Saturday, December 30, 2023

नववर्ष

नववर्ष

 

















नववर्ष........

चला नवीन वर्षात नवे संकल्प करुया .
काही स्वतःसाठी तर काही जगासाठी.

करत नसु व्यायाम
तर.. त्याला सुरवात करुया !
कशाला उठा लवकर ...
म्हणून दडपून झोपत असू ,
तर.. लवकर जागे होऊया ,
मोकळ्या हवेत फेरफटका मारुया.


असतील  बऱ्या - वाईट सवयी ,
तर ,आपणच आपल्या सवयींची यादी करुया.
चांगल्या सवयी, तेवढ्याच पुढे नेऊया,
वाईट सवयींना मूठमाती देऊया.


कधी -कधी आपला इगो दुखावतो ,
आणि आपल्याच माणसांना ,आपण हर्ट करतो.
अहंकाराचा हा इगो नम्रपणे बाजूला ठेऊया ,
आपल्याच माणसांना आताआपणच आनंदी पाहूया !


कधी छोट्यांचे मोठ्यासाठी,मोठ्यांचे छोट्यासाठी,
कटू शब्द बाहेर पडतात , मानापमान होतात.
मन दुखावतात , माणसं दुरावतात ,
अशावेळी  एकदुसऱ्याला मानसन्मान देऊयात.


आता ठरलं तर ! संकल्पांची नुसतीच..
मोठी यादी नको करायला.
आपल्याला पेलणारे छोटे-छोटे संकल्प करुया.
नकोत नुसतेच ते करायला ,
तर.....हवेत रोजच ते आचरणात आणायला !

- धनाजी माने....✍️

            


Wednesday, December 20, 2023

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षण


 

धनाजी माने दि. २१-✍️" विद्यार्थी आता नवीन संकल्पनेनुसार शिकण्यासाठी शिकणार यातून त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे."असे प्रतिपादन वाळवा तालुका गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले.ते वाळवा तालुका स्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.

नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज पेठ येथे हे प्रशिक्षण विविध टप्प्यात सुरु आहे.

ते पुढे म्हणाले की इथून पुढे ....

" शिक्षक आणि विद्यार्थी यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागणार असून यातूनच जगाच्या पटलावरती टिकणारे विद्यार्थी घडवणे अपेक्षित आहे."

या प्रशिक्षण अंतर्गत मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, शिकण्यासाठी विध्यार्थी यांना शिकण्यास आव्हान देणे, लर्निंग इंटरवेशन, जिज्ञासू वृतीचा संवाद, अध्ययन गती वाढवणे, आव्हाने स्वीकारणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विविध विषययावर मार्गदर्शन केले जात आहे.

नवीन पद्धतीमध्ये शिक्षकांनी अध्यापन न करता मुलांना शिकण्यास प्रवृत्त करायचे आहे, विद्यार्थ्यांची अध्ययन गती तिप्पट करायचे आहे. या मुलांची ज्ञानाची कक्षा मोठी करायची आहे. या विषयाच्या संदर्भाने विविध कृतींचे आयोजन करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण तालुक्यातील शंभर टक्के शिक्षकांना देण्यात येणार आहे. याचे नियोजन तालुका पंचायत समिती तर्फे करण्यात आले असून ,टप्प्या-टप्प्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणविस्तार अधिकारी अंबी साहेब, गायकवाड मॅडम, संजय पाटील पंचायत समितीचे विषय तज्ञ महेश पाटील, राम यादव सर, पोखर्णीकर सर, प्रवीण पाटील यांनी नियोजन केले आहे.
तालुक्यातील १ ते ५ व ६ ते ८ अशा दोन्ही गटाचे , तालुक्यातील सर्व केंद्रातील शिक्षकांचे प्रशिक्षण जानेवारी अखेर संपन्न होणार आहे.

- धनाजी माने....✍️


Friday, December 15, 2023

कै.स्वर्गीय शिवाजीराव पाटील आण्णा चौथे पुण्यस्मरण !


 ▪️ शुक्रवार - दि.१५/१२/२०२३ 

।। चौथे पुण्यस्मरण ।।

🙏मा.आमदार शिवाजीराव पाटील(आण्णा) यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!........

🔹प्राथमिक शिक्षकांचे रू्द्यसंम्राट , मुकूटमणी🔹

🔸कै.स्वर्गीय आ.शिवाजीराव पाटील(आण्णा)🔸

सर्वसामान्य माणसे संसाराच्या मायाजाल गुरफटलेली असतात. जीवन म्हणजे आळवावरचे पाणी हे माहीत असूनही संसाराच्या पाशातून ते अलिप्त राहू शकत नाहीत .

जातस्थही ध्रुवो मृत्यू:|

 हे कटु सत्य आहे. जन्माला आला आहे त्याला मरण येणारच ! मग घाबरायचं कशाला मृत्यूवर मात करून कीर्ती रूपाने या जगात जिवंत राहण्यासाठी माणसाने आयुष्याची जिवंतपणी आखणी केली पाहिजे.

 हे ओळखून जे जीवन जगतात तेच खरे लोकोत्तर पुरुष ठरतात .

असेच आपले संपूर्ण आयुष्य जगलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे आदरणीय स्वर्गीय आण्णा  महाराष्ट्रातील नव्हे तर अखंड भारतातील तमाम प्राथमिक शिक्षकांचे आण्णा म्हणजे आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील.

आण्णा आज तुम्हाला जाऊन चार वर्षे झाली .आपण गेल्यानंतरची निर्माण झालेली पोकळी समस्त शिक्षक बांधवानसाठी खूपच मोठी आहे.

