उन्हाळ्याचे दिवस होते..मार्च पासून पुढे उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत #जिल्हा परिषदेच्या #शाळा या नेहमीच सकाळच्या सत्रात भरतात.
कोरोनामुळे #लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊन नंतर काही काळ हा लॉकडाऊन उठवण्यात आला व #पाचवी पासूनचे पुढचे वर्ग हे सकाळच्या #सत्रात भरु लागले होते. तर इयत्ता पहिली ते चौथी वर्गांचे ऑनलाईनच #अध्यापन सुरु होते .ऑनलाईन #तासिका घेऊन व कार्यालयातील कामकाज पाहून मी शाळेतून बाहेर पडलो.
#कामेरी गावाच्या पूर्वेकडून इस्लामपूरला एक मधला मार्ग जातो.त्या मार्गाने मी निघालो होतो.
मी कामेरी ते #इस्लामपूर मधल्या मार्गाने जात असताना, या रस्त्यालगतच एका ठिकाणी ऊसाला
पाणी पाजण्यासाठी #मोटर सुरू होती. उन्हाचा तडाखा कडक असल्यामुळे या ठिकाणी थांबून , हात-पाय धुऊन घ्यावेत व अंगावरती पाणी मारून घ्यावे. असा मनात विचार आला आणि मी माझी गाडी थांबवली.रस्त्याच्या कडेला एका बाजूला आंब्याच्या सावलीत गाडी उभी केली.
हात - पाय धुतले . आंब्याच्या झाडाखाली बसलो. थोडा विसावलो. एवढ्यात भर उन्हातून याच मार्गावरून एक #मुलगी आणि दोन लहान #मुले जात असताना दिसली.साधारणत: ५ते ७ वर्षे वयाने असावीत.
त्यांना मी हाक मारली. माझ्या जवळ बोलावलं.
त्यांना मी माहिती विचारली. कुठून आलात? कुठे निघालात? त्यावेळी त्या भावंडापैकी त्या मुलीने मला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, दोघे तिच्यापेक्षा लहानच होते.
"आमचं,आई-बाबा #ऊस तोडायसाठी इकडं आलेती."
"त्यांच्याबर आलुया !"
मुलीने उत्तर दिलं
कधी आलायं गं? - मी विचारलं
"लय दिवस झालं"
मुलीने पुन्हा माझ्या प्रश्नाचे उतर दिलं.
आता कुठ चाललाय?
"खोपटावर निघालुया ! "
मी त्यांना माझ्याजवळ बसवून घेतलं
तिन्ही भावंडांची नाव विचारली पुढे #गाव, #तालुका, #जिल्हा विचारला पण त्यांना नावाशिवाय काहीच सांगता आलं नाही.
तिन्ही भावंडांची नाव खूपचं सुंदर होती.....
सर्वात मोठी #सुंदरी ,मधला #देव आणि सर्वात छोटा #रवी .
सावळ्या रंगाच्या सुंदरीला #दृष्ट लागू नये म्हणून कपाळाच्या मध्यभागी आणि दोन्ही गालावरती काळ्या काजळाच्या टिकल्या लावलेल्या दिसत होत्या. जेणेकरून आपल्या #लेकीला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या आईनेच या टिकल्या लावल्या असाव्यात .विसकटलेले तिच्या डोक्यावरचे केस.गळ्यामध्ये काळ्या-पांढऱ्या मण्यांची #माळ ,अंगामध्ये #गुलाबी ड्रेस, हातामध्ये हरभऱ्याचा डहाळा,कोणाच्यातरी शेतातून खाण्यासाठी तिने घेतलेला असावा. दोन्ही हातातील मनगटावर बांधलेला काळा दोरा. दोन्ही पायात असणारी #चप्पल. पण.... त्यातील एका चप्पलाचा #अंगठा तुटलेला. आणि त्याच ठिकाणी पांढऱ्या दोऱ्याने #टाके घातलेले.
