Tuesday, August 30, 2022

गुरुजी ! तुम्हाला लढायला हवं आमच्यासाठी !



 ( मर्यादित शिक्षकांच्या संख्येवरती शिक्षक गेली दहा वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत. या अध्यापनाच्या कामाबरोबरच निवडणुका, जनगणना, विविध सर्वे ,अशा अनेक अशैक्षणिक कामांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे .द्वी- शिक्षकी शाळेत तर दोन शिक्षकांवरतीच चार -चार वर्ग शिकवले जात आहेत. सध्या तर अनेक शाळेत हे काम एकच शिक्षक करत आहेत.मग अशा शाळेतील शिक्षकांना दोष देण्यात काय अर्थ? यासाठी यंत्रणेत बदल व्हायला हवा.या क्षेत्रात अनेक समस्या आहेत.

शिक्षक "आम्हाला फक्त शिकू द्या ! "अशी आर्त विनवनी  करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होऊन, मुख्य दोष दूर न होता ,शिक्षकांना मागीतली जाते शैक्षणिक गुणवत्ता ! तरीही असे शिवधनुष्य पेलून शिक्षक अविरतपणे झटत असून गुणवत्ता टिकवण्याचं काम करत आहेत. ज्या निष्पाप विद्यार्थींनी व त्यांच्या पालकांनी अशा शिक्षकांची व्यथा ,आणि शिक्षक करत असलेले काम जवळून  पाहिलं ते मात्र शिक्षकांची खरी व्यथा जाणतात.हेच या कवितेत मांडल आहे.फक्त वाचू नका चिंतन करा.दिसणं आणि असणं यातला फरक समजूदे शिक्षकांची खरी व्यथा सर्व समाजाला कळूदे !! )

👇🏼 

 ( हे वास्तव जाणून, शिक्षकांना फक्त आणि फक्त अध्यापनाचेच काम द्यायला हव.तरच  शाळेतील मुलांना यापेक्षाही गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळून त्यांना खराखुरा न्याय मिळेल)

आमच गुरुजी .....✍️

गुरुजी आता तुम्हाला लढायला  हवं,

सत्य काय हे साऱ्यांना सांगायला हवं.


अहो मोठ्या -मोठ्या कामांचा तुम्ही,

डोंगर उभा केलाय,मुलांना घडवण्याबरोबरच

लोकवर्गणीसाठी हवा तेवढा वेळ तुम्ही दिलाय,

यातूनच शाळेच्या भौतिक सुविधांचा ,

डोंगर उभा राहिलाय


शिकवणं सोडून , शासनाची प्रत्येक कामं

तुम्ही अगदी विश्वासाने करताय.

निवडणूक असो वा , जणगणना

वर्षभर होणारे उपक्रम असो वा सर्वे

तुम्ही मनापासून करताय.

हे सारं करत, गुणवत्ताही जपताय.


अहो तुमच्या  कामामध्ये  , 

वेळेला बंधनं कुठ  हाय.

Online काम असो वा,

शालेय पोषण आहाराची आकडेवारी.

Gas संपो अगर , भाजीपाला , 

तुम्ही वेळेवर आनताय.


घरच्या प्रपंच्यापेक्षाही,

तुम्ही शाळेचाच प्रपंच्या जपताय

आणि हो ! वर्षातून एक दिवस,

तुमचा ५ सप्टेंबरला बैलपोळा केला जातोय,

बाकी वर्षभर मात्र ,लायकी नसणारा कडून,

 तुमचा अवमानच होतोय.


अहो ज्ञानदानाचे काम सोडून,

तुम्हाला दारुच्या गुत्त्यावरही उभ केलं .

कोरोणात तर तुम्हाला चेकपोस्टवरही ,

रात्रभर उभ केलं.

काहींनी तर आपल जीवही गमावलं

खरच  तुमच्या मान-सन्मानाचा ,

सारा खिमा केलाय.

खरच, गुरुजी तुमच्या सहनशीलतेला ,

आम्ही सलामच  केलायं !


