Tuesday, September 02, 2025

🙏भावपूर्ण श्रद्धांजली !💐

 

🙏भावपुर्ण श्रद्धांजली : समाजाभिमानी नेता व प्रगतशील शेतकरी -सुभाष नामदेव पाटील (तात्या)

२ सप्टेंबर २०२५ रोजी ,वयाच्या ७३व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.ते तात्या या नावाने सर्वपरिचित होते.

  तात्या !  हे नाव उच्चारताच  प्रत्येकाच्या मनात आदर, आपुलकी आणि प्रेरणेची छाप उमटते.

तात्या हे केवळ शेतकरी नव्हते, तर एक मार्गदर्शक, समाजाभिमानी नेता आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होते.

 सरपंच, सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले .सोसायटी संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.  

इटकरे गावाचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुकाईदेवीच्या देवालयाचा  जिर्णोद्धारही त्यांनीच त्यांच्या काळात केला. तुकाईदेवालय परिसर या परिसरातील एक पर्यटन स्थळ म्हणून आज नावारूपाला येत आहे यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.

त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणूनही आधुनिक शेतीत नवे प्रयोग करून दाखवले. शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी इस्राएलचाही दौरा केला. व  पाण्याचे महत्व जाणून त्यांनी तो प्रयोग आपल्या इटकरे येथील शेतीवर केला. 

कुणाच्या स्वप्नातही नसेल अशा खडकावरती त्यांनी नंदनवन फुलवले.

जवळजवळ वीस एकर क्षेत्रावर जेसीबी पोकलॅण्ड, बुलडोझर अशा अवजड  अवजारांचा वापर करून त्यांनी ही शेती हाताखाली आणली. व या शेतीवर नवनवे प्रयोग केले. पुढील अनेक पिढ्यांसाठी व तहयात नवनिर्मिती करणारी शेती निर्माण करून ती फुलवली.

केळीसारख्या पिकांचे त्यांनी या क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेतले. व इंच आणि इंच जमिनीचा वापर करून त्यांनी बांधावरतीही वनराई फुलवली बांधावरती सुपारी, नारळ ,आंबा यासारख्या पुढील अनेक पिढ्यांना उत्पादन देणाऱ्या वनराईची नवनिर्मिती केली. जणू काळाकुट्ट दगडावरती त्यांनी नंदनवनच फुलवले.

त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. 

सर्वसामान्य व गरीब कुटुंबात जन्माला येऊनही  कष्ट, चिकाटी आणि धडाडीच्या जोरावर त्यांनी आपले घर, शेती आणि समाजकारण उभे केले.

तात्यांचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्यांचे कुटुंब. घरातील प्रत्येकाला त्यांनी मेहनतीची शिकवण दिली. त्यांच्या मुला-मुलींनी व नातवंडांनी शिक्षण व उद्योग क्षेत्रात  परंपरा पुढे चालवली आहे. आज त्यांची नातवंडे देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत, काही उद्योगधंद्यात आपले स्थान निर्माण करत आहेत. "सुमनराज हायटेक फर्म" ही त्यांच्याच प्रेरणेने उभी राहिलेली संस्था आज यशस्वीपणे कार्यरत आहे.

तात्या साधेपणाने जगले, त्यांच्या वागण्यात मोठेपणाचा कधीच डामडौल नव्हता.

 प्रत्येकाला त्यांनी कधी आपुलकीने तर कधी प्रसंगी रागाहूनही हात दिला, संकटात आधार दिला. 

माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी खऱ्या अर्थाने कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आधार दिला, सुखदुःखात साथ दिली. त्यामुळे त्यांचे जाणे हे केवळ कुटुंबापुरतेच नाही, तर आमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी वैयक्तिक हानी आहे.

आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर  त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

तात्यांच्या शिकवणी, त्यांच्या कष्टाची परंपरा आणि समाजकारणाचा वारसा पुढील पिढ्यांना नक्कीच दिशा देत राहील.

🙏 तात्या, आपण दिलेला आधार, आपुलकी आणि प्रेरणा आम्ही विसरणार नाही. आपण आमच्यासाठी कायम प्रेरणास्थान राहाल. भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹

     - धनाजी माने ….✍️

  dhanajimane.blogspot.com



Saturday, July 12, 2025

"शिष्याचे नम्र अभिवादन: गुरूच्या हृदयाला स्पर्शणारी कहाणी"


🎁 गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळालेलं आयुष्यभराचं बक्षीस – एक शिष्याचं पत्र ⤵️

#गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक खास दिवस. #शिक्षक म्हणून गेली कित्येक वर्षे काम करत असताना अनेक विद्यार्थी भेटले, अनेक अनुभव गाठीशी जमा झाले. पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे काही अनुभवलं, ते शब्दांत मांडणं कठीण आहे – आणि म्हणूनच या लेखातून मी हे सर्व शेअर करत आहे.


आज सकाळी मला माझा एक विद्यार्थ्यी शुभम याचं पत्र आल. हे पत्र वाचताना माझ्या डोळ्यांत #अश्रू उभे राहिले.आम्ही पती-पत्नी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काम करीत असताना या विद्यार्थ्यांना २० वर्षापुर्वी अध्यापन केले होते.६२ पैकी ५२ विद्यार्थी त्यावेळी ४ थी शिष्यवृत्ती मद्धे यशस्वी झाले होते. त्यातील एका विद्यार्थ्याने पाठवलेल पत्र ,सध्या तो #इंजिनिअर आहे.

 एक शिक्षक म्हणून आयुष्यात खूप काही मिळवलं, पण हे पत्र म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्यभरासाठीचं अमूल्य बक्षीस आहे. 

🔖तुम्ही स्वतःच ते वाचा :शिष्य शुभमचं पत्र...

