Sunday, February 25, 2024

पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे

 




'पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे


धनाजी माने दि.२६  - मार्च महिना आला की या परिसरातील लोकांना आठवण होते ती येडेनिपाणीच्या ' पद्मविभूषण वसंत व्याख्यानमालेची '...

मार्च महिन्याच्या सुरुवातीला येडेनिपाणी (ता.वाळवा) या पी.सावळाराम यांच्या नगरीत  आसमंतात एक सुखद गारवा भरून राहिलेला असतो. अशा या उल्हासित वातावरणात येडेनिपाणी येथील संस्कार मंदिराजवळील बाजारपेठेचे मैदान दि.१ मार्च ते ५ मार्च, सायंकाळी ७ ते रात्री ९ श्रोत्यांच्या उपस्थितीने फुलून गेलेले असते. पाच दिवस श्रवणभक्तीची आस असलेले या परिसरातील श्रोते ज्ञानरसांच्या तुषारात अक्षरशः न्हाऊन निघतात. 

येडेनिपाणी येथील जय किसान तरुण मंडळाची ‘पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला’ म्हणजे गेली ३५ वर्ष अविरतपणे चाललेला एक ज्ञानयज्ञ.जवळ जवळ तीसऱ्या तपाच्या अंतिम टप्प्यात असणारी ही व्याख्यानमाला १ मार्च पासून सुरु होते आहे.

 या ज्ञानयज्ञातून या गावातील ,परिसरातील अनेक पिढ्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाल्या. अक्षय विचारांचे समृद्ध धन मुक्तपणे या व्यासपीठाद्वारे समाजात संक्रमित झाले. विविध विषयातील अभ्यासकांनी श्रोत्यांचं अवघं विचारविश्व ढवळून काढलं. श्रवणभक्तीतील तल्लीनता काय असते याची प्रचिती या व्याख्यानमालेस उपस्थित राहिल्यावरच अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांनी आपल्या ज्ञानाचे भांडार येथे रिते केले. व्याख्यानमालेने आपल्या या दीर्घ प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः घडवले आहे. आजच्या बदलत्या अभिरूचीच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरु ठेवणं हे देखील एक आव्हान आहे. आणि हे शक्य झालं आहे ते मंडळाच्या निस्पृह कार्यकर्त्यांमुळे.

जय किसान मंडळाचे संस्थापक माननीय आनंदराव पाटील (काका)अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक स्वामी, संयोजक शंकर पाटील ,सचिव कालिदास पाटील ,सहसंयोजक प्रा.स्वप्निल पाटील यांच्याबरोबरच या व्याख्यानमालेसाठी बाळकृष्ण पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद माळी, कविता पाटील, जयश्री पाटील ,हिंदुराव रसाळ ,शरद घाडगे, मयूर थोरात, अरुण पाटील, विद्याराणी शेवाळे ,विजय पाटील, नंदकुमार बनसोडे ,जयसिंग पाटील ,कुंडलिक कोळी, अर्जुन थोरात, धोंडीराम पाटील ,दिनकर पाटील, सतीश पाटील ,शंकर गोपाळ पाटील, सतीश कांबळे, प्रा.संजय थोरात हे सर्वजण निस्पृह भावनेने हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू राहावा या प्रामाणिक भावनेने यासाठी झटत असतात.

संस्थापक आनंदराव पाटील ( काका) व प्रा.डॉ. दीपक स्वामी यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या  वटवृक्षाला असाच बहर येत राहो याच साऱ्या शुभेच्छा !

♨️ ३५ व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन -

१ मार्च रोजी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील-साखराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

♨️ २०२४-या वर्षीचे व्याख्यानमालेतील वक्ते आणि विषय ⤵️

,🎤 १ मार्च -इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके इस्लामपूर यांचे 'असे होते शिवशंभू संभाजीराजे' 

 🎤 २ मार्च- 'संस्कार : काळाची गरज' या विषयावर प्रा. डॉ. शोभा लोहार (सातारा) 

 🎤 ३ मार्च-  'घराचे घरपण... गावाचं गावपण टिकवूया' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे ( सोलापूर)

🎤  ४ मार्च - 'कविता नात्या-गोत्याच्या' अरुण पवार (परळी वैजनाथ) 

🎤 दि. ५ मार्च - 'लोकशाहीच्या प्रवासाची दिशा व सद्य:स्थिती' या विषयावर विधी तज्ज्ञ व संविधान विश्लेषक असीम सरोदे (पुणे) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.