पहाडासारखे भारदस्त व्यक्तीमत्व, रांगडी भाषा ,आणि शिक्षकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची जाण असणारे , मोठ्या मनाचे उत्तूंग व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय आण्णा.समर्थ रामदासासारख्या संत क्रांतिकारक  सत्पुरुषानेही म्हटले आहे की,

 किर्ती पाहो जाता सुख नाही |

 सुख पाहता किर्ती नाही || 

माणसाला जर कीर्ती मिळवायची असेल तर वैयक्तिक सुखाची आहुती द्यावी लागते आणि हेच अण्णांच्या बाबतीत लागू पडते .ते शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्र न दिवस झटले . ते म्हणतही की " शेवटच्या श्वासापर्यंत मी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, माझे आयुष्य खर्ची घालणार , समर्पित करणार !" आणि तेच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केले.

त्याची कीर्ती चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेच ,त्याचबरोबर आसेतुहिमालय त्यांची किर्ती शिक्षकांच्यात  आहे.देशातील शिक्षकांचे ,दीपस्तंभ, आधारस्तंभ म्हणून  महाराष्ट्राबरोबरच  देशातील लाखो शिक्षकवृंद त्यांना ओळखतात .

१९७५ पासून   त्यांचा  संघटना बांधणीचा, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रवास सुरू होता. त्यांनी संघटनेच्या कामासाठी बळकट बांधनीसाठी सारे आयुष्य वेचले ,सारे आयुष्य ते महाष्ट्रभर संघटन बांधनीसाठी भ्रमंती करत राहिले.त्यांनी आपल्या आयुष्यातील वैयक्तिक सुखाऐवजी  प्राथमिक शिक्षकांच्या  सुखाचा विचार केला .प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवले.पगारवाढ, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता,शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण,पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतन वाढी, त्रिस्तरी चटोपाध्याय वेतनश्रेणी, बदल्या, व शासकीय कामे असे अनेक प्रश्न प्राथमिक शिक्षकांना हैराण करत होते, ते सोडवण्यासाठी आदरणीय स्व.आण्णांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लाखो प्राथमिक शिक्षकांना एकाच छताखाली आणले .

 आदरणीय स्व. आण्णांनी  शिक्षकांना हाक देताच  लाखो शिक्षक एकत्र यायचे. हे विराट दर्शन राज्याच्या राज्यकर्त्यांना अनेकवेळा दिसले ; राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याबरोबरच विविध खात्याचे मंत्री व्यासपीठावर उपस्थित असायचे. आणि मग लाखो शिक्षकांचे पंचप्राण, बुलंद आवाज मुलुख मैदानी तोफ, प्राथमिक शिक्षकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन लाखो शिक्षकांच्यासमोर  या मंत्र्यांना आपल्या सांगड्या भाषेत, शिक्षकांच्या समस्या सांगायचे.

 मग  या मंत्रीमहोदयांना  प्रश्न लाखो शिक्षकांनसमोर  सोडवल्याचे जाहीर करावे लागायचे.  मग एका मागोमाग एक समस्या सुटायच्या याबाबत शासनाचे आदेश काही दिवसातच निघायचे,आणि तमाम शिक्षक चिंतामुक्त व्हायचे.

 हे महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी गेल्या अनेक दशकांत पाहिले, अनुभवले  आहे. आणि यांचे सर्व श्रेय स्व.आण्णांच्या  वैयक्तिक कौशल्याला आणि त्यांच्या त्यागाला द्यावे लागते.

गेल्या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील अनेक धूरीणांनी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेतृत्व केले.

 यामध्ये आचार्य अत्रे,आचार्य भिसे, डॉ.ग. श्री. खैर ,कर्मवीर भाऊराव पाटील ,आचार्य दादासाहेब दोंदे अशा या परंपरेला समर्थपणे आणि सार्थपणे १९७५ पासून २०१९ पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत स्व.अण्णांनी न्याय दिला .

वयाच्या नव्वदीतही आण्णा शिक्षकांच्या प्रश्नासाठी अविरत झटत राहिले.मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, शिक्षणक्षेत्रातील विचारवंत यांच्या भेटी घेण्यासाठी मुंबई -दिल्ली असा अविश्रांत प्रवास केला. दिल्लीतील रक्त गोठवणाऱ्या थंडीची तमा न करता  शेवटच्या गोव्यातील अधिवेशनाच्या नियोजनासाठी नव्वदीतही प्रवास करत राहिले होते. खरचं हे सर्व तरुणांना ही लाजवेल या न्यायाने झटत राहिले होते.

स्व:ताच्या तब्येतीची तमा न करता नव्वदीच्या वयामद्धेही ते अविश्रांत झटत राहिले होते फक्त तमाम शिक्षकांनसाठी.

असे हे पहाडासारखे धिप्पाड शरीर ,नेतृत्वाचे अतुलणीय कौशल्य, रांगडी भाषा, सर्वांनवर प्रेम,  माया,आपुलकी तेवढेच कर्तव्य कठोर व्यक्तिमत्त्व पुन्हा शिक्षक संघटनेत न भुतो नं भविष्य लाभणार नाही हे मात्र निश्चित !

अण्णांनी वैयक्तिक सुखाचा त्याग करून शिक्षकांच्या समस्यांसाठी चंदनाप्रमाणे आपले आयुष्य झिजवले । म्हणूनच त्यांची सर्वदूर  कीर्ती आहे .आण्णांचे हे पहाडासारखे व्यक्तीमत्त्व आणि तेवढ्याच मोलाचे शिक्षक संघटनेतील काम महाराष्ट्रातील आणि भारतातील शिक्षकांना विसरता येणार नाही हे नक्की  !🙏 आदरणीय स्व. आण्णाच्या  स्मृतींना विनम्र अभिवादन !

- धनाजी माने (इस्लामपूर)....✍️


बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...