🪔 Happy Diwali !🪔
दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, हा भारतात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते.पणती ,समई,नंदादीप ,निरांजन ,दीपमाळ सारीच तर प्रकाशाची रूपे.रंग रूप वेगवेगळे मात्र धर्म एकच, उजेडानं अंधार मिटविण्याचा !असा हा दीपोत्सव !!
या पर्वातील विविध दिवसांचे महत्व जाणून घेऊयात…
वसुबारस
भारत हा कृषीप्रधान देश. शेतीसाठी बैल हा अत्यंत उपयुक्त प्राणी. जो आपल्याला धान्य पिकविण्यासाठी मोलाची मदत करतो, काबाड- कष्ट करतो त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैल पोळा सण साजरा करतात. बैलाला सजवतात, गोडधोड खाऊ घालतात अगदी ओवाळतात सुध्दा. अशा बैलाला जन्म देणारी,
दुधदुभते देणारी, खतासाठी तसेच घर सार- विण्यासाठी शेण देणारी औषधी असे गोमुत्र देणारी गोमाता ही देवतेसमान ठरली.
वसुबारस हा तिचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे धन, रत्न आणि बारस म्हणजे द्वादशी.कार्तिक कृ.द्वादशीला हा सण साजरा करतात. गोधना मुळे शेतीत विपुल धान्य पिकवलेजाते, त्यातूनच संपत्ती निर्माण होते.म्हणून त्या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात,गाईच्या गळ्यात हार घालतात, तिला कुंकू लावतात,कामधेनूचे स्मरण करत पक्वान्न खाऊ घालतात. दारात रांगोळी काढतात. घरात लक्ष्मीचे / संपत्तीचे आगमन व्हावे या इच्छेने हा सण साजरा करतात. दिवाळीचा हा पहिला दिवस.
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपूज्य जी वंद्य या भारताला नमस्कार माझा त्या दिव्य गो देवतेला ।
धन्वंतरी -
अश्विन कृष्ण त्रयोदशी धन्वंतरी जयंती
ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघट चारुदोर्भिश्चतुर्भिः । सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम ||
कालाम्भोदोज्ज्वलांग कटितटविलसच्चारु पीतांबराढ्याम । वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम ||
आम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो
श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना
धन्वंतरी
याला विष्णूचाच अंशावतार मानतात. समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली त्यांत धन्वंतरीची गणना आहे. तो वैद्यराज असून समुद्रातला अमृतकलश त्यानेच वर आणला. त्याच्याच अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृताच्या रुपाने देवांना प्राप्त झाले व ते अजरामर झाले. धन्वंतरीला विष्णूच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्याने वैष्णव मूर्तीत त्याला स्थान मिळाले. शिल्पयंत्र ग्रंथात त्याच्या मूर्तीची लक्षणे ग्रंथीत झाली आहेत ती या प्रमाणे- चतुर्भूज, तेजस्वी, पीतवस्त्रधारी, एक हात अभय मुद्रेत व इतर हातात कमळ, अमृतघट आणि जळू धनत्रयोदशीच्याच दिवशी या वैद्यराजाचे पूजन करतात व आरोग्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतात.
धनत्रयोदशी -
प्राणिमात्रांच्या जीवनाची मुदत संपल्यावर त्यांचे प्राण हरण करणाऱ्या यमधर्माने एकदा आपल्या दूतांस विचारले की, यमपाश घालून प्राण हरण करताना तुम्हाला कोणाची दया आली होती का ? दूतांनी सांगितले की एकदा हैम नावाच्या राजाच्या मुलाचा विवाह थाटात चालला असता राजपुत्राला सर्पदंशाने मरण आले. त्या वेळी त्याचे प्राण हिरावून घेताना आम्हाला खूप वाईट वाटले. अशा आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. असा प्रसंग कोणावर येऊनये असे काही करावे ही आपणाला विनंती. दूतांचे भाषण ऐकून यमधर्म म्हणाले, अश्विन कृष्ण त्रयोदशी पसून पाच दिवस रोज प्रदोषकाली म्हणजे सूर्यस्तानंतर सर्वठिकाणी जो दीपोत्सव करील त्याला तुमच्या इच्छे प्रमाणे मृत्यू येणार नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला दिवे अर्पण करायची प्रथा आहे. त्या दिवशी जरी फारसे दिवे लावत नसले तरी फक्त त्याच दिवशी दिव्याची ज्योत दक्षिणेकडे ठेवतात.
