।।तुकाई ।।
'तुकाईच्या नावानं चांगभलं'
®️ Created by - @dhanajimane2681 ®️ धनाजी माने (इटकरे)✍️
आमचे #ग्रामदैवत
- वाळवे तालुक्यातील #इटकरे हे एक छोटसं #खेडेगांव. या गावातील प्रत्येकाचे लहानांपासून, आबालवृद्धांचे श्रद्धास्थान 'तुकाई देवी! तशी गावामध्ये #बिरोबा मंदिर, #हनुमान मंदिर, #जोतिर्लिंग मंदिर, #विठ्ठल- रुक्मिणी, #गणपती मंदिर अशी वेगवेगळी मंदिरे आहेत. तुकाई देवी हे गावातील सर्वांचेच 'श्रद्धास्थान' आहे.
इटकरे गावच्या उत्तरेस #राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर दोन्ही डोंगरांच्या कुशीत एका टेकडीच्या उतारावर हे ठिकाण आहे.शेकडो वर्षाच्या डेरेदार वटवृक्षाच्या (वडाच्या) छायेखाली देवीचे मंदिर शोभून दिसते.
'वटवृक्षाच्या छायेखाली , देवीचे मंदिर आहे.
तर देवीच्या छत्रछायेत जणू गाव आहे.'
कारण आयुष्यात येणाऱ्या संकटात , भक्तगण देवीचाआवर्जून धावा करतो , तेव्हा ' तुकाई ' संकटाला धावून येते.आपल्या भक्ताला आपल्या छत्रछायेत घेते अशी देवीची लीला आहे व भक्तांची अशी अगाध श्रद्धा आहे.
देवीचे #मंदिर राष्ट्रीय महामार्गावरून सहज दृष्टीस पडते. देवस्थान समितीमधील सर्वच कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमातून एक मोठी वास्तू या #नैसर्गिक वातावरणात उभी राहिली आहे. मंदिराच्या टेकडीवरून सभोवताली #वाळवा, #वारणेचा हिरवागार नयनरम्य परिसर दिसतो.
देवीच्या 'तुकाई ' नावाबाबत अनेक अख्यायिका आहेत.
देवीच्या नावाचा उल्लेख विविध ग्रंथात असल्याचे भक्तगण सांगतात.
#श्रावण महिन्यामध्ये मंदिर व परिसराचे दृश्य #विलोभनीय असते आणि श्रावण महिन्यातील शेवटच्या #मंगळवारी किंवा #शुक्रवारी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून या ठिकाणी येतात, तर वर्षभर मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारादिवशी लोक गर्दी करतात, तर नियमित दर्शन घेणारेही भाविक आहेत.
ऐन उन्हाळ्यातही या ठिकाणी मोठी पाण्याची सोय असल्याने या ठिकाणी #ज्ञानेश्वरी, #शिवलीलामृत व इतर ग्रंथाचे पठण होते, परिसरातील मुलांच्या #सहली या निसर्गरम्य वातावरणात येतात. परिसरातील हे एक भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ आहे.
श्रावण महिन्यातील यात्रेदिवशी देवीची #पालखी #मिरवणूक गावातून देवीच्या डोंगरावर जाते. बेल भंडाऱ्यामध्ये व #धनगरी ढोलाच्या गजरात 'तुकाईच्या नावानं चांगभलं' च्या गजराने सर्व परिसर दुमदुमतो, बेल भंडाऱ्यात अनेकजण नाहून निघतात.
देवीच्या मंदिरासमोर विविध #स्टॉल लागलेले असतात.
गावातील सर्व भावीक भक्त ,माहेरवाशिणी आपल्या कुटूंबासमवेत देवीच्या डोंगरावर येतात.नारळ, दही - भात देवीला अर्पण करतात.
सोबत #दही-धपाटे (#थालीपीठ) ,#आळूवडी सोबत आणतात. कुटुंबातील सर्व सदस्यांनसोबत याचे सहभोजन करतात , एक भक्तीमय माहोल तयार होतो.
अनेकांच्या अनेकदिवस न झालेल्या नातेवाईक, मित्र,माहेरवाशिणी यांच्या दुर्मिळ भेटी देवीच्या यात्रेनिमित्त एका छत्राखाली होतात. जणू ' तुकाई देवीच '
या भेटी घडवून आणते.
गावातील लोक मिळून मसाले भात ,गव्हाची खीर याचा मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद करतात.
