🙏भावपुर्ण श्रद्धांजली : समाजाभिमानी नेता व प्रगतशील शेतकरी -सुभाष नामदेव पाटील (तात्या)
२ सप्टेंबर २०२५ रोजी ,वयाच्या ७३व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.ते तात्या या नावाने सर्वपरिचित होते.
तात्या ! हे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या मनात आदर, आपुलकी आणि प्रेरणेची छाप उमटते.
तात्या हे केवळ शेतकरी नव्हते, तर एक मार्गदर्शक, समाजाभिमानी नेता आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होते.
सरपंच, सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले .सोसायटी संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.
इटकरे गावाचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुकाईदेवीच्या देवालयाचा जिर्णोद्धारही त्यांनीच त्यांच्या काळात केला. तुकाईदेवालय परिसर या परिसरातील एक पर्यटन स्थळ म्हणून आज नावारूपाला येत आहे यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणूनही आधुनिक शेतीत नवे प्रयोग करून दाखवले. शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी इस्राएलचाही दौरा केला. व पाण्याचे महत्व जाणून त्यांनी तो प्रयोग आपल्या इटकरे येथील शेतीवर केला.
कुणाच्या स्वप्नातही नसेल अशा खडकावरती त्यांनी नंदनवन फुलवले.
जवळजवळ वीस एकर क्षेत्रावर जेसीबी पोकलॅण्ड, बुलडोझर अशा अवजड अवजारांचा वापर करून त्यांनी ही शेती हाताखाली आणली. व या शेतीवर नवनवे प्रयोग केले. पुढील अनेक पिढ्यांसाठी व तहयात नवनिर्मिती करणारी शेती निर्माण करून ती फुलवली.
केळीसारख्या पिकांचे त्यांनी या क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेतले. व इंच आणि इंच जमिनीचा वापर करून त्यांनी बांधावरतीही वनराई फुलवली बांधावरती सुपारी, नारळ ,आंबा यासारख्या पुढील अनेक पिढ्यांना उत्पादन देणाऱ्या वनराईची नवनिर्मिती केली. जणू काळाकुट्ट दगडावरती त्यांनी नंदनवनच फुलवले.
त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.
सर्वसामान्य व गरीब कुटुंबात जन्माला येऊनही कष्ट, चिकाटी आणि धडाडीच्या जोरावर त्यांनी आपले घर, शेती आणि समाजकारण उभे केले.
तात्यांचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्यांचे कुटुंब. घरातील प्रत्येकाला त्यांनी मेहनतीची शिकवण दिली. त्यांच्या मुला-मुलींनी व नातवंडांनी शिक्षण व उद्योग क्षेत्रात परंपरा पुढे चालवली आहे. आज त्यांची नातवंडे देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत, काही उद्योगधंद्यात आपले स्थान निर्माण करत आहेत. "सुमनराज हायटेक फर्म" ही त्यांच्याच प्रेरणेने उभी राहिलेली संस्था आज यशस्वीपणे कार्यरत आहे.
तात्या साधेपणाने जगले, त्यांच्या वागण्यात मोठेपणाचा कधीच डामडौल नव्हता.
प्रत्येकाला त्यांनी कधी आपुलकीने तर कधी प्रसंगी रागाहूनही हात दिला, संकटात आधार दिला.
माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी खऱ्या अर्थाने कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आधार दिला, सुखदुःखात साथ दिली. त्यामुळे त्यांचे जाणे हे केवळ कुटुंबापुरतेच नाही, तर आमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी वैयक्तिक हानी आहे.
आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !
तात्यांच्या शिकवणी, त्यांच्या कष्टाची परंपरा आणि समाजकारणाचा वारसा पुढील पिढ्यांना नक्कीच दिशा देत राहील.
🙏 तात्या, आपण दिलेला आधार, आपुलकी आणि प्रेरणा आम्ही विसरणार नाही. आपण आमच्यासाठी कायम प्रेरणास्थान राहाल. भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹
- धनाजी माने ….✍️
dhanajimane.blogspot.com
