Sunday, May 08, 2022

आईचाच खून ? - मातृदिनाच्या दोन दिवस अगोदरची घटना !


#आई खरंच काय असते? , लेकराची माय असते.

वासराची गाय असते, दुधाची साय असते.

लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी , सरतही नाही उरतही नाही! -फ.मु
पण.......

आईचाच #खून ? - #मातृदिनाच्या दोन दिवस अगोदरची घटना !

#८ मे हा दिवस मातृदिन म्हणून आपण आई बाबत कृतज्ञता व्यक्त करतो.आज मातृदिन #व्हाट्सअप , #ट्विटर, #इन्स्टाग्राम,#फेसबुक, या #सोशल मीडिया वरती सर्वत्र  आईची #माहिती,#महती सांगणारे अनेक मेसेज वाचनात आले .अनेकांनी आपल्या आई बाबतच्या आठवणींना उजाळा दिला. तिच्या सोबतचे कुटुंबासोबतचे फोटो , व्हिडिओ या सोशल मीडिया वरती #शेअर केलेले पाहिले.

 हे पहात असतानाच मातृदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दोन दिवसापूर्वी  ६ मे रोजी एका  #दुर्दैवी आईबाबतची  घडलेली घटना वाचनात आली. एका दैनिकामध्ये 

' #जेवण चांगले बनविले नाही म्हणून आईचा खून! '

या मथळ्याखाली ही #बातमी वाचली आणि मन खिन्न झाले.

#सांगली जिल्ह्यातील #कवठेमहांकाळ तालुक्यातील #आगळगावातील  ही घटना.

#मायाक्का (नाव बदल)  या सत्तर वर्षाच्या आईला #दशरथ  या पोटच्या मुलांने मारहाण केली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 

कारण काय होते ? तर आईने जेवण चांगले बनवले नाही . म्हणून या पोटच्याच   मुलाने आपल्या मातेला #लोखंडी #फुकणी आणि दगडाने मारहाण केली.त्यात ही माय #जखमी झाली. उपचारासाठी तीला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुलाच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलाचा आणि त्याच्या दोन मुलांना (नातवांना)  मायाक्का ही #माय #काबाडकष्ट करून सांभाळ करत होती. वयाच्या सत्तरीत सुद्धा ही आपल्या मुलाला आणि नातवांना जगवण्यासाठी गरिबितही धडपडत होती.खरचं ही आई किती थोर होती.मुलगा व्यसनी होता तरी त्याकडे कानाडोळा करून ही माय मात्र काबाडकष्ट करतच राहिली आणि मुलाला आणि नातवांना सांभाळत राहिली .मात्र मातृदिनाच्या दोनच दिवस अगोदर हा पोटचा  मुलगाच तिचा काळ ठरला . आणि या दुर्दैवी मातेचा यात मृत्यू झाला.

एका बाजूला मातृदिनाच्या दिवशी आईसाठी अनेक लेकरांनी आपल्या परीने आपल्या आईसाठी दिलेल्या शुभेच्छा! तीच्या आठवणींना दिलेला उजाळा....

 तर दुसऱ्या बाजूला  मातृदिनाच्या #पूर्वसंध्येला एका #क्षुल्लक कारणावरून आईच्याच मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा. या घटनांचा #पदर उलगडून पाहताना मनात विचार येतात की ,

कुठे तो 'श्यामच्या आई ' मधील #श्याम (#साने गुरुजी) आणि कुठे हा आगळगावचा आईच्याच मृत्यूचा कारण ठरलेला मुलगा !

खरंच आज समाजामध्ये अशा घटना का घडत आहेत? इतकं दुर्दैवी जीवन एखाद्या आईच्या वाट्याला का यावे ? याने मन विषण्ण होतं.

श्यामच्या आई मधील श्याम म्हणजेच साने गुरुजी आपल्या आईची महती सांगताना ,#सवंगड्यांना सांगताना,

गडयांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. 

आई माझा #गुरू, आई  #कल्पतरू

सौख्याचा सागरु आई माझी ।।

 तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, #झाडामाडांवर, #प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले. 

तीच #वास देणारी, #रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर #माउलीचे. सारी माझी आई!आई!!आई!!!'

असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळयातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे #ओठ, त्यांचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. गड्यांनो आईचे #गुणगान सांगून हे ओठ #पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. असे श्याम म्हणाला ,आणि दररोज आपल्या आईची महती सांगत गेला. जवळजवळ ४२ रात्रीत श्यामने  आपल्या आईची महती व गुणगान आपल्या सवंगडी मित्रांना सांगून आपले ओठ पवित्र केले.

 या दोन्ही प्रसंगांचे पदर उलगडताना असे वाटते की , परमेश्वराला प्रत्येक घरात जन्म घेता येत नाही म्हणून तो आईच्या रूपात प्रत्येक घरात असतो. अस असताना पोटी येणारा मुलगाही.......तेवढ्याच #तोलामोलाचा जन्माला यावा !

 म्हणजेच श्यामसारख्या मुलांचा सहवास घरोघरी प्रत्येक मातेला लाभावा,

गावाला ,माणुसकीला काळीमा लावणारा आईचाच बळी घेणाऱ्या असल्या मुलाचा #सहवास कोणत्याच मातेच्या वाट्याला न यावा !

हीच मातृदिना दिवशी #परमेश्वर चरणी #प्रार्थना !

- धनाजी माने ...✍️


 

Friday, May 06, 2022

📢 असे भोंगे गावागावात वाजायलाच हवेत....

 

               ■ शुभ वर्तमान ■

📢 असे भोंगे गावागावात वाजायलाच हवेत.....

आज  सर्व महाराष्ट्रभर  भोंग्या वरून राजकारण पेटलं आहे .वातावरणातील तापमानाबरोबर  भोंग्याचे राजकारणही तापू लागले आहे.याचे लोण महाराष्ट्राबरोबरच सर्व भारतभर पसरू लागले आहेत.

समाजा -समाजामध्ये, जाती - धर्माच्या नावाखाली भेदा-भेद सुरू आहे. सामाजिक ऐक्याला कुठेतरी तडा जाताना  दिसत आहे. यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विनाकारण ताण वाढू लागला आहे.

जिल्हा- परिषद पंचायत समित्या, नगरपालिका ,महानगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमाचे बिगुल काही काळातच राज्यात वाजणार आहेत. आणि यामध्ये आपल्या पक्षालाच मतांचा गट्टा कसा मिळेल यासाठी प्रत्येक पक्षआत्तापासून वेगवेगळे डावपेच  रचत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वेगवेगळे पत्ते बाहेर काढले जात आहेत असे विश्लेषक, जाणकार नागरिक बोलत आहेत. 

गेल्या दोन वर्षात कोरोणाने हाहाकार माजवला आणि अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष निघून गेले .आणि त्या कुटुंबावरती आभाळ कोसळले. अजूनही महाराष्ट्रातील अशी  हजारो कुटुंब या दुःखातून सावरलेली नाहीत. त्यांच्या समोर अनेक समस्या आवासून उभ्याआहेत.महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले .शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. दरडी कोसळून गावेच्या गावे नामशेष झाली. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न.....असे अनेक प्रश्न  राज्यासमोर आवासून उभे असताना त्याच्या वरती चर्चा होताना कुठेच दिसत नाही.

आपला पक्ष आणि आपणच कसे बरोबर आहोत, समोरचे कसे चुकीचे आहेत , यासाठी वैयक्तिक टिका -टिपणी ,वैयक्तिक शिंतोडे ,एक दुसऱ्याच्या संपत्तीचे मोजमाप ....याचीच चर्चा जाहीरपणे होताना दिसते.वरती उल्लेख झालेल्या सर्वसामान्यांच्या समस्यांवरती चर्चा होताना दिसत नाही .गोरगरिबांच्या दुःखावरती कशी फुंकर मारता येईल? त्याचे जीवनमान कसे सुधारेल? शेतकऱ्यांच्या संसारात कसे सुख येईल? तरुणांच्या हाताला कसा रोजगार मिळेल ?पेट्रोल दर गगणाला भिडलेत ,Gst मद्धे वह्या  -पुस्तकांचे दरही वाढलेत सामान्य. कुटुंबातील गरिबाला याचा मेळ घालताना ससेहोलपट होते, महागाईमुळे मेहनतीचे, खताचेदर गगणाले भिडले पण  शेतीमालाचे दर....? यामुळे बळीराजाच्या संसारातील मेळ बसेना......   अशा एक ना अनेक समस्यांबाबत  चर्चा होताना दिसत नाही.नियोजन नाही.

