Wednesday, August 09, 2023

बापमाणूस...

 


बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


बाप माझा शेतामध्ये राबराब राबायचा ,

उन्ह-पावसात ,थंडी -वाऱ्यात....

तो  सार  सोसायचा.

फाटक्या संसाराला ठिगळ लावण्यात,

तो सारा खपायचा.

दु:ख सार उरात दाबून, हसत-हसत

सार काही आमच्यासाठी  करायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


वर- वर तो नेहमी हसत दिसायचा ,

आत मात्र गरीबीने पुरा फाटलेला असायचा.

लागलं काही संसाराला , लगेच आणून दयायचा

एक-दोन घास स्वतः कमी खायचा,

आम्हाला मात्र तो, पोटभरुन  द्यायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


सणासुदीला गोड-धोड , कमी पडू नाही द्यायचा.

दिवाळी असो वा पाडवा , कपडे तो साऱ्यांना आणायचा.

स्वतःच  मात्र फाटक दंडक, तो तसाच झाकून ठेवायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


आईसाठी कवितेच्या ,कविंच्या मैफली व्हायच्या .

आई दुधावरची साय असते.वासराची गाय असते ,

साहित्यात आईचाच प्रभाव अधिक असायचा.

ढालीसारखे वार झेलणारा ,

सुपाएवढ्या काळजाचा

बाप माझा , तिथही दुर्मिळच असायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


- धनाजी माने....✍️

dhanajimane.blogspot.com


Sunday, August 06, 2023

राजं परतं तुम्हाला याव लागणारं.....


 


राजं परत तुम्हाला याव लागणार,

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुम्ही  रयतेचं राजे होता ,
सारा कसा आनंदी आनंद होता,
राजे जरी असला तुम्ही
जनतेत मनापासून मिसळत होता.

आता असे काही उरले नाही .
नवे नेते ,नवे कायदे आले तरी.
रयतं काही सुखी झालीच नाही.
म्हणूनच.......                           

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुम्ही कशी सगळ्यांची ,
मोठ बांधली होती.
अठरा पगड जातीची माणसं कशी ,
गुण्यागोविंदाने राहत होती.

आता राज इथं अस घडत नाही,
जाती-जातीत  धर्मा-धर्मात,कलह सुरु आहेत.
तसे घरा-घरात , गल्ली- बोळात तेढ सुरु आहे.
गटा-गटाने आणि वार्ड कमेटीने ही जंग चालू आहे.
म्हणून.....

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुमच्या सोबत तेव्हा ,
जीवाभावाचे एकनिष्ठ मावळे होते.
जीवाची बाजी लावणारे ,बाजी होते.
रयतेच्या सुखासाठी प्राणाचे बलिदान देत होते.

आता राज इथ अस काही उरल नाही.
विश्वासू , निष्ठावानांची वानवा आहे.
इकडून- तिकडे पळणारांची आणि पळवणारांची
स्पर्धा इथे सुरु आहे.
म्हणून......

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

राज तुमच्या काळात ,लगेच न्याय मिळायचा.
आया-बहिनीनकडे वाकडी नजर करणारांचा,
आणि भ्रष्टाचाऱ्यांचा  तुम्ही कडेलोट करायचा.

राज  जनतेला आता न्यायासाठी,
वर्षानुवर्षे लढाव लागतयं.
रोज नव्या गुन्ह्यांचे आणि भ्रष्टाचाराचे,
पेव इथ फुटलयं, मन कस खिन्न झालयं !
म्हणूनच म्हणतोयं , हात जोडून विनवणी करतोयं......

राजं परत तुम्हाला याव लागतयं..
राजं परत तुम्हाला याव लागतयं...
राजं परत तुम्हाला याव लागतयं.......

- धनाजी माने....✍️
dhanajimane.blogspot.com


Saturday, June 17, 2023

१५ जून २३ रोजी राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शाळेत आला नाही.❓












 १५ जून २३ रोजी राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये  एकही विद्यार्थी  शाळेत आला नाही.❓


शालेय जीवनातच शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज असते कारण त्याच्याच जोरावर आयुष्यात यशस्वी होता येते.आणि हा पाया भक्कम होणेसाठी त्याची सुरुवात  प्राथमिक शिक्षणापासूनच  करावी लागते.


