Friday, November 10, 2023

दिवाळी या पर्वातील विविध दिवसांचे महत्व जाणून घेऊयात

 


  🪔 Happy Diwali !🪔


दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, हा भारतात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते.पणती ,समई,नंदादीप ,निरांजन ,दीपमाळ सारीच तर प्रकाशाची रूपे.रंग रूप वेगवेगळे मात्र धर्म एकच, उजेडानं अंधार मिटविण्याचा !असा हा दीपोत्सव !!

या पर्वातील विविध दिवसांचे महत्व जाणून घेऊयात…

वसुबारस


भारत हा कृषीप्रधान देश. शेतीसाठी बैल हा अत्यंत उपयुक्त प्राणी. जो आपल्याला धान्य पिकविण्यासाठी मोलाची मदत करतो, काबाड- कष्ट करतो त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैल पोळा सण साजरा करतात. बैलाला सजवतात, गोडधोड खाऊ घालतात अगदी ओवाळतात सुध्दा. अशा बैलाला जन्म देणारी,


दुधदुभते देणारी, खतासाठी तसेच घर सार- विण्यासाठी शेण देणारी औषधी असे गोमुत्र देणारी गोमाता ही देवतेसमान ठरली.


वसुबारस हा तिचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे धन, रत्न आणि बारस म्हणजे द्वादशी.कार्तिक कृ.द्वादशीला हा सण साजरा करतात. गोधना मुळे शेतीत विपुल धान्य पिकवलेजाते, त्यातूनच संपत्ती निर्माण होते.म्हणून त्या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात,गाईच्या गळ्यात हार घालतात, तिला कुंकू लावतात,कामधेनूचे स्मरण करत पक्वान्न खाऊ घालतात. दारात रांगोळी काढतात. घरात लक्ष्मीचे / संपत्तीचे आगमन व्हावे या इच्छेने हा सण साजरा करतात. दिवाळीचा हा पहिला दिवस.


स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपूज्य जी वंद्य या भारताला नमस्कार माझा त्या दिव्य गो देवतेला ।



धन्वंतरी -

अश्विन कृष्ण त्रयोदशी धन्वंतरी जयंती

ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघट चारुदोर्भिश्चतुर्भिः । सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम ||

कालाम्भोदोज्ज्वलांग कटितटविलसच्चारु पीतांबराढ्याम । वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम ||


आम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो

श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना


धन्वंतरी

याला विष्णूचाच अंशावतार मानतात. समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली त्यांत धन्वंतरीची गणना आहे. तो वैद्यराज असून समुद्रातला अमृतकलश त्यानेच वर आणला. त्याच्याच अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृताच्या रुपाने देवांना प्राप्त झाले व ते अजरामर झाले. धन्वंतरीला विष्णूच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्याने वैष्णव मूर्तीत त्याला स्थान मिळाले. शिल्पयंत्र ग्रंथात त्याच्या मूर्तीची लक्षणे ग्रंथीत झाली आहेत ती या प्रमाणे- चतुर्भूज, तेजस्वी, पीतवस्त्रधारी, एक हात अभय मुद्रेत व इतर हातात कमळ, अमृतघट आणि जळू धनत्रयोदशीच्याच दिवशी या वैद्यराजाचे पूजन करतात व आरोग्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतात.


धनत्रयोदशी -

प्राणिमात्रांच्या जीवनाची मुदत संपल्यावर त्यांचे प्राण हरण करणाऱ्या यमधर्माने एकदा आपल्या दूतांस विचारले की, यमपाश घालून प्राण हरण करताना तुम्हाला कोणाची दया आली होती का ? दूतांनी सांगितले की एकदा हैम नावाच्या राजाच्या मुलाचा विवाह थाटात चालला असता राजपुत्राला सर्पदंशाने मरण आले. त्या वेळी त्याचे प्राण हिरावून घेताना आम्हाला खूप वाईट वाटले. अशा आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. असा प्रसंग कोणावर येऊनये असे काही करावे ही आपणाला विनंती. दूतांचे भाषण ऐकून यमधर्म म्हणाले, अश्विन कृष्ण त्रयोदशी पसून पाच दिवस रोज प्रदोषकाली म्हणजे सूर्यस्तानंतर सर्वठिकाणी जो दीपोत्सव करील त्याला तुमच्या इच्छे प्रमाणे मृत्यू येणार नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला दिवे अर्पण करायची प्रथा आहे. त्या दिवशी जरी फारसे दिवे लावत नसले तरी फक्त त्याच दिवशी दिव्याची ज्योत दक्षिणेकडे ठेवतात.

🚩हे ही माहिती असावे - मध्यप्रदेशात माळव्यात

या दिवशी एखादे तरी भांडे खरेदी करायची प्रथा आहे. या दिवशी इंदूर मधला बर्तन बाजार. रस्त्यावर पायघड्या पसरवून ग्राहकांसाठी सज्ज झालेला असतो. दोन मजल्यांपर्यंत भांड्यांची उतरंड लावलेली असते.