🚩हे ही माहिती असावे - मध्यप्रदेशात माळव्यात
या दिवशी एखादे तरी भांडे खरेदी करायची प्रथा आहे. या दिवशी इंदूर मधला बर्तन बाजार. रस्त्यावर पायघड्या पसरवून ग्राहकांसाठी सज्ज झालेला असतो. दोन मजल्यांपर्यंत भांड्यांची उतरंड लावलेली असते.
नरकचतुर्दशी-
श्री लक्ष्मी -गजलक्ष्मी
समुद्रमंथनातून वर आलेल्या लक्ष्मीने क्षीरसमुद्रावरील शेषशायी विष्णूच्या गळ्यात माळ घालून ती त्याची अर्धांगी झाली. ऋग्वेदा नुसार श्री व लक्ष्मी या दोन देवता होत. दोघी विष्णूच्या भार्या. पुढे श्रीदेवी आपले वेगळे अस्तित्व सोडून लक्ष्मीत विलीन झाली. लक्ष्मी संपत्तीची अधिष्टात्री देवता. ही दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनोकामना पूर्ण करते,
लक्ष्मीपूजनासंबंधी एक कथा —
फार पूर्वी बली नावाचा एक मोठा वैभवशाली, पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने आपल्या संपत्तीच्या व पराक्रमाच्या जोरावर देवादिकांना कारागृहात कोंडून ठेवले. प्रत्यक्ष लक्ष्मीला सुध्दा बलीच्या बंदिशालेत रहावे लागले. त्यावेळी श्रीविष्णूंनी वामन अवतार घेऊन बली राजाला पाताळात पाठविले व देवांचे प्रभुत्व पुनः प्रस्थापित केले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका झाली. लोकांना खूप आनंद झाला. तेव्हा पासून लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायमचा असावा म्हणून अश्विन अमावस्येला तिची पूजा केली जाऊ लागली. लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरापुढे रांगोळी काढली जाऊ लागली.
🚩हे ही माहिती असावे - बिहार मधील राजगीर जवळील पावापुरी या पुण्यभूमीत अश्विन अमावस्या, ख्रिस्त पूर्व ५२८,महावीर स्वामी शिष्यांना उपदेश करीत असता, पद्मासन घालून स्थिर झाले व देहत्याग केला. भगवान कर्मबंधातून मुक्त झाले. निर्वाणाप्रत गेले. म्हणून देहत्याग सुध्दा उत्सवात परिगत झाला. अग्निसंस्कारानंतर महावीर स्वामींच्या भक्त मंडळी तेथील रक्षा नेऊ लागले. रक्षा संपल्यावर माती नेऊ लागले. काही दिवसांत तेथे मोठा खड्डा तयार झाला. मग त्या खड्डयात पाणी पाझरुन तळे झाले. कालांतराने त्या तळ्यात महावीर स्वामींची स्मृती म्हणून जलमंदिर निर्माण केले गेले.दिवाळीत सर्व जैन मंदिरांत या दिवशी उत्सव साजरा करतात.
बलिप्रतिपदा -
कार्तिक शुध्द प्रतिपदेस बलिप्रतिपदा किंवा गोवर्धनप्रतिपदा असेही म्हणतात. श्रीकृष्णाच्या काळात, इंद्राच्या प्रकोपामुळे प्रचंड पाऊस पडला, प्रलय सदृष्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा कृष्णाने आपल्या करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला व त्या खाली आपल्या गोपालांना, गायी, गुरांना आश्रय दिला अशी कथा आहे.