वेळ - दररोज सायंकाळी -७ वा.

💢  ठिकाण - संस्कार मंदिरा जवळील मैदान , येडेनिपाणी


- धनाजी माने....✍️



 

आगळा वेगळा लग्नसोहळा....

 


शिवविवाह सोहळा ...मोरे -कारंडे कुटूंबियांचा.....

छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या जयघोषात रविवारी एक विवाह सोहळा पार पडला

 ' शिवविवाह सोहळा 'जो मी आयुष्यात या भागातील हा लग्नसोहळा पहिल्यांदाच अनुभवला आणि उपस्थित असणाऱ्या या परिसरातील लोकांनाही हा असा विवाह सोहळा पाहिल्यांदाच  पाहण्याचा दुर्मिळ योग आला असावा.

आपण आजपर्यंत जे अनेक विवाह सोहळे पाहिले ते विविध कर्मकांडामद्धे अडकलेले विवाह सोहळे पाहिले.

 यामध्ये  अंगावर हळद लावणे / ओतणे , अक्षताच्या नावाखाली वधू- वरांवरती अक्षता टाकणे भटजीला  तांदूळ मारणे . विषारी फोमचे स्प्रे मारणे .पारंपरिक मंगलाष्टका म्हणने ,होम हवन ,सप्तपदी अशा वातावरणात पार पडणारे विवाह आजपर्यंतआपण पाहिले,आणि पाहत आलो आहोत.

पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन , एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा ,चांगल्या संस्काराचे समाजात रोपन करणारा एक आगळावेगळा ' शिवविवाह सोहळा ' याची देही याची डोळा मी या परिसरात आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.

पुणे-बेंगलोर हायवे जवळील इंदिरा पॅलेस या ठिकाणी  त्याचे साक्षीदार होता आले. 

खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा आनंद सोहळा असे त्या विवाहाचे स्वरूप होते. त्यामध्ये पारंपरिक काव्याक्षता नव्हत्या की वधु-वरावरती अक्षता टाकने नव्हते.पारंपरिक मंगलाष्टका म्हणने नव्हते. तर...

शिवविवाह पद्धतीच्या रचलेल्या आणि विवाहाचा त्यातील बंधनांचा अर्थ सांगणाऱ्या काव्याक्षता होत्या. 

व्यासपीठावरुन आपण ज्यांचा इतिहास सांगतो , वैचारिक वारसा सांगतो त्या  जिजाऊमाता ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. 

निमित्त होत शिवश्री इंजिनिअर  विक्रांत व शिवमती इंजिनिअर सोनल यांच्या विवाह सोहळ्याचे.

हा विवाह सोहळा होता ,या परिसरातील अभियंते महेश मोरे यांच्या मुलाचा तर उद्योजक जयंत मोरे यांच्या पुतण्याचा हा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथील कारंडे कुटुंबातील वधु सोनल यांच्याशी पार पडला.

आदरणीय स्व.संपतराव मोरे व आदरणीय माई या प्राथमिक शिक्षक दांपत्यांच्या पोटी ... वर पिता महेश मोरे यांचा जन्म, त्यांच्या संस्काराची शिदोरी ते आजपर्यंत जपत आले आणि त्या संस्कारांच्या जडणघडणीतून घडलेल्या संस्काराचे संस्कारक्षम फलित म्हणजे हा विवाह सोहळा होता असेच म्हणावे लागेल !

या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होताना एक वेगळाच आनंद देणारा अनुभव येत होता. क्षणाक्षणाला घडणाऱ्या विवाह सोहळ्यातील प्रसंगाने, उपस्थितांच्या मनावर विधायक संस्कारांची पेरणी होत होती.

 तुतारीच्या रोमांचकारी वाद्यांच्या गजरात राजमाता जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नव वधूवरांनी हार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या नवाचा  जयघोष झाला ! .....चैतन्याचा, आनंदाला भरते आनणारा  सोहळा या पहिल्याच प्रसंगाने सुरु झाला.