खरच ! शिकवण सोडून गुरुजी ,

तुमच्या इतर कामाचींच यादी मोठी हाय.

'आम्हाला फक्त शिकवू द्या ' ही तुमची,

मागणी  रास्तच हाय.


इतर सारी काम बंद करुन, मायबाप सरकारने

तुमच्या समोर आमची मुलं ,

आणि मुलांसमोर, तुम्हाला ठेवले तर ,

शिक्षणाच्या गुणवत्तेचा इतिहास घडेल.

आमच्या लेकरांच , भविष्य यापेक्षाही उजळेल.


म्हणून गुरुजी आता ही लढाई,

तुम्हाला ,जोमाने लढावी लागेल.

अगदी, ओरडून तुम्हाला बदनाम करणाऱ्यांच्या,

झुंडीकडे दुर्लक्ष करुन.


गरिब माय-बाप आमच्या लेकरासाठी

ही लढाई गुरुजी तुम्हाला लढावीच लागेल !

लढावीच लागेल!!  लढावीच लागेल!!!

- धनाजी माने.....✍️

M - 9403963934




👆🏻  (तुमच्या सगळ्या ग्रुपला गुरुजींची वास्तव्य व्यथा पाठवा.सत्य नेमक काय असत ते थोड तरी समाजात कळूदे,शिक्षकांची व्यथा समजूदे.खरे दोष नेमके कुठे आहेत ❓हे समाजातील सर्वसामान्य लोकांना समजूदेत. फक्त शिक्षकांना त्याचे खरेखुरे शिकवण्याचे काम मिळुदे! गोरगरिबांची मुल यापेक्षाही चांगल शिक्षण मिळण्यासाठी हक्कदार राहुदेत!)











Monday, August 08, 2022

थोडा जागर मांडला आहे.

 








 ( आज सभोवताली समाजात पाहिलं तर ,अनेक क्षेत्रातील लोकांना विविध समस्या आहेत यात शेतकरी,शिक्षक ,पोलीस,व्यावसायिक, विविध क्षेत्रातील खाजगी कर्मचारी अशा अनेक घटकांच्या विविध समस्या आहेत......निसर्गाच्या ल री लाटा माणसाला त्याच्याच चुकानमुळे सहन कराव्या लागत आहे.तरुणाईच्या समस्याही आहेत.

यातील फक्त काही समस्या  मांडण्याचा हा प्रपंच एवढचं........)


   थोडा जागर मांडला  आहे.....✍️


जो तो जगतो आहे आपल्याच कोशात 
आणि आपल्याच विश्वात.
अनेक समस्या आणि दुःख आहेत,
माणसामाणसात आणि समाजात , 
कुणालाच कुणाच देणंघेणं उरल नाही.
जो तो दंग आहे ,आपलाच कोश घट्ट विणण्यात.

शेतकरी असो वा शिक्षक,
पोलीस असो वा पूरग्रस्त
असे सारेच आहेत समस्याग्रस्त .
 

वाट्याला यावेत चार दिवस सुखाचे,
आपल्याबरोबरच,आपल्या मुलाचे.
आणि पिढ्यानपिढ्या वाढलेला,
कर्जाचा डोंगर कमी  होऊन ,
शांत झोप लागावी यासाठी ,
 लढाई आजूनही सुरूच आहे बळीराजाची.

तो समस्यांचा पाढा बोंबलून पाहतो,
दारे ठोठावून पाहतो,
तरी त्याच्या समस्या कधी सुटल्याच नाही.
कधी त्याने स्वतःला दोरीत लटकवूनही घेतले.
तरीही त्याचे प्रश्न ,  कधी नाही सुटले।

चार दिवस त्याच्या मरण्याचे अन्,
सांत्वनाचे फोटोसेशन झाले.........
पुढच्या पिढीच्या वाट्याला मात्र,
बाप गेल्याचे आणि बोंबलून- बोंबलून
हात गेल्याचे दुःखच वाट्याला आले.

तरीही सारेच कसे मशगुल आहेत ...
आपल्याच कोशात आणि आपल्याच विश्वात !


