सांगली जिल्हा परिषदेचा डिजिटल शाळा प्रोजेक्ट असो की,वाळवा पंचायत समितीचा डिजिटल स्टुडिओ असो , खेराडेवांगीचा भोंगा असो की बागणी परिसरातील विद्यार्थ्यांचा मोफत शिष्यवृत्ती तासाचा उपक्रम असो एकूणच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक प्राथमिक शाळांचा अंतर्बाह्य चेहरा-मोहरा बदलण्यासाठी या शैक्षणिक यज्ञात झोकून देऊन काम करत आहेत.
याची सुरुवात झाली ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या आदर्श शाळा या संकल्पनेतून ........
जिल्हा परिषद शाळेमध्ये शुद्ध पाणी, शौचालय, संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग , क्रीडांगण, परसबाग, संरक्षक भिंती ,स्वागत कमानी, CCTV,अशा अनेक भौतिक सेवा-सुविधा विविध फंडातून, लोकवर्गणीतून उपलब्ध करण्यात आल्या.
एकेकाळी पडक्या इमारतीत ,कुठल्यातरी देवळात भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी ऊर्जेतून आदर्श शाळा बनत आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळा आपले रुपडे बदलत आहेत.नामांकित खासगी शाळांनाही लाजवतील अशा जिल्हा परिषदेच्या शाळा सांगली जिल्ह्यातआकाराला येऊ लागल्या आहेत.
हे सारे बाह्य रुप बदलत असतानाच , विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वाळवा पंचायत समितीने पुढाकार घेतला, गटविकास अधिकारी मा.आबासाहेब पवार , गटशिक्षणाधिकारी मा.अजिंक्य कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध फंडातून शाळांना टी.व्ही संच पुरवले, पंचायत समितीच्या इमारतीत अत्याधुनिक डीजीटल स्टुडिओ उभारला.येथून तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणारे शिक्षक मार्गदर्शन करु लागले.
वाळवा तालुक्यात ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओ सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने वाळवा पंचायत समिती शिक्षण विभागाकडून राबवली आहे.या उपक्रमाचा जिल्हा परिषदेचे सर्व विद्यार्थी लाभ घेत आहेत.मे महिन्यातही दररोज सकाळी १०.३० ते ११.३० रविवार वगळता शिष्यवृत्तीचे हे तास अखंड सुरू राहणार आहे. रविवारी ही यात खंड पडू नये म्हणून रविवारीही शाळेतून offline शिष्यवृत्ती तासांचे शिक्षकांनी नियोजन केले आहे.शिष्यवृत्तीत जास्तीत-जास्त विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी अतिशय जाणीवपूर्वक वाळवा पंचायत समितीकडून हा उपक्रम राबवला जात आहे.
यासाठी गटविकास अधिकारी आदरणीय डॉ. आबासाहेब पवार सो., शिक्षणाधिकारी मा.मोहनराव गायकवाड सो. यांच्या मार्गदर्शनाने गटशिक्षणाधिकारी मा.अजिंक्य कुंभार सो, विस्तार अधिकारी मा.सौ.छायादेवी माळी सो. , मा.श्री .सुनिल आंबी डाटा operator मा.भालचंद्र कोळी व तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणारे तज्ञ शिक्षक एप्रिल महिन्यापासून अविरतपणे परिश्रम घेत आहेत.
सकारात्मक विचारातून सकारात्मक आचार तयार होतात आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरतात.
अशाच सकारात्मक विचारातून खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे दररोज सात वाजता भोंगा वाजतो आहे.देशाचे भवितव्य ज्या तरुण पिढीच्या हातात असते त्या तरुणांना , बालचमूंना एका चांगल्या कामात गुंतवण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्याचे सर्वत्र तोंड भरुन कौतुक होत आहे.खेराडेवांगी गावातील प्राथमिक शाळेवर एक भोंगा बसविला आहे.हा भोंगा दररोज सात वाजता वाजविला जातो. सर्व घरातील टीव्ही बंद होतात .इतरही करमणुकीची साधने बंद केली जातात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. एक तास म्हणजे आठपर्यत ही सर्व मुलं शांत वातावरणात अभ्यासात मग्न असतात.हा भोंगा गावात काही महिन्यापासून वाजवला जातो आहे.एका विधायक विचारातून समोर आलेला हा साधा उपक्रम मुलांचं अमुल्य असे भवितव्य घडवत आहे.गावकऱ्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
हे सारे होत असतानाच पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कामेरी, बागणी ,आष्टा परिसरातील शिक्षकांनी मोफत शिष्यवृत्ती वर्गाचे आयोजन केले पाचवीत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यातील नामवंत शिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गाचा भागातील जि. प. खासगी अनुदानित संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकणार आहेत. भागातील पालक वर्ग आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी भेट घेऊ लागले आहेत.या उपक्रमासाठी तालुक्यातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शक कार्यरत आहेत.
एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांतीचे गतवर्षी प्रज्वलित झालेले स्फुल्लिंग हळूहळू ते सर्व जिल्हाभर अशा विविध रुपाने प्रज्वलित होत आहे.भौतिक सुविधा बरोबरच , शैक्षणिक दर्जाही सुधारत आहे .
यावर पालकांचा विश्वास निर्माण झाल्याने, या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच हजारो मुलांनी १ली साठी प्रवेश घेतला आहे.अनेकांनी आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच केला आहे. अनेक खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
या अशा आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, SMC समित्या ,शिक्षणप्रेमी , तरुण मंडळे, सामाजिक संस्था,आणि जिल्ह्यातील तमाम हजारो शिक्षक ,शिक्षिका अविरतपणे झटत आहेत.विद्यार्थ्या विना ओस पडू लागलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत.
एकूणच सांगली जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल त्यावेळी... ही प्राथमिक शाळांचा चेहरा-मोहरा बदलणारी शैक्षणिक क्रांती , भविष्यात एक दीपस्तंभ म्हणून, सर्वांच्या स्मरणात राहील हे निश्चित !
- धनाजी माने (इस्लामपूर)
Ⓜ️9403963934
. . .✍️

3 comments:
मनःपूर्वक धन्यवाद सरजी...🙏
प्राथमिक शाळांचा चेहरा मोहरा बदलतोय हे खरच आहे सर....त्याच बरोबर प्राथमिक शिक्षकांचा देखील चेहरा मोहरा कमालीचा बदलतोय हे आपल्या ब्लॉग ला भेट दिल्या नंतर प्रकर्षाने जाणवतेय....धन्यवाद आपल्या लेखनाबद्दल आणि सकारात्मक विचारा बद्दल... संतोष पाटील yesbee...
छान लिहिले आहे सर, मराठी शाळेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन समाजात निर्माण होत आहे..पुढील लिखाणाला शुभेच्छा 💐 .... अनिता संजय काटे
Post a Comment