' जिजाऊ माऊली घे...  ही तुला वंदना....जय जय जिजाऊ ......च्या स्वरात जिजाऊ वंदना पार पडली.

इतिहासातील या महान व्यंक्तिच्या मानवंदनेनंतर....

ज्यांनी या वधू-वरांना इथपर्यंत पोहचवण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले ,संस्कारीत केले त्या कुटुंबातील व्यक्तीचा सन्मान केला गेला.

प्रथम मान मुलीकडच्या नातेवाईकांना देण्यात आला.मुलीचे आजी -आजोबा, आई -वडिल चुलते - चुलती ,भाऊ, बहिण दाजी यानंतर

मुलाचे आजी -आजोबा, आई -वडिल, चुलते - चुलती भाऊ, बहिण दाजी या सर्वांची ओळख उपस्थित हजारो समुदायाला करुन दिली.पुष्प गुच्छ देऊन नातेवाईक यांचा सत्कार करण्यात आला.

वधू- वर सोनल - विक्रांत यांनी वृक्षाला, तुळशी मातेला पाणी घातले , ज्या निसर्गाने आपले पालन पोषण केले त्याचे जणू ऋणच या प्रसंगातून व्यक्त केले.

यानंतर .....।

वधू -वर यांनी एकदुसऱ्याला हार घालत ते विवाहबंधनात बंधित झाले.तसे तुतारींचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.....

वधू- वरांनी उपस्थितांच्या साक्षीने एक दुसऱ्याचा स्वइच्छेने स्वीकार केल्याची व आयुष्याच्या एखाद्या वळणावर मतभेद झाले तर ते समंजसपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करु व यातूनही नाहीच मिटले मतभेद तर परस्परांशी कसलीही बाधा येणार नाही याची काळजी घेत बाजूला होऊ अशी सर्वांच्या साक्षीने जाहीर शपथ घेतली.... वराने - वधूला मंगळसूत्र घातले.....

आणि शिवसप्तकाला सुरुवात झाली.....

' वंदा...जिजाऊ ,शहाजी या महान व्यक्तींची जरित्रे जपा ....शिवमंगल सत्यध्यान .....(टाळ्या)

या सप्तकाच्या माध्यमातून

सासू -सासरे ,काका ,ननंद ,भावजय ही नाती जपण्याचा...सामाजिकभान ,कर्तव्य करताना चुकू नये.विद्या घेताना विज्ञान व खेळ हेही जपा.व्यसनाधीन होऊ नका.शिवाजींचा आदर्श जपून कर्तृत्व करा....दोघांची हृदये प्रसन्न ठेवा....असे संदेश दिले.

झाले शिवमंगलम्  या वाक्याने शिवसप्तक संपले .......टाळ्या झाल्या

वधू व वरांना शिवविवाह दाखला देण्यात आला व वाचन करण्यात आले .......

शिवधर्मपीठ, मातृतीर्थ, सिंदखेड राजा

|| शिवविवाह दाखला ।।

शिवमती सोनल.......आणि शिवश्री विक्रांत यांचा

|| शिवविवाह ।।

शिवशक ३५० रविवार दि. २५/०२/२०१४ रोजी इंदिरा पॅलेस पुणे-बेंगलोर हायवे, वाघवाडी फाटा येथे संपन्न झाला. दाखल्यावरती नव वधु - वरांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि हा आगळा - वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.

एकूणच खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा आनंद सोहळा , अगदी शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अशा या मोरे-कारंडे यांच्या विवाह सोहळ्यातून अनेक चांगले संदेश समाजापर्यंत जातील हे नक्की !

धन्यवाद मोरे आणि कारंडे कुटुंबीयांना त्यांनी अशा विधायक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचा योग आनला !

- धनाजी माने......✍️

Saturday, February 24, 2024

माठ आणि माठातील थंडगार पाणी....


 

🌿माठ आणि माठातील थंडगार पाणी -

पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी मातीची भांडी वापरली जायची. तवा, कढई अशी भांडी जेवण बनवण्यासाठी तर रांजण , माठ, अशी भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जायची.