गावातील सर्व लोकांच्याबरोबर देवीला #नारळ द्यायला आलेल्या #माहिरवासिनी ,त्यांचे कुटुंबातील सदस्य व परिसरातील विविध गावातून आलेले भक्तगण या महाप्रसादाचा लाभ मोठ्या आनंदाने घेतात.
ही यात्रा पारपाडणेसाठी यात्रा कमेटी व भक्तगण,कार्यकर्ते मुख्य यात्रे आगोदर काही दिवस , #रात्रदिवस कष्ट घेत असतात.
यात्रेमद्धे सारा गाव मनोभावे सामिल झालेला असतो.
सर्व जाती-धर्माचे लोक अगदी आनंदाने या यात्रेत सहभागी होतात , अनेकजण देवीला #नवस बोलतात व देवी नवसाला पावते अशी देवीच्या भक्तांची #श्रद्धा आहे.
====================================
◆◆◆◆◆◆◆◆ ■ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
====================================
परंपरा आजही यांचेकडूनही जपली जातेय.....
अशीच परंपरा माने भावकी यांनीही पिढ्यानपिढ्या जपली आहे आणि आजही ती सुरु आहे.देवीचा वार असतो त्या दिवशी श्रावणातील मंगळवारी किंवा शुक्रवारी , #माने भावकीतील लोक परंपरेनुसार प्रतिवर्षी बेल भंडाऱ्यामध्ये व #धनगरी ढोलाच्या गजरात #'तुकाईच्या नावानं चांगभलं' च्या गजरात देवीची #पुजा करतात , देवीच्या मंदिराजवळील पाण्याच्या टाक्यामद्धे #परडी सोडतात. #बेल-भंडाऱ्याची उधळण करतात. रात्री #माने-वाड्यात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.भावकीतील लोक एकत्र येतात , हिस्स्याची येणारी वर्गणी देतात. कधी शिरा-भात ,आमटी तर कधी भावकीतील लोक प्रत्येक घरातून १०...२०..२५ अशा भाकरी एकत्र जमा करतात. या बरोबर #भात , #आमटी ,भाजीचा मेनू करतात.
भावकीतील लहान मुलानंपासून , आबालवृद्धांपर्यंतचे सर्व स्री-पुरुष एकत्र येतात व #महाप्रसाद सोबत घेतात.
गावातील इतर लोकांनाही या महाप्रसादासाठी बोलवले जाते व #महाप्रसाद दिला जातो. भावकीबरोबर गावातील इतरही सर्वजण #गुण्यागोविंदाने एकत्र प्रसाद घेण्याचा आनंद घेतात.एक दुसऱ्याच्या ,यानिमित्ताने एकत्र भेटी होतात. महाप्रसादाबरोबरच आपली सुख-दु:खही share केली जातात.एक आनंदमय ,#भक्तीमय माहोल तयार होतो.
ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आली असून ,त्यामध्ये खंड नपडता अखंडपणे सुरु आहे.
रात्री धनगरी ओव्यांचा #कार्यक्रम असतो.
या #ओव्या ऐकण्यासाठी लोक येतात.
पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही #परंपरा आजही तेवढ्याच नेटाने नव्या पिढीकडून सांभाळली जात आहे.
एकूणच तुकाई देवीची यात्रा म्हणजे इटकरेवासियांनबरोबरच ,परिसरातील भक्तांचा एक भक्तीमय आनंदउत्सवच असतो.........
बोला ----
'तुकाईच्या नावानं चांगभलं !'
'तुकाईच्या नावानं चांगभलं !!'
'तुकाईच्या नावानं चांगभलं !!!'
----- ®️ धनाजी माने (इटकरे)...…..✍️
☎️ ९४०३९६३९३४
=======================================
तुकाई महात्म्य
प्रथम तुकाई भक्त व वाचक व हितचिंतक इटकरे पंचक्रोशीतील भक्त मंडळी व शुभेच्छुक यांचे आभार मानून श्री तुकाई देवी चरणी लीन होऊन करतो तुकाई देवीचा ' चांगभल '
भारतीय संस्कृतीत जे जे उत्तम, उदात्त आहे त्यांची पूजा केली जाते व आनंदाची निर्मिती त्यातुनच होत असते. आषाढानंतर येणारा श्रावण हा आनंदाचा महिमा गाणारा महिना आहे.