यावेळी , 'गरिबीने गांजलेल्या आयुष्यालाही टाके घालण्यासाठी त्यांच्या आई-बाबांचेही कोयते कुणाच्यातरी फडात ऊस तोडण्यासाठी चालत असल्याचा मला भास झाला. '
सुंदरी आपल्या रवी आणि देव या भावंडांना खोपटावर घेऊन जात होती.
सुंदरीने आपल्या हाताला लहान भावंडांना धरलेलं. आपला भाऊ देव आणि रवी.
देवाचाही ,असाच काही अवतार, देवाचे पूर्ण #टक्कल केलेले . अशा भर उन्हात तो बोडकाच होता. डोक्यावर काहीच नव्हतं . डोक्यावर #चपचपीत लावलेल्या तेलामुळे त्याच डोक आणखीनचं तळपत होतं.
दोन्ही बाजून वगळलेल #तेल दिसत होतं.
त्याला मी म्हटल - अरे, देवा एवढ कशालारे तेल लावलेस?
तो हसून म्हणाला, " आईनच , लावलयं , सकाळी आंघुळ केल्यावं !"
अंगामध्ये गुलाबी शर्ट .वरची फक्त दोनच #बटणं. खालची सर्व तुटून गेलेली.अंगामध्ये असणारी पॅन्ट त्याला नसणारी चेन. पायात स्लीपर.
तेही सुंंदरीच्या चपलासारखे दोऱ्याने टाके घातलेलेच असा देवाचा #अवतार होता.
या भावंडापैकी रवी या तिन्ही भावंडांमध्ये सर्वात लहान असावा. हे त्याच्या सर्वात लहान व्यक्तीमत्वावरून जाणवत होतं. रवीच्या अंगात चेन नसलेलं #जॅकेट. जॅकेटच्याआत उघडेबंब शरीर. गळ्यामध्ये तीन-चार पंचरंगी बांधलेले दोरे आणि त्याच्यामध्ये कोणत्यातरी देवीचा एक रुपयाच्या आकाराएवढा #रुपेरी #फोटो
अडकवलेला. त्याला हात लावत , मी रवीला विचारलं,
रवी हे काय रे , कुणी बांधलय ?
' हे देवाचं हायं, देवाला गेल्याव , बांधलयं आईनं '
रवीची चड्डीही गुडघ्याच्या खाली पर्यंत आलेली, तीही उजव्या मांडीवर फाटलेली .बेंबीच्या खाली #काळादोरा कंबरेला बांधलेला,त्याच्या उघड्या अंगामधून दिसत होता.
अशी ही तिन्ही भावंडे भर उन्हात आपल्या खोपटाकडे चाललेली.#घामाघुम झालेली.
चपला तुटक्या असल्या तरी, भर उन्हात त्यांच्या ,पायाला चटके बसण्यापासून त्या चपला त्यांना वाचवत होत्या.
फाटक्या #संसारात असतानाही , तुटक्या $चपला देऊन का असेना , लेकरांच्या पायांना चटके बसु नयेत म्हणून जगता-जगता त्यांच्या आई- बाबांनी कुठेतरी स्वतःच्या पोटाला #चिमटा घेतला असावा असा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला.
#गप्पा सुरु असतानाच,
गाडीला अडकवलेली माझी #शबनम मी काढली. आणि त्यात मला दिलेला जो जेवनाचा डबा होता तो मी त्या मुलांच्या समोर ठेवला.
शाळेत लवकर यावे लागत होते, त्यामुळे #दररोज जेवणाचा #डबा सोबत असायचा.आता घरीच जाऊन #जेवण करु असे ठरवून #घरी निघालो होतो.
त्यादिवशी तो घास त्या लेकरांच्या #मुखात जाणार असावा व त्या अनोळखी लेकरांची भेट घडणार असावी.म्हणूनच तो प्रसंग #नियतीने घडवून आणला असावा.
मी माझ्या शबनम मधून काढलेला तो डबा तिघांच्या समोर ठेवला.
आणि तिघही खाऊन घ्या म्हणून सांगितले.
" नको,नको आमी जेवलुया सकाळी " सुंदरीने डबा बाजुला सरकवत नकार दिला.