नरकचतुर्दशी-

भागवतात अशी कथा आहे की, पूर्वकाली नरकासूर नावाचा एक असुर प्राग्ज्योतिषपूर येथे राज्य करीत होता. मिळालेल्या वराने तो बलाढ्य झाला होता. त्याने इंद्राचे छत्र, आदितीची कुंडले आणि अमर पर्वतावरील मणिपर्व नावाचे स्थान हरण केले. देव व मानव यांस तो पिडा देऊ लगला. आपण अजिंक्य व्हावे म्हणून त्याने आपल्या राजधानीच्या सभोवती पर्वतांचे व शस्त्रांचे कोट रचले. हा दुष्ट दैत्य स्त्रीयांस पिडा देऊ लागला. जिंकून आणलेल्या सोळा सहस्त्र उपवर स्त्रीयांना त्याने तुरुंगात कोंडून ठेवले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. ही बातमी श्रीकृष्णाला समजताच सत्यभामेला बरोबर घेऊन गरुडावर बसून असुराच्या दुर्गावर हल्ला केला. नरकासुराला ठार केले. सर्व स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने लोकांकडून हरण केलेले धन परत केले. मुक्तता केलेल्या स्त्रीयांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांच्याशी विवाह केला आपले नाव दिले. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुराला ठार करुन त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळास लावला होता पहाटे घरी आल्यावर नंदाने त्यास मंगल स्नान घातले होते. या घटनेचे स्मरण म्हणून या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याचा प्रघात पडला.


श्री लक्ष्मी -गजलक्ष्मी

समुद्रमंथनातून वर आलेल्या लक्ष्मीने क्षीरसमुद्रावरील शेषशायी विष्णूच्या गळ्यात माळ घालून ती त्याची अर्धांगी झाली. ऋग्वेदा नुसार श्री व लक्ष्मी या दोन देवता होत. दोघी विष्णूच्या भार्या. पुढे श्रीदेवी आपले वेगळे अस्तित्व सोडून लक्ष्मीत विलीन झाली. लक्ष्मी संपत्तीची अधिष्टात्री देवता. ही दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनोकामना पूर्ण करते,


लक्ष्मीपूजनासंबंधी एक कथा —

फार पूर्वी बली नावाचा एक मोठा वैभवशाली, पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने आपल्या संपत्तीच्या व पराक्रमाच्या जोरावर देवादिकांना कारागृहात कोंडून ठेवले. प्रत्यक्ष लक्ष्मीला सुध्दा बलीच्या बंदिशालेत रहावे लागले. त्यावेळी श्रीविष्णूंनी वामन अवतार घेऊन बली राजाला पाताळात पाठविले व देवांचे प्रभुत्व पुनः प्रस्थापित केले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका झाली. लोकांना खूप आनंद झाला. तेव्हा पासून लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायमचा असावा म्हणून अश्विन अमावस्येला तिची पूजा केली जाऊ लागली. लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरापुढे रांगोळी काढली जाऊ लागली.


🚩हे ही माहिती असावे - बिहार मधील राजगीर जवळील पावापुरी या पुण्यभूमीत अश्विन अमावस्या, ख्रिस्त पूर्व ५२८,महावीर स्वामी शिष्यांना उपदेश करीत असता, पद्मासन घालून स्थिर झाले व देहत्याग केला. भगवान कर्मबंधातून मुक्त झाले. निर्वाणाप्रत गेले. म्हणून देहत्याग सुध्दा उत्सवात परिगत झाला. अग्निसंस्कारानंतर महावीर स्वामींच्या भक्त मंडळी तेथील रक्षा नेऊ लागले. रक्षा संपल्यावर माती नेऊ लागले. काही दिवसांत तेथे मोठा खड्डा तयार झाला. मग त्या खड्डयात पाणी पाझरुन तळे झाले. कालांतराने त्या तळ्यात महावीर स्वामींची स्मृती म्हणून जलमंदिर निर्माण केले गेले.दिवाळीत सर्व जैन मंदिरांत या दिवशी उत्सव साजरा करतात.


बलिप्रतिपदा








हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे.

कार्तिक शुध्द प्रतिपदेस बलिप्रतिपदा किंवा गोवर्धनप्रतिपदा असेही म्हणतात. श्रीकृष्णाच्या काळात, इंद्राच्या प्रकोपामुळे प्रचंड पाऊस पडला, प्रलय सदृष्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा कृष्णाने आपल्या करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला व त्या खाली आपल्या गोपालांना, गायी, गुरांना आश्रय दिला अशी कथा आहे. 


🚩पूर्वी बली नावाचा एक विख्यात चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो दैत्यकुलोत्पन्न विष्णूभक्त प्रल्हादाचा नातू होता. देवांचेही राज्य त्याने जिंकले होते. तो सदाचरणी व पापभिरू होता. त्याच्या दातृत्वाची कीर्ति दिगंतरात पसरली होती.त्याची सत्ता दशदिशांस पसरली असून प्रजा आनंदात होती. परंतू एकदा गर्वाने परमेश्वराचे माझ्यापुढे काय चालणार असे उद्गार काढले. बलीचे गर्वहरण व्हावे व देवांचे राज्य परत मिळावे म्हणून विष्णूने वामन अवतार घेऊन ठेंगू ब्राह्मणाचे रुप धारण करुन बलीने चालविलेल्या यज्ञाच्या वेळी हजर राहून आपल्या विद्वत्तेने राजास चकीत केले. संतुष्ट झालेल्या राजाने तुला काय हवे ते माग असे सांगताच ' त्रिपाद भूमि' दान मागितली. बलीने वामनाच्या हातावर दानाचे उदक सोडताच वामनाने विश्वरुप धारण केले. . दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला आणि तिसरे पाऊन कोठे ठेऊ असे विचारताच बलीने आपले मस्तक नमविले. वामनाने आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेऊन बलीला पाताळात लोटले अशी कथा आहे.


याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.


यमद्वितिया / भाऊबीज -


'बहीण-भाऊ यांचे नाते एक विशेष आणि अलौकिक असे स्नेहबंधन असते. एकमेकांच्‍या सुखाकरता झटावे, ही त्‍यांची आतील माया असते. दुःखात वा संकटात एकमेकांना साहाय्‍य करण्‍यासाठी बहीण भावाकडे अन् भाऊ बहिणीकडे जात असतो. या कौटुंबिक स्नेहाला उजाळा देण्‍याचा हा दिवस !