🚩पूर्वी बली नावाचा एक विख्यात चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो दैत्यकुलोत्पन्न विष्णूभक्त प्रल्हादाचा नातू होता. देवांचेही राज्य त्याने जिंकले होते. तो सदाचरणी व पापभिरू होता. त्याच्या दातृत्वाची कीर्ति दिगंतरात पसरली होती.त्याची सत्ता दशदिशांस पसरली असून प्रजा आनंदात होती. परंतू एकदा गर्वाने परमेश्वराचे माझ्यापुढे काय चालणार असे उद्गार काढले. बलीचे गर्वहरण व्हावे व देवांचे राज्य परत मिळावे म्हणून विष्णूने वामन अवतार घेऊन ठेंगू ब्राह्मणाचे रुप धारण करुन बलीने चालविलेल्या यज्ञाच्या वेळी हजर राहून आपल्या विद्वत्तेने राजास चकीत केले. संतुष्ट झालेल्या राजाने तुला काय हवे ते माग असे सांगताच ' त्रिपाद भूमि' दान मागितली. बलीने वामनाच्या हातावर दानाचे उदक सोडताच वामनाने विश्वरुप धारण केले. . दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला आणि तिसरे पाऊन कोठे ठेऊ असे विचारताच बलीने आपले मस्तक नमविले. वामनाने आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेऊन बलीला पाताळात लोटले अशी कथा आहे.
याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.
घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.
उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.
यमद्वितिया / भाऊबीज -
'बहीण-भाऊ यांचे नाते एक विशेष आणि अलौकिक असे स्नेहबंधन असते. एकमेकांच्या सुखाकरता झटावे, ही त्यांची आतील माया असते. दुःखात वा संकटात एकमेकांना साहाय्य करण्यासाठी बहीण भावाकडे अन् भाऊ बहिणीकडे जात असतो. या कौटुंबिक स्नेहाला उजाळा देण्याचा हा दिवस !
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे.
कार्तिक शुध्द द्वितीया म्हणजेच यमद्वितीया किंवा भाऊबीज. या दिवशी मृत्युदेव यमाने आपली बहीण यमी हिच्या घरी आनंदाने भोजन केले आणि वस्त्रालंकार भेट दिले अशी कथा आहे. यमाची पिडा होऊ नये व दीर्घायुष्य लाभावे म्हणून हा दिवस साजरा करतात. सहोदर भगिनी नसल्यास चुलत, मामे, आते किंवा मानलेल्या भगिनीकडे जाऊन यथाशक्ती भेट वस्तू देतात. यम व यमी ही जुळी भावंडे. यमराज सद्वर्तनी व सनातन धर्माचा अभिमानी होता. त्याने यमीस सदुपदेश करुन सध्दर्माचे रहस्य सांगितले अशी वेदांत कथा आहे.
'भाऊबीज' हा बहीण-भावाच्या मंगल आणि पवित्र प्रेमाचा दिवस भारतीय संस्कृतीतील 'सोनेरी पान' आहे. निःस्वार्थी बहीण भावाकडून केवळ प्रेमाचीच अपेक्षा करते.
'नको धन, नको मुद्रा, नको मोतियांचा हार ।
देई प्रेमाश्रूंची धार, भाऊराया ॥'
एवढीच तिची बंधूरायाकडून अपेक्षा असते. भाऊ नसलेल्या स्त्रिया चंद्राला स्वतःचा भाऊ मानून त्याला ओवाळतात. 'भाऊबिजेच्या दिवशी भावाने स्वतःच्या घरी जेवू नये. पत्नीच्या हातचे अन्न खाऊ नये. बहिणीच्याच घरी जाऊन तिच्या हातचे अन्न खावे', असे सांगितले आहे.'
-धनाजी माने...✍️
dhanajimane123@gmail.com