■ शुभ वर्तमान ■
📢 असे भोंगे गावागावात वाजायलाच हवेत.....
आज सर्व महाराष्ट्रभर भोंग्या वरून राजकारण पेटलं आहे .वातावरणातील तापमानाबरोबर भोंग्याचे राजकारणही तापू लागले आहे.याचे लोण महाराष्ट्राबरोबरच सर्व भारतभर पसरू लागले आहेत.
समाजा -समाजामध्ये, जाती - धर्माच्या नावाखाली भेदा-भेद सुरू आहे. सामाजिक ऐक्याला कुठेतरी तडा जाताना दिसत आहे. यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विनाकारण ताण वाढू लागला आहे.
जिल्हा- परिषद पंचायत समित्या, नगरपालिका ,महानगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमाचे बिगुल काही काळातच राज्यात वाजणार आहेत. आणि यामध्ये आपल्या पक्षालाच मतांचा गट्टा कसा मिळेल यासाठी प्रत्येक पक्षआत्तापासून वेगवेगळे डावपेच रचत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वेगवेगळे पत्ते बाहेर काढले जात आहेत असे विश्लेषक, जाणकार नागरिक बोलत आहेत.
गेल्या दोन वर्षात कोरोणाने हाहाकार माजवला आणि अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष निघून गेले .आणि त्या कुटुंबावरती आभाळ कोसळले. अजूनही महाराष्ट्रातील अशी हजारो कुटुंब या दुःखातून सावरलेली नाहीत. त्यांच्या समोर अनेक समस्या आवासून उभ्याआहेत.महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले .शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. दरडी कोसळून गावेच्या गावे नामशेष झाली. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न.....असे अनेक प्रश्न राज्यासमोर आवासून उभे असताना त्याच्या वरती चर्चा होताना कुठेच दिसत नाही.
आपला पक्ष आणि आपणच कसे बरोबर आहोत, समोरचे कसे चुकीचे आहेत , यासाठी वैयक्तिक टिका -टिपणी ,वैयक्तिक शिंतोडे ,एक दुसऱ्याच्या संपत्तीचे मोजमाप ....याचीच चर्चा जाहीरपणे होताना दिसते.वरती उल्लेख झालेल्या सर्वसामान्यांच्या समस्यांवरती चर्चा होताना दिसत नाही .गोरगरिबांच्या दुःखावरती कशी फुंकर मारता येईल? त्याचे जीवनमान कसे सुधारेल? शेतकऱ्यांच्या संसारात कसे सुख येईल? तरुणांच्या हाताला कसा रोजगार मिळेल ?पेट्रोल दर गगणाला भिडलेत ,Gst मद्धे वह्या -पुस्तकांचे दरही वाढलेत सामान्य. कुटुंबातील गरिबाला याचा मेळ घालताना ससेहोलपट होते, महागाईमुळे मेहनतीचे, खताचेदर गगणाले भिडले पण शेतीमालाचे दर....? यामुळे बळीराजाच्या संसारातील मेळ बसेना...... अशा एक ना अनेक समस्यांबाबत चर्चा होताना दिसत नाही.नियोजन नाही.
आज प्रश्न असा पडतो राजर्षी शाहू राजांचा शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना. अभिवादन करत असताना त्या महान रा. शाहूराजांचा थोडा तरी आदर्श घ्यायला हवा.या राजाने जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अठरा- पगड जातींना एकत्र बांधले. ज्या काळात सर्व समाज दलितांना अतिशय हीन वागणूक देत होता ; त्या काळात या माणसातील देव माणसाने , रयतेच्या- राजाने... राजर्षी शाहूंनी गंगाराम कांबळे सारख्या सर्वसामान्य दलित माणसाच्या हॉटेल वरती , चार घोड्याच्या बग्गीतून जाऊन चहा घेतला व घेत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान उच्चविद्याविभूषित व्यक्तीसाठी करवीर नगरीत स्वागत कमानी उभारुन आणि त्यांना पायघड्या घालून स्वागत केले .जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी काम केले. दुष्काळ, स्त्रीशिक्षण, सर्व समाजातील तरुणांना शिक्षण , सर्व स्तरातील सर्वसामान्यांची, गोरगरिबांची दुःख दूर करण्यासाठी हा राजा रात्रंदिवस झटला. आपल्या उण्यापुऱ्या अठ्ठेचाळीस वर्षांत आणि मिळालेल्या राजकीय कारकीर्दीच्या कालावधीत फक्त आणि फक्त रयतेची काळजी वाहिली. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून ते आयुष्यभर चालले त्यांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आणि कार्य करत राहिले सर्वसामान्यांच्या साठी रात्रंदिवस झटत राहिले.