===================

आदरणीय सर & मॅडम,

मी तुमचा शिष्य शुभम,

गुरु ब्रम्हा, गुरु विष्णु, गुरू देवो महेश्वरा,

गुरु साक्षात परब्रह्म, तसमैसी गुरु नमः🙏🏻

आज गुरुपौर्णिमा, याचेच औचित्य साधून प्रथम तुम्हा दोघांना वंदन करतो आणि तुमच्यासाठी दोन शब्द🙏🏻


मी इंग्लिश माध्यमातून मराठी माध्यमांमध्ये इयत्ता २ री मध्ये आपल्या गावच्या प्राथमिक शाळेत पहिल्या सत्रात मध्यातून प्रवेश घेतला. त्यावेळी तुम्ही वर्ग शिक्षक होता. माझे वडील तुमच्याकडे माझ्या प्रवेशासाठी मला घेऊन आले होते. त्यावेळी मला मराठीचा 'म' सुद्धा माहिती नव्हता. तुम्ही माझ्या वडीलांना वर्गातील इतर मुलांची तयारी दाखवली. त्या वेळी खूप मागे होतो. मला इतकी समज नव्हती आणि मी पूर्ण कच्च्या माती सारखा होतो. नंतर माझी तुमच्या मार्गदर्शना खाली घडायला सुरुवात झाली. मराठी साठी शून्य असणारा मी इयत्ता ३ मध्ये पूर्ण वर्ग मध्ये तिसरा आलो. हे फक्त तुमच्यामुळे. तिथून एक वेगळा आत्मविश्वास तुम्ही माझ्या मध्ये निर्माण केला आणि तिथून पुढे मागे वळून ही पाहील नाही. तुम्ही दाखवलेला विश्वास आणि तो आत्मविश्वास आजही माझ्या सोबत आहे. ही कच्ची माती आता एका पूर्ण परिपक्व मडक रूपात बनलेला आहे.


लहान असताना आम्ही सर्वच तुम्हाला खूप घाबरत होतो. तेव्हा वाटायचं की तुम्ही आम्हाला मारता म्हणून आम्ही तुम्हाला घाबरत होतो, पण नंतर समजले की ती भीती तुमच्याबद्दल असलेल्या आमच्या मनातल्या आदरा प्रति होती. या आजच्या स्पर्धेच्या युगात जे काही मी पाय घट्ट करून उभा आहे ते फक्त तुम्ही आमच्या सुरवातीच्या काळात रचलेल्या मजबूत पायामुळेच शक्य झाले आहे.


आज गुरुपौर्णिमा, गुरुला वंदन करण्याचा दिवस पुन्हा एकदा तुम्हाला वंदन करतो, तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहुदेत. काही चुकी झाली असल्यास क्षमस्व 🙏🏻

धन्यवाद.

तुमचा आज्ञाधारी शिष्य,

शुभम

______________________________

हे पत्र वाचून मी खूप वेळ शब्दच हरवून बसलो. अशा वेळी शिक्षकाच्या भूमिकेतील "गुरू" ही संकल्पनाच नव्याने उमगते. कधी कुणाच्या आयुष्यात आपण काय बीज पेरलं याची कल्पनाही नसते, आणि अशा वेळी शिष्य स्वतःहून त्याचा उल्लेख करतो, तेव्हा समाधानाचं उधाण येतं. या पत्राला उत्तर देताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ होता. शब्द जुळवणंही कठीण जात होतं, पण त्याच वेळेस खूप काही बोलावंसं वाटत होतं. 


🔖म्हणून मी शुभमला खालीलप्रमाणे उत्तर पाठवलं:---माझं उत्तर – एक गुरू म्हणून 

____________________________

प्रिय शुभंम,

सप्रेम आशीर्वाद.

तुझं गुरुपौर्णिमेनिमित्ताने पाठवलेलं पत्र वाचलं आणि डोळ्यांत अश्रू तरळले. एका गुरूसाठी याहून मोठं बक्षीस दुसरं काही असूच शकत नाही. तुझ्या आठवणींनी मन पुन्हा त्या जुन्या दिवसांत हरवून गेलं.


तू इयत्ता दुसरीत आमच्या शाळेत आला होतास, ते क्षण आजही आठवतात. त्या वेळचा तुझा निरागस चेहरा, कुतूहल, आणि भाषेचं अज्ञानही तुझ्या डोळ्यांतील चमक लपवू शकलं नाही. मला तुझ्यात एक प्रतिभाशाली विद्यार्थी पहिल्या दिवसापासून दिसला होता. आणि मी फक्त एक गुरु म्हणून तुला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला.


तू स्वतःच खूप मेहनती होतास, आणि जेव्हा एखादा विद्यार्थी संधी मिळाल्यावर झपाटून शिकतो, प्रगती करतो, तेव्हा त्याच्या यशात गुरूचा नव्हे तर त्या विद्यार्थ्याच्या जिद्दीचा अधिक वाटा असतो. तुला इयत्ता तिसरीत आलेलं यश म्हणजे केवळ सुरुवात होती — त्यानंतर तू सतत प्रगती करत गेलास, हे पाहून मला खूप आनंद होतो.


तू म्हणतोस की, "मी एक कच्ची माती होतो आणि परिपक्व मडक झालो" — हे ऐकून समाधान वाटतं की, त्या मातीला योग्य आकार देण्यात थोडं योगदान आमचंही होतं. पण या मडक्याला मजबुती आणि उपयोगीपणा तू स्वतःच्या कष्टांनी दिलास.


तू आमच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता, आदर आणि प्रेम मनाला स्पर्शून गेले. शिक्षक म्हणून हा क्षण अत्यंत समाधानाचा आहे.

तुला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तू आयुष्यात कितीही उंच भरारी घेत जा, पण मातीचा गंध आणि मूळ कधी विसरू नकोस. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.


गुरुचं खरं यश हेच की त्याचा शिष्य यशस्वी होतो आणि मनाने नम्र राहतो. तू हे दोन्ही सिद्ध केलं आहेस.

सदैव तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनवर मुलांनप्रमाणे प्रेम करणारे तुमचे

माने सर आणि मॅडम

_________________________

एकूणच हे दोन्ही पत्र वाचताना शिक्षक म्हणून तुमच्याही डोळ्यांत पाणी तरळलं असेल. शिक्षक आणि शिष्य यांचं नातं इतकं नाजूक आणि तरीही इतकं गहिरं असतं की शब्द अपुरे पडतात. शुभमसारखा शिष्य मिळणं ही शिक्षकासाठी आयुष्यभराची संपत्ती आहे.आणि असे अनेक विद्यार्थी मला माझ्या आयुष्यात मिळाले. यामध्ये मला आजही त्यांचे फोन येतात .