अशा श्रावणात येणारे सारे सण हे निसर्गाशी मानवाचे असणारे अतूट नाते सांगणारे असतात. आपली भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यांची आपल्या पुर्वजांनी एक सांगड घालून दिली आहे. आचार-विचार, व्रत-वैकल्ये, सण उत्सव यांची योग्य सांगड घालून घरातील, समाजातील वातावरण प्रसन्न राहावे, रोजचे व्यवहार सुरळीत चालावेत, आरोग्य, आयुष्य सुखी व्हावे, बंधु- , भाव प्रेम वाढावे म्हणून आपण सण उत्सव साजरे करतो. प्रत्येक सणामागे काही ना काही तरी शिकवण असते. आणि अशीच बंधुभावाची, भक्तीची, पेमाची, एकात्मतेची श्रद्धेची शिकवण देणारी इटकरे गावची तुकाईदेवी व तिची श्रावणातील शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी होणारी यात्रा होय.
श्री तुकाई देवीचे मंदिर व रम्य परिसरामुळे इटकरे येथील ग्रामस्थांना तीर्थक्षेत्राची प्रसन्नता मिळाली आहे. याबरोबरच गावाजवळून जाणाऱ्या पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाने वैभव मिळवून दिले आहे. या महामार्गापासून अवघ्या दीड किलोमिटर अंतरावरील हे श्रद्धेचे मंदिर व प्रसन्नतेचे प्रतिक असलेला डोंगर उतारावरील हिरवा परिसर भाविकांना साद घालीत असतो. हा विलक्षण देखावा येथे येणाऱ्या प्रत्येकालाच भूरळ घालतो आहे. दळण वळणाची सोय झाल्याने दिवसेंदिवस भाविकांची ओघ वाढतच चालला आहे. श्रावण मासातील हिरवे, आनंदी वातावरण, भरत आलेले आभाळ, पाण्यानं ओथंबलेले ढग, पक्षांची मधूर किलबिल, शांतपणे वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरावर झुलणारी पाने, गाभाऱ्यातील गारवा अन् समोर श्रद्धेची मूर्ती यामुळे भविकांच्या अंत:करणातील भक्तीचा झरा वाहू लागतो.
सुसंस्कृत अशा या गावास सधनतेची किनार आहे. पुर्वांपार चालत आलेल्या देवीचया रूढी, परंपरा काळाबरोबर काहीशा बदललेल्या आहेत.
श्री तुकाई देवी स्थानास व इटकरे गावास फार प्राचीन असा इतिहास आहे. इ.स. पूर्व काळात या डोंगर उतारावरच गाव वसले होते. 'पांढरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वस्तीस त्याकाळी हिस्त्रपशु तसेच राक्षसगणाकडून त्रास होऊ लागला. यामुळे तेथून स्थलांतर करून डोंगराच्या पायथ्याशी (सध्याचे गाव) वस्ती केली. मात्र त्या ठिकाणी देवीची शिला तशीच राहीली.
या गावातील धनगर समाजाचा हरीबा नावाचा एक मेंढपाळ होता. त्याने अनेक पुर्व भाकनुक (भविष्य) वर्तविले होते. त्याची भविष्यवाणी सत्यात उतरू लागल्याने सारा गाव हरीबास महान पुरूष मानू लागला. पुढे पुढे ते 'हरीबा देवऋषी' म्हणून परिचित झाले. असेच एकदा ते मेढ्या हाकत डोंरावर गेले. त्यांना त्याठिकाणी देवीची शिला दिसली. त्याच रात्री या देवीने हरीबा देवऋषींच्या स्वप्नात साक्षात्कार दिला. तो असा " मी पार्वती स्वरूप तुकाई. तुमच्या पांढरीत मी आहे. पण माझ्याकडे कोणाचेही लक्ष नाही.” हा साक्षात्कार त्यांनी ग्रामस्थांना सांगितला. त्या सर्वांनी एकत्र येऊन या शिलेवरती छोटासा निवारा केला.
