सार काही हरवलय.......
बालपणीच खेळ आमच्या ,
आता कुठच दिसत नाय
जाड कळकाचा तो हातभर दांडू ,
आणि त्यावर असणारी टोकदार चिन्नी.....
आता कुठच दिसत नाय......
उठ-सुट जो तो मोबाईल मद्धेच गुंतून गेलाय ,
पब्जी, रमी अशासारख्या खेळातच ,
रमून सारा तरुण गेलाय.
मैदानावरचे खेळ बरेचसे , तो आता हरवून बसलाय.
गद आणि गदीवरच्या गोट्या,
आटा-पाट्या असो वा सुर -पारंबी
हे खेळ खेळताना कोणीच आता दिसत नाय
सळीचा गाडा आणि चाकावरचा आकडा
फिरतानाही कुठ दिसत नाय.
पिवळा हत्ती ,चारमिनार ,ब्रीस्टॉल सारखी पाकीट ,
गोळा करुन दुमडून त्याचे चौकोन आम्ही करायचो.
मोठा चौकोन आखून, त्यात त्यांना मांडायचो.
पाच ,दहा ,वीस , पन्नास त्याच मुल्य आम्हीच ठरवायचो.
आणि हातात घेऊन व्हन्या , आम्ही ते टिपायचो.
हे मैदानावरचे खेळ आता सारेच हरवलेत...
मैदानावरचा चौकोन जाऊन ,
आता हातात मोबाईलचा आयत आलाय.
दुसऱ्या हाताच्या बोटावरच कॅंडी क्रश ,
टेंम्पल रन सारखे खेळ- खेळू लागलाय.
अस बरच काही भुतकाळात हरवलयं ,
नव्या पिढीला , जुन्या लोकांच्या या खेळांचा ,
मागमुसही नाय , कारण काळाच्या ओघात
हे सारच आता हरवलय
- धनाजी माने (इस्लामपूर)
.jpeg)