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.

कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे.

कार्तिक शुध्द द्वितीया म्हणजेच यमद्वितीया किंवा भाऊबीज. या दिवशी मृत्युदेव यमाने आपली बहीण यमी हिच्या घरी आनंदाने भोजन केले आणि वस्त्रालंकार भेट दिले अशी कथा आहे. यमाची पिडा होऊ नये व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हा दिवस साजरा करतात. सहोदर भगिनी नसल्यास चुलत, मामे, आते किंवा मानलेल्या भगिनीकडे जाऊन यथाशक्ती भेट वस्तू देतात. यम व यमी ही जुळी भावंडे. यमराज सद्वर्तनी व सनातन धर्माचा अभिमानी होता. त्याने यमीस सदुपदेश करुन सध्दर्माचे रहस्य सांगितले अशी वेदांत कथा आहे.

'भाऊबीज' हा बहीण-भावाच्‍या मंगल आणि पवित्र प्रेमाचा दिवस भारतीय संस्‍कृतीतील 'सोनेरी पान' आहे. निःस्‍वार्थी बहीण भावाकडून केवळ प्रेमाचीच अपेक्षा करते.

'नको धन, नको मुद्रा, नको मोतियांचा हार ।

देई प्रेमाश्रूंची धार, भाऊराया ॥'


एवढीच तिची बंधूरायाकडून अपेक्षा असते. भाऊ नसलेल्‍या स्‍त्रिया चंद्राला स्‍वतःचा भाऊ मानून त्‍याला ओवाळतात. 'भाऊबिजेच्‍या दिवशी भावाने स्‍वतःच्‍या घरी जेवू नये. पत्नीच्‍या हातचे अन्‍न खाऊ नये. बहिणीच्‍याच घरी जाऊन तिच्‍या हातचे अन्‍न खावे', असे सांगितले आहे.'

-धनाजी माने...✍️

dhanajimane123@gmail.com











Monday, October 23, 2023

दसरा


 दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा

नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा.

“दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असं जे म्हटलं जात ते काही उगाच नाही. देवीनं महिषासुराशी युद्ध करून त्याला मारला तोच हा दिवस. प्रभू रामरायांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. रजपूत काय किंवा मराठे वीर काय ह्यांनी युद्ध मोहिमांना प्रारंभ केला तोच हा दिवस.
दसऱ्याच दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशीत केली जातात. ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.

दसरा / विजयादशमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  हा सण भारतीय संस्कृतीचा शौर्य आणि शौर्याचा उपासक आहे.  दसरा म्हणजेच अश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जाणारा आयुध-पूजा हा हिंदूंचा प्रमुख सण आहे.  व्यक्ती आणि समाजाच्या रक्तातील शौर्य प्रदर्शित करण्यासाठी दसऱ्याच्या सणाचे आयोजन करण्यात आले आहे.

🏹 असत्यावर सत्याचा विजय - भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला.  तो असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.  म्हणूनच ही दशमी विजयादशमी म्हणून ओळखली जाते.  दसरा ही वर्षातील तीन सर्वात शुभ तिथींपैकी एक आहे, इतर दोन म्हणजे चैत्र शुक्ल आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा.  या दिवशी लोक नवीन कामाला सुरुवात करतात, या दिवशी शस्त्र पूजन आणि वाहन पूजन केले जाते.

प्राचीन काळी राजे या दिवशी विजयाची प्रार्थना करून युद्धासाठी निघत असत.  दसऱ्याचा सण आपल्याला वासना, क्रोध, लोभ, आसक्ती, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी या दहा प्रकारच्या पापांचा त्याग करण्याची प्रेरणा देतो.

☘️ दसरा या शब्दाची उत्पत्ती - दसरा किंवा दसरा हा शब्द 'दश' (दहा) आणि 'अहान' यांनी बनलेला आहे.  दसरा सणाच्या उत्पत्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  काही लोकांच्या मते हा शेतीचा सण आहे.  दसऱ्याला सांस्कृतिक पैलूही आहे.

☘️ भारत हा कृषिप्रधान देश आहे.  जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक घेतो आणि धान्याच्या रूपात संपत्ती घरी आणतो तेव्हा त्याच्या आनंदाला आणि उत्साहाला पारावार उरत नाही.  या आनंदाच्या प्रसंगी, तो देवाच्या कृपेचा स्वीकार करतो आणि तो प्रकट करण्यासाठी, तो त्याची पूजा करतो.  तर काही लोकांच्या मते ही रण यात्रेचे सूचक आहे, कारण दसऱ्याच्या वेळी पाऊस संपतो, नद्यांना पूर येणे थांबते, भात इ. साठवण्यासाठी तयार होतात.

☘️  हा सण नवरात्रीशीही संबंधित आहे. कारण हा सण नवरात्रीनंतर येतो आणि त्यात महिषासुराविरुद्ध देवीच्या धाडसी कृत्यांचाही उल्लेख आहे.  नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा किंवा विजया दशमी साजरी केली जाते.  या दिवशी रामाने रावणाचा वध केला.

☘️ राम आणि रावणाचे युद्ध- रावणाने प्रभू रामाची पत्नी सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेले होते.  भगवान राम हे युद्ध देवी माँ दुर्गा यांचे भक्त होते, त्यांनी युद्धादरम्यान पहिले नऊ दिवस माँ दुर्गेची पूजा केली आणि दहाव्या दिवशी दुष्ट रावणाचा वध केला.  त्यामुळे विजयादशमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.  रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला 'विजयादशमी' असे म्हणतात.