नॉर्वे मद्धे असणारा अक्षय,अमेरिकेत असणारा संग्राम , महाराष्ट्र पोलीसमद्धे असणारा जयकर , कुवेतमद्धे असणारा प्रतिक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अभिनव,सुशांत, अनिकेत, सुरज ,प्रवीण गावडे ,मंगेश ,आदित्य, मयूर, रोहन ,सत्यम,जयेश ,हर्षद,अजिंक्य, स्वप्निल,प्रणव, राहुल,साहिल, अभिजीत ,अमर ,अनिल रणजीत,ऋषिकेश ,सौरभ ,सुरेश ,संतोष ,धीरज, महेश हे सर्व विद्यार्थी त्यावेळच्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने यशस्वी झाले होते.अनेक विद्यार्थ्यांनी तर २५२ ते २७४ इतकी  मार्कस  मिळवली होती.  यशस्वी झालेले हे विद्यार्थी आजही कृतज्ञतापूर्वक मागे फिरून पाहतात.  आठवणी काढतात. संपर्क साधतात ,भेटतात.माझा वाढदिवस स्मरणात ठेवून शक्य असेल ते विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी येऊन जातात.तसेच तुषार व सुहास हे तर वेळोवेळी आमच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करतात ,असेल ती भाजी -भाकरी आमच्या समवेत खातात ,गप्पा मारतात ,सुखदुःख शेअर करतात... तेव्हा मन भरून येत गहिवरून येतं. आयुष्यातील हे सर्वात मोठ बक्षीस मिळाल्याचं समाधान मिळतं.


हा लेख मी खास त्या क्षणाच्या साक्षीदारासाठी लिहिला आहे – ज्यांनी मला “गुरू” या शब्दाचा खरा अर्थ पुन्हा एकदा शिकवला.

- धनाजी माने....✍️

 _______________________

🔖 अमेरिकेतून आणखी एका माझ्या संग्राम या विद्यार्थ्याने पाठवलेल पत्र -

[7/5, 12:57 AM] Sangram Nikam: 

"I want to sincerely thank you sir for giving me the best education. Your guidance, patience, and dedication have shaped who I am today. I’m truly grateful for everything you've taught me, both inside and outside the classroom."


[7/5, 12:59 AM] Sangram Nikam:  "In the USA, it's not easy to learn everything, especially without strong communication. But you and Madam helped me so much and taught me many important things. I’m truly grateful for your support, guidance, and patience. Thank you for helping me grow."

 ____________________________


Tuesday, May 13, 2025

मनाचा हळवा कोपरा – वेदांत आणि वेदिका




=======================

मनाचा हळवा कोपरा – वेदांत आणि वेदिका यांचे उज्ज्वल यश !

========================

काही क्षण हे आयुष्यात अक्षरशः ठसा उमटवून जातात. काळजाच्या इतक्या जवळचे होतात की त्या क्षणांची आठवण येताना डोळे नकळत ओलावतात.

माझ्यासाठी हा असाच एक सोनेरी क्षण आहे. आज मला मामा म्हणून जे समाधान, जो अभिमान वाटतो आहे, त्याला शब्दांत बांधणं खरंतर अवघडच आहे.

माझा लाडका भाचा #वेदांत… किती आठवणी आहेत त्याच्या बालपणाच्या. लहानपणी खेळण्यामधील हनुमानाची गदा  धरून “जय हनुमान !” म्हणणारा वेदांत आज खऱ्या अर्थाने देशासाठी उभा राहिलाय. 

UPSC - NDA परीक्षेत देशभरातून १६० वा क्रमांक मिळवणं हे काही सोपं नव्हतं – वर्षानुवर्षांचे कष्ट, अभ्यास, शिस्त आणि अपार समर्पण यामागे आहे. त्याहून अधिक गौरवाची गोष्ट म्हणजे Service Selection Board-SSB मध्ये संपूर्ण देशातून ७ वा  क्रमांक मिळवून त्याची NDA मध्ये अंतिम निवड झाली - ही निवड म्हणजे केवळ एका मुलाचं यश नाही, तर कुटुंबाचं,  संस्कारांचं आणि  देशसेवेच्या संस्कृतीचं यश आहे.

त्याचं मनोबल, त्याची शारीरिक आणि मानसिक तयारी, आणि त्याचे देशप्रेम – हे सर्व पाहिलं की वाटतं, हा मुलगा खरोखरच भारतीय सैन्याचा गौरव ठरेल. वेदांत आता केवळ माझा भाचा नाही – तर , तो आता देशाच्या मातृभूमीचा सुपुत्र झाला आहे.

आणि त्याचबरोबर, माझी चिमुरडी भाची समीक्षा ( वेदिका) – अभ्यासात लहानपणापासून हुशार, शांत, पण खूप चिकाटीची. पुस्तकांत गुंतलेली, परीक्षांबद्दल जागरूक आणि नेहमी आई-वडिलांचं नाव उजळवण्याच्या प्रयत्नात असणारी मुलगी. 

आज १३ मे २५ रोजी १० वी चा रिझल्ट समजला... ती १० वी बोर्ड परीक्षेत ९७.२०%  गुण मिळवले.या तिच्या उज्ज्वल यशाने डोळ्यांत आनंदाश्रू आले.ऊर अभिमानाने भरुन आला.

 हे यश काही एका परीक्षेपुरतं मर्यादित नाही – हे तिच्या आत्मविश्वासाचं, सातत्याचं आणि मजबूत स्वप्नांच्यापाठी चालण्याच्या इच्छाशक्तीचं प्रतीक आहे.

ती फक्त गुण मिळवणारी मुलगी नाही – ती भविष्यात समाजाला दिशा देणारी एक तेजस्वी किरण आहे, हे मला ठाम वाटतं. आई-वडिलांनी तिला दिलेले संस्कार ,मूल्य, शिक्षिकांनी केलेलं मार्गदर्शन आणि तिच्या स्वतःच्या मेहनतीचा संगम म्हणजेच हे तिचे यश आहे.

आज वेदांत आणि वेदिका  दोघंही वेगवेगळ्या वाटांनी, पण एकाच दिशेने – प्रगतीच्या, सन्मानाच्या आणि प्रेरणेच्या मार्गावर निघाले आहेत. त्यांचं हे यश केवळ आकड्यांमध्ये नाही, तर ते मनात खोलवर रुजलेल्या संस्कारांमध्ये आहे. त्यांच्या या यशात त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे – ' की स्वप्नं पाहणं आणि ती पूर्ण करण्यासाठी लढणं, यातूनच खरं यश जन्म घेतं. '

मामा या नात्याने मी आज अभिमानाने डोळे मिटतो आणि अंतःकरणातून एकच प्रार्थना करतो – देव यांना सदैव योग्य मार्ग दाखवो, हे असेच यशाच्या पायऱ्या चढू देत , आणि या मुलांनी आपल्या यशाने अनेकांचे जीवन उजळवो.

वेदांत आणि समीक्षा – आज तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणा बनला आहात. तुमच्या यशाने आमच्या मनात नवी स्वप्नं जागी केली आहेत. तुमचा मामा म्हणून, माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका आज तुमच्या यशासाठी गूंजतो आहे. मामा म्हणून मी अभिमानाने आणि प्रेमाने नतमस्तक आहे. तुमच्या यशाची ही केवळ सुरुवात आहे – आकाश अजून मोठं आहे आणि उडण्यासाठी पंख तुमच्याकडे आहेतच!Keep it up !👍 Dear Vedant & Vedika

तुमचा मामा !

