( हल्ली माणसाचे आणि निसर्गाचे नाते हळूहळू संपत चालले आहे की काय असे वाटते. निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यातील वीण विरळ होत आहे .हीच व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न .या कवितेत आंब्याचे झाड ,निसर्गाचे प्रतिनिधित्व करत आहे .....)
🌿 नाते निसर्गाशी.....🌿
सुट्टी दिवशी असाच शेतात गेलो असता,
कुठून तरी आवाज आला,
हल्ली कुठे असतोस रे , माझ्या मित्रा ?
मी थोडा दचकलो ,कावरा बावरा झालो.
आवाजाच्या दिशेने चार पावले चाललो.
कोणीच कुठे दिसेना , म्हणून थोडा थबकलो.
पुन्हा तोच आवाज कानावरती धडकला,
लहानपणी मी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो,
त्या आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ थांबल़ो.
बरोबर ओळखलस ,लहान होतास तेव्हा रोज भेटायचासं.
हल्ली इतका कशात रे हरवून गेला आहेस ?
मला प्रश्न त्याने केला.
मी म्हटलं मित्रा संसाराच्या गुंत्यात ,
मी पुरा हरवून गेलोय , तुलाच मी आता विसरुन गेलोय
नोकरी,बायको,मुले,गाडी ,बंगला...
यादी खूप मोठी आहे,न संपणारी ही लिस्ट आहे.
वेळच मिळत नाही रे , तुझ्या जवळ यायला
लहानपणी खेळलो ,तसे खेळ खेळायला.
लहानपणीचे ते दिवस खरचं मंतरलेले होते.
तुझ्याजवळ खेळताना आनंदाचे भरते येत होते.
आता आनंदच हरवलाय रे......
या साऱ्या गुंत्यात मी पुरा गुंतून गेलोय.
तो म्हटला , अस नको करू मित्रा ,
मलाही थोडा वेळ देत जा.
पुर्वीसारखाच आताही सोबत रहात जा,
आनंद मिळेल तुलाही आणि मलाही.....
- धनाजी माने....✍️
.jpeg)
1 comment:
♥️♥️♥️♥️
Post a Comment