☘️  दसरा सणावेळी विविध जत्रा / मेळे- दसरा सण साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे मेळे भरवले जातात.  येथे लोक आपले कुटुंब आणि मित्रांसह येतात आणि मोकळ्या आकाशाखाली जत्रेचा आनंद घेतात.  जत्रेत बांगड्यांपासून खेळणी आणि कपड्यांपर्यंत विविध वस्तूंची विक्री होते.  यासोबतच या जत्रेत स्वादिष्ट पदार्थही मुबलक प्रमाणात मिळतात.

☘️  रामलीला आणि रावण वध- रामलीलाचेही यावेळी आयोजन केले जाते.  रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याचे दहन केले जाते.  दसरा असो की विजयादशमी हा सण प्रभू रामाचा विजय म्हणून साजरा केला जातो किंवा दुर्गापूजा म्हणून, दोन्ही रूपात तो शक्ती-पूजा, शस्त्रपूजा, आनंद, आनंद आणि विजयाचा उत्सव आहे.  रामलीलामध्ये अनेक ठिकाणी रावणाच्या वधाचे प्रदर्शन केले जाते.

☘️ शक्तीच्या प्रतिकाचा उत्सव - शारदीय नवरात्री, शक्तीच्या उपासनेचा उत्सव प्राचीन काळापासून प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ निश्चित तिथी, नऊ नक्षत्रे आणि नऊ शक्तींच्या नवधा भक्तीने साजरी केली जात आहे.  यानिमित्ताने नवरात्रीच्या नऊ दिवसांत जगदंबेच्या विविध रूपांची पूजा करून शक्तिमान राहण्याची लोकांची इच्छा असते.  भारतीय संस्कृती नेहमीच शौर्य आणि पराक्रमाची समर्थक राहिली आहे.  दसरा हा सणही शक्तीचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण आहे.

☘️ वाईटावर चांगल्याचा विजय - या दिवशी क्षत्रियांमध्ये शस्त्रांची पूजा केली जाते.  या दिवशी रावण, त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.  कलाकार राम, सीता आणि लक्ष्मणाचे रूप धारण करतात आणि फटाक्यांनी भरलेल्या या पुतळ्यांवर बाण सोडतात.  पुतळ्याला आग लागताच ती जळू लागते आणि त्याला जोडलेले फटाके फुटू लागतात आणि त्यामुळे त्याचा अंत होतो.  हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

चला तर मग आजच साऱ्या वाईट गोष्टीचा त्याग करुया आणि जे-जे चांगले ते स्वीकारुया !

- धनाजी माने...✍️



Sunday, October 01, 2023

जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद होणार ❓पेन्शनच काय होणार❓











 
🏠 जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद होणार❓
📚 शिक्षकांची नोकरी धोक्यात

✍️आम्हाला शिकवू द्या ! 
 जुनी पेन्शन द्या !
खाजगीकरण थांबवा !


महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात, कड्या- कपारीत शिक्षणाची गंगा पोहचावी म्हणून उघडलेल्या हजारो  शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण करत शाळा बंद करण्याचा सरकारने घाट घातला आहे. सरकार गांभीर्यपूर्वक यावर वाटचाल करीत आहे.


 कारण खेडेगावातील ,वाड्या-वस्तीवरील  कमी पट संख्या असणाऱ्या अशा सर्व शाळा बंद करायच्या. त्या गावातील चार-दोन मुला- मुलींनी शेजाच्या गावातील शाळेत जायचं. अशा पंचक्रोशीतील पाच-दहा गावांची तथा वाड्या वस्त्यांची एकच शाळा चालू ठेवायची. बाकीच्या , अशा कमी पटाच्या  हजारो शाळा बंद करायच्या हे  सरकारने ठरवलं आहे.


त्या दिशेने एक - एक पाऊल सरकारचे पुढे पडत आहे.

 कमी पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करून... त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या प्रस्तावित समूह शाळेत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


समूह शाळेची संकल्पना ही खरच शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल की सर्व सर्वसामान्य गरीब दिन-दलित वाड्या-वस्तीवरील मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेईल हे काळच ठरवेल.


ज्या महाराष्ट्रासाठी १०८ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते, त्या हुतात्म्यांनी अशा महाराष्ट्राचे स्वप्न कधीच पाहिले नसेल .....


ज्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू राजांनी १०० वर्षांपूर्वी वाडी-वस्तीवरील  गोरगरीब मुलांसाठी 'वतनी शाळा ' सुरू केल्या होत्या. त्याच  धर्तीवर  ही ज्ञानाची गंगोत्री तळागाळातील , रंजल्या -गांजलेल्या लोकापर्यंत पोहचावी , गावकुसातील ,डोंगर - कपारीच्या कणखर महाराष्ट्रात सर्वदूर पसरावी म्हणून ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 'वस्ती शाळा ' सुरू  करण्यात आल्या. 


परंतु, समूह शाळेचा निर्णय ,शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण यामुळे गोर- गरीब मुलांच्या शाळांवर किंबहुना त्यांच्या भविष्यावरच वरवंटा फिरणार आहे.

महाराष्ट्रामधील वाडी-वस्तीवरील मुलांची शिक्षणापासून मोठी हेळसांड होणार आहे.एकवेळ खाजगी कंपन्यांच्या घशात शाळा गेल्या की , सर्वसामान्यांना शिक्षण मोफत मिळणार नाही, ही सामान्यांची शिक्षणाची कवाडे कायमची बंद होतील अशी या क्षेत्रातील जाणकारांच्यातून ,समाजातून खंत,खदखद ,भिती व्यक्त होत आहे.