उन्हाळा सुरू झाला की, लोक आपल राहतं घर आणि पिण्याचं पाणी कसं थंड ठेवता येईल याचा खूप विचार  करतात.

या दिवसात थंड पाणी पिल्याने शरीराला खूप आराम मिळतो.उबाळ पाणी पिल की तहान काही भागत नाही.

मग काही लोक फ्रीज मद्धे पाणी बॉटल ठेवतात आणि त्याचा आधार घेतात.पण फ्रीजमधील थंड पाणी त्रासही देते. असा अनेकांचा अनुभव आहे.

रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपला हात थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीएन नावाचे केमिकल असते जे आरोग्याला धोकादायक असते. म्हणून शक्य तितका प्लास्टिकचा वापर कमी करा.उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणं फायदेशीर आहे.  पण हे अनेकांना फायदे माहिती नसतात.मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. ते  खास फायदे...

♨️ पोट चांगलं राहतं

बर्फाचं पाणी किंवा फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेकांना पोटात दुखायला लागतं. घसाही यामुळेंळे खराब होतो. वाताचा त्रासही व्हायला लागतो. पण मातीच्या मडक्यातील पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही. मडक्याला रंग देण्यासाठी गेरुचा वापर केला जातो. गेरु उन्हाळ्यात थंडावा देण्याचं काम करतो.

🌿 पुरूषांना मिळतो मोठा फायदा

पुरुष आणि महिला या दोघांच्याही शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स असतात. नियमीतपणे मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरुन ठेवल्याने प्लॅस्टिकमधील अशुद्ध गोष्टी एकत्र होतात. त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. महत्वाची बाब म्हणजे मातीच्या मडक्यात पाणी साठवून ठेवल्याने आणि ते प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन्समध्ये वाढ होते.

♨️ विषारी पदार्थ दूर करतं

मातीत अशुद्ध गोष्टींना शुद्ध करण्याचे गुण असतात. त्यामुळे माती पाण्यातील सर्वच विषारी पदार्थांचं शोषण करते. यासोबतच माती पाण्यात असलेल्या सर्वच सूक्ष्म पोषक तत्वांना एकत्र करण्याचं काम करते. त्यामुळे पाण्याचं तापमान संतुलित राहतं. म्हणजे पाणी ना जास्त थंड होत, ना जास्त गरम...

🌿 घसा चांगला राहतो

उन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने घसा आणि शरीरावर मोठा प्रभाव पडतो. थंड पाणी प्यायल्याने घशातील पेशींचे तापमान कमी होते आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. थंड पाणी प्यायल्याने घशातील ग्रंथींवर सूज येते. पण मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने असे काही होत नाही.

थोडक्यात महत्त्वाचे -

🌿 फ्रिजमधील पाण्याचे तोटे

१ अनेकदा पोटात दुखण्याची शक्यता असते.२ घसा खराब होतो.३ वाताचा त्रास होऊ शकतो.४ घशातील पेशींचे तापमान कमी होऊन अनेक समस्या होतात.५ घशातील ग्रंथींवर सूज येते.

Ⓜ️ मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे

१) मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने घशाचा त्रास होत नाही.२) हे पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही.३) गेरुमुळे शरीराला थंडावा मिळतो.४) यात विषारी पदार्थ शोषून घेण्याची क्षमता ५)पाण्यात सर्व सूक्ष्म पोषक तत्व एकत्र येतात.६)पाण्याचे तापमान संतुलित राहते.७) शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्सचा स्तर वाढतो.८)रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते.९)अ‍ॅसिडीटीची समस्या दूर होते.

👌माठात मुळातच पाणी गार असते. पण तुम्ही या एका पद्धतीने ते आणखी गार करू शकता.

