Thursday, July 22, 2021

गुरुपौर्णिमा













आज २३ जुलै आज गुरुपौर्णिमा ........

आपल्या जीवनाच्या प्रवासात पावलोपावली जे -जे गुरु भेटले. ज्यांच्याकडून आपण सुसंस्कार शिकलो असे प्रत्येकजण आपल्या गुरुस्थानीच असतात
पृथ्वी, वारा, अग्नी, सुर्य,जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर , प्राणी ,पक्षी निसर्गातली  प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही  तरी बोध देतच असतो. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येका विषयी कृतज्ञता बाळगतो.
जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्वोच्च स्थानी आहे. म्हणूनच म्हटले आहे....

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा ||
गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः |

जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. म्हणून असे सर्वजण आपले गुरुच असतात.

जे आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करुन
जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून, आनंदी जीवन कसे जगावे, हे आपल्याला शिकवतात.
ते 'गुरु ' .........माझ्या जीवनाच्या प्रवासात असे , जे- जे गुरु पावलोपावली भेटले . त्या सर्व गुरूंच्या पवित्र पावलांना पदस्पर्श करुन मी आज नतमस्तक होतो. मला ज्यांनी प्रकाशवाट दाखवली त्या सर्व गुरुंचा मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्या सर्व गुरूंचा ऋणी आहे.
मूल जेव्हा-जेव्हा घरात असते तेव्हा आई-वडील त्याच्यावर संस्कार करत असतात. त्याला छोट्या- छोट्या गोष्टीतून जीवन कसं जगायचे ते समजावत असतात. आईवडील हेच तर आपले प्राथमिक अवस्थेतले प्रथम आणि महत्वाचे गुरू असतात.
या प्राथमिक अवस्थेमध्ये सुसंस्कारित आई-वडील भेटणं हेही खूप महत्त्वाचं असतं. कारण घरांमधील साध्या - साध्या घटनांवरून मूल शिकत असतं. आणि त्याच्यावरती आई-वडिलांच्या दैनंदिन वर्तनाचे तसेच संस्कार त्या मुलांवरती होत असतात.
घरातील या अनौपचारिक वातावरणात ते बरंच काही शिकत असतं .बोलावं कसं ,वागावं कसं इतरांसोबत रहावं कसं अशा बऱ्याच गोष्टी ते कुटुंबात शिकत असतं. आई-वडिलांच्या या गुरु म्हणून भूमिकांचे ,संस्काराचे बीजारोपण मुलांच्या वर्तनातून दिसत असते.

आपण या अशा अनौपचारिक वातावरणातून जेव्हा एका औपचारिक वातावरणात जातो तेव्हा
आई- वडीलानंतर आपले पहिले गुरू शाळेत गेल्यावर ‘ शिक्षक’ असतात. ते आपल्याला ज्ञान देतात. शाळेमधले ‘ गुरु’ आपल्याला मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांचे ज्ञान देतात.
त्यासोबतच मैदानावर खेळणे, चांगले लेखन, वाचन चार लोकांसमोर बोलण्याचे धाडस शाळेतील गुरुंपासूनच प्राप्त होते.कॉलेजमध्येही आपल्याला वेगवेगळे ‘ गुरु’ मिळतात. भावी पिढीचे डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक घडविण्याचे काम हे गुरु करत असतात. ते आपणाला जीवन जगण्याची कला शिकवतात ते आपल्यापायावरती उभे राहण्याची क्षमता देतात. या ठिकाणीही चांगल्या गुरुंचे संस्कार त्याला त्याच्या आयुष्यात चांगली दिशा देण्यासाठी दिशादर्शक ठरत असतात
गुरु आपला संशय आणि अज्ञान नाहीसे करतो, दुष्ट प्रवृत्ती आणि मानसिक संस्कारांना रुपांतरीत करतात.गुरु फक्त ज्ञानच देत नाहीत तर आपल्यामध्ये प्राणशक्ती, जीवनऊर्जा जागृत करतात. अतिशय तीक्ष्ण बुद्धी म्हणजे बुद्धीमत्ता.गुरूच्या सानिध्यात आल्यावर शोध थांबतो आणि बहरणे सुरु होते.गुरु म्हणजे अनंत, अमर्याद, विशाल आणि सर्व समावेशक अस्तित्व.गुरूच्या एका असण्यामुळे सर्व नाते संबंधांना परिपूर्णता येते.
पण असे गुरु आपल्या आयुष्यात पावलोपावली भेटणे खूप महत्त्वाचे असते. मग ते कोणत्याही क्षेत्रातले असोत.
पण.... असे आज घडते का ❓
आजचे कटू सत्य आपणाला या उदाहरणावरून लक्षात येईल. याला एखादा अपवादही असू शकतो.