कारण कमी पट असणाऱ्या अनेक शाळा डोंगरावर डोंगरकपारीत ,दूर्गम भागात आहेत. तिथे वाहतुकीची व्यवस्थाच नाही. समूह शाळेपासून हे अंतर एक ते तीन किलोमीटरपेक्षा जास्त असल्याने लहान गटातील पहिली, दुसरीची मुले शाळेला चालत जाऊ शकणार नाहीत. आणि डोंगराळ आणि दुर्गम भागातील रस्ते खडकाळ व दगडधोंड्याचे असल्याने तिथे स्कूलबस पोहोचणार नाही  अशी अनेक वाड्यांस्त्यांवरची अवस्था आहे.तरीही हा घाट घातला जात आहे.


अशा डोंगरी व दुर्गम भागात कधीही सेवा न केलेल्या , या भागातील समस्या , त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन गरजा ,समस्या ,कौटुंबिक समस्या याचा कोणताही दुरगामी विचार नकरता ,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वातानुकूलित खोलीत बसून केलेली ही योजना,  असल्याने प्रत्यक्ष सर्वसामान्य विद्यार्थी ,वाडी -वस्तीवरील विद्यार्थी ,पालक कोणत्या अवस्थेतून जात असतात हे या योजना आखणाऱ्यांना काहीच माहिती नसताना आखलेला डाव आहे . असा नाराजीचा सूर पालक,शिक्षक,लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांच्यातून उमटत आहे. 


सरकारच्या या धोरणाबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.याचाच एक भाग म्हणून ३० सप्टेंबर रोजी -

' सरकारने आता आमचे ऐकले नाही तर पालक विद्यार्थ्यांसह मोर्चा काढू, प्रसंगी शाळा- बेमुदत बंद ठेवू, असा इशारा कोल्हापूर येथे विविध संघटनांनी 

दिला. ' शिक्षकांनी मोर्चा काढला.पावसाची तमा न बाळगता जिल्ह्यातून हजारो शिक्षक या निषेध मोर्चात सामील झाले  होते.कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयावर शिक्षकांनी मोर्चा काढला.


' शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा! आम्हाला शिकवू द्या ! गोरगरीब मुलांना शिकू द्या !  या सरकारचं करायचं काय खाली डोकं.. वर पाय... शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण चालणार नाही.....' अशा घोषणा देत शनिवारी शिक्षकांनी शाळांच्या समूहकरण, कंत्राटीकरण व खासगीकरणाला विरोध केला. 


दिल्लीत जुन्या पेन्शनसाठी देशातून शिक्षक एकवटला.आपला असंतोष, न्याय्य मागण्या मांडल्या. आपली व्यथा, कुटुंबाची परवड मांडली.


सांगलीत तर चक्क शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर  जोरदार घोषणाबाजी केली.

सावरकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी सांगलीत आलेल्या मंत्री.केसरकर यांना पदवीधर तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला. 


पवित्र शिक्षक संघर्ष समितीने ' समूह शाळा पद्धती बंद करा. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया करू नका ! स्थायी पद्धतीने भरती करावी अन्यथा कृष्णा नदीत जलसमाधी घेऊ ! ' असा इशारा पवित्र शिक्षक संघर्ष समितीने त्यांना दिला.यावरुन या धोरणाविषयी लोकांची खदखद ,उद्विग्नता दिसून येते.


खरंच ! आज शिक्षण क्षेत्रात खूप मोठे मंथन होणे गरजेचे आहे .यासाठी एखादी ,तज्ञांची ' समिती ' गठित करुन   यावर अभ्यासपूर्ण अभ्यास होणे खूप गरजेचे आहे .

नेमक्या समस्या ,अडथळे यावर उपाय व त्याची तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.कारण शिक्षण क्षेत्रातील समस्या लोंबकळत ठेवण हे कोणत्याही राज्याला ,देशाला परवडणारे नसते , याचे दूरगामी परिणाम अनेक पिढ्या भोगावे लागतात. कारण देशाची उज्ज्वल पिढी प्रत्येक शाळेत घडत असते.


आज महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांची एकच मागणी वेळोवेळी पुढे येते....' अशैक्षणिक कामे बंद करा ! आम्हाला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना शिकवूद्या ! '

ही मागणी अगदी रास्त असताना , शासन का ठोस निर्णय घेत नाही ❓

 आज , शिक्षकांना फक्त आणि फक्त अध्यापनाचे काम देणं गरजेचं आहे .शिक्षक, विद्यार्थी, खडू, फळा.....

हे अध्यापनाचे कार्य दररोज नियमित विना व्यत्यय घडले तर महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगती कोणीही टाळू शकणार नाही.पण हेच आज दुरापास्त झाले आहे.आणि याला सर्वसामान्यांचा आधार असणारा ,गरिब घरातील विद्यार्थी बळी जात आहे.

कारण सर्वसामान्यांची मुलेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असतात.

मोठ्यांची मुल या समस्यांना कधीच फेस करीत नाहीत ,कारण अशांची मुल खाजगी शाळा ,इंग्रजी माध्यमाच्या, CBSC च्या शाळेत विनाव्यत्यय शिक्षण घेत असतात. कारण अशा ठिकाणी अशैक्षणिक काम नसतात.आणि अपवादात्मक असलीच तर ती पार पाडणारी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फौज या संस्थामधून दिमतीला असते.


आज रोजी जिल्हा परिषद  शिक्षकाकडे १५१ पेक्षा अधिक अशैक्षणिक कामे अध्यापना व्यतिरिक्त शिक्षकांना वर्षभर करावी लागतात .याची यादी अनेक वेळा मोर्चे, उपोषण, प्रसारमाध्यम यातून ही यादी व्हायरल झाली आहे, याची खदखद व्यक्त झाली आहे.विशेष करून द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांना याला मोठ्या प्रमाणावरती तोंड द्यावे लागत आहे.


