कवी यशवंत एका ठिकाणी बैलपोळा सणाबाबत म्हणतात.
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली,
चढविल्या झुली, ऐनेदार....
सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे.
श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने ग्रामीण भागात साजरा करतांना आपल्याला दिसतात.
बळीराजाच्या सुखासाठी दावणीचे बैलं वर्षभर आपल्या मालकासाठी राब-राब राबत असतात.
शेतीची नांगरट असो,कुळवणी असो की वर्षभर ओझी ओढणी असो. अशी विविध कामे बैल वर्षभर करत असतात.अनेक कष्टाची काम ती वर्षभर आपल्या मालकासाठी करत असतात.
बैलपोळ्या दिवशी मात्र बैलांना कोणतेही कष्टाचे काम लावले जात नाही. हा दिवस त्यांचा पुर्ण विश्रांतीचा असतो.
शेतकरी आपल्या बैलांना या दिवशी कसलेही कष्टाची काम देत नाहीत.
गोडधोड पुरणपोळीचा घास त्यांना आनंदाने भरवला जातो. जर बैलांची निगा राखणारा गडी असेल तर त्या गडयालाही कृतज्ञता म्हणून नवे कपडे दिली जातात. त्याचाही तितकाच मान असतो.
पुणे ,मुंबई ,औरंगाबाद, नागपूर अशी मेट्रो शहरं या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ असावीत. या शहरातील लोकांची धावपळ पहिली की कधीकधी वाटतं पोळा या सणाची या लोकांना काही माहिती आहे की नाही ❓ असे वाटते. पण याच वेळी या शहरांच्या आसपासची ग्रामीण भागातील लोक आणि संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या सर्जा-राजाचा जिवाभावाच्या सोबत्यांचा हा सण अत्यंत पारंपारीक पध्दतीने आणि आनंदाने आजही साजरा करतांना दिसतो.
पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पध्दत आहे बरं का.
'आज आवतण घ्या उद्या जेवायला या ! '
असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर ,आडावर ,विहीरीवर नेतात, आज ग्रामीण भागातील गावोगावी नळाचे पाणी असल्याने अनेक जण आपल्या घराजवळच नळावरतीच पाईप लावून त्यांना आंघोळ घालतात. आंघोळीनंतर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना रंग बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जातात. सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पुजा करतात.
बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधुन बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल - ताशे ,लेझीम, हालगी ,घुमके, झांच,बेंजो ,नगारे जे -जे ज्या भागात उपलब्ध आहे ते वाजवले जाते.
पोळयाची गितं म्हंटली जातात. येथे बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला बक्षिसही दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघतांना बैलांना घरोघरी नेले जाते. तेथे गावातील बायाबापड्या बैलांची पुजा करतात. बैल नेणाऱ्यास ’बोजारा’ देण्यात येतो.
बोजारा म्हणजेच पैसे दिले जातात
हिंदू संस्कृती ही महान संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृती मध्ये वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानले जाते. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांच्याप्रती कृतज्ञता आणि याच कृतज्ञतेतून एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो.
कवयित्री बहिणाबाई चौधरी एका ठिकाणी म्हणतात-
"आला आला शेतकऱ्या,
पोयाचा रे सन मोठा,
हातीं घेईसन वाट्या,
आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं,
सजवा रे घरदार ..."
एकूणच - पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही ग्रामीण भागामध्ये साजरे केले जातात.आणि हिंदू संस्कृती मधील ही परंपरा आजही लोक मोठ्या आनंदाने जपतात .
- धनाजी माने....✍️
9403963934

1 comment:
खूप छान माहिती सर . धन्यवाद
Post a Comment