आज अनेक ठिकाणी हे चित्र भयावह आहे विशेष करून सरकारी शाळांचे .आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सरकारी शाळांची अवस्था ही खूपच निराशाजनक आहे .ना इमारती , ना इतर सुविधा.तर काही ठिकाणी हेच चित्र खूपच आशादायी आहे.आणि प्रेरणादायी आहे.


हे विरोधाभास असणारे महाराष्ट्रातील चित्र प्रसिद्ध माध्यमातून होणाऱ्या प्रसिद्ध बातम्यांनवरून दिसत आहे.याला नेमके कारणीभूत  कोण आहे ❓

शिक्षक, पालक, विद्यार्थी, यंत्रणा की अन्य काही समस्या ! हे आज वेळीच पाहण्याची खूप गरज असून हे वेळीच सावरले नाही तर , जे  उद्याचे देशाचं भवितव्य  आहे अशा अनेक  पिढ्या  बरबाद होतील हे मात्र निश्चित.


मध्यंतरी सर्व राज्यभर महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी अनेक वेळा विविध समस्यांबाबत मोर्चे काढले यामध्ये मुख्य मागणी होती "आम्हाला फक्त शिकू द्या ! " यामध्ये शिक्षकांच्या वरती अशैक्षणिक कामांचा बोजा किती आहे याची सविस्तर यादीच विविध संघटनांनी शासनासमोर मांडली होती.(११७ प्रकारची अशैक्षणिक कामे )

 व एकच मागणी होती की-

 ' आमच्यासमोर विद्यार्थी विद्यार्थ्यांसमोर आम्ही '

 ' आमच्या हातात खडू आणि आमच्या समोर फळा आणि मुले ' 

हेच चित्र शालेय वेळेत  दिसावे.अध्ययन-अध्यापनाची क्रिया कोणतेही अडथळे न आणता घडावी .एवढी माफक अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. आणि ती रास्तच आहे.


 अध्ययन अध्यापनाच्या काळात - 

' ना ऑनलाईन मीटिंग असावी ,ना 

 ' ही लिंक भरा ती लिंक भरा '

 'ही माहिती द्या, ती माहिती द्या '

अशी कोणतीही काम किंवा अन्य अशैक्षणिक कामे -

बी.एल.ओ, इतर सर्वे ,इतर खात्यांचे विविध उपक्रम, त्याचे समारंभ, फोटो या साईट वरती अपलोड करा त्या साइट वरती अपलोड करा. असं कोणतंही काम शिक्षकांना न देता फक्त अध्ययन आणि अध्यापन हीच क्रिया शालेय वेळेत घडावी असा उहापोह या मागण्यांनमद्धे होता.आणि खरोखरच ही सर्व शिक्षकांची मागणी रास्तच होती. याचा  साकल्याने विचार संबंधित यंत्रणांनी करायला हवा होता व व तसे बदल करून शिक्षकांना फक्त वर्षभर अध्ययन अध्यापनात गुंतवण्यासाठी आणि गुंतण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते परंतु तसे चित्र आजही दिसत नाही.त्याचेच परिणाम आज दिसू लागले आहेत.


त्यातच गावोगावी स्थानिक लोकांच्या खाजगी शाळा व त्यामुळे सरकारी शाळांवरती होणारा परिणाम याचा कोणीच विचार करत नाही गावोगावी सरकारी शाळा सोडून इतर शाळांचेही पेव फुटले आहे. आणि यामुळे पटाला मर्यादा येत असल्याने  व स्थानिक खाजगी संस्थाचालकांचे वर्चस्व असल्याने अनेक ठिकाणी सरकारी शाळा दर्जा असूनही पटाविना शाळा डबघाईला आल्या आहेत. याचाही विचार कोणी करत नाही यासाठी निश्चित असं धोरण वरिष्ठ पातळीवरून व्हायला हवे अशीही शिक्षकांच्यातून मागणी जोर धरत आहे.


