तुंगच्या मातीच्या कुशीतून, देशसेवेसाठी घेतलेली उत्तूंग भरारी : वेदांत वाईंगडे याची असामान्य वाटचाल -
शेतात काम करणाऱ्या हातांमध्ये जर देशसेवेची स्वप्नं असतील, तर ती साकार होऊ शकतात, हे उदाहरण म्हणजे तुंगचा -वेदांत वाईंगडे.
ग्रामीण भागात वाढून, कठीण परिस्थितीवर मात करत, लाखो स्पर्धकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या युवकाची गोष्ट ही केवळ प्रेरणादायी नाही, तर लाखो ग्रामीण भागातील तरुणांना दिशा देणारी आहे.
📌 बालपण
वेदांत यांचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. आई योगीता ,प्रगतशील शेतकरी -आजोबा शामराव वाईंगडे व वडील प्रविण वाईंगडे यांनी वेदांतला शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा दिली.वेदांतचे आई- वडील, पालक, आपल्या वेदांतने शिकून मोठं व्हावं, हीच त्यांची इतर पालकाप्रमाणे धडपड आणि स्वप्न होती. आजोबा,आई-वडील यांनी मेहनत करून अनेक आव्हानात्मक परिस्थितीतीशी तोंड देत त्याला इथपर्यंत पोहचवण्यासाठी पालक म्हणून खडतर प्रयत्न केले.आणि वेदांतनेही याला आपल्या या उत्तूंग यशातून न्याय दिला.स्वप्न साकाराला योग्य अशी यशस्वीतेची दिशा दिली.
📌 शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि चिकाटी -
वेदांत लहानपणापासून अभ्यासात हुशार होता, पण हुशारीपेक्षा त्याची मेहनत जास्त मोठी होती. दहावीमध्ये त्याने ९८ टक्के गुण मिळवले. गावात आणि शाळेत त्याच्या नावाची चर्चा झाली. पण त्याचं यश इथेच थांबलं नाही.
दहावीनंतर औरंगाबाद येथील SPI ( महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवा प्रशिक्षण केंद्रामध्ये) निवड होण्यासाठी विशेष निवड परिक्षेमद्धे हजारो विद्यार्थ्यांमधून फक्त ६० विद्यार्थ्यांची निवड झाली. या निवडीतही वेदांतने स्वतःचे वरचे स्थान पटकावले. ही निवड केवळ अभ्यासाची नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी होती.या कसोटीला तो उतरला.दोन वर्षाच्या या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. एक-एक अवघड पायरी तो सर करत होता. प्रत्येक टप्प्यावर तो यशस्वी होत प्रवास करत होता.
📌 NDA – देशसेवेचं स्वप्न
वेदांतने त्याचं खरं स्वप्न ठरवलं होतं – भारतीय लष्करात अधिकारी होणं. देशासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. त्यासाठी त्याने NDA (National Defence Academy) परीक्षेची तयारी सुरू केली.केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) मार्फत घेतली जाणारी NDA परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यामध्ये वेदांतने देशात १६० वा क्रमांक मिळवला – हे कोणत्याही ग्रामीण युवकासाठी स्वप्नवत यश आहे.
📌 SSB आणि मेडिकल - अंतिम कसोटी
UPSC -NDA लेखी परीक्षा पास झाल्यावर येते ती , खरी परीक्षा – SSB (Services Selection Board). या पाच दिवसांच्या मुलाखतीमध्ये फक्त बौद्धिक नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांची चाचणी घेतली जाते. वेदांतने या कठीण प्रक्रियेत देशभरातून ७ वा क्रमांक मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
त्यानंतर आलेल्या मेडिकल टेस्टमध्येही १००% फिटनेस दाखवत त्याने पूर्णता साधली.
📌 एका शेतकऱ्याचा मुलगा – देशाच्या नौदलात अधिकारी होणार
वेदांत वाईंगडे यांची ही वाटचाल ही एका सामान्य ग्रामीण मुलाची असामान्य गाथा आहे. त्याने केवळ स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या गावासाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी ही घवघवीत कामगिरी केली आहे. शाळेत दप्तर घेऊन जाणारा आणि सुट्टीत शेतात आजोबा,वडिलांना मदत करणारा हा मुलगा, आज देशाच्या संरक्षण सेवेत अधिकारी होण्यासाठी , त्याचे पुणे (खडकवासला ) येथील प्रशिक्षण त्याला खुणावत आहे.प्रशिणासाठी तो सज्ज झालाय. हे सारे यश पाहून डोळे अभिमानाने पाणावतात.
📌 तरुणांसाठी प्रेरणा
आजच्या घडीला अनेक तरुण मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. पण वेदांत वाईंगडे यांच्यासारख्या युवकाने सिद्ध केलं की जर मनात ठाम निर्धार असेल, तर कोणतीही अडचण आड येऊ शकत नाही. त्याने वेळेचा सदुपयोग केला, मार्गदर्शन घेतलं, आणि सातत्याने मेहनत घेतली.
"वेदांत वाईंगडे हे नाव आता केवळ एका विद्यार्थ्याचं नाही, तर प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. त्याने दाखवलेला मार्ग हा प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याला हे दाखवतो की ...
" स्वप्न मोठं असावं, आणि प्रयत्न अखंड."
आज वेदांत वाईंगडे केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान आहे. त्याचं यश हे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे – की स्वप्न कोणतीही सीमा पाहत नाहीत आणि यशासाठी गरज असते ती फक्त जिद्दीची!
-धनाजी माने.....✍️
====================
