !"

अंगामध्ये गुलाबी शर्ट .वरची फक्त दोनच #बटणं. खालची सर्व तुटून गेलेली.अंगामध्ये असणारी पॅन्ट त्याला नसणारी चेन. पायात स्लीपर.

तेही सुंंदरीच्या चपलासारखे दोऱ्याने टाके घातलेलेच असा देवाचा #अवतार होता.


या भावंडापैकी रवी या तिन्ही भावंडांमध्ये सर्वात लहान असावा. हे त्याच्या सर्वात लहान व्यक्तीमत्वावरून जाणवत होतं. रवीच्या अंगात चेन नसलेलं #जॅकेट. जॅकेटच्याआत उघडेबंब शरीर.  गळ्यामध्ये तीन-चार पंचरंगी  बांधलेले  दोरे आणि त्याच्यामध्ये कोणत्यातरी देवीचा एक रुपयाच्या आकाराएवढा #रुपेरी #फोटो

 अडकवलेला. त्याला हात लावत , मी रवीला विचारलं,

रवी हे काय रे , कुणी बांधलय ?

' हे देवाचं हायं, देवाला गेल्याव , बांधलयं आईनं '

 रवीची चड्डीही गुडघ्याच्या खाली पर्यंत आलेली, तीही उजव्या मांडीवर फाटलेली .बेंबीच्या खाली  #काळादोरा कंबरेला बांधलेला,त्याच्या उघड्या अंगामधून  दिसत होता. 

अशी ही तिन्ही भावंडे भर उन्हात आपल्या खोपटाकडे चाललेली.#घामाघुम झालेली.

चपला तुटक्या असल्या तरी, भर उन्हात त्यांच्या ,पायाला चटके बसण्यापासून त्या चपला त्यांना वाचवत होत्या.

फाटक्या #संसारात असतानाही , तुटक्या $चपला देऊन का असेना , लेकरांच्या पायांना चटके बसु नयेत म्हणून जगता-जगता त्यांच्या आई- बाबांनी कुठेतरी स्वतःच्या पोटाला #चिमटा घेतला असावा असा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला.

#गप्पा सुरु असतानाच,

गाडीला अडकवलेली  माझी #शबनम मी काढली. आणि त्यात मला दिलेला जो जेवनाचा डबा होता तो मी त्या मुलांच्या समोर ठेवला.

शाळेत  लवकर यावे लागत होते, त्यामुळे #दररोज  जेवणाचा #डबा सोबत असायचा.आता घरीच जाऊन #जेवण करु असे ठरवून #घरी निघालो होतो.

त्यादिवशी तो घास त्या लेकरांच्या #मुखात जाणार असावा व त्या अनोळखी लेकरांची भेट घडणार असावी.म्हणूनच तो प्रसंग #नियतीने घडवून आणला असावा.

मी माझ्या शबनम मधून काढलेला तो डबा तिघांच्या समोर ठेवला.

आणि तिघही खाऊन घ्या म्हणून सांगितले.

" नको,नको आमी जेवलुया सकाळी  " सुंदरीने डबा बाजुला सरकवत नकार दिला.

#दही, #शेंगदाणे, गवारीची भाजी,भात तिन्ही डब्यातमद्धे घालून मीच पुन्हा तिघांना #तीन भाग करुन , दिले.

सुरवातीला पुन्हा त्यांनी नकारच दिला.

पुन्हा मात्र त्यांनी आढे - वेढे न घेता आपल्या समोर आलेले #अन्न संपवले. 

दोन केळीही होत्या.

त्याही सुंदरीकडे दिल्या तर, 

म्हणते कशी "तुमच जेवान सगळ , तुम्ही आमासणीचं दिलसा, आता ही तुमीच खा ! "

मी नको म्हटलं, आणि तिच्या हातात केळी दिली आणि खायला सांगितले

सुंदरीनेच त्याचे चार भाग केले.आणि तिघांना तीन घेऊन,

एक मला खाण्यास सांगितला.

मी "नको " म्हटलं 

तर ,तिनेचं #आग्रह केला. तोवर देव ही म्हणाला " खावाकी "

त्या मागोमाग रवीही म्हणाला  "खावा - खावा, सगळ आमासणीच देतायसा कशाला ? खावा "

एका केळीचे दोन भाग केलेल्यापैकी तो केळीचा #अर्धा भाग त्या सर्वांच्या आग्रहाखातर  मी खाल्ला.त्या वेळी त्या #अपरिचित ,भावडांनी केलेला $आग्रह यामध्ये वेगळचं प्रेम भरलेल.त्या केळाच्या अर्ध्या भागानेही माझे #पुर्ण #पोट भरल्याची जाणीव झाली.