१५ जून २०२३ पासून राज्यभर नवीन शैक्षणिक वर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पण....

राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये  एकही विद्यार्थी  शाळेत आला नाही. कारण या सर्व शाळा शून्य पटावर आल्या  तर  तब्बल ७००० ( सात हजार) शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १०  आहे. हे वास्तव भयाण चित्र शासनाच्या यु-डायस प्लस अहवालातून  समोर आले आहे. एकीकडे राज्यभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे मात्र शाळांच्या विद्यार्थीसंख्येचे  हे भयाण चित्र समोर आले आहे.हे चित्र बदलले गेले नाही तर अनेक पिढ्यांचे , गरीबांचे  जीवन शिक्षणाविना अंधकारमय होऊन जाईल.या शाळा कायमस्वरूपी बंद पडल्या तर गोरगरिबांंना शिक्षणाला मुकावे लागेल. गावागावातील विशेष करून छोट्या गावातील वाड्या- वस्त्यावरील शाळा बंद पडल्या तर गोरगरिबांची मुलं शिकणार कुठे ?त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार कशी? त्या गोरगरीब मुलांचे पालक आपल्या रोजी रोटीचा प्रश्न संपवून आपली मुलं दुसऱ्या गावात घालण्याइतपत त्यांची परिस्थिती असेल का ?

असे अनेक प्रश्न आवासून पुढे उभे राहतात.


पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरू होते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. 


महाराष्ट्र शासनाने १० मे २०१० रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्राथमिक शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारांत केल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने २७ ऑगस्ट २००९ च्या राजपत्रात ‘राइट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अ‍ॅण्ड कम्पल्सरी एज्युकेशन अ‍ॅक्ट, २००९’ प्रसिद्ध केला आहे. त्यात ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू आणि काश्मीर वगळता) लागू केल्याचे नमूद केले आहे. या कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटांतील सर्व बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनावर आली आहे.


बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे.


असे असले तरी, आज राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात शेकडो शिक्षकांची पद गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भरलीच नाहीत. त्यामुळे राज्यातील रिक्त पदांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे.त्यामुळे आहे त्या शिक्षकांच्या वरती इतर वर्गांचा ताण व त्यामुळे अध्ययन अध्यापनामध्ये घडत असणाऱ्या प्रक्रिया यावर त्याचा परिणाम वर्षानुवर्ष होत आहे. आणि याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगती वरती ही दिसून येत आहे.

आज राज्यांमधील जिल्हा निहाय शिक्षकांच्या रिक्त पदांची आकडेवारी पाहिली तर खूपच भयावह आहे.




📌जिल्हानिहाय रिक्त जागा (मराठी व उर्दूसह)   

कोल्हापूर - ९९०,नागपूर - ७७०,नांदेड - ७८८,नंदूरबार - ३७७,नाशिक - ५३४,पालघर - १९७३,यवतमाळ - १३७५,परभणी - ३९१,पुणे - १७०,रायगड - ११६५,रत्नागिरी - ९३२,सांगली - ७०१,सातारा - १०२८,सिंधुदुर्ग - ६०२,सोलापूर - ४८४,ठाणे - ५७७,वर्धा - २१५,वाशीम - १७३,

नगर - ३४९, अकोला - ३४९, अमरावती - ३२४,छत्रपती संभाजीनगर - ६६५,बीड - ४८६,भंडारा - ३०८,बुलडाणा- २४९,चंद्रपूर- २०४,धुळे - ३४८,गडचिरोली - २६५,गोंदिया - २९१,हिंगोली - ८७,जळगाव - ५६०,जालना - २३४,

अशी एकूण जवळजवळ १८, ०४९ (अठरा हजार चे वर) शिक्षक पद रिक्त आहेत.


राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु होत नसल्याचे दिसून आले आहे.