आज या शिक्षकांना एवढी अशैक्षणिक कामे दिली जातात की, त्याला वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिलेला वेळ  हा ज्या अध्यापनाच्या कामासाठी द्यायला हवा तो अशैक्षणिक कामामुळे देताच येत नाही किंवा तो खूप कमी दिला जातोय ,द्यावा लागतोय. याचं कारण अध्यापना व्यतिरिक्त इतरच कामांमध्ये शिक्षकांचा वेळ जातोय.


निव्वळ आकडेमोड करणे, विविध माहिती गोळा करणे, पासवर्ड लक्षात ठेवणे ,लिंक भरणे ,फोटो अपलोड करणे विविध पद्धतीचे सर्वे करणे , शालेय पोषण आहार योजना आकडेमोड, आर्थिक  हिशोब ,विद्यार्थ्यांची वजन ,उंची आधार अपडेट ,आधार लिंकिंग ,सरल माहिती ,विद्यार्थी डीट्याच्,,अटॅच्  करणे, निवडणूक आयोगाची कामे - BLO हे काम तर वर्ष-वर्ष भर चालते.अशा अनेक विविध गोष्टीत त्याचा बहुमूल्य वेळ जातो. आणि विद्यार्थ्यांसमोर वेळ देणं त्याला दुरापास्त होतं.मग....त्याच्याकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा का केली जाते❓

त्यातच हजारो पदांची भरती गेल्या दहा वर्षात या क्षेत्रात झालेली नाही , तो ही अतिरिक्त भार सहन करत शिक्षक निमूटपणे सहन करत ते आव्हान पेलत आहेत , पण आज ते न पेलवण्यापलिकडे झाल्याचे ,अनेक व्याधींना बळी पडत असल्याचे शिक्षक खाजगीत व्यक्त होतात आपल्या व्यथा मांडतात.


हे कधी थांबणार❓कोण थांबवणार❓शिक्षकांच्या , विद्यार्थ्यांच्या किती पिढ्या उद्ध्वस्त होणार❓

हे प्रश्न खरच ! राज्याला , देशाला न परवडणारे आहेत असे शिक्षणतज्ञांच्यातून बोलले जात आहे.


ज्या विद्यार्थ्यांचे अध्यापन करून त्यांचे उज्वल भविष्य घडवणे यासाठी शिक्षकांची नेमणूक असते हे कामच शिक्षकांना आजची यंत्रणा करू देत नाही.

यातच भरीस भर म्हणून गेल्या दहा वर्षांमध्ये शिक्षक पदांची नेमणूक न झाल्याने, हजारो पदे रिक्त आहेत.

 त्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपलब्ध असणाऱ्या शिक्षकांच्याच वाट्याला येतोय.  त्यामुळेही विद्यार्थ्यांच्या अध्यापनात  अडथळे निर्माण होतात .


अनेक केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी ,शिक्षणाधिकारी यांची पदे रिक्त आहेत. अनेकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.यामुळेच एकूणच शिक्षण व्यवस्थेवर याचा दूरगामी परिणाम होत असताना दिसत  आहे.


द्वि -शिक्षकी शाळेतील शिक्षकांच्या  सहनशक्तीची तर परिसिमाच झाली आहे. या शिक्षकांवरती तर अतिरिक्त कामाचा ताण असतानाच, एका -एका शिक्षकाला चार -चार वर्ग अध्यापनाचे  कामे करावे लागत आहे.

 आणि अशातच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची आणि अशा शाळेतील विद्यार्थ्यांची तुलना करून शिक्षकांना बदनाम केलं जात आहे.किती मोठा विरोधाभास हा !


अशा द्विशिक्षकी शाळेतील शिक्षक शिकवतच नाहीत, आणि त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे ,असे खापर या शिक्षकांच्या नावाने फोडले जाते .

अशा शाळेतील शिक्षक समपातळीवर स्पर्धा व तुलना करण्याचे आवाहन करतात. समान सुविधा देऊन मगच मुल्यमापन करण्याचे हे शिक्षक माफक अपेक्षा करतात.

'रोग रेड्याला आणि दंड पखाल्याला ' अशी त्यांची अवस्था आहे


 खोलवर विचार केल्यानंतर नेमकं दोषी हे शिक्षक नसून यंत्रणेतील दोष लक्षात येतात. 

 या सदोष यंत्रणेमुळे शिक्षक दोषी नसतानाही त्यांच्या कपाळी हा दोष येतो. आज सर्वच शिक्षक तळमळीने काम करतात .अनेक शाळा आदर्श घडवल्या आहेत .

लोकसहभागातून कोट्यावधी रुपयाचा निधी शिक्षकांनी जमा करून शासनावर अवलंबून न राहता , शाळेच्या भौतिक सुविधा स्वतः निर्माण केल्या आहेत.


अनेक शिक्षक आव्हान करतात की आम्हाला फक्त शिकवू द्या ! फक्त आणि फक्त शिकवण्याचे काम द्या ! अतिरिक्त कामाचा बोजा काढून घ्या. 


आम्ही, विद्यार्थी, खडू आणि फळा या मध्ये कोणताही व्यत्यय  न आणता शाळेच्या वेळेत फक्त आम्हाला अध्यापनाचे पवित्र काम करू द्या . आणि शाळेच्या वेळेत व्यतिरिक्त आम्हाला आमच्या बायका पोरांच्या आनंदाने जगू द्या ! मग पहा ' ऑल इज वेल ' कसे घडते ते !

आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या अनुभवाप्रमाणे अध्यापनाचे काम करू द्या. 

कोणतेही येशील बसून सुपीक डोक्यातून आलेले प्रकल्प ,प्रोजेक्ट आमच्यावरती लादू  नका. 

