दि.२०/०१/२०२१
◾ प्रासंगिक .........✍️
मी कामेरीची जिल्हा परिषद
शाळा बोलतेय !
' शिक्षण हि माणसाची मूलभूत गरज आहे. माणसाकडे रंगरूप, सोन- नान,धन- संपत्ती, सर्व काही असेल आणि त्याच्याकडे शिक्षण नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. शाळा हा आपल्या शिक्षणाचा प्रमुख आणि अविभाज्य घटक आहे. एक लहान मूल शाळेत जाते पण शाळेतून बाहेर पडते ते एक सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून. अनेक यशस्वी व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेला आणि शिक्षकांना दिले. अनेकांनी शाळेचे तोंडभरून कौतुक केले.'
पण कधी आपण विचार केला आहे का ? कि हि आपल्या कामेरी गावची जिल्हा परिषद शाळा, जिच्यामुळेच आज आपण घडलो, जिच्या आंगाखांद्यावर खेळून ,अक्षरांचा श्रीगणेशा गिरवूनच आज या पदापर्यंत पोहचलो.समाजात एवढा मानसन्मान मिळाला,मिळतोय तो , माझ्या या शाळेमुळे.
हो ना रे ?
मला अभिमान आहे माझी लेकर समाजात नाव कमवत आहेत ,मोठ - मोठी पद पादाक्रांत करत आहेत आणि केलीही आहेत.
पण ....मला वाईट एवढ्याच गोष्टीच वाटत की तुम्ही
माग फिरुन कधी पाहिलंच नाही. अरे जरा थोडीतर
कृतज्ञता बाळगा रे !
तुम्ही सारी लेकर म्हणत असाल की ही आम्हाला आरे - तुरे का करते ?
अरे बाबांनो माझा तेवढा अधिकारच आहे. माझ वय आता दिडशे वर्षापेक्षाही जास्त झालयं.अरे तुम्ही माझी जन्म तारीख विसरला असाल (आईची जन्म तारीख कशाला कोन ध्यानात ठेवील?)पण तुमची आणि माझी जन्मतारीख ...मी नाही विसरले.
तुमच्या सर्वांच्या जन्मतारखा माझ्याकडे आहेत.
पण माझी तुमच्याकडे आहे? मला महिती आहे उत्तर नाहीच येणार .
तर सांगते ऐका.... अरे सन- १८७० साली ,मार्च महिन्याच्या १ तारखेला माझा जन्म झालायं, तब्बल दीडशे वर्षाची मी.समजलं आता माझं वयं.
माझ्या आंगाखांद्यावर खेळलेली अनेक लेकर वार्धक्याने म्हातारी होऊन काळाच्या पडद्याआड गेली.
आणि आज कामेरी गावात हयात असणारी सर्वांत वयोवृद्ध माझी लेकरं माझ्या पेक्षा वयाने कितीतरी लहान आहेत, म्हणून मी तुम्हाला अधिकार वाणीने
आरे - तुरेच बोलवणार ,रागावणार ,तुम्हाला हक्काने दरडावणार समजलं.
म्हणूनच मी आज तुमच्याशी बोलतेयं रागाने आणि तेवढीच व्यथीत होऊन .
होय तुमचीच ,कामेरीची जिल्हा परिषदेची शाळा बोलतेय, हो-हो तुमचीच शाळा बोलतेय बाळांनो… अस अनोळखी होवून पाहू नका. खरच मी तुमची शाळा बोलतेय,
ओळखल नाहीत का मला? पण मी मात्र ओळखते तुम्हाला… आता बरेचसे चेहरे बदललेत…. ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होत… ते चेहरे बदलले.
तुम्ही मोठे झालात, आपापल्या संसारात रमलात. मी मात्र आहे तिथेच आहे तशीच आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागून , गावाच्या पश्चिमेला वाहनांची घरघर ऐकत कुडते आहे,अगदी खिन्न मनाने.
आता थोडा बदल झालाय माझ्यात, तुमाच्यातल्याच काहींनी हात दिला मला मदतीचा. आणि मी पूर्वी पेक्षा थोडी बदलले. आपलं संपुष्टात येणार अस्तित्व टिकवण्यासाठी.
वाटलं होत कि तुम्ही माझ्या अंगणात खेळलात, शिकलात, पडलात, रडलात आणि घडलात सुद्धा.
तुम्ही माझ्या बाजूने जाताना कधी आपल्या मुलांना सांगत ही नाही की, बाळांनो ही माझी जिल्हा परिषदेची शाळा… मी याच शाळेत शिकलो, इथेचं घडलो… चल तुला मी माझी शाळा दाखवतो…
अस बोलला असतात तरी माझ समाधान झाल असत. मी आनंदाने सद्गदित झाले असते.
जाऊदे....उगाचच मी हे तुमच्यासमोर उगाळत बसलेय.
पण ....एक सांगते अजूनही वेळ गेलेली नाही. आजही तुमच्या नात्या- गोत्यातील मुल माझ्या अंगणात,छताखाली घडतायत…
मोठी होतायत, खूप हुशारही आहेत हो ,ही लेकर. . त्यांना मी तुमचीच मुले… तुमचच रूप समजते.