- धनाजी माने.....✍️




 

Monday, April 21, 2025

वेदांत वाईंगडेने तुंगच्या मातीच्या कुशीतून, देशसेवेसाठी घेतलेली उत्तूंग भरारी



तुंगच्या मातीच्या कुशीतून, देशसेवेसाठी घेतलेली उत्तूंग भरारी : वेदांत वाईंगडे याची असामान्य वाटचाल -

शेतात काम करणाऱ्या हातांमध्ये जर देशसेवेची स्वप्नं असतील, तर ती साकार होऊ शकतात, हे उदाहरण म्हणजे  तुंगचा -वेदांत वाईंगडे.
ग्रामीण भागात वाढून, कठीण परिस्थितीवर मात करत, लाखो स्पर्धकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या युवकाची गोष्ट ही केवळ प्रेरणादायी नाही, तर लाखो ग्रामीण भागातील तरुणांना दिशा देणारी आहे.
📌 बालपण
वेदांत यांचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. आई  योगीता ,प्रगतशील शेतकरी -आजोबा शामराव वाईंगडे व वडील प्रविण वाईंगडे यांनी वेदांतला शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा दिली.वेदांतचे आई- वडील, पालक, आपल्या वेदांतने शिकून मोठं व्हावं, हीच त्यांची इतर पालकाप्रमाणे धडपड आणि स्वप्न होती. आजोबा,आई-वडील यांनी मेहनत करून अनेक आव्हानात्मक परिस्थितीतीशी तोंड देत त्याला इथपर्यंत पोहचवण्यासाठी पालक म्हणून खडतर प्रयत्न केले.आणि वेदांतनेही याला आपल्या या उत्तूंग यशातून न्याय दिला.स्वप्न साकाराला योग्य अशी यशस्वीतेची दिशा दिली.
📌 शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि चिकाटी  -
वेदांत लहानपणापासून अभ्यासात हुशार होता, पण हुशारीपेक्षा त्याची मेहनत जास्त मोठी होती. दहावीमध्ये त्याने ९८ टक्के गुण मिळवले. गावात आणि शाळेत त्याच्या नावाची चर्चा झाली. पण त्याचं यश इथेच थांबलं नाही.
दहावीनंतर औरंगाबाद येथील SPI ( महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवा प्रशिक्षण केंद्रामध्ये)  निवड होण्यासाठी विशेष निवड परिक्षेमद्धे  हजारो विद्यार्थ्यांमधून फक्त ६० विद्यार्थ्यांची निवड झाली. या निवडीतही वेदांतने स्वतःचे वरचे स्थान पटकावले. ही निवड  केवळ अभ्यासाची नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी होती.या कसोटीला तो उतरला.दोन वर्षाच्या या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. एक-एक अवघड पायरी तो सर करत  होता. प्रत्येक टप्प्यावर तो यशस्वी होत प्रवास करत होता.
📌 NDA – देशसेवेचं स्वप्न
वेदांतने त्याचं खरं स्वप्न ठरवलं होतं – भारतीय लष्करात अधिकारी होणं. देशासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. त्यासाठी त्याने NDA (National Defence Academy) परीक्षेची तयारी सुरू केली.केंद्रीय लोकसेवा आयोग  ( UPSC  ) मार्फत घेतली जाणारी NDA परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यामध्ये वेदांतने देशात १६० वा क्रमांक मिळवला – हे कोणत्याही ग्रामीण युवकासाठी स्वप्नवत यश आहे.
📌 SSB आणि मेडिकल - अंतिम कसोटी
UPSC -NDA लेखी परीक्षा पास झाल्यावर येते ती , खरी परीक्षा – SSB (Services Selection Board). या पाच दिवसांच्या मुलाखतीमध्ये फक्त बौद्धिक नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांची चाचणी घेतली जाते. वेदांतने या कठीण प्रक्रियेत देशभरातून ७ वा क्रमांक मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
त्यानंतर आलेल्या मेडिकल टेस्टमध्येही १००% फिटनेस दाखवत त्याने पूर्णता साधली.
📌 एका शेतकऱ्याचा मुलगा – देशाच्या नौदलात अधिकारी होणार
वेदांत वाईंगडे यांची ही वाटचाल ही एका सामान्य ग्रामीण मुलाची असामान्य गाथा आहे. त्याने केवळ स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या गावासाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी ही घवघवीत कामगिरी केली आहे. शाळेत दप्तर घेऊन जाणारा आणि सुट्टीत शेतात आजोबा,वडिलांना मदत करणारा हा मुलगा, आज देशाच्या संरक्षण सेवेत अधिकारी होण्यासाठी  , त्याचे पुणे (खडकवासला ) येथील प्रशिक्षण त्याला खुणावत आहे.प्रशिणासाठी तो सज्ज झालाय. हे सारे यश पाहून डोळे अभिमानाने पाणावतात.

📌 तरुणांसाठी प्रेरणा
आजच्या घडीला अनेक तरुण मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. पण वेदांत वाईंगडे यांच्यासारख्या युवकाने सिद्ध केलं की जर मनात ठाम निर्धार असेल, तर कोणतीही अडचण आड येऊ शकत नाही. त्याने वेळेचा सदुपयोग केला, मार्गदर्शन घेतलं, आणि सातत्याने मेहनत घेतली.
"वेदांत वाईंगडे हे नाव आता केवळ एका विद्यार्थ्याचं नाही, तर प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. त्याने दाखवलेला मार्ग हा प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याला हे दाखवतो  की ...
" स्वप्न मोठं असावं, आणि प्रयत्न अखंड."
आज वेदांत वाईंगडे केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान आहे. त्याचं यश हे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे – की स्वप्न कोणतीही सीमा पाहत नाहीत आणि यशासाठी गरज असते ती फक्त जिद्दीची!

-धनाजी माने.....✍️
====================

 

Saturday, September 28, 2024

शिक्षकांचा आक्रोश मोर्चा.....










 महाराष्ट्रातील शिक्षकांची व्यथा.....✍️

राज्यभर शिक्षक हे शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आक्रोश का करत आहेत ? रस्त्यावर का येत आहेत ?