एकवेळ एका महाराजांच्याकडे एक आजीबाई तिच्या एका सहा- सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेली. ती महाराजांना म्हणाली, "महाराज, हा माझा नातू खूप गूळ खातो हो ! यावर काहीतरी उपाय सांगा."
महाराज अगदी विनम्रपणे त्या आजीबाईंना म्हणाले "आठ ते दहा दिवसांनी तुम्ही परत या!"
त्याप्रमाणे त्या आजीबाई आठ दहा दिवसांनी पुन्हा
परत आल्या त्या वेळी महाराजांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि महाराज म्हणाले, " हे बाळ ! तू गूळ खात जाऊ नकोस ! "
यावेळी त्या आजीबाई त्या महाराजांवरची खूप चिडल्या आणि म्हणाल्या, " एवढंच सांगायचं होतं, तर ते आठ दिवसांपूर्वीच सांगायचं होतं, मला कशाला परत हेलपाटा घालायला  लावला ? "
यावेळी महाराज अत्यंत विनम्रपणे म्हणाले ,
"हे माते ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा नातवाला घेऊन आलात , त्या वेळी मलाच गूळ खाण्याची सवय आणि मोह  होत होता. आणि त्यामुळेच मला त्या मुलाला गुळ खाऊ नको म्हणून सांगण्याचा अधिकार पोहोचत नव्हता. म्हणून मी त्यावेळी त्याला उपदेश केला नाही. गेल्या आठ- दहा दिवसात मी स्वतः गुळ खाण्याचा मोह सोडून, गुळ खाणे सोडले .त्याच वेळी मी या मुलाला अधिकारवाणीने गुळ खाऊ नको म्हणून उपदेश करु शकतो.तसे सांगण्याचा  अधिकार पोहोचतो. म्हणूनच मी आज त्याला गुळ खाऊ नकोस म्हणून सांगू शकलो."


तर असे हे पूर्वीचे गुरु आपल्याला आपल्या जीवन प्रवासात प्रत्येक क्षेत्रात पावलोपावली भेटत होते. ज्यांची तात्विक बैठक शुद्ध होती आणि करणी आणि कथनी समान असायची म्हणूनच अशा गुरूंविषयी मनामध्ये एक आदरयुक्त भीती असायची. त्यांचे हृदयसिंहासनावरती स्थान अढळ असायचे. आणि अशा गुरूंच्या पावलावरती मस्तक नतमस्तक व्हायचे.

म्हणून जीवनात प्रत्येक ठिकाणी असे योग्य गुरू आपणास लाभले तर योग्य संस्कार होऊन आपण आदर्श जीवन जगू शकतो.
पण.... आज मात्र समाजामध्ये  राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अध्यात्मिक, कौटुंबिक अशा सर्वच क्षेत्रात असे गुरु लाभणे दुर्मिळ झाले आहे. ज्यांच्या करणी आणि कथनी मध्ये कसलाच मेळ नसतो असेच सारे उपदेशक गुरु झालेत.मार्गदर्शक झालेले सर्वत्र दिसतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे.

