🙏।।भावपूर्ण आदरांजली ।।🙏
त्यावेळी कोणालाच असे वाटले नव्हते, असे अघटीत घडून जाईल, चालता - बोलता ...देव तुम्हास, आमच्यातून अचानक असे घेऊन जाईल. ज्या -ज्या वेळी माणुसकी, दातृत्व, स्नेह याची चर्चा होईल, त्या त्या वेळी सर्वात पहिली आठवण नाना तुमची येईल..!😢😢😢😢
११ मे २०२२ नानासाहेब महाडीक यांचे तृतीय पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन …..
आज नानांना जाऊन ३ वर्षे झाली ११ मे २०१९ चा तो दिवस आजही आठवतो. इस्लामपूर येथील सुश्रुषा हॉस्पिटल मध्ये एकच गर्दी जमली होती. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपला बाप माणूस आज आपल्यात नाही याची उणीव सगळ्यांना त्यादिवशी जाणवत होती .कारण नानांचं अचानकच एक्झिट त्यादिवशी झालेलं होतं. नेहमीच सर्वसामान्य माणसांमध्ये रमणारे नाना, सर्वांचे नाना, त्यादिवशी सर्वांना सोडून कायमचे निघून गेले होते , पुन्हा कधीही न परत येण्याच्या प्रवासाला !
आज तीन वर्ष झाली. नानांना जाऊन, परंतु ते आजही आपल्यातच आहेत असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं.
कारण माननीय राहुल महाडीक ( दादा ) व सम्राट महाडिक ( बाबा )यांच्या रुपाने प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आधारवड हे दोन्ही सुपुत्र झाले आहेत. नाना हे नानाच होते . नानांची बरोबरी करता येत नसली तरीही ही भावंड मात्र सर्वसामान्यांसाठी झटत आहेत नानांचा वारसा पुढे चालवत आहेत.
नाना हे सर्वसामान्य कुटूंबात जन्माला येवून , सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होणारे ,आणि सतत सामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देऊन त्याला मोठ करणारे,
मोठ्या मनाचा दिलदार माणूस म्हटल की , नानासाहेब महाडीक यांचे व्यक्तीमत्व आजही सर्वांच्या डोळ्यासमोर उभ राहतं !
मुळचे येलूर ( ता.वाळवा) गावचे ,पण व्यवसामुळे पेठ नाका येथेच स्थायिक झाले होते.
त्यांचा जन्म१ जून १९५० रोजी कै. रामचंद्र मसोजी महाडिक यांच्यासारख्या सर्वसामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला.त्यांच्या कुटूंबामद्धे एकूण ७ जण भाऊ व ५ बहिणी नानासाहेब यांचा १२ वा क्रमांक, सर्वात छोटे असल्यामुळे ते सर्व भावा बहिनींचे लाडके होते.
त्यांचे नाव मारुती ऊर्फ बटुपंत असले तरी नानासाहेब या नावानेच ते सर्वपरिचित होते.
१९६६ मध्ये नानासाहेब भारत सरकारच्या नेव्ही - नौदलामध्ये भरती झाले आणि देशसेवेला वाहून घेतले. ९ वर्षाची देशसेवा केल्यानंतर , शेती,व्यवसाय यामुळे त्यांनी राजीनामा देऊन व्यवसायात लक्ष केंद्रित केले.१९७८-७९ पासून ते पेठ नाका येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आणि शेती ,व्यवसाय ,राजकारण, समाजकारण या क्षेत्रात त्यांनी वाहून घेतले.
१९८४ पासून ते फोंडा येथील जवळपास १०० एकर शेतजमीनीवर विविध शेतीचे प्रयोग करत होते . विशेष करून त्यांचे झाडानवरं विशेष प्रेम होते .त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो झाडे जगवली आणि वनराई फुलवली.
त्यांनी फोंडा येथील शेतजमिनीवर केलेल्या विविध शेती प्रयोगांची शासनाला दखल घ्यावी लागली आणि याच कामासाठी महाराष्ट्र शासनाने १९९० मद्धे त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री मा.सुधाकराव नाईक यांच्या हस्ते वनश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भीमा सहकारी साखर कारखाना उभारणी होत असताना जेष्ठ बंधू कै. पै .भिमराव महाडिक यांच्या बरोबर पंढरपूर येथे राहून जातीने लक्ष घातले. त्यांच्या बरोबर बंधू शामराव महाडिक व विष्णुपंत महाडिक हे ही होते. कारखाना उभारणीत नानासाहेबांचा मोलाचा वाटा होता.
पेट्रोल पंप, हॉटेल व्यवसायामुळे पेठ नाक्याची ओळख नानासाहेबांच्यामुळे सर्वत्र होती.
राजकीय क्षेत्रात त्यांचा वेगळा दबदबा होता.
अनेकांना आमदार, खासदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी एखाद्या नेत्याला शब्द दिला की ते पुर्ण शक्तीनिशी त्या नेत्याच्या पाठीशी राहयचे.अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्द घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदानहोते.
शिराळा विधानसभा मतदार संघात नानासाहेबांची नेहमीच किंगमेकर ची भूमिका राहिली होती.
वाळवे तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी
२००३ साली श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे स्थापना केली.२००८ साली त्यांनी अल्पावधीत एका मोठ्या आकर्षक अशा शैक्षणिक संकुलाची पेठ नाका येथे उभारणी केली. डिप्लोमा, MBA, अभियांत्रिकी, ITI, B. SC, पब्लिक स्कूल, ज्युनिअर कॉलेज अशा विविध शाखा निर्माण करुन अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली.
फी विना शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना मदत करुन ,पाठबळ दिले.
नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य शेतकरी , गरजू लोकांना आर्थिक सोय उपलब्ध करून देण्यात मोलाची कामगिरी बजावून मोलाचे मार्गदर्शन केले.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शाखांद्वारे या संस्थेच्या रुपाने सेवा सूरु आहे.
महाडिक परिवाराचे कुस्तीवर नेहमीच प्रेम राहिले . मल्ल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मल्लांच्या पाठीशी नानासाहेब नेहमीच राहात होते.व सर्वप्रकारची मदत करत होते.अनेक मल्ल घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
महाडिक कुटुंबातील व्यक्तींनी राजकारणात ग्रामपंचायत सदस्य ते खासदार अशी विविध पदे स्वतःच्या ताकतीवर भूषविली आहेत.
यामद्धेही नानासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
देशसेवा, निसर्ग प्रेम ,राजकारण, समाजकारण, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे नानासाहेब अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !🙏
- धनाजी माने…..✍️

No comments:
Post a Comment