काल आणि आज ही तफावत आपण पाहत असतानाच , भोंग्यावरून चाललेल्या राजकारणात, राजकारण्यांना चपराक देणारे शुभवर्तमान सर्वसामान्य लोकांच्या कडूनच घडत आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यावेळी आपण बदलतो , त्यावेळी विधायक कार्य समोर येते .सकारात्मक विचारातून सकारात्मक आचार तयार होतात आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरतात.
अशाच सकारात्मक विचारातून खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे दररोज सात वाजता भोंगा वाजतो आहे.देशाचे भवितव्य ज्या तरुण पिढीच्या हातात असते त्या तरुणांना , बालचमूंना एका चांगल्या कामात गुंतवण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्याचे सर्वत्र तोंड भरुन कौतुक होत आहे.
खेराडेवांगी गावातील प्राथमिक शाळेवर एक भोंगा बसविला आहे.हा भोंगा दररोज सात वाजता वाजविला जातो. सर्व घरातील टीव्ही बंद होतात .इतरही करमणुकीची साधने बंद केली जातात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. एक तास म्हणजे आठपर्यत ही सर्व मुलं शांत वातावरणात अभ्यासात मग्न असतात.हा भोंगा गावात काही महिन्यापासून वाजवला जातो आहे.
एका विधायक विचारातून समोर आलेला हा साधा उपक्रम मुलांचं अमुल्य असे भवितव्य घडवत आहे.गावकऱ्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
युनिसेफचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले तेव्हा पाहणी पथकाने हा उपक्रम पाहिला , तेव्हा पथकातील अधिकारी आदर्श शाळा आणि गावातील भोंग्याचा उपक्रम पाहून चकित झाले.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या आदर्श शाळा या संकल्पनेतून ही शाळा शाळेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी आदर्श बनवली आहे.
या शाळेत शुद्ध पाणी, शौचालय,संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग अशा अनेक भौतिक सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
एकेकाळी पडक्या इमारतीत ,कुठल्यातरी देवळात भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता अशा आदर्शअधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून निर्माण होणाऱ्या आदर्श शाळा बनत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आपले रुपडे बदलत आहेत.नामांकित खासगी शाळांनाही लाजवतील अशा जिल्हा परिषदेच्या शाळा सांगली जिल्ह्यातआकाराला येऊ लागल्या आहेत.
या भौतिक सुविधा बरोबरच , शैक्षणिक दर्जाही सुधारत आहे .यावर पालकांचा विश्वास निर्माण झाल्याने, या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो मुलांनी १ली साठी प्रवेश घेतला आहे आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेच्या शाळेतून केला आहे. अनेक खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
भविष्यातील दोन - चार वर्षात जिल्हा परिषद शाळेमद्धे प्रवेशासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागेल असे वातावरण सर्व जिल्ह्यात निर्माण होऊ लागले आहे.
या आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, SMC,शिक्षणप्रेमी जिल्ह्यातील तमाम शिक्षक अविरतपणे झटत आहेत.
विद्यार्थ्या विना ओस पडू लागलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. आणि हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डीसाहेब यांच्या संकल्पनेतून शक्य झाले आहे हे मात्र निश्चित !
एकूणच महाराष्ट्रात भोंग्या वरून राजकारण पेटले असतानाच , मुलांच्या उज्वल भविष्यासाठी खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे रोज भोंगा वाजत आहे.
म्हणूनच सर्वांनी इतर भोंगे वाजवून किंवा बंद करून राजकारण करण्यापेक्षा, गावागावात असे विधायक विचाराने प्रेरित झालेले भोंगे वाजवायलाच हवेत .
(न्यायालय निर्देशानुसार - डेसिबल मर्यादा नियम)
- धनाजी माने......✍️
.jpeg)
1 comment:
माझी शाळा आदर्श शाळा
Post a Comment