माठ एका लोखंडी स्टँडवर ठेवा.त्यानंतर त्या स्टँडवर माठ ठेवण्यापूर्वी एक मातीची कुंडी किंवा पसरट भांडे ठेवावे. यावर माती घालून ती भिजेल इतकं पाणी घालावं.यानंतर त्यावर पाण्याने भरलेले माठ ठेवावे.यामुळे माठाला खालच्या बाजूनेही गारवा मिळेल आणि पाणी आणखी गार होईल.कायम लक्षात ठेवा माठ खिडकीजवळ हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा पण तेथे उन लागणार नाही याची काळजी घ्या.तशी जागा नसल्यास माठ काळोखाच्या ठिकाणी किंवा जेथे उन्ह आणि गॅसची झळ लागणार नाही असा ठेवा.तसेच माठावर कायम एक ओला टॉवेल किंवा कापड ठेवा. ज्यामुळे माठाला बाहेरूनही गारवा मिळेल.यामुळे पाणी पुर्वीपेक्षा अधिक थंड होईल.

♨️ माठातील पाणी वापरताना घ्यावयाची काळजी -

माठ दररोज स्वच्छ करावा. जेणे करून त्याला गार राहण्यास मदत होईल.माठातील पाणी पिताना सर्वात प्रथम माठ स्वच्छ ठेवून घ्या.अनेकदा माती निघत असते. तर तळात जमा राहते. याचा त्रास होऊ शकतो.तसेच माठ दररोज स्वच्छ करा अन्यथा माठाला आतून बुरशी येते.बुरशीजन्य पाणी प्यायल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात.

खरचं जुन तेच सोनं.मातीचा माठ आणि माठातील थंडगार पाणी ,तो मातीचा वास ,याची मजाच न्यारी ! हे मात्र जो अनुभवतो त्यालाच माहिती !

- धनाजी माने.....✍️


Saturday, February 10, 2024

निसर्गाशी नाते....


 

( हल्ली माणसाचे आणि निसर्गाचे नाते हळूहळू संपत चालले आहे की काय असे वाटते.  निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यातील वीण विरळ होत आहे .हीच व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न .या कवितेत आंब्याचे झाड ,निसर्गाचे प्रतिनिधित्व करत आहे .....)


🌿 नाते निसर्गाशी.....🌿


सुट्टी दिवशी असाच शेतात गेलो असता,
कुठून तरी आवाज आला,
हल्ली कुठे असतोस रे , माझ्या मित्रा ?


मी थोडा दचकलो ,कावरा बावरा झालो.
आवाजाच्या दिशेने चार पावले चाललो.
कोणीच कुठे दिसेना , म्हणून थोडा थबकलो.


पुन्हा तोच आवाज कानावरती धडकला,
लहानपणी मी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो,
त्या आंब्याच्या झाडाखाली  थोडा वेळ थांबल़ो.
बरोबर ओळखलस ,लहान होतास तेव्हा रोज भेटायचासं.


हल्ली इतका कशात रे हरवून गेला आहेस ?
मला  प्रश्न त्याने केला.
मी म्हटलं मित्रा संसाराच्या गुंत्यात ,
मी पुरा हरवून गेलोय , तुलाच मी आता विसरुन गेलोय


नोकरी,बायको,मुले,गाडी ,बंगला...
यादी खूप मोठी आहे,न संपणारी ही लिस्ट आहे.
वेळच मिळत नाही रे , तुझ्या जवळ यायला
लहानपणी खेळलो ,तसे खेळ खेळायला.


लहानपणीचे ते दिवस खरचं मंतरलेले होते.
तुझ्याजवळ खेळताना आनंदाचे भरते येत होते.
आता आनंदच हरवलाय रे......
या साऱ्या गुंत्यात मी पुरा गुंतून गेलोय.


तो म्हटला , अस नको करू मित्रा ,
मलाही थोडा वेळ देत जा.
पुर्वीसारखाच आताही सोबत  रहात जा,
आनंद मिळेल तुलाही आणि मलाही.....


- धनाजी माने....✍️



Thursday, February 01, 2024

मराठा आरक्षण - मानधन


 

MSBCC प्रगनकांना नेमके किती मानधन मिळणार?

मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण २०२४ साठी प्रगनकांना नेमके किती मानधन मिळणार?

