Sunday, May 16, 2021

यासाठीच ही लढाई लढतो आहे.

◾ऊस तोढ कामगार आपल्या कुटुंबाला, जिवाभावाच्या लोकांना सोडून प्रचंड जोखमीचे,हलाखीचे- ऊसतोडीचे काम करतात. महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या कामगारांचे मागासपण आणि पर्यायाने या जिल्ह्याचे मागासपण अजूनपर्यंत कायम आहे. ऊसतोड कामगार हे पारंपारिक पद्धतीने टोळीमध्ये काम करतात 
ऊस तोड़णीशिवाय या कामगारांना कोणताच पर्याय नसतो .गेली कैक वर्ष झाले कामगार व त्यांची पुढची येणारी पिढी ही ऊसतोड कामगार म्हणूनच काम करत आहे .ऊसतोड कामगाराला गावाकडे काम नसते, अल्पशा जमिनीतून त्याला खाण्यापुरत पीक येत, तर कधी पीक येत नाही. काहींना कसण्यासाठी जमीनसुद्धा नसते,काहींचे कुटुंब मोठे असल्यामुळे मुलींच्या लग्नाची जबाबदारी येते,मग लग्नासाठी काढलेले सावकाराचे कर्ज, वयोवृद्ध लोकांचे आजारपण,मुलांचे शिक्षण, यासाठी 
ऊसतोड़ कामगार ऊचल घेतो. 
आणि उचल भागवण्यासाठी ऊसतोड कामगार त्याच्या पूर्ण कूटुंबाला घेऊन ६ महिन्यासाठी स्थलांतरीत होतो.प्रचंड थंडीत ऊसतोड़ कामगार कुटुंबाचा पसारा हा  ट्रक, टेंपो , ट्रॅक्टरा मध्ये भरतो, मुले-बाळे, गाई- गुरे घेतो आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर , बोचणाऱ्या थंडीत ,सतत चालणारा कोयता हातात घेऊन ,त्याची जगण्याची लढाई सुरु होते.......✍️




गुलाबी थंडीचा , हा झोंबतोय गारवा,
फुटून गेले अंग सारे,बोचतोय गारवा.
कधी मिळेल उबदार कपडा,
जाते मन माझे या स्वप्नांच्या गावा.  

झोंबणाऱ्या गारव्याची तमा न करता,
तळपतोय बांधाबांधावर ,माझा कोयता.
पोटाची खळगी भरण्यास,
हा संघर्ष माझा.

उगड्या - नागड्या लेकरांना माझ्या,
उब देण्यासाठी हा संघर्ष सारा.
वाट्याला येवू नये त्यांच्या, हा झोंबणारा गारवा,
त्याचसाठी हा सारा,प्रपंच माझा.

कोसोदूर येवून सारा,
हा गारवा मी सोसतो आहे.
उबदार घरटी,मिळावी लेकरांना,
यासाठीच ही लढाई लढतो आहे. 

कधी वाडेविक्रीची कमाई, 
कधी वाहतुकीची हमाली.
फाटलेल्या संसाराला ,असे ठिगळ लावतो आहे.
झोंबणारा गारवा हा, मनी माझ्या टोचतो आहे. 

होरपळणाऱ्या या प्रपंच्यात माझ्या,
मिळावा थोडातरी गारवा.
यासाठीच हा अखंड प्रपंच माझा !
अखंड प्रपंच माझा !! 

- धनाजी माने....✍️

dhanajimane123@gmail.com

No comments:

जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत

 ===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...