एक अनाहूत पत्र……✍️
🙏 आदरणीय साहेब !
प्रत्येकजण येतो आणि शिक्षकालाच शहाणपण शिकवतो.त्याने कसे वागावे याचे डोस पाजतो.शिक्षकांच्या समोर उभी राहयची लायकीही नसते, अक्कल नसते असेही येऊन शिक्षकांना डोस पाजतात.शिक्षक मात्र निमुटपणे सहन करतात.कारण ते मुलांना संस्काराचे धडे देतात, समोरच्याच्या पातळी इतके विचार खाली येऊ इच्छित नसतात.आणि याचाच अनेकजण फायदा घेताना दिसतात. पात्रता नसणारेही गुरुजणांना शहाणपणाचे डोस पाजत राहतात.अशांनी थोडे आत्मभान ठेऊन आत्मपरीक्षण केले तर ते स्वतःच काय पात्रतेचे आहेत हे समजते तेवढे भान आणि संस्कार मात्र त्या व्यक्तीकडे हवेत !पात्रता असणाऱ्यांनी शिक्षकांना जरुर मार्गदर्शन करावे , त्याला शिक्षकांचीही ना नसते , कारण शिक्षकही ज्ञानपिपासू असतातच.त्यालाही गरज असते मार्गदर्शनाची आणि मार्गदर्शकाची.आज शिक्षक पदवीधर ,पदव्युत्तर M.A,M.Com, M.Sc,M.Phil,P.hd असे उच्चविद्याविभूषित आहेत.तंत्रज्ञानाचा वापर करुण मुलांना आधुनिक शिक्षणाची संधी देणारे , दोन ,तीन तपांची सेवा बजावत ज्ञानदान करणारे तज्ज्ञ शिक्षक आज कार्यरत आहेत. अनेक अशैक्षणिक कामांची आव्हाने स्वीकारत ,सहन करत तो पुढे चालतोच आहे. म्हणून ,एवढीतरी  गुणवत्ता आज टिकून आहे , काही ठिकाणी याला असतीलही अपवाद , पण तिथलीही प्राप्त परिस्थिती काय आहे ? याचा लेखा-जोखा तपासून तिथल्या शिक्षकाचे मुल्यमापन व्हायला हवे.आणि सारेच कसे एका मापाने मोजून चालेल ?समाजात प्रत्येक क्षेत्रात अपवाद हे असतातच ,म्हणून का त्या क्षेत्रातील सारेच तसे नसतात हो !
आज अनेक ठिकाणी दोन- तीन वर्ग व शाळेची कागदोपत्री इतर काम सांभाळून शिक्षक काम करत आहेत.( द्विशिक्षकी शाळेत तर आज अनेक ठिकाणी आज एकाच शिक्षकावर काम सुरु  आहे) तिथली गुणवत्ता कशी मागणार ? तुम्हीच सांगा ? आणि सगळेच तुमच्या सोईनुसार कसे तोलता हो ? जरा समोरचा शिक्षकही माणूस आहे.त्यालाही कुटुंब आहे,त्यालाही मन आहे.तो काय ब्रम्हदेवाचा अवतार नाही.समोरचाही कोणत्या अवस्थेततून जात आहे ,तेही पहा ना?
शिक्षकांची नसणारी पण, त्याच्यावर लादली जाणारी अनेक कामे  तो निमुटपणे करत आला.करतो आहे. (ही यादी खूप मोठी आहे, ती सर्व  काम फिल्ड वर येऊन करुन पाहिल्याशिवाय कळणार नाहीत. लांबून ढपल्या मारण आणि माप~ काढण , इतक सोप ते नक्कीच नाही बर !)
प्रत्येकजण येतो आणि शिक्षकांच्या पगारावर बोलतो. मोठ-मोठे पगाराचे आकडे सांगतो.अहो पण साधा आडाणी माणूस सांगू शकतो की......एका गावात इतर खात्यातील कर्मचारी संख्या आणि शिक्षक संख्या यांची खूप मोठी तफावत असते.१० ते १५ हजार लोकवस्तीच्या गावात तलाठी,ग्रामविकाअधिकारी यांची संख्या प्रत्येक गावासाठी  फक्त एक आणि एकच असते .शिक्षकांची संख्या अशा गावात ,मुलांच्या पटाप्रमाणे ७० ते ८० असते मग तुम्हीच सांगा ही तफावत एवढी मोठी असेल तर शिक्षणांवरील खर्चाचा आकडा मोठा दिसणारच ना?शेतकरी सुद्धा सांगू शकेल हे गणित एका माणसाच्या आणि ८० लोकांच्या पगारात फरक असणारच .शिक्षकाबाबत नेहमीच अर्धसत्य सांगून त्याच्या बदनामीचा अगदी रचनात्मक खेळ सुरु आहे.काहीजण तर हवे तसे शिक्षणाच ,शिक्षकाच आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करत आहेत.अहो शिक्षक म्हणजे काय जादूगार आहे का? शिक्षण ही प्रक्रिया फक्त शिक्षकावर अवलंबून आहे का?यातील सगळे गुण दोष तपासायला नकोत का ?
एखाद्या फाईलवर सही केली, झाले पूर्ण काम इतक हे सोप्प काम आहे का ,तुम्हीच सांगा.(आणि आम्हाला कुठे अधिकार राहायला आहे ,व्यक्त व्हायचा आणि सत्य सांगायचा?)
अहो शिष्यवृत्तीमद्धे मुले पास होण्यासाठी गुणवत्ता यादीत आणण्यासाठी पाच-पाच वर्षे काम पूर्ण क्षमतेने करावे लागते , तेव्हा त्या शिक्षकाचे काम दिसते.एका रात्रीत इमारत उभी करण्याएवढे हे काम सोप्पे नाही हे सर्वमान्य असूनही , काही जण लगेच जादूच घडेल अशी गुणवत्ता मागत आहेत.खरचं हे सद्सदविवेकी बुद्धीला पटत का हो?
शिक्षकांच्यावर नको ते आरोप करून  त्यांची बदनामी सुरुच आहे.शिक्षक मात्र सत्तेपुढे शहाणपण नको म्हणून निमूटपणे सहन करतायत.दुर्लक्ष करतात याचा अर्थ शिक्षक दोषास पात्र आहेत असा होत नाही.यावर चिंतन आणि मंथन व्हायला हव.
विद्यार्थ्यांना हा पाढा म्हण तो पाढा म्हण ,हे कोण....ते कोण.....यांचे नाव काय.....त्यांचे नाव काय ?या प्रश्नांची उत्तर विचारली जातात.काही मुले उत्तर देतात काही देत नाहीत.यात शिक्षकांचा दोष काय ? सारखीच बुद्धी असते का सर्वांची.दहावी ,बारावी ,MPSC .......अशा सगळ्याच परीक्षेत कुठे १००℅ सारी पास होतात? रात्र-दिवस अभ्यास करुन तिथेही नापास होतातच की हो ! मग....गुरुजींना आणि खेळकर वयातील साऱ्याच मुलांना १००℅ चा रिझल्ट कसा मागता येईल.....तुम्हीच सांगा ना हो !
मुलांना तिसरी-चौथी -पाचवी मद्धे गुरुजींनी पाढे शिकवले. काहींना आले, काहींनी पाठ केले , यात काही विसरले .त्यात सर्वांचीच बुद्धिमत्ता एकसारखी असते का हो ? 