श्री तुकाई देवीची अख्यायिका सांगितली जाते. त्यावरून देवीचे महात्म्य लक्षात येते. राम युगात घडलेल्या एका घटनेमुळे 'तुकाई' हे नांव रूढ झाले आहे. त्याचे असे झाले, लंकापती रावणाने सिता मातेस लंकेस पळवून नेले होते. त्यावेळी प्रभुरामचंद्र सितेच्या शोधासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाले होते. दंडकारण्यातून मार्ग काढीत ते या ठिकाणी आले. व्याकुळ अवस्थेतील श्रीराम 'सिता - सिता' म्हणत ध्यानस्थ बसले. त्यावेळी श्री शंकर व पार्वती यांना विमानातून जात असताना खाली श्रीराम दिसले. पार्वतीने शंकरांना विचारले "प्रभु रामचंद्र सितेसाठी इतके व्याकूळ का झाले आहेत?
पत्नी प्रेमाचा हा गर्वच म्हणावा लागेल." या प्रेमाची परीक्षा घ्यायच्या इराद्याने पार्वतीने सितेचे रूप घेतले व प्रभुरामचंद्रांच्या पुढे प्रकट झाली. डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या विष्णू अवतारी प्रभु रामचंद्रांच्या हा प्रकार लक्षात आला. अंतर्यामी राम पार्वतीस म्हणाले "तू का आई इथे ?" असे म्हटल्यावर पार्वतीने स्वत:चे खरे रूप दाखविले आणि अदृश्य झाली. अशी अख्यायिका आहे. प्रभुराम तुकाआई बोलण्यावरून तुकाई हे नांव प्रसिद्ध झाले. याबरोबरच केदारविजय या ग्रंथात २१ व्या अध्यायात उल्लेख आढळतो. कोल्हासूर व रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी श्री जोतिबास श्री तुकाई देवीने मदत केलेली आढळते.
सन १८०० ते १८१० चे दरम्यान देवीने काही भक्तांना दृष्टांत दिला असे सांगितले जाते. या दृष्टांतात ती म्हणते, "माझ्या मंदिराचा जिर्णोद्धार करा. तो ही एका रात्रीत ! पन्हाळ्याचा दगड व कृष्णेचे पाणी आणून एकाच रात्रीत देवळाचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे." हि बाब या भक्तांना अशक्य वाटली. पण देऊळ उभे करण्याच्या निर्धाराने पायी चालत जावून पाणी व दगड आणून छोटेसे देऊळ बांधण्यात आले.
सन १९०० च्या सुरूवातीस देवी रोगाची व प्लेगची (पटकी) मोठ्या प्रमाणात साथ होती. त्यावेळी श्री तुकाई देवीचे छत्र ग्रामस्थांच्यावर असल्यामुळे
या रोगास एकही बळी पडला नाही अशी लोकांची धारणा झाली. ही बातमी वाऱ्यासारखी या गावच्या पंचक्रोशित पसरली. इटकरे गावाच्या पुर्वेकडील गावातील काही लोकांनी देवीच आपल्या गावात आणायची आणि साथीच्या रोगाचा अटकाव करायचा या हेतुने मूर्ती चोरून नेण्याचा बेत आखला. त्याप्रमाणे ही मूर्ती बैलगाडीतून नेण्याचा प्रयत्न झाला. पण इटकरे गावाच्या शीवेपर्यंतच काय ती मूर्ती गेली. त्यापुढे बैलगाडी हाकणे कठीण झाले. शिवेवरच मूर्ती गाडीतून खाली पडली. त्यावेळी मूर्तीचे नाक तुटले. ते आजही तसेच आहे. शिला उचलण्याचा प्रयत्न झाला पण शिला काही उचलेना. अखेरीस ते रिकाम्या हातानेच निघून गेले. हा प्रकार इटकरे येथील गावकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ती मूर्ती पुन्हा पाठीमागे आणून स्थापना केली.
श्री तुकाई देवीच्या उजव्या बाजूस एक जीवंत पाण्याचा झरा आहे त्यास गंगा कुंड म्हणतात व डाव्या बाजूस एक कुंड आहे त्यास भागिरथी कुंड म्हणतात. या झऱ्यामध्ये अंघोळ केल्यास अंगावरील खरूज, गजकर्ण, नायटे अथवा चमडीचा कसलाही रोग बरा होतो. अशी लोकांची धारणा आहे. आजही लहान मुलांना त्यात अंघोळ घालण्याची प्रथा आहे. देवीच्या पाठीमागे कारीचे झाडाखाली मसोबाचे दैवत आहे. त्यास आषाढ महिन्यात नैवेद्य पूजा होते. अलीकडच्या काळातही असाच एक चमत्कार लोकांनी अनुभवला आहे.