सुंदरीचे आणि  त्या छोट्या भावंडांचे वाटून खाण्याचे मोठे #संस्कार ,मला त्या एका प्रसंगात जाणवले.


 सुंदरी ,रवी आणि देव यांनी तो डबा संपवला, केळीचा अर्धा- अर्धा भाग खाल्ला. आणि मोटरीच्या  पाण्यावरती पोटभर #पाणी पिले. आणि पुन्हा माझ्याजवळ येऊन  बसले.

"तुमी काय करता?" सुंदरीने विचारलं

मी म्हटलं - "गुरुजी आहे मराठी शाळेत, येणार का आमच्या शाळेत खूप छान आहे आमची शाळा? "

"नाय ,आमाला खोपटावर थांबाव लागतं , या दोघासनी सांभाळत."

काहीवेळ त्यांच्याशी गप्पा झाल्यानंतर  मी माझ्या खिशातील काही #रक्कम प्रत्येकाच्या हातात दिली. सुरुवातीला प्रत्येकाच्या हातात देत असणारी #नोट पाहून ती घेण्यास त्यांनी नकार दिला.

 त्यांना सुरुवातीला ते खरचं वाटलं नाही. पण....

 पुन्हा मी खूपच #आग्रह केल्यानंतर त्यांनी ती प्रत्येकाच्या हातात दिलेली नोट घेतली. जाताना त्यांना मी सांगितलं की " पैसे व्यवस्थित घरापर्यंत न्या . आणि तुमच्या #आई -बाबांच्या बरोबर बाजारात गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला पायात चपला घ्या.त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काय वेगळेच होते.आनंदाची वेगळी #लकेर त्या भावंडांच्या चेहऱ्यावर दिसली."

पुन्हा एकवेळ 'पैसे व्यवस्थित घरापर्यंत न्या ! ' असं सांगून मी त्या तीन्ही भावंडांना मधे कुठेही न थांबता  त्यांना त्यांच्या खोपटावरच जायला सांगितलं. मी माझी गाडी सुरु केली. गाडीवरती बसलो आणि  मी इस्लामपूरच्या दिशेने जाऊ लागलो.

 काही अंतरावर गेल्यानंतर मी माग वळून परत पाहिलं तर ती लेकरं माझ्या गाडीच्याच दिशेने पाहात होती.त्यांच्या आंतरिक मनात भावनांचा काय कल्लोळ सुरु होता काय माहित , पण त्यांची पावलं थांबून ,नजर माझ्या गाडीच्या दिशेने त्या मार्गावरतीच स्थिरावली होती.

मी माझी गाडी तिथचं थांबवली आणि हातानेच हातवारे करुन त्यांना जायला सांगितले.

त्यांनी मला हातवारे केले आणि ती #पाठमोरी झाली.

ते हळुहळु त्या मार्गावरुन जात राहिले , दिसेनासे झाले.ती सर्व भावंड  त्यांच्या खोपटाकडे निघून गेली.

तोपर्यंत मी जागेवरतीच थांबलो होतो.

काही वेळाने परत ,मी माझ्या इस्लामपुरच्या दिशेने माझ्या घराकडे निघून आलो.

पण .....परतत असताना माझ्या मनात अनेक विचार  आले.

आत्ताच आपण शाळेतील ज्या मुलांचे ऑनलाईन तास घेऊन आलो त्या मुलांचे जीवन आणि सुंदरी,देव आणि रवी यांच्या सारख्या मुलांच्या जीवनातील ही गरिबीची #दरी कधी मिटणार?

ज्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच #संघर्ष सुरु आहे, त्यांच्याकडे डिजिटल शिक्षणासाठी #स्मार्टफोन कधी येणार ? कसा आणि कुठून येणार? त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कधी येणार ?

की यांच्या मागच्या पिढींचा गरीबीशी संघर्ष सुरु आहे तो तसाच पुढे यांच्याही जीवनात असाच राहणार?

यावेळी मला माझ्याच कवीतेच्या #ओळी आठवल्या , ज्या ऊस तोडणाऱ्यांच्या #व्यथा सांगतात.


"उगड्या - #नागड्या लेकरांना माझ्या,

आधार देण्यासाठीच हा संघर्ष सारा.


#कोसोदूर येवून सारा,

हा  #ऊन -वारा सोसतो आहे.

उबदार घरटी,मिळावी लेकरांना,

यासाठीच ही #लढाई लढतो आहे. "


एकूणच हा संघर्ष सुंदरी,देव आणि रवी यांच्या जीवनात येऊ नये.