♨️  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार प्रगनकांना दहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये भत्ता असे मानधन दिले जाईल असे नमूद होते परंतु दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी नवीन आदेशानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

♨️सदर कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फत ओळखपत्र व सर्वेक्षणांच्या वेळी घरावर चिंन्हाकंन करण्याकरिता प्रगणकांना Permenent Marker Pen देण्यात येणार असून दि. १९/०१/२०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी Assistant Nodal Officer यांना हे साहित्य पुरविण्यात येईल. Assistant Nodal Officer जिल्हा व महानगरपालिका यांनी हे साहित्य तालुका व वॉर्ड स्तरावर तेथील प्रशिक्षणापूर्वी पोहोचवावे व प्रशिक्षणाच्या वेळी सदर साहित्य प्रगणकांना उपलब्ध करुन द्यावे.

तालुका Nodal Officer यांना तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे वेळापत्रक व प्रगणकांच्या बॅचेस याबाबतची माहिती गोखले इंन्स्टियुट मार्फत दि. १८/०१/२०२४ रोजी Email वर पाठविण्यात येईल. त्या वेळापत्रकानुसार प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये प्रत्येकी ७५ प्रगणक व त्यांचे सुपरवायझर बोलावून प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणाच्या वेळी तालुका Nodal Officer यांनी प्रगणकाचे नाव किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये बदल असल्यास त्याबदलाबाबतचा Report तयार करुन गोखले एन्स्टियूट मार्फत आपल्या जिल्ह्यासाठी / महानगरपालिकेसाठी नियुक्त Master Trainer यांना Whats app वर तातडीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रगणकाच्या नावात व मोबाईल क्रमांकामध्ये तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल.


♨️ महानगरपालिकेमध्ये कमी प्रगणक असलेल्या वॉर्ड किंवा पेठा एकत्र करुन ३०० प्रगणकाच्या ग्रुपकरिता १ प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, या वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील प्रशिक्षणासाठी बोलविण्यात यावे.

♨️ प्रशिक्षणाच्या वेळी आयोगाने पुरविलेल्या

- ओळखपत्रामध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, गाव, तालुका, जिल्हा ही माहिती भरून फोटो चिटकवावा, त्यावर तहसील / महानगरपालिका कार्यालयाचा शिक्का उमटवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.

♨️ प्रत्येक प्रगणकास चिन्हांकन करण्याकरिता १ Marker पेन उपलब्ध करुन द्यावा. ओळखपत्र व Marker Pen दिल्याची नोंद ठेवण्यात यावी.

सदर सर्वेक्षणाचे काम दि. २३/०१/२०२४ ते दि.३१/०१/२०२४ या कालावधीत पूर्ण करावे.

♨️ ( या कामाला मुदतवाढ देऊन हे काम दि.०२ फेब्रुवारी २४ पर्यंत करण्याचे आदेश)

💠या कामकाजासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील Nodal Officer व Assistant Nodal Officer यांना विभाग जिल्हा व तालुका स्तरावर १ लिपिकाची सेवा उपलब्ध करुन घेता येईल. या लिपिकांना एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या ५०% रक्कम मानधन म्हणून देण्यात येईल. 

♨️तालुका स्तरावरील प्रशिक्षकांना रू. १०,००० इतके मानधन देण्यात येईल. यापूर्वी कळविल्याप्रमाणे मराठा व खुल्या प्रवर्गातील १०० कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी रु.१०,०००/- इतके मानधन देण्यात येईल तर मागासवर्गीय कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुंटुंब रु.१०/- इतके मानधन देण्यात येईल.

असे अनेक प्रसिद्धी माध्यमातून प्रसारित झाले आहे.

एकूणच प्रत्येक प्रगनकाला नेमके किती मानधन मिळणार आहे?  व कधी मिळणार आहे ? हे प्रत्यक्ष खात्यावर किंवा हातात आल्यानंतरच झाल्यानंतर समजणार आहे.

( MSBBC सर्वेचे ॲप 

दिनांक- 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटानंतर बंद होणार मुदत वाढ मिळणार नाही .संबंधित यंत्रणेकडून  आदेश )

( अधिक माहितीसाठी वेळोवेळी प्रसिद्ध झालेली शासकीय परिपत्रक , आदेश अभ्यासावी .)

(सदरची माहिती प्रसारमाध्यमे यामधून प्रसिद्ध झालेल्या माहितीतून संकलित )

- धनाजी माने....✍️

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...