#दही, #शेंगदाणे, गवारीची भाजी,भात तिन्ही डब्यातमद्धे घालून मीच पुन्हा तिघांना #तीन भाग करुन , दिले.
सुरवातीला पुन्हा त्यांनी नकारच दिला.
पुन्हा मात्र त्यांनी आढे - वेढे न घेता आपल्या समोर आलेले #अन्न संपवले.
दोन केळीही होत्या.
त्याही सुंदरीकडे दिल्या तर,
म्हणते कशी "तुमच जेवान सगळ , तुम्ही आमासणीचं दिलसा, आता ही तुमीच खा ! "
मी नको म्हटलं, आणि तिच्या हातात केळी दिली आणि खायला सांगितले
सुंदरीनेच त्याचे चार भाग केले.आणि तिघांना तीन घेऊन,
एक मला खाण्यास सांगितला.
मी "नको " म्हटलं
तर ,तिनेचं #आग्रह केला. तोवर देव ही म्हणाला " खावाकी "
त्या मागोमाग रवीही म्हणाला "खावा - खावा, सगळ आमासणीच देतायसा कशाला ? खावा "
एका केळीचे दोन भाग केलेल्यापैकी तो केळीचा #अर्धा भाग त्या सर्वांच्या आग्रहाखातर मी खाल्ला.त्या वेळी त्या #अपरिचित ,भावडांनी केलेला $आग्रह यामध्ये वेगळचं प्रेम भरलेल.त्या केळाच्या अर्ध्या भागानेही माझे #पुर्ण #पोट भरल्याची जाणीव झाली.
सुंदरीचे आणि त्या छोट्या भावंडांचे वाटून खाण्याचे मोठे #संस्कार ,मला त्या एका प्रसंगात जाणवले.
सुंदरी ,रवी आणि देव यांनी तो डबा संपवला, केळीचा अर्धा- अर्धा भाग खाल्ला. आणि मोटरीच्या पाण्यावरती पोटभर #पाणी पिले. आणि पुन्हा माझ्याजवळ येऊन बसले.
"तुमी काय करता?" सुंदरीने विचारलं
मी म्हटलं - "गुरुजी आहे मराठी शाळेत, येणार का आमच्या शाळेत खूप छान आहे आमची शाळा? "
"नाय ,आमाला खोपटावर थांबाव लागतं , या दोघासनी सांभाळत."
काहीवेळ त्यांच्याशी गप्पा झाल्यानंतर मी माझ्या खिशातील काही #रक्कम प्रत्येकाच्या हातात दिली. सुरुवातीला प्रत्येकाच्या हातात देत असणारी #नोट पाहून ती घेण्यास त्यांनी नकार दिला.
त्यांना सुरुवातीला ते खरचं वाटलं नाही. पण....
पुन्हा मी खूपच #आग्रह केल्यानंतर त्यांनी ती प्रत्येकाच्या हातात दिलेली नोट घेतली. जाताना त्यांना मी सांगितलं की " पैसे व्यवस्थित घरापर्यंत न्या . आणि तुमच्या #आई -बाबांच्या बरोबर बाजारात गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला पायात चपला घ्या.त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काय वेगळेच होते.आनंदाची वेगळी #लकेर त्या भावंडांच्या चेहऱ्यावर दिसली."
पुन्हा एकवेळ 'पैसे व्यवस्थित घरापर्यंत न्या ! ' असं सांगून मी त्या तीन्ही भावंडांना मधे कुठेही न थांबता त्यांना त्यांच्या खोपटावरच जायला सांगितलं. मी माझी गाडी सुरु केली. गाडीवरती बसलो आणि मी इस्लामपूरच्या दिशेने जाऊ लागलो.
काही अंतरावर गेल्यानंतर मी माग वळून परत पाहिलं तर ती लेकरं माझ्या गाडीच्याच दिशेने पाहात होती.त्यांच्या आंतरिक मनात भावनांचा काय कल्लोळ सुरु होता काय माहित , पण त्यांची पावलं थांबून ,नजर माझ्या गाडीच्या दिशेने त्या मार्गावरतीच स्थिरावली होती.
