नराधम आणि......आपल्या लाडक्या लेकी,बहिणी .....?
१ नोव्हेंबर २१ चे दैनिक उघडले आणि या दैनिकामध्ये ' रिजन अपडेट ' मध्ये एक बातमी वाचनात आली मन सुन्न करणारी बातमी ....
आपण राहत असलेल्या #वाळवा तालुक्यालगतच्या #हातकणंगले तालुक्यातील #खोची येथील ही दुर्दैवी घटना वाचून मन सुन्न झाले .
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण खून केल्याची घटना खोची (ता. हातकणंगले) येथे घडली. या #दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे .
त्या कुटुंबातील एकुलती एक आणि लाडाची लेक अशा अवस्थेत पाहून तीच्या आईवडिलांनी अक्षरशः #आक्रोश केला होता . हृदय पिळवटून टाकणारी घटना खरंच माणुसकीला काळीमा फासणारी आहे .
ती मुलगीसर्वांना आपुलकीने बोलवणारी
बोलकी, हुशार होती. लहान मुलांसोबत ती गल्लीत हसतखेळत असायची. एकुलती एक असल्याने प्रेमळ, लाडकी होती. घटना घडली त्या दिवशी त्या ६ वर्षाच्या लेकिने सकाळी आपल्या वडिलांना जेवणाचे ताट दिले होते.व जेवावयास सांगितले आणि घराबाहेर गेली होती. गेली ती गेलीच...ती परत आलीच नाही. ...
म्हणून , तिचा शोध सुरू झाला आई-वडील शेजारी-पाजारी यांनी सर्वत्र तिला शोधले. अखेर गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असणाऱ्या. जुन्या दफनभूमीच्या झुडपात तिचा #मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर व पायाला जखमेचे व्रण दिसून आले होते. अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले .त्यावेळी त्या नराधमाने निर्लज्जपणे गुन्ह्याची कबुली दिली होती.
पोलिसांनी आपली कामगिरी कितीही चोख बजावली .याबाबतचे #कायदे कितीही कडक झाले तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत .
#महिला, #मुली ,अल्पवयीन मुली यांच्यावर असे व यापेक्षाही भयावहअत्याचार घडण्याचे प्रमाण खरोखरच खूपच मन सुन्न करणारे आहे .
▪️१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीच्या 'वसंत विहार ' भागात तरूणीवर #पाशवी #बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत तिने #झुंज दिली व तिचा #मृत्यू झाला. दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे #शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय निर्भयावर दोषींनी चालत्या बसमध्ये पाशवी बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह मरणासन्न अवस्थेत महामार्गावर फेकून दिले होते. या प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता.
▪️नगर - जिल्ह्यातील #कोपर्डी (ता. #कर्जत)येथे १३जुलै २०१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास असाच गुन्हा घडला होता. येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यत सामील असणाऱ्या तीन नराधमांना विशेष #जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची #शिक्षा ठोठावली होती.
▪️ ऑक्टोंबर २१ मधील वणी येथील अशीच घटना. वणी येथे #बसस्थानक परिसरात एका ४० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचाराची घटना घडली.मानवतेवर घाला घालणारी ही #गुन्हेगारी #प्रवृत्ती
समाजात सर्वत्र फोफावताना दिसत आहे.
महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. अशा घटना आपल्या आजूबाजूला दररोज घडू लागल्या आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यासाठी आणि महिला, मुली, तरुणींच्या मदतीसाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. 'जेथे भय तेथे निर्भया ' हे ब्रिदवाक्य घेवून स्थापन करण्यात आलेल्या या पथकांच्या कारवाईने चांगलाच दबदबा निर्माण झाला असला आणि पोलीस आपले काम चोख बजावत असले तरी अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतच आहेत.
अशा घटनांची आकडेवारी पाहिली म्हणजे खरोखरच #समाज नेमका कुठे चालला आहे? समाजातील ही नराधम प्रवृत्ती कोणत्या टोकाला जाऊन पोचलली आहे असे वाटते.
२०१९ मद्धे देशभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) ३० सप्टेंबर १९ जारी केलेल्या अहवालानुसार २०१९ मध्ये भारतात बलात्काराच्या घटनांत मोठी वाढ झाली. ३०,६४१ केसेस बलात्काराच्या बाबतीत नोंदवण्यात आल्या, देशात दर १७ मिनिटांनी बलात्कार होत असल्याचे #NCRB अहवालातून
स्पष्ट झाले आहे.
भारतात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा अव्वल क्रमांकावर येतो. दरवर्षी साधारण तीस ते चाळीस #हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद देशात होते. हे झाले #नोंद झालेल्या गुन्ह्यांबद्दल; पण समाजातील लोक काय म्हणतील या भीतीपोटी अनेक प्रकरणात बलात्काराची नोंददेखील केली जात नाही.अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे, बलात्काऱ्यांना शिक्षा मिळण्याची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. दुर्दैवाने दिवसेंदिवस या गुन्ह्याची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढत चालली असल्याचे एनसीआरबीच्या (#राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग) अहवालातून स्पष्ट होत आहे.
एकूणच #निर्भया प्रकरणानंतर अशा बाबतीत अनेक कडक कायदे करण्यात आले. विविध पथकांची #स्थापना करण्यात आली. विविध #हेल्पलाइन #नंबर देण्यात आले .तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत. की ज्या तुम्हा आम्हाला सर्वांनाच मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत.
आणि त्याच बरोबर अशा घडणाऱ्या घटना पाहून, ऐकून, मनात एक भीतीची #पाल चुकचुकते की आपल्याही लाडक्या लेकी,बहिणी शिक्षणाच्या निमित्ताने ,काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या तर ,त्या पुन्हा घरी सुरक्षित येतील ना?
यासाठी प्रत्येक लेक सुरक्षित पाहिजे .....
- धनाजी माने ......✍️