Tuesday, March 01, 2022

आडवाटेवरचे कोल्हापूर ...एक प्रवास

 





#पावनखिंडीकडे रवाना झालो. या भूमीत #बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले आणि स्वराज्यासाठी कामी आले त्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणाऱ्या धारातीर्थी भूमीत पोहचलो.


११ मे रोजी संयोजकांचे सूचनेप्रमाणे आम्ही कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे पोचलो. त्या ठिकाणी देवेंद्र #जावडेकर यांनी आमचे फॉर्म भरून घेतले. बँगवर लावण्यासाठी नंबरचा टॅग व टोपी दिली. ओंकार गवळी, पारस जाधव यांची भेट झाली. उदय गायकवाड यांनी आम्हा पर्यटकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि दोन आरामबसमधून पहिल्या दिवशीचा प्रवास सुरू झाला.


काही वेळातच आम्ही कोल्हापूरच्या उत्तरेला #जोतिबाच्या डोंगरकुशीत पोहाळे येथे पोहोचलो. त्याठिकाणी प्राचीन बौद्धकालीन गुहा पाहिली. पाण्याची दोन टाके, चैत्यगृह, पाठशाळा हा परिसर पाहून आम्ही 

पावनखिंडीकडे रवाना झालो. या भूमीत बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले आणि स्वराज्यासाठी कामी आले त्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणाऱ्या #धारातीर्थी भूमीत पोहचलो.

पुढे आमचा प्रवास अनुस्कुराकडे सुरू झाला. त्या ठिकाणी आम्ही #फरसबंदी 'सातवाहन कालीन मार्ग पाहिला. #सातवाहनाच्या काळात बांधल्या गेलेला फरसबंदी मार्गावरून घोडा, गाढवाच्या पाठीवरून त्या काळात येथून वाहतूक होत होती. घाटाच्या तोंडाशी त्या काळात करवसुली केली जात असे. या ठिकाणी एक #शिलालेख, पाण्याचे कुंड व #उगवाईचे मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून काही भाग जंगलातून चालत जावा लागला. यावेळी #करवंदे, #आंबा, #फणस, #काजू, #अंजन, #कांचन वृक्षांची #घनदाट वृक्षराईतून प्रवेश केला. यावेळी निसर्गाचा वेगळा आविष्कार अनुभवता आला.

पहिल्या दिवशीच्या सहलीनंतर आम्ही रात्री सव्वा सातच्या दरम्यान बसमधील साहित्य घेऊन एका मधल्या  मार्गाने चालत जंगलातून वाट काढत - सर्वांच्या हातात #मोबाइल #टॉर्च लावून काळम्मवाडी येथील विश्रामगृहावर मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो.  टॉर्च लावून रात्रीच्या वेळी केलेला एक किलोमीटरचा प्रवास रोमांचकारी आणि अविस्मरणीय होता. मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची, रहाण्याची व्यवस्था संयोजकांनी खूपच चांगली केली होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळ्यांनी सकाळी साडेसहा वाजता नाष्टा केला.त्या दिवशीचा प्रवास बरोबर सात वाजता सुरू झाला. या दिवशीची पहिली भेट #शिवडाव येथील देवराई येथे दिली. त्या ठिकाणी विविध वनस्पतींनी व्यापलेला परिसर, विविध पक्ष्यांचे #आवाज वेगळा अनुभव देऊन जातात. या परिसराची उदय गायकवाड यांनी माहिती दिली.

यानंतर आम्ही मौनी महाराजांच्या आणि #छत्रपती शिवरायांच्या सानिध्याने पुनीत झालेल्या #भुदरगड तालुक्यातील #वेदगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या #पाटगाव मधील #मौनी महाराजांच्या समाधी स्थळी पोहोचलो याठिकाणी महाद्वार, सभामंडप,कोरीव खांबांच्या सजावटी पाहिल्या. हा परिसर शांततेचे आणि पावित्र्याचे प्रत्यंतर देत होता.

