कथा एका घोंगड्याची.......
◾▪️▪️ #घोंगडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते मेंढीच्या लोकरी पासून बनविलेले जाड #वस्त्र.पुर्ण काळ्याकुट्ट लोकरीपासून बनवलेले तर कधी पांढरी- काळी लोकर वापरुन तयार केलेले नक्षीदार घोंगडे.घरात , शेतात , थंडीत- पावसात कसेही वापरले तरी #उबच देते.थंडीच्या दिवसात तर अंगावरून काढवतच नाही असे घोंगडे.
पण......हे घोंगडे मात्र जगातील सर्व घोंगड्यानपेक्षा वेगळेच आहे.नुसतीच उब नाही तर ......माझ्यासाठी माया, #प्रेम, आपुलकी ,आपलेपणा,जिव्हाळा, माणुसकी, करुणा,कृतज्ञता आणि प्रेरणाही देणारे हे घोंगडे ठरले.शेवटपर्यंत जरुर वाचा तुम्हालाही हे घोंगडे इतर घोंगड्यानपेक्षा नक्की वेगळे वाटेल.....
( कथा सत्य घटनेवर आधारित......)
सप्टेंबर २००० मधील ही गोष्ट नेहमीप्रमाणे अध्यापनाचे काम वर्गावरती चालले होते, एवढ्यात आवाज आला,
'माने सर आत येऊ का ?"
मी आत येण्यास सांगितले.
समोर, शाळेतील सहाय्यक अध्यापिका सौ. तिवडे मॅडम, सोबत त्यांच्याचवर्गातील महादेव गावडे व हुंदके देत आलेली त्याची आई .
'महादेव, खूप दिवसानंतर शाळेत आलेला. तो सतत गैरहजरच असायचा, त्याला हृदयविकाराचा त्रास सुरु होता, त्या दिवशी तर तो खूप निस्तेज झालेला, गाल फुगलेले, फटफटीत झालेला चेहरा, त्याच्या बोलण्यातून थकवा जाणवत होता.'
माझ्या हातात मिरजेच्या हॉस्पिटलची कागदपत्रे देत व महादेवला जवळ करीत महादेवची आई मोठ्यानेच रडू लागली.
कागद हातात घेऊन पाहिले, कागदावर महादेवच्या उपचारांच्या खर्चाचे #इस्टिमेट होते. जवळजवळ रु. पन्नास ते नव्वद हजार रक्कमेचा तो तपशील होता. तर.. प्रवास, राहणे व इतर खर्च वेगळाच. एकूणच जवळ-जवळ रु. १ लाखाच्या पुढे जाणारा #खर्च कशातून करायचा हा प्रश्न हताश झालेल्या महादेवच्या कुटुंबाच्या समोर होता. हुंदके देतच महादेवची आई म्हणाली,
'सर! लय दिवस झाले हो! माझा #बाळ सोसतुया ! लय-लय माझं पॉर हाल सोसतय बघा ! डाक्टरांनी तर सांगितलंय इलाज लवकर न्हाय झाला तर, मुलगा तुमचा.........."तिला पुढचा शब्द म्हणण्याचे धाडस होईना, म्हणण्यापेक्षा तिला तो उच्चारताच येईना येवढे रडू कोसळले.
" सर! आमचं हातावरच पॉट, ना जमीन ना दुसरे काय,धनगराच असलो तरी, ना शेरडु , ना मेंढरू, भांगलाय गेलं तर,तुकडा मिळतुया ! आणि एवढा खर्च कशातनं करायचा, माझं बाळ तर एकुलतं एक हाय! खरचं! सर काहीतरी करा हो! "
म्हणून ती हुंदके देत पुन्हा रडू लागली! महादेवही आईच्या अंगाशी बिलगला, आणि आईचा पदर आपल्या तोंडावर घेवून तोही रडू लागला,जणू उपचाराविणा आपल्या पोटचा गोळा तिला आपल्यापासून दूर कुठेतरी जाताना दिसत असावा.साक्षात तिला आपल्या एकूलत्या एक मुलाचा फटफटीत पडलेला चेहरा पाहून त्याचा साक्षात मृत्यू समोर दिसत असावा.
एकूणच ते दृश्य पाहून, मलाही गहिवरून आलं, सर्व वर्गामध्ये निरव शांतता पसरली हे सर्व पाहून मुलांनाही वाईट वाटले.
गरिबीच्या नरकयातना काय असतात, हे महादेवच्या आईच्या असहाय्यतेतून जाणवत होते.
त्या दोघांनाही शांत केलं, धीर दिला.
मी विविध दैनिकातून लिहतोय , महादेवच्या या करुन कहाणीला कुठेतरी मांडले जाईल आणि आपल्याला त्याच्या उपचारासाठी मदत मिळेल ,या आशेने , शाळेतील सहाय्यक शिक्षिका तिवडे मॅडम त्यांना माझ्याकडे घेऊन आल्या होत्या.