आज प्रश्न असा पडतो राजर्षी शाहू राजांचा शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना. अभिवादन करत असताना त्या महान  रा. शाहूराजांचा थोडा तरी आदर्श घ्यायला हवा.या राजाने जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अठरा- पगड जातींना एकत्र बांधले. ज्या काळात सर्व समाज दलितांना अतिशय हीन वागणूक देत होता ; त्या काळात या माणसातील देव माणसाने , रयतेच्या- राजाने... राजर्षी शाहूंनी गंगाराम कांबळे सारख्या सर्वसामान्य दलित माणसाच्या हॉटेल वरती , चार घोड्याच्या  बग्गीतून जाऊन चहा घेतला व घेत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान उच्चविद्याविभूषित व्यक्तीसाठी करवीर नगरीत स्वागत कमानी उभारुन आणि त्यांना पायघड्या घालून स्वागत केले .जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी काम केले. दुष्काळ, स्त्रीशिक्षण, सर्व समाजातील तरुणांना शिक्षण , सर्व स्तरातील सर्वसामान्यांची, गोरगरिबांची दुःख दूर करण्यासाठी हा राजा रात्रंदिवस झटला. आपल्या उण्यापुऱ्या अठ्ठेचाळीस वर्षांत आणि  मिळालेल्या राजकीय कारकीर्दीच्या कालावधीत  फक्त आणि फक्त रयतेची काळजी वाहिली. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून ते आयुष्यभर चालले त्यांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आणि कार्य करत राहिले सर्वसामान्यांच्या साठी रात्रंदिवस झटत राहिले.

काल आणि आज  ही  तफावत आपण  पाहत असतानाच , भोंग्यावरून चाललेल्या राजकारणात, राजकारण्यांना चपराक देणारे शुभवर्तमान सर्वसामान्य लोकांच्या कडूनच घडत आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यावेळी आपण बदलतो , त्यावेळी विधायक कार्य समोर येते .सकारात्मक विचारातून सकारात्मक आचार तयार होतात आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरतात.

अशाच सकारात्मक विचारातून खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे  दररोज सात वाजता भोंगा वाजतो आहे.देशाचे भवितव्य ज्या तरुण पिढीच्या हातात असते त्या तरुणांना , बालचमूंना एका चांगल्या कामात गुंतवण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्याचे सर्वत्र तोंड भरुन कौतुक होत आहे.

खेराडेवांगी गावातील प्राथमिक शाळेवर एक भोंगा बसविला आहे.हा भोंगा दररोज सात वाजता वाजविला जातो. सर्व घरातील टीव्ही बंद होतात .इतरही करमणुकीची साधने बंद केली जातात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. एक तास म्हणजे आठपर्यत ही सर्व मुलं शांत वातावरणात अभ्यासात मग्न असतात.हा भोंगा गावात काही महिन्यापासून  वाजवला जातो आहे.

एका विधायक विचारातून समोर आलेला हा साधा उपक्रम मुलांचं अमुल्य असे भवितव्य घडवत आहे.गावकऱ्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

युनिसेफचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले तेव्हा पाहणी पथकाने हा उपक्रम पाहिला , तेव्हा पथकातील अधिकारी आदर्श शाळा आणि गावातील भोंग्याचा उपक्रम पाहून चकित झाले.

सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या आदर्श शाळा या संकल्पनेतून ही शाळा शाळेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी आदर्श बनवली आहे.

या शाळेत शुद्ध पाणी, शौचालय,संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग अशा अनेक भौतिक सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

एकेकाळी पडक्या इमारतीत ,कुठल्यातरी देवळात भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता अशा आदर्शअधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून निर्माण होणाऱ्या आदर्श शाळा बनत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आपले रुपडे बदलत आहेत.नामांकित खासगी शाळांनाही लाजवतील अशा  जिल्हा परिषदेच्या शाळा सांगली जिल्ह्यातआकाराला येऊ लागल्या आहेत.