या पवित्र भूमीनंतर आमचा प्रवास सुरू झाला........

#नेसरी येथील #सरसेनापती #प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमी स्मारकाकडे या परिसरामध्ये बाग बगीचा, ऐतिहासिक प्रतिकृती, प्रतापराव गुजर यांचे #स्मारक पाहिले. 

त्यानंतर आजरा तालुक्यातील शिरसंगी या गावात असलेल्या महाकाय वटवृक्षाच्या छायेत काही काळ व्यतीत केला. शेकडो वर्षाचा हा साक्षीदार वसुंधरेचं संरक्षण करत अनेक पक्ष्यांचा निवारा बनत, आपली मुळे पारंब्या घट्ट जमिनीत रोवून खड़ा आहे. या वडाच्या झाडाच्या पारंब्या  जमिनीपर्यंत पोचल्या आहेत आणि त्याला पुन्हा खोडाचा आकार प्राप्त झाला आहे. जवळजवळ एक एकरापेक्षाही जास्त जागेत या वटवृक्षाने आपल्या पारंब्या जमिनीत घट्ट रोवल्या आहेत. व आपल्या आक्राळ-विक्राळ रुपाचे दर्शन देत आहे. असा #वटवृक्ष माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिला. प्रत्येकाने आयुष्यात येऊन निसर्गाच्या शक्तीचे व वडाच्या महाकाय रूपाचे दर्शन घ्यायचे असेल तर हा वृक्ष पाहिलाच पाहिजे असे मला वाटते.

पुढे आम्ही अवघड घाट चढत कोल्हापूरपासून दक्षिणेस ५० किमी अंतरावर व #गारगोटी पासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या #पुष्पनगर गावाजवळून प्रवास करत #भुदरगड किल्ल्यावर पोहोचलो. या किल्ल्यावरून चारी बाजूंचे निसर्गाचे सौंदर्य पाहता येते. या ठिकाणी शिवमंदिर, भैरव मंदिर, तटबंदीचे काही अवशेष व दूधसागर तलाव अशी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

या ठिकाणी सर्व पर्यटकांना एकत्र घेऊन समारोपाचा छोटासा कार्यक्रम झाला. पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भुदरगडगड ते कोल्हापूर परतीचा प्रवास सुरू झाला. 

रात्री साडेआठच्या दरम्यान आम्ही कोल्हापुरात पोहोचलो आणि आमची सहल संपली. 

या दोन दिवसांमध्ये प्राचीन #गुहा, #गड, #शिल्पे, #युद्धभूमी, मंदिरांचे व #जंगल दर्शन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील #हातकणंगले, #शिरोळ, #कागल हे तीन तालुके वगळता इतर सर्व नऊ तालुक्यांचा जवळजवळ चारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास झाला. 

या पैकी ९० ते १०० किलोमीटर प्रवास निसर्गाच्या सान्निध्यात जंगलातून झाला. दोन ते तीन किलोमीटर घनदाट #जंगल ट्रेकचा अनुभव घेतला.

या प्रवासात आम्हाला नाचणीची #भाकरी, #मेतकुट, आमटी-भात, पिटले, #दही-खर्डा, कैरीचे लोणचे, #पापड यांचा आस्वाद घेता आला. 

प्रवासामध्ये पर्यटकांच्या सेवेसाठी संयोजक प्रमोद पाटील, उदय गायकवाड, ओमकार गवळी, पारस जाधव, ऋतू काशिद, तनिष्का बेंडके, रणजित पाटील, गणेश व विविध बचत गट या सर्व टीमने आम्हा पर्यटकांना पर्यटणातील प्रत्येक टप्यावर चांगली सेवा दिली.

एकूणचं ही दोन दिवसाची आडवाटेवची सहल, महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील  सहभागी शेकडो साथिदारांच्या साक्षिने अविस्मरणीय ठरली.

- धनाजी माने .....✍️


( माझा हा.लेख ...पूर्वप्रकाशित-  महाराष्ट्र टाईम्स )



बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...