मी माझी गाडी तिथचं थांबवली आणि हातानेच हातवारे करुन त्यांना जायला सांगितले.
त्यांनी मला हातवारे केले आणि ती #पाठमोरी झाली.
ते हळुहळु त्या मार्गावरुन जात राहिले , दिसेनासे झाले.ती सर्व भावंड त्यांच्या खोपटाकडे निघून गेली.
तोपर्यंत मी जागेवरतीच थांबलो होतो.
काही वेळाने परत ,मी माझ्या इस्लामपुरच्या दिशेने माझ्या घराकडे निघून आलो.
पण .....परतत असताना माझ्या मनात अनेक विचार आले.
आत्ताच आपण शाळेतील ज्या मुलांचे ऑनलाईन तास घेऊन आलो त्या मुलांचे जीवन आणि सुंदरी,देव आणि रवी यांच्या सारख्या मुलांच्या जीवनातील ही गरिबीची #दरी कधी मिटणार?
ज्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच #संघर्ष सुरु आहे, त्यांच्याकडे डिजिटल शिक्षणासाठी #स्मार्टफोन कधी येणार ? कसा आणि कुठून येणार? त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कधी येणार ?
की यांच्या मागच्या पिढींचा गरीबीशी संघर्ष सुरु आहे तो तसाच पुढे यांच्याही जीवनात असाच राहणार?
यावेळी मला माझ्याच कवीतेच्या #ओळी आठवल्या , ज्या ऊस तोडणाऱ्यांच्या #व्यथा सांगतात.
"उगड्या - #नागड्या लेकरांना माझ्या,
आधार देण्यासाठीच हा संघर्ष सारा.
#कोसोदूर येवून सारा,
हा #ऊन -वारा सोसतो आहे.
उबदार घरटी,मिळावी लेकरांना,
यासाठीच ही #लढाई लढतो आहे. "
एकूणच हा संघर्ष सुंदरी,देव आणि रवी यांच्या जीवनात येऊ नये.
आता कुठेही असतील तिथे- त्या सावळ्या सुंदरीचे #आयुष्य सुंदर व्हावे.
परमेश्वराने , #चिमुकल्या देवाला $आनंदायी जीवन द्यावे.
आणि रवीच्याही जीवनातील दारिद्ऱ्याचा #अंधार दूर होऊन ,सुखाची #प्रकाशकिरणे त्याच्याही आयुष्यात सदैव तेवत रहावीत.
अशाच तमाम भावंडाच्या जीवनात आनंदाचे #भरते यावे ही #प्रार्थना आजही करतो आहे.
आणखी एक प्रश्न नेहमीच #अनुत्तरीत राहतोय,
जीवनाच्या प्रवासात काही अल्पकाळासाठी भेटलेली ही सुंदरी ,देव आणि रवी ही भावंड नेमकी आत्ता कुठे असतील? पुन्हा कधी आयुष्यात भेटतील का?
ना त्यांच्याकडे माझा #पत्ता......., ना माझ्याकडे त्यांचा पत्ता.....
सारे अनुत्तरीतच .......!
- धनाजी माने.....✍️
( पुर्वप्रसिद्ध - माझी ही छोटी कथा, लेख विविध शैक्षणिक अंकातून प्रसिद्ध झाली आहे ,साभार इथे घेतली आहे. )
📚 मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये एवढचं. विशेषतः ,अशा रंजल्या,गांजल्या,गरिबाघरी .......✍️

9 comments:
छान सर
Very nice 👌🌹
माने सर सुंदर कथा 🙏🙏🙏
खूपच छान ,सुंदर कथा,मनाला स्पर्श करणारी कथा
खूप छान कथा लेखन!
Great
खराखुरा अनुभव जेव्हा खूप काही सांगून जातो....
संघर्षातून शिक्षण घेणार्याचे हृृृृृदय पार ताणून जातो....
स्वातंत्र्य हे एक
स्वप्न आहे की वास्तव हेच आम्हाला कळत नाही....
गरीबी आणि श्रीमंती दरी
नष्ट झाल्याशिवाय
स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही.
Thanks
super. !!
👌
Post a Comment