आता कुठेही असतील तिथे- त्या  सावळ्या सुंदरीचे #आयुष्य सुंदर व्हावे.

परमेश्वराने , #चिमुकल्या देवाला $आनंदायी जीवन द्यावे.

आणि रवीच्याही जीवनातील दारिद्ऱ्याचा #अंधार दूर होऊन ,सुखाची #प्रकाशकिरणे त्याच्याही आयुष्यात सदैव तेवत  रहावीत.

अशाच तमाम भावंडाच्या जीवनात आनंदाचे #भरते यावे ही #प्रार्थना आजही करतो आहे.

आणखी एक प्रश्न नेहमीच #अनुत्तरीत राहतोय,

जीवनाच्या प्रवासात काही अल्पकाळासाठी भेटलेली ही सुंदरी ,देव आणि रवी ही भावंड नेमकी आत्ता कुठे असतील? पुन्हा कधी आयुष्यात भेटतील का?

ना त्यांच्याकडे माझा #पत्ता......., ना माझ्याकडे त्यांचा पत्ता.....

सारे अनुत्तरीतच .......!

- धनाजी माने.....✍️

( पुर्वप्रसिद्ध - माझी ही छोटी कथा, लेख विविध शैक्षणिक अंकातून प्रसिद्ध झाली आहे ,साभार इथे घेतली आहे. )

📚 मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये एवढचं. विशेषतः ,अशा रंजल्या,गांजल्या,गरिबाघरी .......✍️

Monday, June 07, 2021

मैत्री दिन

 

८जून - मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा

मैत्रीची माझी एक साधी सरळ
व्याख्या आहे.
कोणत्याही प्रसंगी , कोणत्याही वेळी
आपल्या माणसाला हक्कान सांगता आल पाहिजे.
प्रसंगी चार शिव्या हासडून.
" अरे ! तुला यावचं लागतयं."

प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.













Friday, June 04, 2021

विचार - Quotes

 छापलेली पुस्तके वाचल्याने

खरेज्ञान मिळत नाही...

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते...
कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात...
पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.








Thursday, June 03, 2021

सायकल आणि आठवणी......


 







◾सायकल दिनानिमित्त......✍️

आजच्या आधुनिक काळात हृदरोगतज्ञ हे रुग्णांनी सायकल चालवावी असा सल्ला देतात. सायकल चालविण्याने रक्ताभिसरण होण्यास मदत तर होतेच होते परंतु मूळ चयापचय क्रियेसही सायकल चालविण्याचा व्यायाम पोषक होतो. बैठी कामे करणाऱ्यांच्या पायांच्या स्नायूंना सायकलमुळे व्यायाम मिळून जादा चरबी कमी होते. उघड्यावर सायकल चालविण्याने मोकळी श्वास मिळतो, तसेच शरीराला ऑक्सिजनाचा जास्त पुरवठा होऊन दीर्घश्वसनही होते. सायकल चालवण्याचे असे अनेक फायदे आहेत .तशाच सायकलीबरोबरच्या प्रत्येकाच्या काही आठवणीही असतात , अशाच काही माझ्याही आठवणी या सायकल दिनानिमित्त तुम्हाला शेअर करतोय.तुमच्याही काही आठवणी जाग्या झाल्या तर , जरुर कमेंट करा....


📌आज सायकल दिन या सायकल दिनानिमित्त सायकलींच्या विविध अनुभवांचा पट आज उलगडत गेला. भूतकाळातील विविध आठवणींना आज उजाळा मिळाला.

सायकल शिकण्यापूर्वी फक्त सायकलवर बसायचं माहिती होते. कोणाच्या तरी पाठीमागे लागून, हट्ट करुन सायकल वरती बसायचं.

गावातीलच रामादादा, पंडितआप्पा ,विलासमामा असे सर्वजण आमचा हा सायकलवर बसण्याचा हट्ट पुरवायचे.


सायकलवर बसवून नेणारे हे सर्व सायकलच्या त्या लोखंडी नळीवरती दोन्ही बाजूला पाय सोडून आम्हाला बसवायचे. सायकलवर बसायचा तो बाल हट्ट पुरा व्हायचा. मात्र सायकलवरुन फिरून आल्यानंतर , बसलेला भाग नळीवर आदळून. फिरुन आल्यानंतर काही वेळाने लक्षात यायचे की आपला हट्ट पुर्ण झालाय पण ....

आदळलेल्या भागाच्या यातना सुरु झालेत.

या अनुभवाचे शहाणपण आल्यानंतर पुन्हा मात्र पुढे सायकल वरती बसताना असा त्रास होऊ नये. म्हणून टॉवेल गुंडाळूनच बसायचो. 