या भौतिक सुविधा बरोबरच , शैक्षणिक दर्जाही सुधारत आहे .यावर पालकांचा विश्वास निर्माण झाल्याने, या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो  मुलांनी १ली साठी प्रवेश घेतला आहे आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेच्या शाळेतून केला आहे. अनेक खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.

 भविष्यातील  दोन - चार वर्षात  जिल्हा परिषद शाळेमद्धे प्रवेशासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागेल असे वातावरण सर्व जिल्ह्यात निर्माण होऊ लागले आहे. 

या आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, SMC,शिक्षणप्रेमी जिल्ह्यातील तमाम शिक्षक अविरतपणे झटत आहेत.

विद्यार्थ्या विना ओस पडू लागलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. आणि हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डीसाहेब यांच्या संकल्पनेतून शक्य झाले आहे हे मात्र निश्चित !

एकूणच महाराष्ट्रात भोंग्या वरून राजकारण पेटले असतानाच , मुलांच्या उज्वल भविष्यासाठी खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे रोज भोंगा वाजत आहे.

म्हणूनच सर्वांनी इतर भोंगे वाजवून किंवा बंद करून राजकारण करण्यापेक्षा, गावागावात असे विधायक विचाराने प्रेरित झालेले भोंगे वाजवायलाच हवेत .

(न्यायालय निर्देशानुसार - डेसिबल मर्यादा नियम)

- धनाजी माने......✍️


  




Thursday, May 05, 2022

शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन !

                     राजर्षी छत्रपती शाहू महाराज


🙏 #६ मे २०२२ - शाहू महाराज यांचा १०० वा #स्मृतिदिन !

लोकराजा #राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त......

◆ शुक्रवार दि. ६ मे रोजी

◆ सकाळी १० वाजता १०० सेकंद

◆ स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुयात..!

=================================

📑 राजांचा जीवनपट ....🎥

◆ शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी #कागल येथील घाटगे घराण्यात झाला. 

◆पूर्ण नाव #यशवंत जयसिंगराव घाटगे .

◆ आईचे नाव #राधाबाई होते.

◆चौथे #शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर यशवंतला दत्तक घेतले. त्यांचे “शाहू” असे नामकरण करण्यात आले. #शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचेहोते.ते न्यायप्रेमी होते.

◆१ एप्रिल १८९१ साली ते #लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाहबद्ध झाले.#राजाराम व #शिवाजी हे दोन मुलगे व #राधाबाई व #अनुबाई या दोन कन्या होत्या .शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८९४ साली त्यांचा #राज्याभिषेक करण्यात आला.

◆संस्थानातील सर्व मुलांना #प्राथमिक शिक्षण #मोफत दिले. स्त्री शिक्षणासाठी देखील ते नेहमी आग्रही होते. 

◆#जातीभेद आणि #अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अस्पृश्यांच्या वेगळ्या #शाळा भरवणे बंद केले.

◆छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी १९१९ मध्ये भेट झाली ती #डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि #मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले

◆ #राधानगरी धरणाची उभारणी, #शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड #अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ची स्थापना,#शाहुपुरी व्यापारपेठ, ,शेतकऱ्यांची सहकारी संस्था,अशा कामातून शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले. 

◆आपल्या अधिकारांचा फायदा #बहुजन समाजाला मिळवून दिला. त्यांच्या न्यायासाठी आणि शिक्षणासाठी ते नेहमी झटले.

◆ १९१७ साली त्यांनी #पुनर्विवाहाचा कायदा करून#विधवा विवाहास कायदेशीर #मान्यता मिळवून दिली.

◆जातीव्यवस्थेची #शिकार झालेल्या अनेक #जमाती च्या लोकांना #गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी #ब्रिटिश कालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांनी कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या . त्यांना घरे बांधून दिली . ,वणवण भटकणाऱ्या लोकांची राहणाऱ्या पोटापाण्याची सोय झाली . गुन्हेगारी पासून मुक्ती होऊन त्या लोकांना समाजात #माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले .

◆शाहू महाराजांना #‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी #क्षत्रिय समाजाने दिली. #

◆इतिहासकारांनी त्यांची नोंद #लोककल्याणकारी #राज्यकर्ता म्हणून केली आहे. 