राज्यातील केवळ प्राथमिक शिक्षकांच्याच नव्हे तर, शिक्षण विभागातील अगदी वरिष्ठ पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंतच्या हजारो जागा रिक्त आहेत. मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी,ग.शि.,शिक्षणाधिकारी,सचिव या पदापर्यंत ही साखळी जाऊन पोहचते.अशा  या रिक्त पदानमुळेच शिक्षण विभाग अगदी खिळखिळा झाला आहे. त्यातच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांकडे ११७ प्रकारची अशैक्षणिक कामे सोपविण्यात आलेली आहेत. या बाबी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठा अडथळा ठरु लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील केवळ शिक्षकच नव्हे तर, सर्व प्रकारच्या रिक्त जागा त्वरित भरणे गरजेचे आहे.


एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या जागा भरल्याच जाणार नसतील तर, राज्याची शैक्षणिक प्रगती कशी साधणार, असा प्रश्न अनेक शिक्षक तज्ज्ञ ,विविध संघटना व्यक्त करीत आहेत.


एकूणच देशाचे भविष्य या चार भिंतीच्या आत घडते .ती यंत्रणा अतिशय निकोप आणि कोणत्याही अडथळ्या विना चालायला हवी .याच्यामध्ये कुठेही बाधा येईल असं एकाही पातळीवरती काम घडायला नको ,तरच ….. देशाचे भवितव्य असणारी तरुण पिढी योग्य शिक्षण योग्य वेळेत मिळून ही पिढी सावरली जाईल हे नक्की !


  • धनाजी माने ✍️




Tuesday, June 06, 2023

केंद्रप्रमुख विभागीय भरती २०२३

 



( वाचा आणि आपल्या शिक्षक बंधू- भगिनींना माहितीसाठी पुढे जरुर पाठवा ! जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक सहभागी होऊन यामद्धे यशस्वी होतील , सर्वांना हार्दिक शुभेच्छा !💐 )

🥁 केंद्रप्रमुख विभागीय भरती २०२३ 📢

📰 केंद्रप्रमुख २३८४पदांची जाहिरात प्रसिद्ध !

📩 अर्ज करण्याची मुदत (ONLINE )दि. ६ जून  ते १५ जून २०२३ या कालावधीत अर्ज करता येतील.

📣 स्पर्धा परीक्षा २०२३ या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात .

📄 शिक्षकांना १५ जून २०२३ पर्यंत अर्ज करता येणार ;

📝 परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार.
👩‍🏫 महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना २३८४  रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित आयोजन करण्यात आले आहे.
📌 परीक्षा माहिती लिंक - www.mscepune.in
   📌अर्ज लिंक-https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
      

📌परीक्षा शुल्क- 

🚻सर्व संवर्गातील उमेदवार - ९५० रुपये

 ♿दिव्यांग उमेदवार - ८५० रुपये
     

 📚 पदासाठी अर्हता ⤵️

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.A/B.Com / B.Sc ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक .आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

📌 वेतनश्रेणी : ९,३०० - ३४,८००
ग्रेड पे - ४४००
📌परीक्षा - एकूण २०० वस्तुनिष्ठ प्रश्न २०० गुणांसाठी असणार.
📚 पेपर १- १०० प्रश्न १०० गुण


📚 पेपर २ - १०० प्रश्न १०० गुण
  

🥇पेपर १-  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक या घटकांतर्गत ⤵️

गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी,इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन.  या घटकांचा समावेश.

📌 तयारीसाठी पुढील पुस्तके📚 अत्यंत उपयुक्त ठरतील - शालेय ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके,
केंद्रप्रमुख पेपर २ व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न - स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स,शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(नववी आवृत्ती)
शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप ,शिक्षणातील नवविचारप्रवाह - डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन,शालेय आशयज्ञान
केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती) ,केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती),संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती),शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती),शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते,शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह ,भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी ,शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती,माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध,अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचारवंत व विचार इत्यादी ,माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध ,
वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान ,संप्रेषण कौशल्य ,केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (तिसरी आवृत्ती)

- धनाजी माने.....✍️

(अधिकृत अधिक माहिसाठी  शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या शासननिर्णय ,परिपत्रक यांचा आधार घ्यावा .)