पुढे भविष्यात स्वतःला सायकल चालवायची संधी मिळाली. ती इयत्ता सहावी मध्ये.गावामध्ये मौला मुलाणी यांचे एक सायकल भाड्याने देण्याचे दुकान होते.

या दुकानात कमी उंचीची एकच सायकल असायची

व मोठ्या २२-२४ इंची सायकलींची संख्या जास्त होती.पण त्यावेळी आम्हा लहान मुलांची मागणी लहान सायकलची जास्त त्यामुळे सायकल एकच आणि भाड्याने नेणारांची संख्या जास्त.

तिथेही नंबर लावायचा, तास- दोन तास वेटिंग असायचे. कारण त्याचे भाडे तासावर असायचे आणि पहिले नंबर झाल्याशिवाय आणि त्याचे तास संपल्यानंतरच ,नंबर यायचा.

 पन्नास पैसे अर्धा तास आणि एक रुपयात एक तास असे भाडे असायचे , ८० ते ९० या दशकात  या एका रुपयाला ही तशी किंमत होती. भाड्याने सायकल घेतली जायची. तास भरला की त्याची सायकल त्याला परत द्यायची. सुरुवातीला उंचीने कमी असणारी सायकल, नंतर बावीस इंची आणि चोवीस इंची सायकल . सायकल शिकण्याचा हा प्रवास सुरू होताच. मोठी सायकल शिकताना सीटची उंची आणि आमची उंची यांचे व्यस्त प्रमाण असल्यामुळे, तीन नळीमद्धे पाय घालून ,उजवा हात नळीला ,डावा हात हँडलला धरून हा सराव सुरू होता. पुढे हा सराव वाढत जाऊन आणि काळानुसार उंची वाढत गेल्यानंतर हळूहळू सायकलच्या सीटवर बसून सायकल मारण्यास-चालवण्यास येऊ लागली. ज्या दिवशी सायकलच्या सीटवरती बसून सायकल चालवण्यास येऊ लागली. त्या दिवशीचा आनंद काही वेगळाच होता.जणू काय.......

 

माझ्या आयुष्यात माझ्या स्वतःच्या मालकीची सायकल आली ती १९९५ मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर. माझी सुरुवातीची नेमणूक ही कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील उत्साळी हे गाव होते तर राहण्याचे ठिकाण अडकूर होते.

त्यावेळी मुख्य राहण्याच्या ठिकाणापासून शाळेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी सायकलचा वापर आम्ही करायचो. सोबत माझा वर्गमित्र आणि सहकारी घनश्याम पाटील आणि माझी एकाच शाळेत विद्यामंदिर,उत्साळी येथे नेमणूक मिळाल्यामुळे आम्ही दोघेही दोन सायकलवरून प्रवास करायचो.

उत्साळी ते अडकूर आणि अडकूर ते उत्साळी हा नित्यक्रम आमचा प्रवास सुरूच होता.

त्या ठिकाणच्या सेवाकाळात दररोज सायकलचा वापर असल्याने, आणि सायकलवरूनच प्रवास असल्याने, हजारो किलोमीटरचा प्रवास आमचा त्यावेळी झाला.

पुढे कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही स्व जिल्ह्यात म्हणजेच सांगली जिल्ह्यात बदली होऊन आलो. आणि हा सायकलीचा प्रवास बंद झाला. पुढे दुचाकी - चार चाकी मधून प्रवास सुरू झाला. 

एकूणच .......दुसऱ्याच्या सायकलीवर बसण्याचा हट्ट करणे, भाड्याची सायकल, स्वतःची सायकल ,दुचाकी ,चारचाकी असा जीवनप्रवास घडत गेला.आज तो दुचाकी-चारचाकीमधूनच नित्य घडतो आणि घडत आहे.

जुन्या काळातील सायकल या प्रवासातून कधीच कायमस्वरूपी निघून गेली आहे.

 मात्र जी लहानपणी सायकलीवरून प्रवास करण्याची मजा होती . जो आनंद मिळाला. तो आता आनंद हरवलायं की काय असं वाटतं. एकूणच गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी ......सायकलीवरच्या त्या प्रवासाच्या.

- धनाजी माने...✍️


Wednesday, June 02, 2021

विचार



जीभ नरम असते, कोमल असते 
आणि लवचिक असते.
 म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।
याउलट दात कठोर 
असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात 
म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत
 तोंडात शिल्लक राहत नाही।।
म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना
 कोमल शब्द वापरा. 
कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।।
नम्र रहा, आणि लवचिक बना...।
तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल...।







 

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...