आम्ही ज्या परिस्थितीत, ज्या बोलीभाषेच्या वातावरणात अध्यापनाचे काम करतो, तिथल्या अनुभवांप्रमाणे तिथल्या परिस्थितीनुसार आम्हाला आमचे काम प्रामाणिकपणे करण्याचे स्वातंत्र्य द्या.

आमच्या दीर्घ अध्यापनाचा अनुभव आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या पद्धतीने देऊ द्या !

मग पहा ! महाराष्ट्राचं  शैक्षणिक भवितव्य पाहत राहावे असेच उज्वल घडेल असे आवाहन शिक्षक करीत आहेत.  बोलून दाखवत आहेत.



ज्या महाराष्ट्रमद्धे  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी , यामध्ये आचार्य अत्रे ,साने गुरुजी,बाबा आमटे,एन. डी. पाटील,एस. ए. डांगे,एस. एम. जोशी,कृष्णराव धुळप,क्रांतीसिंह नाना पाटील,गणपतराव देशमुख,गोविंदभाई श्रॉफ,जी. डी. (बापू) लाड,दत्ता देशमुख,दत्ता पाटील,दि. बा. पाटील,नागनाथअण्णा नायकवडी,प्रमिला दंडवते,,प्रा. मधु दंडवते,बापू काळदाते,बाबा आढाव,बाळासाहेब देसाई,भाऊसाहेब हिरे,मृणाल गोरे,यशवंतराव मोहिते,यशवंतराव चव्हाण,राजारामबापू पाटील

राम कापसे,राम नाईक,रामभाऊ म्हाळगी,वसंतदादा पाटील,वसंतराव नाईक,शंकरअण्णा धोंडगे,शंकरराव चव्हाण,संतराम पाटील अशा दूरदृष्टीच्या व्यक्तींनी महाराष्ट्राचे उज्वल भविष्य पाहिले .अशांच्या स्वप्नातील भविष्यातील महाराष्ट्र घडावा ! शिक्षण क्षेत्रात क्रांती व्हावी ! सुरु असणारी हेळसांड थांबावी . एवढ्याच माफक अपेक्षा सर्वसामान्यांच्या, शिक्षकांच्या, शिक्षणतज्ञांच्या आहेत !

अशा सर्व शिक्षकांच्या, समाजाच्या आणि सर्वसामान्य पद-दलित, दीन-दलितांच्या मापक अपेक्षा खरोखरच  महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील !

एकूणच ,शिक्षकांना शिकविण्याचा अधिकार आहे, हेच त्यांचे मूळ काम आहे. शिक्षकांना शिकवू द्या! आणि मुलांना शिकू द्या ! कंत्राटीकरण , खासगीकरणाचे धोरण रद्द करा, अन्यथा नवे शिक्षक घडणार नाहीत हे नक्की म्हणता येईल.


- धनाजी माने....✍️


dhanajimane123@gmail.com











Sunday, September 10, 2023

सार्वजनिक गणेशोत्सव

 

नवसाला पावणारा गणपती


।। सार्वजनिक गणेशोत्सव ।।

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना तत्कालीन परिस्थितीनुसार समाजाने एकसंघ व्हावे, संघटित होऊन लोकांमध्ये एकता बाणली जावी हे उद्दिष्ट ठेवले होते. पण त्याचाच आज विसर पडल्याचे दिसत आहे.सार्वजनिक मंडळांचे मंडप रस्तेच्या- रस्ते व्यापू लागताना दिसतात.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानमद्धे गणपती मूर्तींच्या उंचीची सगळीकडे चढाओढ सुरू असताना दिसते.डेकोरेशन, प्रकाशाचा झगमगाट यामध्ये विजेची कोट्यावधी युनिट विनाकारण बरबाद होताना या काळात दिसतात.

महाराष्ट्रातील तसेच भारतातील लाखो खेडी अजूनही अंधारात चाचपडत असताना विद्युत रोषणाईचे अतोनात स्तोम माजलेले दिसत असते. एका बाजूला ऊर्जेची बचत करण्याचे संदेश, तर दुसऱ्या बाजूला चाललेला हा विजेचा अपव्यय  हा विपर्यास सहज डोळ्यांनी दिसतो, समजतो पण......

माणसाच्या मनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी या निमित्ताने घडू नयेत , पण त्याही आज घडताना दिसत आहेत.

श्रद्धाळू भक्तांना भूलवित नवसाला पावणाऱ्या गणपतींचे गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर पेव फुटलेले या गणेशोत्सव काळामध्ये दिसते.

अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळं झगमगाट, देखावे, रोषणाई, ढोलताशे यावर अमाप पैसा उधळताना दिसतात. हे विचार गणेश भक्तांना कडवट वाटत असतील , मनात चिडही निर्माण करतील पण हे सारे वास्तव आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय , अनुभवतो आहे. कडवा तो है , लेकिन सच भी है.....


या साऱ्या घडामोडीमद्धे , काही मंडळे पैशाचा अपव्यय टाळून सामाजिक बांधिलकीचे भान आणि जाण ठेवून ,उल्लेखनीय असे उपक्रम आपल्या मंडळांच्या मार्फत राबवत असतात.काही मंडळे या उत्सव काळामध्ये आपल्या मंडळाच्या श्रीमंतीचे प्रदर्शन न मांडता अनावश्यक, अवास्तव खर्चांना कात्री लावतात. वाचवलेला पैसा समाजाच्या गरजा लक्षात घेऊन यावर खर्च करताना दिसतात , हा आदर्श गल्लोगल्ली स्थापन झालेल्या गणेश मंडळापासून राज्यभर पसरलेल्या मोठमोठ्या गणपती मंडळांनी घ्यायला हवा. जेणेकरून समाजात एक चांगला संदेश जाऊन समाजामध्ये विघातक न घडता विधायक गोष्टी घडत राहतील .