     


Monday, May 15, 2023

शिक्षकांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी शासनाने संधी उपलब्ध करुन दिली आहे

 








डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व लक्षात घेऊन

राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना ,१० कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी.

राज्यशासनाने ११ मे २०२३ रोजी शासन निर्णय काढून शिक्षकांना हि संधी उपलब्ध करुन दिली आहे.

📌 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५१११८४८३०४३२१ असा आहे. 


शिक्षकांची इ- साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी, यासाठी राज्य शासनाने ही कोट्यवधी  रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत.


प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. यातील उत्कृष्ट शिक्षकांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवांकीत करण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धक यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुली स्पर्धा आयोजित केली आहे.


तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले इ -साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


🎼🎶🎞️ स्पर्धेसाठी गट📺🎬


पहिला गट

१ली ते २ री

दूसरा गट

३ री ते ५ वी

तिसरा गट

६ वी ते ८ वी

चौथा गट

६ वी ते ८ वी

पाचवा गट

११ वी व १२ वी

सहावा गट

अध्यापक विद्यालय


📌 यासाठी ……समित्यांची रचना केली आहे

तालुका स्तरावरील निवड समिती

जिल्हा स्तरावरील निवड समिती

राज्य स्तरावरील निवड समिती अशी विभागवार समित्यांची रचना केली आहे


🏆 बक्षिसे 🏆

तालुकास्तरीय ,जिल्हास्तरीय ,राज्यस्तरीय

खालीलप्रमाणे असणार आहेत 🏆


तालुकास्तरीय

🥇प्रथम पुरस्कार- ५ हजार रोख व प्रमाणपत्र

🥈द्वितीय पुरस्कार- ४ हजार रोख व प्रमाणपत्र

🥉तृतीय पुरस्कार- ३ हजार रोख व प्रमाणपत्र

जिल्हास्तरीय

🥇प्रथम पुरस्कार- १० हजार रोख व प्रमाणपत्र

🥈द्वितीय पुरस्कार- ९ हजार रोख व प्रमाणपत्र

🥉तृतीय पुरस्कार- ८ हजार रोख व प्रमाणपत्र

राज्यस्तरीय

🥇प्रथम पुरस्कार- ५० हजार रोख व प्रमाणपत्र

🥈द्वितीय पुरस्कार- ४० हजार रोख व प्रमाणपत्र

🥉तृतीय पुरस्कार- ३० हजार रोख व प्रमाणपत्र


📌निकष

स्पष्टपणा (Simplicity),गरजाधीष्ठितपणा (Relevance),परिणाम (Impact),नाविण्यता (Creativity),समन्वय (Engagement),उपयोगिता (Reusability),चित्रफित दर्जा (Video Quality)

✍️ या निकषांवर १०० गणांचे गुणदान होणार आहे.


📌🎞️ उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष-

व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा.लिंग समभाव, शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आशय असावा.व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल. आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह- अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.


📌 🎬 व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी -

शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे. वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक

व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा.व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.

व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची, व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी, उल्लेख नसावा.व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे.व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त (Creative Commons असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील.


🕙प्रस्तुत पुरस्कार दरवर्षी खालीलप्रमाणे कालावधीत आयोजित करुन देण्यात येतील 🕙 📌जाहिरात प्रसिद्धी -मे 📌ऑनलाईन नामांकन नोंदणी -जून 📌तालुका व जिल्हास्तर निवड समितीमार्फत पडताळणी व पुढील टप्प्यासाठी उत्कृष्ट उमेदवारांची शिफारस - जुलै 📌राज्यस्तर निवड समितीमार्फत पडताळणी व अंतिम उत्कृष्ट उमेदवारांची शासनास शिफारस -ऑगस्ट 📌पुरस्कार वितरण समारंभ - सप्टेंबर


🙏 सविस्तर माहितीसाठी -

 शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतांक २०२३०५१११८४८३०४३२१ हा पहावा.


  • धनाजी माने…..✍️

          



राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !

  "राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )" =============================== 🙏भावप...