एवढा आशेचा धागा पकडून, त्याचा फोटो विविध माध्यमातून छापून आवाहन केले जाईल,ही आशादायी अपेक्षा ठेवून, त्या मॅडम त्या महादेवच्या आईला घेऊन आल्या होत्या.
मी त्यांना महादेवाचा फोटो काढून देण्यास सांगितले. दवाखान्याच्या खर्चाच्या तपशीलाच्या झेरॉक्स घेतल्या.
त्यानंतर माझे मन सतत बेचैन झाले. सारखा- सारखा त्या महादेवचा निस्तेज चेहरा, त्याचा धोक्याच्या दिशेने सुरु असणारा जीवनप्रवास आणि महादेवच्या आईची असहाय्यता दिसू लागली.
यावेळी महादेवच्या आईला शक्य तेवढी आम्ही व शिरोलीतील लोकांच्याकडून आर्थिक मदत गोळा केली, महादेवला ऍडमिट करण्याचा सल्ला दिला.त्याला ऍडमिट करुन त्याच्यावर उपचार सुरु केले.मीही #दोन #तीन वेळ मिरजेला दवाखान्यात जाऊन त्यांना धीर दिला.महादेवच्या कुटुंबातील सदस्यांनाही धीर आला. या आजाराने आपल्या पासून दुर निघालेला आपला पोर , उपचार सुरु झाल्याने पुन्हा आपल्या कुशीत पुर्वीसारखाच आनंदाने खेळेल या आशा , त्या मातेच्या पल्लवीत झाल्या.
दरम्यान महादेववरती पुरे उपचार होऊन तो सुरक्षित घरी परतेपर्यंत आता आपणही सर्वोतोपरी प्रयत्न करायचे असे ठरवले आणि त्या दिशेने प्रवास सुरु झाला.
फोटो घेतला, माहिती तयार केली.
एका नामांकित दैनिकाच्या अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी लिहिण्यास प्रेरणा दिली. आणि माझ्या हातून त्या प्रसंगाला अनुसरून माहिती लिहिली गेली . आणि सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र त्याची ही करूणभरी कहाणी प्रसिद्धही झाली.
त्याचे झगडणे, दारिद्र्याशी आणि हृदयविकारासाशी........या मथळ्याखाली ती माहिती प्रसिद्ध झाली......
मनाला घालमेल करणारे विचार ,कागदावर उतरले.
माझ्या भावनांनाही वाट मोकळी झाली. त्या अमूर्त भावनांना ,या करुन कहाणीच्या रुपाने मुर्त रुप मिळाले.
दुःख नेत्रीचे घेता पिऊनी,
नित्य भजतो मानवतेला, तोचि आवडे देवाला ।"
या काव्यपंक्ती आपल्याला हेच सांगतात की, आपल्या सभोवती जर कोणी दुःखी - कष्टी असेल, तर त्याचे दुःख जाणून घ्या. जगात वावरताना डोळस बना, उघड्या डोळ्याने वावरा म्हणजे समजेल की,
आपल्या अवती भोवती, दीन-दुबळे, दुःखी- कष्टी, अश्राप जीव वावरत आहेत. अशा दुःखाशी, संकटाशी एक शाळकरी मुलगा सध्या झगडतो आहे.
एकीकडे त्याचे झगडणे आहे. प्रकृतीशी आणि दुसरीकडे दारिद्र्याशी! अशी वेळ आली आहे. शिरोली (ता. हातकणंगले) येथील कु. महादेव विजय गावडे या १० वर्षाच्या इ. ४ थीत शिकणाऱ्या चिमुकल्या बालकावर, त्याचा प्रत्येक क्षण दुःखाने आणि यातनेने भरलेला आहे. तो शुक्रवार ८ सप्टेंबर, २००० पासून 'वाॅनलेस हॉस्पिटल, मिरज' येथे उपचार घेत असून, त्याच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी रु. ९० हजार ते.१ लाख खर्च येणार आहे.
एवढा पैसा उभा करण्याइतपत त्याच्या घरची परिस्थिती नाही. त्याच्यासाठी शाळकरी मुलांनी व शिक्षकांनी यथाशक्ती मदत केली आहे.
महादेवचे आई-वडिल रोज रोजंदारी करून आपल्या कुटूंबाला सांभाळतात. महादेवच्या दुसऱ्या वर्षापासून महादेवला हा त्रास सुरु आहे. घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे आजपर्यंत त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली नाही. महादेवची आई साश्रुनयनांनी आपली करुणभरी कहाणी हुंदके देत सांगत होती. त्यांची ही वेदना डोळ्यांना दिसत होती. जाणवत होती, दुःखभरीत हुंदके कानांना ऐकू येत होते. अशावेळी स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यांनसाठी जगलास , तरच जगलास! खरे तर या सुविचाराच्या मागेही दुःखितासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हेच आवर्जून सांगितले आहे.