कराड येथील एका भाविकाच्या स्वप्नात देवी प्रगटली. देवीने सांगितले "सध्याचे मंदिर हे फारच अपुरे आहे. तेंव्हा तू या मंदिराचा विस्तार कर." त्याप्रमाणे त्या भक्ताने मंदिराच्या समोर पत्र्याचे शेड बनविले. काही दिवसानंतर या शेडच्या पत्र्याची चोरी करण्याच्या इराद्याने रात्रीच्या वेळेत संपूर्ण पत्रा काढून नेण्याचा प्रयत्न केला. पण हाही पत्रा ठराविक मर्यादेच्या बाहेर नेणे कठीण झाले. हा पत्रा तेथेच टाकून अखेर चोरट्यांनी पळ काढला.
या दृष्टांतावरून देवीच्या जागृततेवर लोकांची गाढ श्रद्धा बसली. ग्रामदैवत श्री तुकाई देवी भक्तांना पावते घराघरामध्ये तीचा वास दरवळतो. रात्री बारा वाजल्यानंतर देवी गावामध्ये येते. संपूर्ण गावाला वेढा घालून पहाटे ती परतते अशी येथील लोकांची धारणा आहे. त्यासाठी ते त्या मार्गावरील देवीची पाऊले व काठीचा व्रण प्रमाण मानतात.
सन २००२ मध्ये या ठिकाणी प्रशस्त मंडप व सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प येथील प्रमुख व्यक्तींनी केला. पहिल्या टप्प्यात सांगली - शिराळा रस्त्यापासून मंदिरापर्यंतचा १ किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला. श्री तुकाई देवी मंदिर व मंडपाच्या जिर्णोद्धाराचे काम कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सोसायटीचे चेअरमन आनंदराव पाटील, शिवाजी भानुसे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, सतिश पाटील आदिंच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली
सुरू करण्यात आले. वास्तू रचनाकार दीपक पवार यांनी उत्कृष्ट असे मंदिर व मंडपाचे डिझाईन केले. या बांधकामासाठी गावातून व परिसरातून मोठ्या प्रमाणात भक्तांनी देणगी, वस्तू देऊन मोलाचे सहकार्य केले.
मंदिराचा जिर्णोद्धार, श्री तुकाई देवी मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण • समारंभ गुरूवार तारीख ५ जून, २००३ रोजी १२ - ३५ मिनिटांनी संपन्न झाला. परमपुज्य योगीराज पूर्णानंद महाराज व वेदशास्त्र संपन्न प्रदीप वासूदेव शास्त्री जोशी यांचे हस्ते कलशरोहण विधी संपन्न झाला. तर सरपंच श्री. सुभाष नामदेव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन सुभाष पाटील यांचे हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी अश्विन, कार्तिक व श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम होतात. विजया दशमीस (दसरा) याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात. भजन, किर्तनाने अवघा परिसर दुमदुमून जातो. श्रावण मासातील प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी सात सुवासिनी गावातून पाणी घेउन जावून देवीची पूजा करतात. ढोलाच्या गजरात पालखीतून पादुका नेवून त्याचे पूजन केले जाते. पालखीचा मान येथील पांडुरंग आण्णा पाटील व नांगरे पाटील कुटुंबियांना आहे. तर परडी सोडण्याचा मान बापू नरसू पाटील व भाऊबंदकीचा आहे.
श्रावणातील शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या ठिकाणी देवीची मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगांव जिल्ह्यातून तसेच मुंबईहून येथे भाविक आवर्जून उपस्थित राहतात. मोठ्या प्रमाणात महाप्रसाद केला जातो. यात्रा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी यात्रा समितीवर असते. यात्रा समितीचे काम संभाजी दत्तू पाटील, अशोक सुतार, संजय कृष्णात पाटील, शंकर देवाळे, पांडुरंग बापू पाटील व इतर सहकारी पाहतात. अशा पध्दतीने श्री तुकाई देवीचे महात्म्य आहे.
ॐ सर्व मंगल मांगल्ये ॥ शिवे सर्वार्थ साधिके ॥
शरण्ये त्र्यंबके गौरी ॥ नारायणि नमोस्तुते ॥
◆ धनाजी माने…✍️
dhanajimane.blogspot.com
dhanajimane123@gmail.com
(सदरचा माझा हा लेख- तुकाई देवी महात्म्य पुस्तकात सन-२००४ ला पसिद्ध झाला आहे.)