- धनाजी माने....✍️




बैलपोळा











 कवी यशवंत एका ठिकाणी बैलपोळा सणाबाबत म्हणतात.

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, 

चढविल्या झुली, ऐनेदार....

सण एक दिन, बाकी वर्षभर 

ओझे मर मर, ओढायाचे.

श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने ग्रामीण भागात साजरा करतांना आपल्याला दिसतात.

बळीराजाच्या सुखासाठी दावणीचे बैलं वर्षभर आपल्या मालकासाठी राब-राब राबत असतात. 

शेतीची नांगरट असो,कुळवणी असो की वर्षभर ओझी ओढणी असो. अशी विविध कामे बैल वर्षभर करत असतात.अनेक कष्टाची काम ती वर्षभर आपल्या मालकासाठी करत असतात.

बैलपोळ्या दिवशी मात्र बैलांना  कोणतेही कष्टाचे काम लावले जात नाही. हा दिवस त्यांचा पुर्ण विश्रांतीचा असतो.

शेतकरी आपल्या बैलांना या दिवशी कसलेही कष्टाची काम देत नाहीत.

गोडधोड पुरणपोळीचा घास त्यांना आनंदाने भरवला जातो. जर बैलांची निगा राखणारा गडी असेल तर त्या गडयालाही कृतज्ञता म्हणून नवे कपडे दिली  जातात. त्याचाही तितकाच मान असतो.

पुणे ,मुंबई ,औरंगाबाद, नागपूर अशी मेट्रो शहरं या सणाविषयी कदाचीत अनभिज्ञ असावीत. या शहरातील लोकांची धावपळ पहिली की कधीकधी वाटतं पोळा या सणाची या लोकांना काही माहिती आहे की नाही ❓ असे वाटते. पण याच वेळी या शहरांच्या आसपासची ग्रामीण भागातील लोक आणि संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या सर्जा-राजाचा जिवाभावाच्या सोबत्यांचा हा सण अत्यंत पारंपारीक पध्दतीने आणि आनंदाने आजही साजरा करतांना दिसतो.

पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पध्दत आहे बरं का.

'आज आवतण घ्या उद्या जेवायला या ! '

असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर ,आडावर ,विहीरीवर नेतात, आज ग्रामीण भागातील गावोगावी नळाचे पाणी असल्याने अनेक जण आपल्या घराजवळच नळावरतीच पाईप लावून त्यांना आंघोळ घालतात. आंघोळीनंतर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना रंग बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जातात.  सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार  करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पुजा करतात.

बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधुन बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल - ताशे ,लेझीम, हालगी  ,घुमके, झांच,बेंजो ,नगारे जे -जे ज्या भागात उपलब्ध आहे ते वाजवले जाते.

पोळयाची गितं म्हंटली जातात. येथे बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला बक्षिसही दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघतांना बैलांना घरोघरी नेले जाते. तेथे गावातील बायाबापड्या बैलांची पुजा करतात. बैल नेणाऱ्यास ’बोजारा’  देण्यात येतो.

बोजारा म्हणजेच पैसे दिले जातात

हिंदू संस्कृती ही महान संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृती मध्ये वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानले जाते. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांच्याप्रती कृतज्ञता आणि याच कृतज्ञतेतून एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो.

कवयित्री बहिणाबाई चौधरी एका ठिकाणी म्हणतात- 

"आला आला शेतकऱ्या, 

पोयाचा रे सन मोठा, 

हातीं घेईसन वाट्या, 

आतां शेंदूराले घोटा, 

आतां बांधा रे तोरनं, 

सजवा रे घरदार ..."

एकूणच - पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही ग्रामीण भागामध्ये साजरे केले जातात.आणि हिंदू संस्कृती मधील ही परंपरा आजही लोक मोठ्या आनंदाने जपतात .

- धनाजी माने....✍️

9403963934

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...