शिक्षक सुद्धा आंदोलन करत,
रस्त्यावर उतरतात.
आम्हाला 'फक्त शिकऊ द्या ! '
म्हणत लढाई- लढत राहतात.
ना पदांची भरती होत आहे ,
ना अतिरिक्त कामाचा ताण .
सारे असे आलबेल सुरु आहे.

शिक्षकांच्या बदनामीचे
षडयंत्र सुरुच आहे .
शिकवण सोडून,इतर कामातच,
गुरुजींना गुंतुन ठेवलं जातयं.
गोरगरिबांच्या शिक्षणाचा,
खेळखंडोबा मात्र सुरुच आहे.

सारेच कसे झोपलेत की,
झोपेचे सोंग घेतलयं कळत नाही.
वाडी- वस्तीवरील मुलांच्या,
शिक्षणाची हेळसांड 
भरतीविना  सुरूच आहे.
तरीही सारेच मशगुल आहेत आपल्याच 
कोशात आणि आपल्याच विश्वात.......

ज्यांनी कोरोणाच्या काळात ,
देवदूत म्हणून काम पाहिलं.
ते पोलीस तर कुठे ,
समस्यान पासून दूर आहेत ?
अतिरिक्त कामाच्या ताणाने तेही पुरे पिचलेत.

चार क्षण आपल्या लेकरा-बाळांच्यात असावेत,
गोरगरीब दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी ,
आपलेही दिवस खर्ची पडावेत
यासाठी तेही खूप आतुरलेत .....

समाजात फिरा ,नाहीतर रस्त्यावर फिरा.
समस्यांचे खड्डे काही मुजत नाहीत.
तरुणांच्या पिढ्या कामाविना भटकत आहेत.
व्यसनांच्या जंजाळात मात्र , ते अडकत आहेत.

कधी अवेळी पाऊस पडतो आहे.
तर कधी दुष्काळही पडतो आहे.
विकासाच्या नावाखाली , 
निसर्गावर अतिक्रमण सुरु आहे.

समस्यांच्या पाढ्यांचा ,
हा पाढा ........
न संपणारा असला तरी ,
समस्यांचा हा .....थोडा जागर मांडला आहे एवढचं.
 
- धनाजी माने.....✍️
dhanajimane.blogspot.com

Saturday, May 21, 2022

विचार...... कोडचं सुटत नाही...


विचार...... कोडचं सुटत नाही...



 



अहो !आश्चर्यम्.... अबब! लग्नपत्रिकेत तब्बल ३५० नावे !!


 अहो !आश्चर्यम्.... #अबब! लग्नपत्रिकेत तब्बल ३५० नावे !!

 अशी #लग्नपत्रिका आपण कुठे पाहिले आहे का?

#दहा, #वीस, #तीस, #पन्नास नव्हे.... तब्बल #साडेतीनशे नावे लग्नपत्रिकेत.... काय धक्का बसला ? पण हे खर आहे राव !

वर आहे इस्लामपुरचा तर वधू आहेत पुण्याच्या.

या वधू-वरांचा विवाह रविवारी २२ मे २०२२ रोजी इस्लामपूर (ता.वाळवा) येथे संपन्न होत आहे.

लग्न पत्रिकेत #नाव नाही म्हणून अनेकजण #नाराज होतात #रुसवे-फुगवे सुरू होतात .पण या #विवाह सोहळ्यात सर्वांनाच मान देण्याचा प्रयत्न #वरपक्षाने केल्याचे दिसत आहे. कुणाचेच रुसवे-फुगवे यायला नकोत याची काळजी घेतल्याचे दिसत आहे.

#भावकी, #पाहुणे, #हितचिंतक,  निमंत्रित अशी जवळजवळ तीनशे पन्नास नावे वरपक्षाने या पत्रिकेत छापली आहेत.

या लग्न पत्रिकेतील भल्यामोठ्या यादीची #सर्वत्र #चर्चा मात्र सुरू आहे.

वाळवे तालुक्यातील नव्हे तर #सांगली जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील हा पहिलाच विवाह प्रसंग असेल की लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशे नावे असतील.