मानसशास्त्र काय सांगते - काही मुले अलौकिक बुद्धीची , काही कुशाग्र बुद्धीची,काही बुद्धिमान, काही मतिमंद,तर काही गतीमंद असतात. ग्रहण शक्ती स्मरणशक्ती ही व्यक्तीपरत्वे भिन्न असते. ज्यांनी उत्तरे दिली त्यांनाही त्याच शिक्षकांनी शिकवलेलं, आणि ज्यांनी उत्तर दिली नाहीत, त्यांनाही त्याच शिक्षकांनी शिकवलेल असतं , मग तुम्हीच सांगा .यात  दोष कोणाचा ? मग...तुम्हीच सांगा... कुणीतरी का- गुरुजींच्या नावाने खडे फोडावे❓आणि विचारणाराचे तरी आता पाठ आहेत का ? मग हा प्रश्न विचारणाऱ्या कुणाला तरी अधिकार  पोहचतो का हो ?
( इथे प्रामाणिकपणे उत्तराची अपेक्षा आहे. No Politics please. ...टाळी  एका हाताने वाजत नसते हो ! )
म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे लायकी नसणाऱ्या कुणीही सोम्या -गोम्याने आपण धुतल्या तांदळागत स्वच्छ असल्यागत आणि ज्या-ज्या ठिकाणी आपण काम करतो ,अशा ठिकाणी अगदी प्रमाणिकपणे काम करतो .या अविर्भावात शिक्षकांच्यावर  उगीच शिंतोडे उडवू नयेत.ज्यांना अंतर्मन प्रामाणिकपणाचा कौल देते ,त्याने जरुर हे सारे शिक्षकांना  विचारावे .स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी उगीच रोज उठ-सुठ शिक्षकांच्या घरावर दगड मारत बसू नये.शहाणपणाचे डोस देत बसू नये.विद्यार्थ्यांनप्रती आज शिक्षक प्रामाणिकपणे राहतो आहे आणि राहायला हवे याचे भान तो आजही विसरलेला नाही.आणि हो ...विस्मरण हे असतेच ना? आज अनेक मुलांचे पालक - डॉक्टर ,इंजिनिअर ,वकील ,प्राध्यापक, पोलीस अधिकारी ,विविध पदावर उच्चपदस्थ आहेत.त्यांचेही पाढे त्यावेळी  तोंडपाठ असतीलच की? ,आज किती जणांना तोंडपाठ आठवतात ? ( हे ही  पालक अगदी प्रामाणिकपणे  खुल्या मनाने सांगतील ,आम्ही आता विसरलो हो Sorry ) म्हणून त्यांचेही शिक्षक अप्रामाणिकच का हो ❓ सांगा तुम्हीच ! मग सांगा ते पाढे  त्यांना त्यावेळी तोंडपाठ होते आता त्यांना ते आठवत नाहीत. तर मग त्यांचे शिक्षक दोषी होते का?खरच हे न्यायप्रिय वाटते का हो ?असे अनेक प्रश्न घेऊन शिक्षकांना बदणाम केले जात आहे.
साहेब ! ही चर्चा खूप मोठी होऊ शकते , त्यावर भाष्य करण्यापेक्षा , चर्चेत शक्ती खर्च करण्यापेक्षा ,नेमका या क्षेत्रातील रोग कोणता आहे हे  चांगल्या तज्ज्ञाकडून शोधयला हवे.समिती पुन्हा एकवेळ गठित करायला हवी.त्यामद्धे राज्यात तळागाळात काम करणारे शिक्षक हवेत.संघटना प्रतिनिधी हवेत .नेमक रोगाचे निदान झाल्याखेरीज रोज उठून प्रत्येकाने डॉक्टर नसताना ,डॉक्टर असलेच्या अविर्भावात गुरुजींना डोस पाजत फिरु नये ही माफक अपेक्षा सर्वच शिक्षकांची आहे। जिथ रोग आहे, तो कसा नष्ट होईल ते सर्वजण मिळून पाहूया ! हे अगदी लेकरांना स्मरुन प्रत्येक प्रामाणिक शिक्षकांना वाटते.
यासाठी तुम्ही जरुर कठोर पावल उचला ,स्वागत आहे.कारण यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे.या प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम न करणाऱ्यांना गुणवत्ता न देणाऱ्यांना जरुर कायमचा घरचा रस्ता दाखवा ,एखादाच अपवाद वगळता या मतावर तमाम सारे शिक्षक अगदी ठाम राहतील.
पण...... हे कधी ? हे - ही आपल्या यंत्रणेण ऐकूण घ्यायला हव ना? मत मांडायला ,व्यक्त व्हायला स्वातंत्र्य द्यायला हवे.बर बोलण्यापेक्षा ,खर-खर बोला आपण सारे मिळून ही यंत्रणा दोषविरहीत करुया.गोरगरीब लेकरांच जीवन फुलवूया हा आत्मविश्वास खालून -वरपर्यंत राबणाऱ्या साऱ्या यंत्रणेन शिक्षकांना द्यायला हवा.यासाठी या क्षेत्रात काही बदल लवकरात - लवकर घडायला हवेत-
◆यासाठी शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरणे क्रमप्राप्त आहे.
◆ शिक्षकांचा नेमका job चार्ट हवा.
◆त्याला नेमूण दिलेल कामच द्यायला हवे.
◆तो कामाच्या ठिकाणी राहत नाही अशी टीका करण्या आगोदर , जसे प्रा.आरोग्य केंद्राशेजारी निवासी यंत्रणा असते तशी शिक्षकांनसाठीही निर्माण करुन द्यायला हवी.आणि त्यानंतरही शिक्षक कामाच्या ठिकाणी नाही राहिले तर कठोर कारवाई केली जावी.फक्त अर्धसत्य सांगून अवघ्या शिक्षक वर्गाला बदनाम करणे कितपत योग्य आहे ?तुम्हीच सांगा
◆त्याला फक्त आणि फक्त शिकवण्याचे काम द्यायला हवे.
◆इतर विभागातील कोणतेही काम त्याच्यावर लादू नये.(इतर विभागाचे लोक ,शिक्षकाचे काम कितीजण येऊन करतात हो ? हे पहिल बंद होऊन शिक्षक - मुलांनसमोर ठेवयला हवा.)
◆वार्षिक नियोजन ,घटक नियोजनात दिलेल्या आणि वर्षातील कामाच्या दिवसाइतक्या तासिका तो पूर्ण वेळ , विद्यार्थ्यांच्या समोर राहील हे पहायला हवे.यासाठी इतर विभागांना सक्त आदेश काढून , " शिक्षकांनवर इतर विभागाने आदेश लादू नयेत , लादले तर , असे आदेश देणाऱ्यांच्यावर कारवाईचा अंकूश राहयला हवा ! " यावर का कुणी बोलत नाही?
◆समाजातूनही उठाव व्हायला हवा ,सत्य समोर यायला हवे…