समाजामध्ये असे अनेक गोरगरीब, दीनदलित गरजू उपेक्षित घटक आहेत जे मूलभूत गरजांपासून वंचित आहेत.


देणगी मधून जमा होणारा लाखो कोट्यावधी रुपयाचा निधी अशा उपेक्षित आणि वंचित घटकांच्या अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य, शिक्षण याकडे वळता केला तर देणगीदारांनी खुल्या मनाने दिलदारपणे दिलेली देणगी सत्कारणी लागेल आणि समाजातील एक -एक विघ्न दूर होऊन ' गणपती बाप्पाला ' आणि ' समाजालाही आनंद होईल !देणगीदारांची मंडळाला झालेली मदत सत्कारणी लागल्याचं समाधान लाभेल.


आज पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत , अशा वेळी मंडळाचे कार्यकर्ते , गणेश भक्त एकत्र जमत असतात अशा वेळी पर्यावरणाबाबत जाणीव जागृती करता येईल.आज झाडे लावणे ,जगवणे हे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी काळाची गरज आहे , यासाठी काय - काय करता येईल? यावरती चर्चा होऊन योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत !


 आणि या आदर्शवत उपक्रमामुळे देणगीदार न मागताच पुढील वर्षी मोठ्या मनाने आणखी देणगीत भर देऊन मंडळांना मदत करतील.

या उत्सवाच्या निमित्ताने मंडळांच्याकडे जमा होणाऱ्या लाखो रुपयांतून आपणाला काय करता येईल व काय टाळता येईल याचे प्रत्येकाने भान ठेवले तर खरोखरच समाजामध्ये चांगल्या घटना या उत्सवाच्या निमित्ताने घडत राहतील.


💥 काय टाळता येईल आणि काय करता येईल......✍️

▪️पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींचा वापर देखाव्यांत टाळता येईल.

▪️बाप्पाची मुर्तीची उंची मर्यादित ठेवता येईल , जेणेकरून यातून निर्माण होणाऱ्या  विसर्जनाच्या वेळच्या पुढील अनेक समस्या टाळल्या जातील.

▪️अवाढव्य मूर्तीची विसर्जनानंतर जी विटंबना होते ती टाळता येईल.

▪️रस्त्यांची आधीच अवस्था बिकट असताना, मंडपासाठी खणलेले खड्डे भर घालणार नाहीत किंवा यानिमित्ताने पर्यायी व्यवस्था यावर संशोधन आणि उपयोजन करता येईल.

▪️वर्गणी गोळा करताना दमदाटीपेक्षा ,ऐच्छिकतेवर भर देता येईल.

▪️मंडळांच्या दरवर्षीच्या हिशोबांत पारदर्शकता आणता येईल.

▪️अवैध वीज जोडणी टाळून , सुरक्षित आणि नियमाने वीज जोडणी करता येईल. 

▪️दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कार्यकर्त्याकडून धक्काबुकी होऊ नये! यासाठी उत्सव काळामध्ये कार्यकर्त्यांना ठराविक दिवशी ड्युटी देऊन रांगेचे नियोजन करता येईल.

▪️ खेडेगावातील अनेक शाळा अनेक सुविधांपासून वंचित आहेत अशा शाळांना मंडळाकडे जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीतून सुविधा पुरवता येतील.

▪️ समाजामध्ये असणाऱ्या अनेक दिव्यांग घटकांना विविध साधनांसाठी मंडळांच्याकडून निधी देता येईल.

▪️ परिस्थितीमुळे शिकू न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मंडळांच्या मार्फत दत्तक घेता येईल.

▪️ अनेक गोरगरीब गरजू घटकांच्या शस्त्रक्रिया असतात या शस्त्रक्रियांसाठी मदत देता येईल.

▪️ अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष निघून गेलेले असल्याने निराधार झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करून आधार देता येईल.

▪️ पोलिसांच्याकडून व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करता येईल.

▪️ गणरायाच्या समोर भक्तिमय वातावरणातील गीते मोटिवेशन स्पीच , पोवाडे असे, ऐकणाऱ्या भक्तांच्या कानाला सुमधुर वाटेल असे संगीत असावे धाबडधिंगा टाळता येईल.

▪️ डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज टाळून ध्वनी प्रदूषण यावर आळा घालता येईल.

▪️ गणेश विसर्जनाच्या वेळीही भक्तीमय वातावरण कसे राहील याचे भान ठेवता येईल. गुलाल ,फक्की व इतर रंगीबेरंगी शरीरास घातक रसायनांचा वापर कमी करता येईल.टाळता येईल।


एकूणच या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येतील.व अनेक चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी टाळता येतील फक्त  प्रत्येकाने आपली मानसिकता बदलायला हवी, विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचे आदर्श घ्यायला हवेत व तसे आदर्श अमलात आणायला हवेत तरच हे शक्य आहे. 

गणरायासमोर नतमस्तक होऊन विनम्रतेने अशी मानसिकता प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केली तर अशक्यही काहीच नाही. 


आणि यातूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा गणेश उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल.महाराष्ट्रातील गाव खेड्यांपासून मोठ्या शहरापर्यंत पसरलेल्या सर्व मंडळांच्या समोर निर्भेळ, निकोप आणि श्रद्धेने पावन झालेले वातावरण प्रत्येक मंडळांतून अनुभवास येवो !हीच गणराया चरणी विनम्र प्रार्थना !

एकूणच जे वाटल , ते व्यक्त केलं.पटल तर बघा , नाहीतर सोडून द्या !

- धनाजी माने......✍️




जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत

 ===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...