गेल्या दोन वर्षा पासून आपण पाहतोय कोरोनाने आपणाला बरच काही शिकवलं. कोणताही #समारंभ असो निमंत्रित मर्यादित असायचे. लग्नात खर्च कमी व्हायचा.

अनेकांनी #यादी पे शादी, #घरगुती मर्यादित निमंत्रित असेच लग्न समारंभ उरकून घेतले.

यामध्ये एखादा चुकला तरी #राग कोणाला येत नव्हता .#माणसं समजून घेत होती.

पण आता मात्र कोरोणा गेल्यानंतर ,लग्नसमारंभ मोठ्या धुमधडाक्यात, थाटामाटात सर्वत्र सुरू आहेत. हजारो लोकांची #गर्दी जमत असते. हजारो लोकांच्या जेवणाच्या पंगती उठतात .#बँजो ,#बॅंड ,#वरात हे सर्व पूर्वीप्रमाणे पार पडत आहे. याचे #अप्रूप कोणालाच वाटत नाही.

 पण या लग्नातील ३५० नावांची लग्नपत्रिका मात्र सगळ्यांचंच #लक्ष वेधून घेते हे मात्र #निश्चित !

- धनाजी माने....✍️







Tuesday, May 17, 2022

📌 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ६ टप्प्यात होणार

 







📌 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ६ टप्प्यात होणार

📌 विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :- खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग - १ म्हणून गणले जातील.

१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis

२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /

डायलीसीस सुरु असलेले शिक्षक 

५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/ जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे

आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency

व इतर आजार)} (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

 ९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१० विधवा शिक्षक

११ कुमारीका शिक्षक

१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी/ नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत) खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी

डायलिसीस सुरु असलेले.

१७ यकृत प्रत्यारोपण झालेले 

१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१९ मेदूचा आजार झालेले.

२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.


📌विशेष संवर्ग शिक्षक भाग २ : पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

 २ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी

असेल तर,

३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त

संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका

५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

📌बदलीस पात्र शिक्षक :- 

बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झलेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात

१० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल.


📌बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक


🚚 बदली प्रक्रिया कार्यपध्दती :

🚦टप्पा १ - ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास, अशा

शाळांमध्ये जर बदलीपात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदा.:- एखाद्या शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र.२.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.

🚦ज्या शाळेत तीन बदली पात्र शिक्षक आहेत. अशा वेळी तेथील दोन बदलीपात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र.२.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.

🚦शाळेत एकच बदली पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व

एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील.


🥇 टप्पा -२ विशेष संवर्ग शिक्षक भाग- १ यांच्या बदल्या:

१. टप्पा क्र.१ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

२. विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.

३. विशेष संवर्गातर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील

व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.

४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास

त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील.

५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.

६. या संवर्गातील शिक्षकांचे वदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.

७. विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

८. विशेषसंवर्ग भाग १ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.

टप्पा क्र.३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांच्या बदल्या :

१. टप्पा क्र. २ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Subrmit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठीअर्ज करु शकेल.

४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी

या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक

एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण १० वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.

५ . ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील.

६. विशेष संवर्ग २ च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


📌 टप्पा क्र.४ - बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :

१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.

२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करावयाची निश्चित ३ धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र - १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

३. सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा

ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.

४. सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.

५.बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या

विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

६, बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. 

📌टप्पा क्र. ५:- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :

१. टप्पा क्र. १,२,३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल. 

२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचान्यास बदली प्राधान्याने

अनुज्ञेय राहील.

 ३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते. 

४. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास

उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त

असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.


📌टप्पा क्र. ६ : विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा:

टप्पा क्र. ५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व  पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

🔺🔺संवर्ग-१ व २ पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करुन घेतलेली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन त्याच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी असे शासन निर्णयात नमुद केले आहे.


📚सदर सविस्तर माहितीसाठी

शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

(शासन निर्णय क्रमांक: जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४)

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...