पालकांनी यंत्रणेला खडसावून सांगायल हवे - ‘आमच्या लेकरांच्या समोरुन शिक्षकांना इतर यंत्रणेन हालवल तर , आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आणि अस आम्ही करु देणार नाही. आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही .त्याना फक्त आणि फक्त शिकवण्याचे काम द्या! अशी भूमिका पालकांचीही हवी.यासाठी का कोणी आवाज उठवत नाही ? उलट समाजातील सर्वांनी यावर आवाज उठवायला हवा, जाब विचारला हवा.पण अस होताना दिसतच नाही. 
'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' अशीच अवस्था !
◆त्याचबरोबर शिक्षण विभागामार्फतही मागवली जाणारी आकडेवरी , online माहिती ,Online link भरणे याच्यासाठी ,शा.पो.आहाराची किंवा इतर वेळोवेळी मागवली जाणारी माहिती देण्यासाठी , वेगळी यंत्रणा उभी करायला हवी.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना शैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई केली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असूनही शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे दिली जातात. 
शिक्षकांच्या अध्यापनावर या गोष्टी बाधा आणतात हे सर्वमान्य असताना ते दोष दूर न करता शिक्षकांना का दुषने दिली जातात?
◆ काही महिला शिक्षकांचे पती  इतर खात्यात सेवेत आहेत,तर काहींच्या पत्नी इतर खात्यात सेवेत आहेत.तर काही पती-पत्नी वेगवेगळ्या गावात १० किलोमीटर पासून १०० किलोमीटर इतक्या अंतरावर कार्यरत आहेत.तर दोघापैकी नेमक कुणी मुख्यालयी राहावे ? अशांना कोणता शासन निर्णय लागू करणार ? यावर पर्याय सांगावा.
👁️ मुद्दा Vip 👁️
 आपल्या सरकारी शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागात आहेत, दुर्गम भागात आहेत.काही अपवाद वगळता त्या चौथीपर्यंत आहेत.अशा ठिकाणी राहणाऱ्या शिक्षकांची मुले ५वी पासून कुठे शाळेला घालायची? अशा वेळी त्या शिक्षकांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात नसेल तर त्याने काय करावे ?( पर्याय सांगावा , नुसते दोष देणे टीका करणे सोपे असते.सकारात्मक विचार हवेत.टीका करणे कुणालाही येते हो !)
◆ या क्षेत्रातील अशा अनेक समस्या आहेत ही यादी खूप मोठी आहे,  जे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारालाच समजते.नुसत्या लांबून गोळ्या मारुन चालत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.या क्षेत्रातील समस्या तशाच लोंबकळत न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन त्या दूर करायला हव्यात.फक्त शिक्षकाला दुषने देण्यात काय अर्थ आहे ? मुळात तो दोषी नसताना त्याला समाजासमोर दोषी ठरवल जात आहे.काही लोक चुकतही असतील म्हणून का साऱ्यांना त्याच तराजूंनी तोलायचे का ?
आहो एवढ्या साऱ्या पसाऱ्यात कुठेतरी चूक होणारच ना ?
स्वार्थी राजकारणी असतात तसे अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतानाच की.काही लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या आरोपाखाली  तुरुंगात सजा भोगत आहेत, म्हणून का सगळेच लोकप्रतिनिधी तसे नसतात.म्हणून समाज साऱ्याच लोकप्रतिनिधींना आरोपी समजत नाही. तद्वतच ,
खूप मोठ्या पांढऱ्या पडद्यावर ,एखाद्या काळ्या ठिपक्याचा डाग असणारच की , म्हणून सारच लक्ष त्या काळ्या ठिपक्यांवर केंद्रीत न करता , जरा शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाच्या ,तो ठिपका तेवढा  सोडून अख्ख्या पांढऱ्या पडद्यावरही लक्ष द्या ना !
जरा उघडा डोळे पहा नीट , किरकोळ चुकानपेक्षा , त्यांचे चांगले कामही पहा जरा.दिसूदे तुमच्या डोळ्यांना.
चोर सोडून सन्याशाला फाशी ,आणि साप ,म्हणून भुई धोपटण्यासारखे फक्त शिक्षकांना नका दुषने देऊ...........
◆ मुख्यालयी राहतो असे खोटे , दाखले दिले जातात हा शिक्षकांच्यावरील आरोप...हा शिक्षकांचा दोष नाही. ते करण्यास वरील 👆(👁️ मुद्दा Vip 👁️) या मुद्द्यामुळे अडचणी आहेत , याला आपली सिस्टीम चुकीची आहे वाटते.यासाठी वरील या मुद्द्यावर खोलवर विचार करुन ,शासन निर्णय करा ना की.....( कर्मचाऱ्यांच्या वरीलप्रमाणे असणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन - कर्मचाऱ्यांनी सोईच्या ठिकाणी राहिले तरी चालेल ,पण नेमून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असून. त्याने त्याचे नेमूण दिलेले काम पूर्ण क्षमतेने करणेचे आहे. असा स्पष्ट निर्णय काढा ना एकदाच.
कशाला कुठला कर्मचारी असे दाखले लिहून देईल ? तुम्हीच सांगा
◆फक्त भौतिक सुविधा देऊन,चकाचक इमारती करुन किंवा आधुनिकता आनून गुणवत्ता नाही सुधारणार , त्यासाठी "शिक्षक-विद्यार्थी दिलेल्या वेळेत समोरा-समोर अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत सक्रिय राहायला हवेत.आणि हेच नेमक घडत नाही.रोग रेड्याला आणि दंड पखाल्याला अशीच काही अवस्था झाल्याचे शिक्षकांच्याबाबत घडते आहे.
का .....हे सारेजाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे ?
आहो स्पर्धा जरुर लावा आमच्यात आणि इतरांच्यात आमचा तमाम प्राथमिक शिक्षक कुठेही कमी पडणार नाही.