◆६ मे १९२२ रोजी #मुंबई येथे त्यांचे निधन झाले

■ आपल्या ४८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी #आरोग्य,#कृषी, #शिक्षण,#कला , #उद्योग,  व #क्रीडा अशा अनेक क्षेत्रात अविरतपणे महत्त्वपूर्ण #योगदान  दिले. अशा या #महान राजांना  #विनम्रपणे #अभिवादन!

- धनाजी माने ......✍️


==================================

 

Monday, April 25, 2022

जिल्हा अंतर्गत बदली नवीन धोरणामध्ये विशेष संवर्ग भाग दोन चे निकष

 


विशेष संवर्ग भाग दोन चे निकष


जिल्हा अंतर्गत बदली नवीन धोरणामध्ये विशेष संवर्ग भाग २ हा तयार करण्यात आला आहे. जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.
1.9 संवर्ग 2 चे निकष व प्राधान्यक्रम
1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी
असतील तर
1.9.2 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.3 पती-पत्नी दोघेही एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर 1.9.4 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदा. महानगरपालिका / नगरपालिका
1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक
उपक्रमातील कर्मचारी 1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/ कर्मचारी असेल तर
4.3 संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया व कार्यपद्धती (टप्पा क्र. 3 )4.3.1 टप्पा क्रमांक दोन प्रमाणे ( संवर्ग १ च्या बदल्या) ( कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल, तद्नंतर विशेष संवर्ग भाग-2 यांच्या बद करण्यात याव्यात.4.3.2 जे शिक्षक विशेष संवर्ग भाग दोन मध्ये मोडतात. त्यांना विवरण पत्र क्रमांक चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल.4.3.4 उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर नमूद केलेल्या कार्य पद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधितांची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक युनिट म्हणून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किमी परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यायचे आहे. यापैकी एकाची पण दहा वर्षे •सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.
4.3.5 तीस किलोमीटर रस्त्यांची अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदर चे 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.
4.3.6 विशेष संवर्ग दोन च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


Saturday, April 23, 2022

जनता म्हणते...भोंगे काढून किंवा चालीसा म्हणून....


 


जनता म्हणते.......


#नेते आणि #राज्यकर्ते हवेत,

माझ्या #शाहू -फुले....

#आंबेडकरान सारखे आणि

#छत्रपती शिवबान सारखे


नकोत नुसतेच एक - दुसऱ्यावर ,

ओरडून तेढ निर्माण करणारे.

#मना-मनात आणि #जाती-धर्मात

#भिंती घालून ,आपली #पोळी भाजणारे.


घ्यावेत #आदर्श थोडेतरी #शिवछत्रपतींचे,

अठरा #पगड जातींना एकत्र बांधण्याचे.

व्हावे त्यांच्याच सारखे #रयतेचे राजे ,

रयतेसाठी #जगणारे ,आणि रयतेसाठीच #मरणारे.


असे नेते नको आहेत जनतेला,

#भेदाभेद निर्माण करून,

 #सुरुंग लावतात ऐक्याला.

#संघर्ष माजवून,खतपाणी घालतात #दुहीला


संघर्ष जरूर असावा ....

तो बाबासाहेबांनी सांगितलेला,

#शिका, #संघटीत व्हा ! आणि #लढा!

या पावलावर #पाऊल टाकणारा


#जनता म्हणते  नेते हवेत असे आम्हाला.

मंदिरातील देवाइतकेच, #अल्लालाही माणणारे.

आणि........

मशीदीतील #अल्लाप्रेमी, #चालीशात #रमणारे.


लोक म्हणतात नेत्यांनी,

जरूर ओढावेत #आसूड,

#महात्मा फुल्यांच्या आसूडांनसारखे,

चुकीच्या परंपरांनवर #प्रहार करणारे.


आहो , #भोंगे काढून किंवा #चालीसा म्हणून,

जनता कधीच सुखी होणार नाही.

#शाहू राजांनसारखी , रयतेची काळजी केल्याशिवाय,

#सर्वसामान्य ,#गोरगरीब #सुखी कधीच होणार नाही.

- #धनाजी माने ....✍️

9403963934

dhanajimane123@gmail.com
























४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...