तेव्हा या चिमुकल्या महादेवला वाचवण्यासाठी डी. डी. किंवा चेकद्वारे किंवा रोख, आपल्या सढळ हाताने मदत देणे आपले कर्तव्य आहे. मदत महादेवलाच मिळावी म्हणून हॉस्पिटलमध्ये -
'रिझर्व डोनेशनसाठी त्याचे खाते उघडले आहे.' अशा मथळ्याची माहिती महादेवच्या निस्तेज फोटोसह, सर्वत्र प्रसिद्ध झाली.
समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळाला, हजारो , लाखो रुपयांची मदत हा-हा म्हणता काही दिवसातच हॉस्पिटलमध्ये जमा होऊ लागली.
महादेवरती शस्त्रक्रिया या मदतीवरच झाली. सर्व खर्च झाला. रोख १५ ते २० रु हजार रु प्रमाणे कुणी १०००, ५०० रु. यथाशक्ती समाजातील लोकांनी प्रत्यक्ष महादेवच्या आई-वडिल , आजी -आजीबा यांच्याकडे मदत दिली
लाखो रुपये जमा झाले.महादेववरती उपचार झाले , तो पुर्वी सारखा आता जीवन जगू लागला होता.
महादेव, व्यवस्थित होऊन शाळेत येऊ लागला, पेपरमध्ये लिहण्याच्या छंदामुळे , आपल्या लिखानामुळे आणि या यंत्रणेमधील अधिका-यांनी माहितीला योग्य स्थान दिल्यामुळे एका चिमुकल्या मुलाचा जिव वाचला याचा सार्थ अभिमान वाटलाच. पण एक परमोच्च आत्मिक आनंद मिळाला. हा आत्मिक आनंद काय असतो ,हे प्रत्यक्ष अनुभुतीतूनच अनुभवता येते.ते नाही कधी शब्दात मांडता येत.
या एका प्रसंगाने आणखी काम करण्याची , लिहण्याची प्रेरणा मिळाली......
असेच एके दिवशी.......नेहमीप्रमाणे, वर्गावर अध्यापन सुरु होते, शाळेच्या ऑफिसमधून निरोप आला,
"सर ! ऑफिसमध्ये बोलबले आहे. "
"का ? " मी विचारले
" काही माहिती नाही गावातील लोक आलेत "
निरोप आणनाऱ्यांनी सांगितले
मी ऑफिसमध्ये गेलो तर, महादेवचे आई-वडिल ,महादेवची बहिण , गीता हातात घोंगडे घेऊन थांबलेले... सोबत काही शिरोलीतील प्रतिष्ठित व्यक्ती......मुख्याध्यापक,आ.रा.कांबळे, माझे सहकारी शिक्षक-बाजीराव पाटील ,नामदेव जाधव ,नामदेव कांबळे , सुनिता पाटील ,शिवाजी चौगुले ,सौ.धेंडे ,सौ.जोशी ,सौ.गुरव मॅडम उपस्थित होते या सर्वांच्या समोर.......
स्वतःच्या हातांनी विनलेले हातातील घोंगडे देत,महादेवचे आई- वडिल म्हणाले
"सर, ही आमच्या गरिबांच्याकडून भेट, महादेवच्या आजी-आजोबांनी या घोंगड्यासाठी कष्ट घेतलंय आणि हे तुम्हाला द्यायला सांगितलय."
मी भारावून गेलो. त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा आनंदअश्रुंना वाट मोकळी करीत ते म्हणाले
'"सर ! तुम्ही आम्हाला देव भेटलासा, माझ्या पोराचा जीव तुम्हांमुळ वाचला , लय- लय उपकार झाल आमच्यावर !!"
माझ्या वरिष्ठांच्यासमोर आणि प्रतिष्ठित नागरिकांच्यासमोर, बालचमुंच्या साक्षीनं मिळालेल ते घोंगड, मी माझ्या जीवनातील मोठा बहुमान समजतो.शिक्षकी पेशातील, शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या पुरस्कारापेक्षाही ते घोंगडे मला आजही मोठे वाटते.
महादेवच्या आई-वडिलांनी , आजी -आजोबांनी तयार केलेल्या त्या घोंगड्याच्या प्रत्येक धसीमध्ये प्रेमाची, आपुलकीची आणि कृतज्ञतेची भावना ओतप्रेत भरलेली आहे. मला आजही ते घोंगडे, मायेची उब देतं, विधायक कामासाठी #प्रेरणा देतं , लिहण्याचे बळ देतं. ते घोंगड मला आजही देशातील सर्वोच्च पुरस्कारापेक्षाही मोठ वाटत.
या अशा प्रेरणेमुळेच, मी एक पामर लिहत राहतो , सुचणाऱ्या भाव -भावनांना शब्दातून वाट मोकळी करत असतो . आपल्यासमोर व्यक्त होतो.ते अशा निरपेक्ष प्रेमामुळेच ,आशीर्वादामुळेच , हे निश्चित !
- धनाजी माने......✍️
(यापुर्वी माझी ही कथा ,लेख...#पुर्वप्रसिद्ध झाले आहेत - #विविध दैनिके, #दिवाळी अंकामधून )