आहो आमच्यासमोर असणारी गोरगरिबांची ,दीन-दलित पिचलेल्या समाजातील मुले असतात.आमच्या अनेक शिक्षिका .त्या लेकरांची माय बनतात. त्यांच्या सुखदुःखात समरस होतात. फक्त अध्यापनच करीत नाहीत तर
त्या विद्यार्थ्यांचे हवे- नको ते पाहतात.  शिक्षणाचे महत्त्व माहिती नसणारे बहुतांश पालक असतात.अनेक गोष्टींची त्यांना वानवा असते.अशा संघर्षमय स्थितीत तो काम करत हा सर्व बाजूंनी खिळखिळा झालेला गाडा ओढतोच आहे.
याच्या सर्व उलट खाजगी शाळेतील विद्यार्थी-पालक यांची अवस्था असते.(हा खूप मोठा विषय आहे.तो मर्यादित शब्दात नाही मांडता येणार)
आज आमचे शिक्षक किती समस्यांना तोंड देत , काम करत आहेत यासाठी एखादी कमेटी नेमा ,त्यावर समाज मंथन होऊदे आणि यानंतर खरे दोष कुठे आहेत ते पहा.
त्यावेळी शिक्षकांना दोष देणाऱ्यांनाच ,पश्चाताप होईल.
" अरेरे ! खरचं आपण आजपर्यंत ' चोर सोडून सन्याशाला फाशी ' या न्यायाने वागलो. खरे दोष वेगळेच आहेत पण आपण शिक्षकांच्या नावाने खडे फोडत बसलो , त्यांना दुषने देत बसलो. त्यांना बदनाम केले. यासाठी मात्र तेवढे निरागस ,पारदर्शी मोठ मन हवं."
 अशा अनेक समस्या आहेत की , ज्याचा अशा एका लेखात परामर्श घेता येणार नाही.
सर्व पातळीवर हे क्षेत्र सर्व समस्यामुक्त  झाल्यानंतरच ......
◆ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना  काम करण्याची संधी द्यावी, समोर असणाऱ्या विद्यार्थ्याची वर्षाच्या सुरवातीला त्याचे मुल्यमापन करून मुले शिक्षकांच्या ताब्यात द्यावीत. व वर्षाच्या शेवटी मुल्यमापन करावे.
अपेक्षित बदल घडले तरच शिक्षकांना पगार वाढ द्यावी अन्यथा देऊ नये.( या पर्यायाला कोणताही शिक्षक बांधव विरोध करणार नाही. कारण शिक्षकांना माहिती आहे वरील सर्व समस्या ,दूर झाल्यास , गुणवत्ता देणे त्याला काहीच अवघड नाही.)
◆ ज्यावेळी शिक्षकांच्या हातात नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ खडू , मुलांनसमोर शिक्षक आणि शिक्षकासमोर मुले राहतील याचे काटेकोर पालन होईल. तसेच 
 " आमच्या मुलांच्यावर शिक्षकांना अध्यापनाचे पूर्णवेळ समाधानाने काम करु द्या ! , शाळेच्या वेळेत त्यांना ,आमच्या मुलांच्या अध्यापनाव्यतिरीक्त कोणतेही काम देऊ नका,त्यांची कारकुनी बंद करा,अध्यापनाशिवाय शिक्षकांना इतर काम दिल्यास पालक आंदोलने करतील.SMC तसे ठराव करतील, त्यावेळी शैक्षणिक गुणवत्तेची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की." हा विश्वास तमाम शिक्षकांना आणि जाणकार पालकांनाही आहे.आणि तो सोन्याचा दिन लवकर येवो , ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
कारण वाडीवस्तीवरील ,दिन - दलित, गोरगरीब घरची लेकर या साऱ्या प्रक्रियेत भरडली तर जात नाहीत ना ? ही अनाहूत भिती प्रत्येक शिक्षकाच्या  मनाला सारखी बेचैन करते !
 तेव्हा बघा साहेब ! हातजोडून विनंती आहे शिक्षकांबाबत - अर्धसत्य सांगून , त्याला बदणाम करुन  समाजातच वाईट संदेश पसरवण्यापेक्षा ,पसरण्यापेक्षा नेमके निदान लाऊन रोग दूर करुयात.
जर असच खरे वास्तव न पाहता शिक्षकांना दुषने देत राहिललात तर ,जीव ओतून काम करणारे शिक्षक नाऊमेद होतील.त्यांचे खच्चीकरण होईल आणि याचे आत्ता नाही.... तर भविष्यात दूरगामी परिणाम दिसतील ,त्यावेळी वेळ टळून गेलेली असेल, आणि अशा वेळी काळ कुणालाच माफ करणार नाही.  तेव्हा मिळून सारेच - यंत्रणा,समाज ,पालक ,शिक्षक ,विद्यार्थी पारदर्शी राहूयात! , गोरगरीब लेकरांचे आयुष्य उज्ज्वलतेकडे सारे मिळून नेऊयात !
शिक्षक दिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिक्षकांचा गौरव केला जातो. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी, शिक्षकांचा गौरव करणारी भाषणे होतात. सत्कार समारंभ होतात. काहींना पुरस्कार दिले गेले. किती हा शिक्षकांचा मान सन्मान ! आणि दुसऱ्या दिवशी? शिक्षकांच्या वाट्याला काय, तर अवहेलना दुजाभाव, अपमान! मग हा दांभिकपणा कशाला हवा? समाज इतका असंवेदनशील कसा असू शकतो? माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. गुरूशिवाय विद्या नाही अन् गुरूशिवाय जीवनाला अर्थही नाही! एका बाजूला गुरूंची थोरवी सांगणाऱ्या या समाजात गुरुपदाची इतकी अवहेलना कधीच झाली नसेल इतकी अवहेलना, गुरूंना वर्गावरून शाळेबाहेर काढून इतर अशैक्षणिक कामाला जपून केली जावी हे असंवेदनशीलतेचे गाठलेले टोकच म्हणावे लागेल.
मंगेश पाडगावकर हे एका कवितेत म्हणतात-
" पायात काटे रुतून बसतात , हे अगदी खर असतं.आणि ,फुल फुलून येतात हे काय खर नसतं? फुलासारखं फुलायचं की, काट्यासारख सलायचं ,तुम्हीच ठरवा !
तेव्हा सारे सकारात्मक राहूया ! आणि हे शिक्षणाचे शिवधनुष्य सारेचजण पेलूया एवढेच...... 
- धनाजी माने .....✍️ 



राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !

  "राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )" =============================== 🙏भावप...