तुम्ही आज आधुनिक होत गेलात. पण मी मात्र तशीच अभागी दोन पावले मागेच राहिले. माझ्याकडे या नव्या आणि आधुनिक जगात काही अपुर आहे .ते तुमच्या लेकरांना देण्यासाठी, तुमचे हात दातृत्वासाठी खुले करा.तेच जुने पुराने मोडके - तोडके साहित्य बदला, मी रस्त्याकडेलाच असल्याने आणि माझ्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने गावातील तर बाहेरील लोक मला इजा करुन जातात,एवढ मोठ दोन एकराच अंगण असूनही उघड- बोडकंच, माझ्या काही भिंतीही आता जुनाड आन ढिसाळ दिसू लागल्यात, ना सभागृह, ना ग्रंथालय, ना प्रयोगशाळा अशा अनेक माझ्या समस्या आहेत.या लेकरांच्या प्राथमिक गरजाच मी पूर्ण करू शकत नाही. तर आधुनिक पद्दतीच शिक्षण कस देवू शकेन?. हे पाहून माझी मलाचं खंत वाटतेयं.
माझ्या या अवस्थेला आज जबाबदार कोण? तुम्हीच सांगा मी कुणाकडे बोट दाखवू. तुमच्यासाठी येथे राबतेय, तुम्हास घडवतेय, सावरतेय अस आपलं आई मुलाच नातं… मला आधार देण्यास तुम्ही का नाही पुढे येत? का नाही खुलवत येथे नंदनवन…?
अरे तुम्ही सर्वांनी मनावर घेतलतं तर किती वेळ लागेल माझ रुप बदलाय ?
मला तुमच्या सगळ्या लेकरांचा अभिमान आहे, माझ्या च आंगा -खांद्यावर खेळलेली लेकरं , वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय , कोणी देशाची सीमा लढवली, कोणी लढवत आहेत ते शुर सैनिक,स्वातंत्र्यसैनिक, अनेकांनी ज्ञानदान केले ,कोणी करत आहेत ते गुरुजन, कोण आधुनिक शेती करत हरित क्रांती घडवत आहेत ती माझी कष्टकरी लेकरं, कुणी हाँटेल व्यवसाय थाटलाय-वाढवलाय, तर कुणी सिनेसृष्टीत नाव कोरलयं, तर काहींनी लेखनीन लेखन करुन लेखक म्हणून नाव कमवलयं,तर अनेकजन विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.कोणी डॉक्टर ,तर कोणी इंजिनिअर आहेत. तर अनेकांनी राजकीय क्षेत्रात वलय निर्माण केलयं, माझ्या अनेक लेकरांनी तर ट्रँक्टर, जेसीबी, पोकलँड सारखी अवजारे घेतली आहेत ,अनेक तरुण मंडळ आहेत, संस्था आहेत आणि त्या- त्या ठिकाणी सारे नाव कमवत आहेत.अशी सारी माझी लेकरं सगळीकडे काम करत आहेत , हे सार माझ वैभव पाहून माझा ऊर भरुन येतो.
पण..... तुम्ही माग वळून माझ्याकडे कधी पाहिलचं नाही याच मला खूप दु:ख होतयं.
तेव्हा लेकरांनो तुम्ही मनावर घेतल्यावर किती वेळ लागेल रं माझ रुप बदलायला.
म्हणून बाळांनो, मी आज तुम्हास मी साद घालतेय….
अस काहीतरी करा कि तुमची मुलं माझ्या अंगाखांद्यावर बागडतील.माझ्या समोर ,माझ्या कुशीत. माझे बनून…
अरे.. ज्या काही वेदना होतात त्या माझ्या मलाच ठावूक.
तेव्हा माझ्या गुणी लेकरांनो ! मी बदलायला तयार आहे. पण माझ्यात तो बदल तुम्ही घडवायला हवा.
माझं वैभव द्या नारे पुन्हामिळवून
उठा! सारे एक व्हा!
आणि घडवा पुन्हा ,तो इतिहास तुमच्या सेवेसाठी.मी खूप आशेने तुमच्याकडे पाहत आहे.
मी दयेची याचना करतेय. घडवा पुन्हा आयुष्य तुमच्या पाल्यांच जे आज माझ्या अंगणात शिकतायत. मला पहायचय की माझा विद्यार्थी हा गाव सोडून शहरात नाही तर गावात राहून मोठा झालेला. शिकून मोठा अधिकारी झालेला, डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर,आधुनिक शेतकरी, शिक्षक, शास्त्रज्ञ ,उत्कृष्ट खेळाडू झालेला.विविध क्षेत्रात नावारुपास आलेला पहायचयं मला.
पदर पसरते मी तुमच्यासमोर.माझी एवढी इच्छा पूर्ण करा.करशी ला नारे माझ्या लेकरांनो !
माझी शेवटची इच्छा पूर्ण ?
निघते ………
बघा थोडा विचार करा.तुमच्याने जमेल तेवढी,तुम्हाला शोभेल अशी ,
सढळ हाताने मदत करा.माझी तुम्ही थोडी तरी सेवा करा.
मातेच्या मोलाने , कारण आईने तुम्हाला जन्म दिलाय आणि
मी तुम्हाला घडवलयं, तुमच्या पायावर उभं केलयं.शिकवून जगण्याचा आत्मविश्वास दिलायं.
▪️ शब्दांकन -धनाजी माने.....✍️
Ⓜ️9403963934

No comments:
Post a Comment